रुबिडियम : धातुरूप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Rb अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ३७ अणुभार ८५·४७ आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्ठकरूप मांडणीतील ⟶ आवर्त सारणी] गट १ अ वितळबिंदू ३८°·५ से. उकळबिंदू ७००° से. सरासरी घनता १·५३ ग्रॅ./घ. सेमी. नैसर्गिक समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) ८५ व ८७ यापैंकी रुबिडियम (८५) स्थिर व रुबिडियम (८७) किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याचा गुणर्धम असणारा) असून याचा अर्धायुकाल (किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काल) ५×१०१० वर्षे आहे. याच्या इतर कृत्रिम आठ किरणोत्सर्गी समस्थानिकांचे द्रव्यमानांक ८१ ते ८४, ८६ आणि ८८ ते ९० असे आहेत. समस्थानिक ८३ चा अर्धायुकाल ८३ दिवस व ८४ चा अर्धायुकाल ३३ दिवस आहे. उरलेल्या समस्थानिकांचे अर्धायुकाल काही मिनिटांपासून काही तासांपर्यत आहेत. इलेक्ट्रॉन विन्यास (अणुकेंद्रातील विविध कक्षांतील इलेक्ट्रॉनांची संख्या) २, ८, १८, ८, १. संयुजा [इतर अणूशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक ⟶ संयुजा] १. ही धातू रुपेरी पाढंरी, मेणासारखी मऊ व अतिक्रियाशील आहे. ती सुरक्षित राहण्यासाठी रॉकेलमध्ये ठेवावी लागते.
इतिहास : रुबिडियमाचा शोध जर्मनीमध्ये रोबेर्ट व्हिल्हेल्म बन्सन व गुस्टाफ रोबेर्ट किरखोफ या रसायनशास्त्राज्ञांनी १८६१ मध्ये लावला. जर्मनीतील बाट ड्यूर्क्हाइम येथील ४० टन खनिज पाण्याचे बाष्पीभवन करून उरलेल्या गाळातून हे मूलद्रव्ये मिळविले गेले. याच्या वर्णपटातील निळ्या भागात दिसणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गडद तांबड्या रेषांवरून या मूलद्रव्याचे अस्तित्व लक्षात आले. लॅटिन शब्द रुबिडस (अतिगडद तांबडा) यावरून त्याचे नाव रुबिडियम असे ठेवले आहे.
आढळ : पृथ्वीच्या कवचात आढळणाऱ्या मूलद्रव्यांच्या विपुलतेच्या प्रमाणानुसार रुबिडियमाचा चौतिसावा क्रमांक व सागरी पाण्यात आढळणार्याम मूलद्रव्यांच्या विपुलतेच्या प्रमाणानुसार हिचा अठरावा क्रमांक लागतो. हिचे प्रमाण पृथ्वीच्या कवचात दर दशलक्ष भागांत ३१० भाग व सागरी पाण्यात दर दशलक्ष भागांत ०·२ भाग इतके असते. मुख्यतः ⇨लेपिडोलाइट या खनिजापासून रुबिडियम मिळते. या खनिज Rb2O जास्तीत जास्त ३ टक्के आढळते. हे खनिज ऱ्होडेशियामध्ये पुष्कळ प्रमाणात सापडते. कार्नालाइट व पोल्युसाइट या खनिजांमध्येही रुबिडियम आढळते. ही खनिजे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये आढळतात.
निर्मिती : १८६१ साली बन्सन यांनी रुबिडियम क्लोराइडाचे विद्युत् विच्छेदन (विद्रावातून वा वितळलेल्या संयुगातून विद्युत् प्रवाह नेऊन त्यातील घटक अलग करण्याची क्रिया) करून सर्वप्रथम रुबिडियम धातू तयार केली. रुबिडियम कार्बोनेट वा क्लोराइड अनुक्रमे मॅग्नेशियम वा कॅल्शियम धातूबरोबर निर्वात नळीत तापवून ⇨क्षपणाने रुबिडियम धातू मिळविता येते. अझाइडापासून (RbN3) ऊष्मीय अपघटनाने (उष्णतेच्या साहाय्याने मोठ्या रेणूचे लहान रेणूंत तुकडे करणाऱ्या क्रियेने) शुद्ध रुबिडियम मिळते. हिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही. लेपिडोलाइटापासून लिथियम, कार्नालाइटापासून पोटॅशियम किंवा पोल्युसाइटापासून सिझियम तयार करताना उप-उत्पादन म्हणूनच रुबिडियमाचे उत्पादन केले जाते.
