रीआ : दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या या पक्षाचा समावेश रीइडी कुलात केलेला आहे. याच्या दोन जाती असून सामान्य जातीचे नाव रीआ अमेरिकाना आहे. ही जाती ईशान्य ब्राझीलपासून मध्य अर्जेटिनापर्यंत आढळते. दुसरी जाती सामान्य जातीपेक्षा लहान असून तिला ‘डार्विन रीआ’ म्हणतात कारण चार्लस डार्विन यांना ही प्रथम आढळली. हिचे शास्त्रीय नाव टेरोक्नेमिया पेन्नाटा आहे पॅटागोनिया आणि पेरूमध्ये ही आढळते. या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य जातीची आहे.

रीआ पक्षी सर्वासाधारणपणे शहामृगासारखा पण आकाराने त्याच्याहून लहान आहे. उंची १२० सेंमी. असते. नर आणि मादी दिसायला सारखी असतात पण नर मादीपेक्षा जास्त उंच असतो. या पक्ष्यांचा एखादा ठराविक किंवा डोळ्यांत भरण्यासारख्या ठसठशीत रंग नसतो. पुष्कळदा याचा रंग फिकट तपकिरी असतो (डार्विन रीआचा रंग पांढरा असतो). मान लांब असून नराच्या मानेच्या बुडाचा भाग काळा असतो.

पाय मजबूत असून प्रत्येकावर तीन बोडे असतात. हे फार जलद पळू शकतात. संकटाच्या वेळी मान पुढच्या बाजूला जवळजवळ आडवी पसरून आणि पंख शिडासारखा वर उभारून तो वेगाने धावतो. पंख जरी मोठे असले, तरी उडण्याच्या कामी निरूपयोगी असतात. यांच्या पिसांत पिच्छिकांचा अभाव असतो [⟶ पीस]. या पक्ष्यांना स्नान करण्याची आवड असून ते उत्तम पोहणारेही आहेत. कोवळी पाने, मुळे, बिया इत्यादींवर ते उपजिविका करतात. यांखेरीज ते पुष्कळ प्रकारचे किडे, विशेषतः टोळ, नाकतोडे वगैरे आणि इतर लहानसहान प्राणी खातात. विणीचा हंगाम सोडून इतर वेळी हे कळप करून राहतात. वयस्क नर एकेकटे असतात. शहामृगांच्या कळपात जसा झीब्रा व हरणांचा समावेश असतो, तसा कधीकधी यांच्या कळपातही हरणे व लामा यांचा समावेश असतो.

रीआ पक्ष्यांत बहुपत्नीत्व दिसून येते. सहा-सात माद्यांसमोर त्यांना आकर्षित करण्याकरिता नर आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करतो त्यांच्यासमोर तो पुढेमागे धावतो ऐटीने उभा राहून मान आत ओढून घेतो पंख झटकून ते पूर्णपणे पसरतो, त्यामुळे त्यांच्यावरची पिसे वाऱ्याने फडफडतात. हे करीत असताना तो तोंडाने एक प्रकारचा आवाज खालच्या सुरात काढीत असतो.

विणीच्या हंगामाच्या सुरुवातीला वयाने मोठे असलेले नर तरुण नरांचा पाठलाग करून त्यांना हाकलून देतात आणि माद्यांवर हक्क प्रस्थापित करण्याकरिता आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी निकराने झुंजतात. विजयी नर दलदलीच्या किंवा नदीच्या जमिनीचा काही भाग आपल्या ताब्यात घेतो आणि तेथे दुसऱ्या नरांना येऊ देत नाही. साधारणपणे गवताळ जमिनीपेक्षा उंच झुडपे व झाडे असलेली जागा तो पसंत करतो.

झुडपांच्या खालच्या कोरड्या जमिनीवर एखाद्या ठिकाणी तेथील गवत चोचीने उपटून काढून तो एक उथळ खळगा तयार करतो या खळग्याला मऊ पाने, गवत यांचे तो अस्तर लावतो. हे या पक्ष्याचे घरटे होय. घरटे तयार झाल्यावर ते दाखविण्याकरिता नर आपल्या सहा-सात माद्यांना तेथे घेऊन जातो. माद्या या घरट्यात अंडी घालायला सुरुवात करतात. प्रत्येक मादी दोन किंवा तीन दिवसांनी एक याप्रमाणे ११−१८ अंडी घालून झाल्यावर माद्या निघून जातात आणि घरट्याकडे अथवा अंड्याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. नुकत्याच घातलेल्या अंड्याचा रंग सोनेरी पिवळा असतो पण तो लवकरच नाहीसा होऊन ती पांढरी होतात.

एका घरट्यात ६०−१०० अंडी असतात आणि नर त्यांचे काळजीपूर्वक संरक्षण करतो. अंडी उबविण्याचे काम फक्त नर करतो. ३५−४० दिवसांनी अंडी फोडून पिल्ले बाहेर पडतात. त्यांचा रंग करडा असून त्यावर काळे पट्टे असतात. घरट्याच्या बाहेर पडल्यावर पिल्ले नराच्या मागेमागे हिंडत असतात. त्यांची वाढ झपाट्याने होऊन पाच महिन्यांतच ती प्रौढ पक्ष्यांएवढी मोठी होतात पण त्यांना दोन वर्षांनी लैंगिक पक्वता येते.

कर्वे, ज. नी.