रुएलिया : फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उप विभाग] ॲकँथेसी (वासक) कुलातील एक लहान प्रजाती. झांदला रुएल या फ्रेंच वनस्पतिविज्ञांचे नाव या प्रजातील दिले आहे. अत्याधुनिक वर्गीकरणाप्रमाणे ही प्रजाती अमेरिकी असून रुएलिया ट्युबरोझा हिची मध्य अमेरिकेतील जाती आता भारतात स्थिर झाली आहे. ती सर्वत्र पसरली आहे व उद्यानांतून लावलेली आढळते. या प्रजातीत अनेक (सु. २००) जाती पूर्वी घातल्या होत्या. उष्ण व उपोष्ण कटिबंधी अमेरिकेत पाच जाती असल्याचे जे. सी. विलिस यांनी नमूद केले आहे परंतु हल्ली फक्त एकच जाती असून इतरांचा समावेश डिप्टेरॅकँथस या प्रजातीकत करतात.

रुएलिया प्रजातीतील वनस्पती केसाळ किंवा लवदार, ओषधीय [⟶ ओषधि], लहान रोपट्याप्रमाणे किंवा झुडपे असून पाने साधी, समोरासमोर, अखंड किंवा दातेरी असतात. फुले विविध रंगांची व विविध फुलोऱ्यांवर पानांच्या बगलेत येतात ती पंचभागी असतात संदले पाच, पाकळ्या पाच पण खाली जुळलेल्या व वर कमी जास्त सुट्या व पसरट केसरदले चार व द्वयोन्नत (दोन आखूड व दोन लांब) आणि किंजदले दोन व ऊर्ध्वस्थ असतात [⟶फूल]. बोंडातील बियांवर केस असतात व ते पाण्याने फुगतात. फुलाची संरचना आणि इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲकँथेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

वर उल्लेख केलेली रु. ट्युबरोझा ही बहुवर्षांयू (अनेक वर्षे जगणारी), सरळ वाढणारी व सु. ३०−६५ सेंमी. उंच ओषधी भारतात उद्यानांतून लावतात. तिला मांसल मूळे, ५−७ सेंमी. लांब व लंबगोल पाने असतात. निळसर व कमी अधिक गर्द रंगाची नाळक्यासारखी वर ३·५−५ सेंमी. व्यासाची फुले उन्हाळ्यात येतात पांढऱ्या फुलझाडांचे दोन प्रकारही आढळतात एका प्रकारात कंठात गुलाबी छटा असून आता तर ही जाती रानटी अवस्थेतही आढळते. यांची लागवड मुळे किंवा छाट कलमे लावून करतात. यांची बोंडे गर्द काळी पिंगट असून बियाही लागवडीस वापरतात. बोंडे तडकून १२−१६ बिया लांबवर फेकल्या जातात व नवीन झाडे येतात. रु. ट्युबरोझा वांतिकारक (ओकारी करणारी) असून ⇨इपेकॅकऐवजी वापरतात. मुतखडा निचरून जाण्यासही ती वापरतात. पानांचा काढा जुनाट श्वासनलिकादाहावर (कफावर) देतात.

रु. प्रोस्ट्रेटा (डिप्टेरॅकँथस): हिला गुजरातेत काली घ्यावनी म्हणतात. ही सरपटत वाढणारी लहान झुडूपवजा वनस्पती भारतात सर्वत्र ओलसर जागी दिसते ती केसाळ असून तिला अंडाकृती ते लंबगोल साधी पाने आणि पानांच्या बगलेत एकेकटी, फिकट निळी किंवा जांभळट फुले येतात. कानाच्या तक्रारीवर ती उपयुक्त असतात. रु. लाँगिफोलिया (डि. लाँगिफोलियस म.सुरत) हे लहान झुडूप मध्य प्रदेशातील सपाट भागात आढळते त्याच्या पानांची भाजी करतात.

रु. सफ्रुटिकोसा (डि. सफ्रुटिकोसस): ही लवदार झुडूपवजा ३०−६० सेंमी. उंच वनस्पती गंगेचे वरचे मैदान, म. प्रदेश, बिहार, ओरिसा आणि बंगाल येथे आढळते हिची मुळे मांसल असतात त्यांचा उपयोग संताळ लोक तांदळाच्या काल्यापासून एक मद्य (बीअर) करण्यास वापरतात. रु. बेकी ह्या ब्राझीलमधील जातीच्या लहान झुडूपाला, लांबट पाने असून त्यांच्या किनारी तरंगित व टोके लांब असतात. हिला सप्टेंबर ते एप्रिलमध्ये सु. ५ सेंमी. लांब तुतारीसारखी शेंदरी फुले येतात त्यामुळे ती येतात त्यामुळे ती उद्यानातून लोकप्रिय आहे. छाट कलमांनी अभिवृद्धी (लागवड) करतात.

रु. रोझिया : ही देखणी मेक्सिकन जाती सु. ३०−६५ सेंमी. उंच असून तिची पाने खरबरीत परंतु फुले विपुल, विटकरी रंगाची, सु. २·५ सेंमी. व्यासाची असतात पाकळ्यांची नळी लांबट असून फुले सकाळी उमलतात व दुपारनंतर गळून पडतात. बिया किंवा छाट कलमे अभिवृद्धीस वापरतात. (खंड १० मधील चित्रपत्र ४७ पहावे).

संदर्भ : 1. Bruggeman, L. Tropical plants And their Cultivation, London, 1962.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vols III and IX, New Delhi, 1952 and 1972.

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.