संयुगे : रुबिडियम क्षारीय धातू गटात (लिथियम, पोटॅशियम इ. धातूंचा समावेश असलेल्या आवर्त सारणीतील १ अ गटात) असल्यामुळे तिचे गुणधर्म व संयुगे सोडियम व पोटॅशियम या मूलद्रव्यांसारखेच आहेत. मात्र रुबिडियम पोटॅशियमापेक्षा जास्त विक्रियाशील आहे. रुबिडियम धातू हवेमध्ये उघडी राहिल्यास जलदरीत्या काळवंडते व ऑक्साइडचा थर तयार होऊन ती पेट घेते. रुबिडियमाची ऑक्सिजनाबरोबर विक्रिया होऊन Rb2O (पिवळे), Rb2O3 (गडद तपकिरी), Rb2O3 (काळे), Rb2O3 (काळे), RbO3 (गडद नारिंगी) या ऑक्साइडचे मिश्रण तयार होते. तिची −१००° से. तापमानाखालील पाणी किंवा बर्फ याबरोबर जोरदार विक्रिया होते आणि हायड्रोजन मुक्त होऊन रुबिडियम हायड्रॉक्साइड तयार होते. ब्रोमीन किंवा क्लोरीन याबरोबर जोरदार विक्रिया होऊन हिची लवणे तयार होतात. धातवीय उत्प्रेरक (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिचा वेग बदलण्यास मदत करणारा पदार्थ) असताना ही द्रव अमोनियात विरघळते आणि उत्प्रेरकाशिवाय वायुरूप अमोनियाबरोबर रुबिडियम अमाइड (RbNH2) मिळते. रुबिडियम ही सिझियमाप्रमाणे बहुहॅलइडे तयार करते. अशी हॅलाइडे क्षारीय धातू गटातील इतर मूलद्रव्ये तयार करीत नाहीत. या गटातील इतर मूलद्रव्यांच्या जटिल लवणांपेक्षा रुबिडियमाची लवणे जास्त स्थिर असतात. कार्बनी धनायनांबरोबर (धन विद्युत् अग्राकडे जाणाऱ्या) आयनाबरोबर म्हणजे विद्युत् भारित अणू, रेणू वा अणूगटांबरोबर) रुबिडियमाचीही संयुगे तयार होतात.
अभिज्ञान : (अस्तित्व ओळखणे). रुबिडियमाची बाष्पनशील (वाफेच्या रूपात उडून जाणारी) लवणे वायू ज्वालकाच्या ज्योतीत धरली असता त्यांना लाल रंग येतो. तसेच उत्सर्जन वर्णपटाच्या [⟶ वर्णपटविज्ञान] साहाय्यानेही रुबिडियम ओळखता येते. परिणामात्मक दृष्ट्या ती ओळखण्यासाठी ⇨ज्योत प्रकाशमापन पद्धतीचा उपयोग करता येतो.
उपयोग : ⇨सिझियम व तिची संयुगे यांसारखे रुबिडियम व तिच्या संयुगाचे उपयोग होतात. रुबिडियम धातूचा उपयोग प्रकाशविद्युत् घट [⟶ प्रकाशविद्युत्] आणि इलेक्ट्रॉन नलिका [⟶ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] यांच्या निर्मितीमध्ये होतो तसेच तिच्या लवणांचा उपयोग काच व मृत्तिका उद्योगांत होतो. नैसर्गिक किरणोत्सर्गी समस्थानिक रुबिडियम (८७) याचा वापर सूर्यकुलाचे वय निश्चित करण्याकरिता केला गेलेला आहे. सूर्यकुलाचे अंदाजित वय ४·५ अब्ज वर्षे हे अशनीमधील (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचलेल्या पदार्थामधील) रुबिडियम (८७) चे स्ट्राँशियम (८७) मध्ये होणाऱ्या रूपांतरणावर [म्हणजे रुबिडियम (८७) व स्ट्राँशियम (८७) यांच्या गुणोत्तरावर] आधारित आहे. ⇨गलगंड व ⇨उपदंश या रोगांवरील उपचारांमध्ये रुबिडियम संयुगाचा उपयोग होतो.
जमदाडे, ज. वि. घाटे, रा. वि.