रुद्र : शिव वा शंकराचे वेदकालीन पूर्वरूप म्हणून मानली गेलेली एक वैदिक देवता. ‘रुद्र’ शब्द ‘रु’ वा ‘रुद्’ म्हणजे आक्रोश करणे गर्जन करणे या धातूपासून आलेला आहे. रुद्‌चा आणखी एक अर्थ लाल वर्ण असा आहे. त्यानुसार रुद्रदेवतेची मूळ संकल्पना लाल रंगाच्या वादळी ढगांवरून वा गडगडाटी वादळाच्या आवाजावरून वा विजेच्या लोळाचे प्रतीक म्हणून आली असावी, असे वेबर, मॅकडॉनल इ. विद्वान मानतात. यास्कानुसार रु-रडणे आणि द्रु-पळणे, धावणे या दोन धातूंपासून रुद्र शब्द व्युत्पादिला जातो. म्हणजे रडणारा, रडवणारा वा रडत रडत धावून जाणारा असा रुद्रचा अर्थ होतो. सायणानुसार जो अंतकाली सर्वाना रडवतो तो रुद्र. ऋग्वेदात रुद्रास फक्त तीन स्वतंत्र सुक्ते (१·११४ २·३३ व ७·४६) दिली आहेत तसेच १,४३ सुक्तातील सहा ऋचा आणि ६·७४ सूक्त रुद्र व सोम यांना मिळून दिले आहे. तथापि नंतरच्या यजुर्वेद, अथर्ववेद, ब्राह्मणे व इतर वैदिक साहित्यात रुद्र ही उत्तरोत्तर अधिकाधिक महत्त्वाची व प्रमुख देवता बनत गेल्याचे दिसते. आरंभीच्या ऋग्वेदकालात रुद्र निसर्गप्रकोपाची एक सामान्य देवता असल्याचे, तर नंतरच्या साहित्यात ती पशू, जंगले, पर्वत, नद्या, कृषी, सुफलता, स्मशानादी सर्व सूष्टी व्यापणारी एक श्रेष्ठ व बदलशाही देवता बनल्याचे दिसते. ऋग्वेदातच (१०·९२·९) तिला ‘शिवा’ असेही म्हटले आहे. यजुर्वेदात रुद्रगणाचा निर्देश आला आहे. त्यावरून वनवासी, निषादादी वन्य जमातीचा रुद्र हा ‘गणपती’ ही असावा असे दिसते. अथर्ववेदात रुद्राची भव शर्व इ. सात नावे आली आहेत. ब्राह्मण ग्रथांत रुद्र हा उषस्‌चा पुत्र असल्याचे आणि त्याला प्रजापतीने आठ नावे बहाल केल्याचे म्हटले आबे. रुद्र, शर्व, उग्र व अशनी ही त्याची चार नावे त्याच्या रौद्र, संहारक रूपाची, तर भव, पशुपती, महादेव व ईशान ही चार नावे त्याच्या शांत, मांगलिक व जगत्प्रतिपालक रुपाची प्रतीके होत. श्वेताश्वतर उपनिषदात रुद्रास सृष्टीची सर्वश्रेष्ठ देवता म्हटले आहे. भक्तिसंप्रदायाचा व शिवोपासनेचा हे उपनिषद आद्यग्रंथ मानले जाते. रुद्र-शिवाची पत्नी उमा हिचा निर्देश केनोपनिषदात आला आहे. महाभारतात रुद्रास शिव वा महादेव म्हटले आहे.

पौराणिक साहित्यात रुद्र-शिवाच्या अनेक कथा आढळतात. ब्रह्मादेवाच्या ‘पुत्र असावा’ अशा संकल्पनाने त्याला मांडीवर नीललोहित पुत्र झाला तो रडू लागल्याने त्याचे नाव ‘रुद्र’ ठेवले. तो पुन्हा सात वेळा रडल्याने त्याची भव, शर्व इ. सात नावे ठेवली. सूर्यचंद्रादी आठ शरीरे त्यांना दिली म्हणून ते ‘अष्टमूर्ती’. रुद्र हे अकरा, शंभर अथवा अनेक होत. सती-पार्वतीपतीचीच ही विविध रूपे होत. चिताभस्माने धवल. सर्पधारी. नीलकंठ, चतुर्भुज, त्रिनेत्र, मस्तकावर चंद्र, जटांमध्ये गंगा असे त्याचे स्वरूप असून त्रिशूल, परशू, पिनाकधनुष्य, डमरू ही त्याची आयुधे कैलास हा त्याचा लोक व प्रमथगण हा त्याचा परिवार होय.

