रुद्रांबा : (कार. १२६२ ते १२९५). आंध्र प्रदेशातील काकतीय वंशातील एक पराक्रमी व लोकहितदक्ष राणी. गणपतिदेवाच्या (वडिलांच्या) मृत्यूनंतर ती १२६२ मध्ये वरंगळच्या गादीवर आली. इतिहासात ही रुद्रादेवी, रुद्रांबा, रुद्रमहादेवी, रुद्रमांबा, रुद्रदेव, रुद्राम्मा इ. विविध नावांनी प्रसिद्ध आहे.

हिच्याविषयीची माहिती शिलालेख, तत्कालीन वाङ्मय आणि मार्को पोलोचे प्रवासवृत्त यांतून मिळते. गणपतिदेव (११९९−१२६२) याचा पुत्र नसल्यामुळे त्याने आपले राज्य मुलीकडेच सोपविले. त्याच्या अखेरच्या दिवसांत तीच प्रत्यक्षात सर्व राज्यकारभार पहात असावी. तिचे लग्न चालुक्य वंशीय सरदार वीरभद्रेश्वर याच्याबरोबर झाले होते. तिने पतीच्या मृत्यूनंतर धरणीकोट येथे राज्य केल्याचे उल्लेख सापडतात परंतु तिचे बरेचसे आयुष्य माहेरीच गेले व गणपतिदेवानंतर सर्व राज्याची धुरा तिच्याच हाती आली.

रुद्रांबा गादीवर आली त्यावेळी राज्यात अस्थिरता होती. कर्लिग राजांनी वेंगी भागात धुमाकूळ घातला होता. दक्षिणेत कडप्पा-कर्नूल भागात जन्निगदेव, त्रिपुरांतकदेव, अन्नयदेव वगैरे सरदारांनी बंड पुकारले. मदुरेचा पांड्य राजा जटावर्मन याने नोलोरवर स्वारी केली. कांचीचे पल्लव गुंतूर जिल्ह्यात धामधूम करू लागले व शेजारचा यादव राजा महादेव याने तिच्या प्रदेशावर स्वारी करून तिचा पराभव केला. अशा वेळी रुद्रांबा डगमगली नाही. आपल्या सरदारांच्या मदतीने तिने परकीय व स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला. यादवांच्या बरोबर तह केला व अनेक वर्षे शांततेने राज्य केले.

ती स्वतः अत्यंत कर्तव्यदक्ष व हुशार होती. पुरुषी वेश घालून, रुद्रदेव या नावाने ती राज्यातून फिरे. तिचा कारभार चोख होता व प्रजा सुखी होती. त्या काळात काकतीयांचे राज्य समृद्ध आणि भरभराटीत होते, असे मार्को पोलो आपल्या प्रवासवर्णनात म्हणतो.

पहा : काकतीय वंश.

संदर्भ : 1. Yazdani, G. Ed. Early History of the Deccan, parts VII–XI, London, 1960.

२. कृष्णाकुमार, वरंगळचे काकतीय राजे, नांदेड, १९४८.

देशपांडे, सु. र.