रीशे, चार्ल्स (शार्ल) रॉबेअर : (२६ ऑगस्ट १८५०−४ डिसेंबर १९३५). फ्रेंच शरीरक्रियावैज्ञानिक. ⇨अपायितेवरील (किंवा अत्यधिहर्षतेवरील म्हणजे बाह्य प्रथिनांशी वा औषधांशी अगोदर आलेल्या संपर्कामुळे नंतर त्यांचाच पुन्हा संपर्क आल्यास त्यांविरुद्ध शरीरात उद्भवणाऱ्या अतिसंवेदनशील प्रतिक्रियेवरील) संशोधनाबद्दल त्यांना १९१३ चे शरीरक्रियाविज्ञानाचे अथवा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळाले.
रीशे यांचा जन्म पॅरिस येथे झाला. पॅरिस विद्यापीठात शिक्षण घेऊन १८७७ मध्ये पदवी संपादन केल्यावर त्यांनी कॉलेज द फ्रान्स मध्ये काम केले. त्यानंतर ते पॅरिस विद्यापीठात परत आले आणि तेथे १८८७ पासून ते १९२७ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले.
प्रारंभी रीशे यांनी जठरातील पचनक्रिया, स्नायूंच्या आकुंचनाचे स्वरूप, अकार्बनी लवणांचा विषारी परिणाम आणि प्राणिशरीरातील उष्णतेची निर्मिती व तिचे नियंत्रण यासंबंधी महत्त्वपूर्ण संशोधन केले. पदवी मिळविण्यापूर्वी त्यांनी अवलंबी प्रतिक्षेपी क्रियेच्या [⟶ प्रतिक्षेपी क्रिया] पचनक्रियेतील स्थानाबद्दल महत्त्वाचे संशोधन केले होते व हायड्रोक्लोरिक अम्ल हेच जटररसातील प्रमुख आम्ल असल्याचे दाखविले होते. १८७८ मद्ये त्यांनी जठररसाच्या गुणधर्मासंबंधी एक व्यापक टिपणी प्रसिद्ध केली आणि तीत पचनक्रियेच्या सर्व बाबींचा आढाव घेऊन सस्तन प्राणी, मासे व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी यांच्या पचनक्रियांमधील फरकाचे वर्णन केलेले होते. त्यांनी श्वनासंबंधीचे शरीरक्रियाविज्ञान, अपस्मार (फेपरे) व क्षयरोगावरील उपचारात कच्च्या मांसाचा आहारातील उपयोग या विषयांवरही संशोधन केले. त्यांचे सर्वांत महत्तावाचे कार्य रोगप्रतिकारक्षमता व रक्तचिकित्सा (रक्त किंवा त्यापासून मिळविलेल्या पदार्थाचा उपचारात उपयोग करणारी चिकित्सा) यांसंबंधी होते. यांकरिता त्यांनी व त्यांचे सहकारी पॉल पोर्टिअर यांनी समुद्रपुष्प या प्राण्याच्या विषाची कुत्र्यांमध्ये काय प्रतिक्रिया होते, याचा प्रथम अभ्यास केला. ज्या कुत्र्यांना या विषाच्या मूळ अंतःक्षेपणानंतर (इंजेक्शनानंतर) काही त्रास झाला नाही अशा कुत्र्यांमध्ये जोरदार प्रतिक्रिया प्रवर्तित करता येते, असे त्यांना आढळून आले. जर मारक मात्रेपेक्षा कमी मात्रेचे अंतःक्षेपण दोन ते तीन आठवड्यांनी पुन्हा दिले, तर ती कुत्री लागलीच अतिशय आजारी होऊन २५ मिनिटांत मेल्याचे त्यांना दिसून आले. यावरून या विषाचे प्रतिकारक्षमता गुणधर्म रक्तरस, हतप्रभ सूक्ष्मजंतूंची संवर्धने (पोषक द्रव्यात वाढवून मग ज्यांची शक्ती क्षीण केलेली आहे अशा सूक्ष्मजंतूंचा समूह) व इतर विषे यांच्याविरुद्ध आहेत म्हणजे नंतर दिलेल्या कमी मात्रेच्या अंतःक्षोपणामुळे