काही विद्वानांच्या मते रुद्रासारखी देवता सिंवू संस्कृतीच्या मुद्रांवर दिसून येते. सभोवताली चार प्राणी असलेली एक योगासनातील आकृती ह्या मुद्रावर आहे. ही योगासनातील आकृती आणि वैदिक संहितेतील काही निर्देश यांतून रुद्राचा प्राण्याशी असलेला संबंध सूचित होतो. प्राण्यांचा अधिपती वा पशुपती म्हणून रुद्र हा प्राण्यांचा रक्षणकर्ता अशा दोन्हीही रूपांत दिसतो. रूद्रांशी विशेषत्वे संबंधित असा पशू म्हणजे वृषभ वा नंदी होय. सिंधुमुद्रांवरील आकृतीवरून काही विद्वानांनी वैदिक रुद्र-शिवाचे मूळ सिंधू संस्कृतीतील ह्या अनार्थ देवतेत असावे असे प्रतिपादन केले.

पृश्री ही रुद्रपत्नी असून तिचे पुत्र मरुत् असल्याचे ऋग्वेदात (५·५७) म्हटले आहे. पृथ्वीचा अर्थ गाय, पृथ्वी, पखाल वा पाणी साठवण्याचे चामड्याचे साधन. वृषभाशी, पर्जन्याशी असलेला तिचा संबंध यांतून सूचित होतो. ऋग्वेदात सुफलता व पर्जन्य घेऊन येणारा असे जे रुद्राचे निर्देश येतात त्यांतूनही त्याच्या सुफलतेशी व पर्जन्याशी असलेल्या संबंधास बळकटी येते. ऋग्वेदात भयंकर, विध्वंसक, मनुष्य व प्राण्यांवर त्वेषाने प्राणघातक बाणांचा वर्षांव करणाऱ्या रुद्राचा क्रोध होऊ नये म्हणून प्रार्थना आहे. त्याला ‘जलाष’ व ‘जलाषभेषज’ म्हणजे व्याधी दूर करणारा व उपशामक औषधींनी युक्त तसेच श्रेष्ठ चिकित्सकही म्हटले आहे.

रुद्रपुत्र मरूतांशीही त्याचे साधर्म्य आहे. रुद्राप्रमाणेच ⇨मरुतांचेही तारक व मारक असे दुहेरी स्वरूप दिसून येते. ‘मरुत्’ शब्द ‘मर’ वा ‘मृ’ म्हणजे मरणे धातूपासून आलेली आहे. म्हणूनच रा. ना. दांडेकरांसारखे अभ्यासक रुद्र ही मृत्यूदेवता असावी असे म्हणतात. रुद्रोपासनेतूनही रुद्राचा मृत्यूदेवता यम, भूतात्मे आणि काळी देवता निर्ऋती यांच्याशी असलेला जवळचा संबंध सूचित होतो. रुद्राची वेदांतील नंतरची पत्नी रुद्राणी वा मीढुषी असून पृथ्वीप्रमाणेच तिच्या द्वारेही रुद्राचे सिंचन करणारा, वृष्टिकर्ता असे स्वरूप सूचित होते. म्हणजेच सुफलतेशी असलेला संबंध दिसून येतो. हा सुफलतेचा धागा रुद्राच्या ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या कालापासून दिसून येतो. यातूनच रुद्र-शिवाच्या नंतर प्रचलित झालेल्या लिंगरूप उपासनेवरही प्रकाश पडतो. नंतरच्या कालात मानवरूपव उपासनऐवजी रुद्र-शिवाची लिंगरूप उपासना मोठ्या प्रमाणावर जी प्रचलित होऊन मान्यता पावली त्याचे रहस्य यातच असावे. [⟶ लिंगपूजा]. ऋग्वेदात शिश्नदेवतोपासक अनायचा निर्देश आलेला आहे. त्यावरून मूलतः रुद्र ही अनार्य देवता असावी, असे दिसते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते रुद्र हा मूळ अवैदिकांचाच देव आहे असे सिद्ध करणे कठीण आहे. त्यांच्या मते रुद्र हा वैदिक लोकांचा त्यांच्या रानटी पशुपालन अवस्थेपासून चालत आलेला देव असावा आणि त्याचा व अवैदिक लिंगदेवाचा समन्वय वैदिकांनीच घडवून आणला असावा. वैदिक व अवैदिक देवांचा संगम होऊन आर्थ व अनार्यांना पूज्य असा शिव, महादेव झाला, असे ते मानतात.

