रे, मिकॉलाय : (४ फेब्रुवारी १५०५–१५६९). पोलिश साहित्यिक. जन्म झोरावनो येथे. स्वप्रयत्नाने त्याने शिक्षण घेतले. १५४६ मध्ये कॅल्व्हिन पंथाची दीक्षा त्याने घेतली. पोलिश भाषेतील लेखनाला त्याने प्रतिष्ठा आणि वाचकवर्ग ह्यांची प्राप्ती करून दिली. त्याने काव्यलेखन केले असले, तरी त्याची ख्याती मुख्यतः त्याच्या गद्यलेखनासाठी आहे. ‘लाइफ ऑन ॲन ऑनरेबल मॅन’ (इं. शी.) ह्या त्याच्या गद्यकृतीत त्याने उभे केलेले आदर्श पोलिश सरदाराचे चित्र प्रसिद्ध आहे. त्यावरून तत्कालीन पोलंडमधील समाज स्थितीचीही कल्पना येते. मिकॉलायची लेखनशैली संपन्न आणि प्रत्ययकारी आहे. बायबलचे विवेचन करणाऱ्या त्याच्या लेखनातून (… Postilla) त्याचा ईश्वरविद्येचा व्यासंग प्रत्ययास येतो. त्याने काही नाटकेही लिहिली आहेत. पोलिश गद्याला त्याने विकासाच्या दिशेने नेले.
कुलकर्णी, अ. र.