बोलीव्हार, सीमॉन : (२४ जुलै १७८३ – १७ डिसेंबर १८३०). दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींचा मुक्तिदाता व कोलंबिया प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. काराकास (व्हेनेझुएला) येथे एका स्पॅनिश उमराव घराण्यात जन्म. लहानपणीच आईवडील वारले तथापि त्यांनी ठेवलेली संपत्ती आणि चुलत्याचे साह्य यांमुळे त्याने यूरोपातील विविध देशांत शिक्षण घेऊन माद्रिद (स्पेन) येथे कायद्याची पदवी घेतली. यूरोपमधील वास्तव्यात त्याच्यावर तत्कालीन ज्ञानयुगातील विचारवंतांचा तसेच अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनचा उदय इ. घटनांचा विशेष प्रभाव पडला. माद्रिद येथे त्याने स्पॅनिश उमराव घराण्यातील मारिया तेरेसा द तोरा या युवतीबरोबर विवाह केला (१८०१) तथापि १८०२ साली तिचे अकाली निधन झाले. बोलीव्हारच्या पुढील काळातील कर्तृत्वाशी या दुःखद घटनेचा मोठा संबंध असावा !

नेपोलियनच्या राज्यारोहणास तो पॅरिसमध्ये होता. या घटनेचा त्याच्यावर विशेष प्रभाव पडला. पॅरिसमध्ये अलेक्झँडर फोन हंबोल्ट या भृगोलवेत्त्याशी त्याची ओळख झाली. त्यामुळे त्याच्या मनातील दक्षिण अमेरिकेच्या मुक्तिसंग्रामाच्या संकल्पास चालना मिळाली. स्पेनची राजवट नेपोलियनने नष्ट केल्याने (१८०८) वसाहतींना स्वातंत्र्य मिळविण्याची संधी मिळेल, या हेतूने तो १८०९ मध्ये मायदेशी परतला व प्रथम स्पॅनिश व्हेनेझुएला स्वतंत्र करण्याची त्याने प्रतिज्ञा केली. या प्रकारचा उद्रेक दडपण्यासाठी स्पेनचे शाही सैन्य तयार होते. ब्रिटिशांनी ब्वेनस एअरीझ व माँटेव्हिडेओ हे प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला. झाक द लिन्येर्स याने स्पॅनिश वसाहतींत लोकसेना उभारून ब्रिटिशांचा प्रभाव केला. परकीय सैन्याचा आपण पराभव करू शकतो, याची खात्री झाल्यावर क्रांतिकारकांनी स्पेनविरुद्ध उठाव केला. क्रीओलांनी ग्रानाडा, ला प्लाता, न्यू स्पेन या वसाहतींत मुक्त लढ्यास आरंभ केला (१८१०). प्लाता वगळता अन्यत्र उठाव दडपण्यात आले. या लढ्यातून व्हेनेझुएला वसाहत स्वतंत्र झाली (५ जुलै १८११) तथापि फितुरीमुळे बोलीव्हारचा पराभव झाला व कुरासाऊँ येथे त्यास आश्रय घेणे भाग पडले. बोलीव्हारला सैनिकी शिक्षण वा प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नव्हता. तो दुय्यम नेता असूनही त्याने मुक्तिसेना उभी केली आणि मुक्तिलढा तीव्रतर केला. त्याने काराकास, आरौरे, व्हिक्टोरिया, काराबोबो इ. ठिकाणच्या लढायांत स्पॅनिश सैन्याचा दारुण पराभव केला पण ला प्वेर्ता येथे त्याला हार खावी लागली (जुलै १८१४). यानंतर त्याला सेनापतिपद देण्यात आले (१८१५). नेपोलियनच्या पराभवानंतर स्पेनचे बरेच सैन्य मोकळे झाले. त्या सैन्याने सांता मारीआ येथे बोलीव्हारचा पराभव केला. तेव्हा हैती येथे त्याने आश्रय घेतला (१८१५). तेथील राष्ट्राध्यक्षाच्या मदतीने भाडोत्री सैन्य जमा करून बोलीव्हाराने बार्सेलोना येथे स्पॅनिश सैन्याचा पराभव केला (१६ फेब्रुवारी १८१७). तेव्हा त्याला राष्ट्रीय सैन्याचे सरसेनापतिपद देण्यात आले. त्याने दक्षिण अमेरिकेतील सर्व स्पॅनिश वसाहतींना उठाव करण्याचे आवाहन केले.

