रूका : हा एक नेहमी आढळणारा बिनविषारी साप आहे. वृक्षसर्पापैकी हा एक असून कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिडी या उपकुलात त्याचा समावेश होतो. भारताचा सगळा दक्षिण भाग, हिमालयाचा पूर्व भाग, पश्चिम घाट, आसाम इ. ठिकाणी तो आढळतो. याचे शास्त्रीय नाव डेंड्रोलाफिक ट्रायस्टिस असे आहे.
रूका हा एक देखणा साप असून त्याची लांबी १२२ सेमी. पर्यंत असते. नराची लांबी मादीपेक्षा कमी असते. शेपूट शरीराच्या एकंदर लांबीच्या एकतृतीयांश असते. मुस्कट लांब आणि गोलसर असते. वरचा ओठ पिवळा असतो. डोळे मोठे असतात. बाहुली वाटोळी आणि तिच्याभोवतालचा पडदा सोनेरी रंगाचा असतो. मान स्पष्ट असते. शरीर सडपातळ असते. पाठ बिरंजी रंगाची असून तिच्या वरील प्रत्येक खवल्याची कडा निळसर काळ्या रंगाची असते. काही नमुन्यांमध्ये पाठ निळसर काळ्या रंगाची असून तिच्या दोन्ही बाजूंवर फिक्कट पिवळ्या रंगाचे लांब पट्टे असतात. पोटाचा रंग पिवळा पण कधी कधी हिरवा किंवा खाकी असतो.
रूका बहुधा झुंडपावर व झाडांवर राहतो. भातशेतांच्या बांधावरही तो राहात असल्याचे दिसून येते. हालचाल न करता तो स्वस्थ असला म्हणजे झाडाच्या एखाद्या फांदीसारखा दिसतो. बहुधा झांडाच्या वाळलेल्या फांद्यांवर तो राहात असल्यामुळे व त्याच्या शरीराच्या संरक्षक रंगामुळे तो दिसून येत नाही.
रूका हा एक चपळ साप आहे त्याच्या सगळ्या हालचाली द्रुत गतीने होत असतात. जमिनीवर तो झपाट्याने सरपटत जातो. तसाच झाडावरही जलद चढतो. इतर वृक्षसर्पांप्रमाणे तो एका झाडावरून दुसऱ्याह जवळच्या झाडावर उडी मारू शकतो. हा नेहमी दिवसा बाहेर हिंडताना दिसतो. लहान पक्षी, पक्ष्यांची अंडी, सरडे, पाली खाऊन हा आपली उपजीविका करतो. स्वभावाने तो भित्रा असला, तरी चवताळल्यावर तो उग्र दिसतो आणि जोराने प्रहार करतो.
मादी एका खेपेला ६−७ अंडी घालते आणि थोड्याच दिवसांत त्यांतून पिल्ले बाहेर पडतात.
पहा: वृक्षसर्प.
कर्वे, ज. नी.