रेक्याव्हीक: आइसलँडची राजधानी, प्रमुख बंदर आणि व्यापारी, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या ९१,३९४ (डिंसेंबर १९८६). रेक्याव्हीक हे सेल्ट-जार्नार द्वीपकल्पाच्या उत्तर बाजूवर, फाक्सा उपसागराच्या आग्नेय भागात लाव्हा रस वाहणाऱ्या व उष्ण झऱ्यांच्या प्रदेशात वसले आहे.
आइसलँडमधील पहिला रहिवासी नॉर्वेजियन इंगोल्फर आर्नॉरसन याने ८७४ मध्ये एक स्थायी वसाहत उभारली. ही वसाहत म्हणजेच सांप्रतचे रेक्याव्हीक होय. नऊ शतकांच्या कालावधीनंतर या जागी लोकरी कापडाच्या कारखान्याची उभारणी झाली, तेव्हा रेक्याव्हीकचा पाया घालण्यात आला, असे मानले जाते. विसाव्या शतकापर्यंत रेक्याव्हीक हे एक लहानसे मच्छीमार गाव होते आणि त्यावर डेनांची सत्ता व रहिवास होता. १७८६ मध्ये त्याला नगरपालिकेचे अधिकार देण्यात येऊन डॅनिश वर्चस्वाखाली असलेल्या आइसलँड बेटाचे प्रशासकीय केंद्र म्हणून ते घोषित करण्यात आले. १८४३ पासून येथे संसद (आल्थिंग) भरू लागली. पुढे ते १९१८ मध्ये डॅनिश राज्यसत्तेच्या आधिपत्याखालील तथापि स्वयंशासित आइसलँडचे राजधानीचे शहर बनले. १९४४ मध्ये आइसलँड स्वतंत्र झाल्यानंतर रेक्याव्हीक त्या प्रजासत्ताकाची राजधानी घोषिक करण्यात आली.
उष्ण झऱ्यांच्या वाफेवरून शहराला रेक्याव्हिक (धुराचा उपसागर) असे नाव पडले असावे. या उष्ण झऱ्यांमधून वाहणाऱ्या उकळत्या पाण्यामुळे रेक्याव्हीकला उबदारपणा लाभला आहे. जगातील अतिउत्तर भागाकडील प्रदेशात रेक्याव्हीक वसलेले असूनही तेथील हिवाळे अत्यंत सौम्य असतात. त्यायोगे रेक्याव्हीक बंदर कधीही गोठत नाही. जानेवारीचे सरासरी तापमान –१० सें., तर जुलैचे सरासरी तापमान ११० से. असते. भूकंपाच्या भीतीमुळे, रेक्याव्हिकमधील बहुतेक सर्व इमारती प्रबलित काँक्रीटच्या बांधलेल्या आहेत. आइसलँडच्या मोठ्या प्रमाणावरील मासेमारी उद्योगाला आवश्यक असलेले बंदर म्हणून रेक्याव्हीकला महत्त्व आहे. शहरात माशांवर प्रक्रिया करणे, गोठविणे व डबाबंद करणे यांचे कारखाने असून कॉड माशांचे तेल उत्पादन, जहाजबांधणी, खाद्यपदार्थ, कापड तसेच छपाई हे उद्योगही महत्वाचे आहेत. यूरोप आणि उत्तर अमेरिका यांच्याशी रेक्याव्हीक हे हवाईमार्ग तसेच जलमार्ग यांनी जोडण्यात आले आहे. शहरात एक विमानतळ असला, तरी नैर्ऋत्येस ३२ किमी. वरील केप्लाव्हीक येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पर्यटन उद्योग मोठ्या प्रमाणावर व झपाट्याने विकास पावत असल्याने शहरात अनेक आधुनिक व दर्जेदार हॉटेले बांधण्यात आली आहेत. सबंध शहरातून गरम पाण्याचे नळ आसमंतीय उष्ण झऱ्यांच्या योगे फिरविण्यात आले आहेत.
शहरातील प्रेक्षणीय वास्तूंमध्ये आल्थिंग हाउस (संसदभवन) राष्ट्रीय ग्रंथालय (१९१८), आइसलँड विद्यापीठ (१९११), राष्ट्रीय संग्रहालय, राष्ट्रीय रंगमंदिर, नौकानयन शाळा इत्यादींचा समावेश होतो. शहरातील अनेक पुतळ्यांपैकी लेव्ह एरिकसन या खलाशाचा पुतळा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी १९३० मध्ये आइसलँडच्या आल्थिंगला स्थापन होऊन १,००० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आइसलँडला भेट म्हणून बहाल केला.
गद्रे, वि. रा.