प्राण्याची प्रतिकारशक्ती त्यापुढील अंतःक्षेपणांविरुद्ध वाढण्याऐवजी कमी होते, असा त्यांनी निष्कर्ष काढला यावरून या गुणधर्माला रीशे व पोर्टिअर यांनी ॲनाफिलॅक्सिस (अपायिता अथवा अत्यधिहर्षण) असे नाव दिले व ते ‘संरक्षणाच्या विरोधक’ या अर्थाने वापरले होते. १५ फेब्रुवारी १९०२ रोजी सोसायटी द बायॉलॉजी या संस्थेच्या बैठाकीत त्यांनी हा प्रयोग दोन कुत्र्यांवर प्रत्यक्ष करून दाखविला. १९०३ पावेतो त्यांनी हाच परिणाम विषारी वा बिनविषारी असलेल्या कोणत्याही प्रथिनांच्या बाबतीत उत्पन्न करता येतो मात्र दोन अंतक्षेपणांच्या मध्ये दोन ते चार आठवड्यांचा काळ असला पाहिजे, असे दाखविले. रीशे यांच्या या कार्यामुळे पराग ज्वर आणि दमा यांसारखे ॲलर्जीजन्य विकार, औषध प्रतिक्रिया व रक्तरस आजार (बाह्य रक्तरसाच्या अंतःक्षेपणामुळे निर्माण होणारी ॲलर्जीजन्य प्रतिक्रिया), तसेच गुंगी येणाऱ्या काही गृढ अवस्था व त्यातून उद्भवणारा मृत्यू यांचे स्पष्टीकरण मिळण्यास मदत झाली. १९११ मध्ये रीशे यांनी स्वतःच्या व इतर शास्त्रज्ञांच्या अपायितेवरील कार्याचा आढावा घेणारा एक महत्त्वाचा लेख लिहिला. त्यांच्या अपायितेवरील कार्याने त्या वेळी नवीनच उदयास येत असलेल्या रोगप्रतिकारक्षमताविक्षानास सखोल अर्थ प्राप्त झाला आणि याबद्दलच त्यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.
रीशे यांना अनेक गोष्टींत रस होता. ते शरीरक्रियावैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असण्याबरोबरच सूक्ष्मजंतुवैज्ञानिक, विकृतीवैज्ञानिक, मानसशास्त्रज्ञ व वैद्यकीय सांख्यकीविज्ञ (संख्याशास्त्रज्ञ) होते. त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रांतील कार्यामुळे त्यांना विमानविद्येतील एक आद्यप्रवर्तक, शांततेकरिता झटणारे एक कळकळीचे कार्यकर्ते (युद्धामुळे द्वेषबुद्धी फैलावते हे दाखविणारी इतिहासावरील कित्येक पुस्तके त्यांनी लिहिली होती), गूढ आविष्कारासंबंधी वैज्ञानिक संशोधन करणारे शास्त्रज्ञ तसेच कवी, कादंबरीकार आणि नाट्य लेखक म्हणूनही कीर्ती लाभली. १९१३ नंतर अपायिता, लॅक्टिक अम्लाचे किण्वन (आंबण्याची क्रिया) मांसरस चिकित्सा व इतर विषयांवरील आपले संशोधन रीशे यांनी पुढे चालू ठेवले. पहिल्या महायुद्धात काही काळ आघाडीवर राहून त्यांनी ⇨रक्ताधानातील समस्यासंबंधी संशोधन केले. १९२६ मध्ये लिजन ऑफ ऑनरच्या रॉसचा त्यांना सन्मान मिळाला. त्यांनी आपल्या संशोधनासंबंधी ११ ग्रंथ व अनेक निबंध लिहिले. पी. लांगल्वा व इतरांच्या सहकार्याने त्यांनी शरिरक्रियाविज्ञानाचा शब्दकोश (१० खंड, १८९५−१९२८) तयार केला. Revue Scientifique या नियतकालिकाचे सहसंचालक म्हणून १८८१ मध्ये त्यांची नेमणूक झाली होती. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.