वैदिक साहित्यात रुद्राचा अग्नी व सोमाशीही जवळचा संबंध असल्याचे दिसते. शक्ती, तेज, संहारशक्ती यांबाबत रुद्र हा अग्नीचेच प्रतिरुप म्हणता येईल. सोमाप्रमाणे रुद्राचेही वास्तव्य हिमालयातील पर्वतशिखरांवर−विशेषतः मजबूत वा मुंजवान पर्वतावर−असल्याचे म्हटले आहे. यजुर्वेद आणि त्यानंतरच्या काळात संस्कृतिसमन्वयाचे पर्व सुरू झाल्यावर ऋग्वेदातील रुद्राचा इतर आर्येवर स्थानिक देवतांशी समन्वय साधण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी. कारण या काळातील साहित्यात रुद्रास चोर, लुटारू व दरवडेखोरांची देवता म्हणून संबोधिले गेले तथापि त्याचे मूळ कल्याणकारी, शुभंकर स्वरुपही कायम राहिले. नंतर त्याची भव, शर्व, उग्र, पशुपती, महादेव, शिव इ. नवी नावे पुढे येतात. यांतील काही नावांचा उगम प्रादेशिक देवतानामांत आहे तर काही नावांचा अद्यापही नीट उलगडा होत नाही तथापि त्या नावांचे मूळ हे स्थानिक व वेदबाह्य देवतानामांत असावे असे म्हणता येते. यजुर्वेद तसेच ब्राह्यणे व नंतरचे साहित्य यांत रुद्राचे इतर देवतांमध्ये व शेवटी शिवदेवतेत संपूर्ण विलीनीकरण झाल्याचा आलेख दिसून येतो. शिवदेवता ही रुदाचीच पुराणकथात्मक वारस आहे. ‘रुद-शिव’ हे नाव ह्या विलीनीकरणाचेच द्योतक होय.

प्राचीन काळी स्थानिक, प्रादेशिक व आदिवासी देवतांशी रुद्राचा जो समन्वय झाला त्यामुळेच रुद्राच्या ठिकाणी अनेक परस्परविरोधी स्वभावांच्या छटा एकत्र आल्याचे दिसते. यज्ञाबाबत रुद्राची जी द्विधावृत्ती दिसते, ती याचेच गमक होय. नंतरच्या शैव परंपरेत यज्ञ त्याच्यापासून दूर गेल्याचे दिसते. दक्षयज्ञात त्याला सहभाग मिळाला नाही म्हणून क्रुद्ध होऊन त्याने यज्ञाचा विध्वंस केला. वेदविरोधी ह्या छटा एकीकडे वाढत राहिल्या आणि दुसरीकडे ऋग्वेदातील वरदायी, पापास क्षमा करणारा, भक्तांना पावणारा अशी त्याची प्रतिमाही प्रतिष्ठा पावून ‘रुद्र-शिव’ ही एक श्रेष्ठ देवता म्हणून स्थिर झाली व मान्यता पावली.

पहा : शिवदेवता.

संदर्भ : 1. Agarwala, Vasudeosharan, Siva Mahadeva, The Great God. Varanasi, 1966.

2. Bhattacharji, Sukumari, Indian Theogony: A Comparative Study of Indian Mythology From the Vedas to the Puranas, New York, 1970.

3. Dandekar, R. N. ‘Rudra in the Veda’. Journal of the University of Poona, Humanities Section I. Poona, 1953.

4. O’Flatherty. W. D. Ascetism and Eroticism in the Mythology of Siva, London, 1973.

सुर्वे, भा. ग.