तुरळक पराभव वगळता आंगोस्तुरा येथून केवळ निवडक सैन्य (२,५०० सैनिक) घेऊन दुर्गम अँडीज पर्वत ओलांडून त्याने बायीआकाची अटीतटीची लढाई जिंकली आणि स्पेनच्या सैन्याचा धुव्वा उडविला (७ ऑगस्ट १८१९). या निर्णायक लढाईनंतर बोलीव्हारने कोलंबिया प्रजासत्ताकाची घोषणा केली. तो त्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला (१७ डिसेंबर १८१९). त्याने स्पॅनिश आणि इतर बड्या जमीनदारांच्या जमिनी लहान लहान शेतकऱ्यांत वाटून त्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काराबोबो येथे स्पॅनिश सैन्याचा पराभव करून एक्वादोरही त्याने जिंकले (१८२१) आणि तो प्रदेश कोलंबिया प्रजासत्ताकात समाविष्ट केला. त्यानंतर चिली-पेरूचा सान मार्तीन व बोलीव्हार यांत विचारविनिमय होऊन सान मार्तीनने या मुक्तिलढ्यातून अंग काढून घेतले. बोलीव्हारने पेरू प्रजासत्ताकाची स्थापना केली. १८२५ मध्ये आग्नेय पेरूमधील प्रदेशास त्याच्या सन्मानार्थ बोलिव्हिया हे नाव देण्यात आले. यानंतर जवळजवळ सर्वच स्पॅनिश वसाहती त्याने जिंकल्या. १८२६ अखेर व्हेनेझुएला, कोलंबिया, एक्वादोर, पेरू, पॅराग्वाय आणि बोलिव्हिया ही सहा नवी राज्ये उदयास आली. या स्वातंत्र्य युद्धात जॉर्ज वॉशिंग्टनपेक्षा अधिक प्रमाणात बोलीव्हारला अननुभवी सैनिक, युद्धसाहित्याची चणचण, डोंगराळ मुलूख इ. अडचणींवर मात करावी लागली.

बोलीव्हारने पनामा येथे काँग्रेस ऑफ पनामा भरविली (१८२६) आणि मुक्त केलेल्या राष्ट्रांचे संघराज्य स्थापण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला अमेरिकेच्या धर्तीवर या छोट्या वसाहतींचे एक राष्ट्रसंघ स्थापण्याची महत्त्वाकांक्षा होती परंतु त्याला हुकूमशाह बनावयाचे आहे, वगैरे आरोप करून ही काँग्रेस अयशस्वी होऊन नवोदित राष्ट्रांत आपापसांत लढाया सुरू झाल्या (१८२५-५०) आणि तिथे पुढे हुकूमशाही राजवटी आल्या. त्याच्याविरुद्ध प्रखर जनमत तयार होऊ लागले. याच वातावरणात बोगोटा येथे बोलीव्हारचा खून करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. आपल्या सत्तेस ओहोटी लागल्याचे लक्षात आल्यावर ही अंतर्गत यादवी टाळण्यासाठी त्याने आपल्या आजीव राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला (१८३०). यूरोपच्या वाटेवर असतानाच सांता मार्ता (कोलंबिया) जवळ क्षयरोग बळावून त्याचे निधन झाले.

बोलीव्हारचे खासगी जीवन स्वैर होते, असे म्हटले जाते. अखेरच्या दिवसांत हुकूमशाह म्हणून त्याची हेटाळणी झाली पण त्याच्या मृत्यूनंतर लॅटिन अमेरिकन जनतेला त्याच्या साहसी कर्तृत्वाची ओळख पटली व एक थोर विभूती म्हणून त्याला मान्यता मिळाली. आजही व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष अधिकार ग्रहाणाच्या वेळी बोलीव्हारच्या अस्थिमंजुषेची किल्ली आपल्या हातात घेतो. बोलीव्हार स्वतःचा ‘संकटकाळातील व्यक्ती’ असा उल्लेख करीत असे. लॅटिन अमेरिकेत उदयाला आलेल्या राष्ट्रवादी शक्तींची नेमकी कल्पना त्याला आली नाही किंवा त्याची सत्ता टिकविण्याची धाटणी अंशतः चुकीच्या तत्त्वावर आधारलेली होती, अशी त्याच्यावर टीका होते. त्याच्या तोडीचा नेता दक्षिण अमेरिकेत त्यानंतर झाला नाही. त्याचा वारसा चे गेव्हारा इत्यादींनी पुढे चालविला. इतिहासकार दक्षिण अमेरिकेचा जॉर्ज वॉशिंग्टन असा त्याचा गौरवपर उल्लेख करतात. बोलीव्हारचे चरित्र, चारित्र्य आणि कार्य या संबंधीची साधनसामग्री व्हिसान्ते लेक्यूना याने संपादित करून स्पॅनिश भाषेत बारा खंडांत प्रसिद्ध केली आहे (१९२९-५९).

संदर्भ : 1. Grimsley, Ronald, Ed. The Age of Enlightenment, Harmondsworth, 1979. 2. Humphreys, R.A. Tradition and Revolt in Latin America, London, 1969. 3. Lynch, J. The Spanish American Revolutions 1808-1826, New York, 1973.

शहाणे, मो. ज्ञा. दीक्षित, हे. वि.