रूटेलीझ : (सताप गण). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका गणाचे शास्त्रीय नाव. ह्यामध्ये ⇨रूटेसी (सताप कुल), ⇨मेलिएसी (निंब कुल), ⇨सिमॅरुबेसी (महानिंब कुल) व ⇨बर्सेरेसी (गुग्गुळ कुल) या चार कुलांचा हल्ली समावेश केलेला सामान्यपणे आढळतो. त्यांचे परस्परांशी आप्तभाव आहेत याबद्दल दुमत नाही. ही व्यवस्था ए. बी. रेंडेल यांनी मान्य केली आहे. एंग्लर व एल्. डील्स यांनी मांडलेल्या पद्धतीत ⇨जिरॅनिएलीझमध्ये (भांड गणात) ६ उपगण व २१ कुले घातली आहेत व त्यांपैकी जिरॅनिनी या उपगणात १२ कुले अंतर्भूत केली आहेत त्यांनी रूटेलीझ गण मानलेली नाही. आर्. वेटश्टाइन, रेंडेल व एच्. हॅलियर यांनी त्या सर्व २१ कुलांचा ३ गणांत समावेश केला असून जे. हचिन्सन यांनी फक्त जिरॅनिनी उपगणामधील कुलांचे ४ गण केले व त्यात रूटेलीझ गणास मान्यता दिली परंतु रूटेलीझमधून मेलिएसी कुल काढून त्याचा अंतर्भाव मेलिएलीझ (निंब गण) ह्या स्वतंत्र गणात केला. रूटेलीझचे जिरॅनिएलीझ निएलीझ गणाशी बरेच साम्य आढळते तथापि अवकिंज बिंब, बहुधा आढळणारे तैल प्रपिंड, दोन केसरमंडलांपैकी बाहेरचे पाकळ्यांसमोर व आतील मंडल पाकळ्यांशी एकांतरित (एकाआड एक) आणि वनस्पतींचे सामान्यतः वृक्षस्वरूप इ. रूटेलीझमधील महत्त्वाची लक्षणे विचारात घेऊन हा गण स्वतंत्र केला आहे. रूटेलीझचे आप्तसंबंध ⇨झायगोफायलेसी या कुलाशी (गोक्षुर कुलाशी) असल्याचे मान्य झाले असून हॅलियर यांनी रूटेलीझचा उगम व विकास -होडेलीझ [⟶ फ्यूमॅरिएसी] गणामधून झाला असावा, असे मत व्यक्त केले आहे.

पहा : जिरॅनिएलीझ.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomay of Vascular Plants, New York, 1965.

2. Mitra J. N. An Introduction to Syatematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants. Vol. ll, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.