रिव्हिएरा : भूमध्य समुद्रकिनाऱ्यालवरचे जगप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र. सामान्यतः फ्रान्समधील येरपासून इटलीतील ला स्पेत्स्यापर्यंत हा प्रदेश असून फ्रान्समधील आल्प्स-मॅरिटाइम व व्हार विभागांचा, तर इटलीतील लिग्यूरिया विभागाचा यात समावेश होतो. इटालियन ‘रिव्हा’शब्दाचा अर्थ किनारा अथवा समुद्रकिनारा असा असून त्यावरूनच ‘रिव्हिएरा’ हा शब्द आला आहे. फ्रान्समध्ये या प्रदेशाला ‘कोत दाझूर’ म्हणजे ‘निळा किनारा’ असे म्हणतात. सु. २४० किमी. लांबीच्या या प्रदेशाचा काही वेळा फ्रान्समधील मार्सेपर्यंतही विस्तार मानला जातो. रिव्हिएराच्या उत्तरेस पार्श्वभागी आल्प्स व ॲपेनाइन पर्वतराजी असून त्यामुळे उत्तरेकडील व पूर्वेकडील थंड वाऱ्यापासून या प्रदेशाचे संरक्षण होते. तसेच दक्षिणेकडील समुद्रभागाकडून वर्षभर ‘बामी’ वारे (आल्हाददायक वारे) या प्रदेशाकडे वाहत असतात. सौम्य व उत्साहवर्धक हवामान, विलोभनीय सृष्टीसौंदर्य, उपोष्ण कटिबंधीय हिरवीगार विपुल वनश्री, सागरसान्निध्य, किनाऱ्यावरील सलग व सुंदर पुळणी इ. नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे जगभरचे पर्यटक वर्षभर या प्रदेशात येतात. विशेषतः हिवाळा सौम्य व स्वच्छ सूर्यप्रकाशाचा असल्याने या काळात पर्यटकांची अधिक गर्दी असते. वर्षांतील फक्त साठ दिवस या प्रदेशात पाऊस पडतो. पश्चिम यूरोपातील ‘फॅशनचे माहेरघर’ म्हणूनही रिव्हिएराचा उल्लेख केला जातो.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून रिव्हिएराची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली. १८६५ मध्ये पॅरिस ते नीसपर्यंत लोहमार्ग बांधण्यात आल्याने या प्रदेशची सुगमता अधिक वाढली. उद्यानगृहे व हॉटेले, सार्वजनिक संगीताचे कार्यक्रम, जुगारगृहे, क्रीडानौका, विविध प्रकारचे क्लब इ. मनोरंजनाच्या व आकर्षक सुविधांमुळे मोठ्या संख्येने लोक येथे येऊ लागले.
जेनोआ हे इटालियन रिव्हिएराचे केंद्रस्थान असून त्याच्या पूर्वेकडील भाग ‘रिव्हिएरा दी लेव्हांते’ व पश्चिमेकडील भाग ‘रिव्हिएरा दी पनेंते’ नावांनी ओळखले जातात. रिव्हिएरा प्रदेशात आंतरराष्ट्रीय महत्त्वाची अनेक नगरे व पर्यटनस्थळे असून त्यांपैकी येर, सें त्रॉपे, कॅन, आंतीब, इवां-ले-पीं. ही फ्रान्समधील माँटी कार्लो हे मोनाकोमधील, तर स्पेत्स्या, लेव्हांतॉ, सेस्त्री लेव्हांते, रापाल्लॉ, सांता मार्गारीता, जेनोआ, साव्होना, अलबेंगा, अलास्सिओ, सान रेमो, बॉर्दीगेरा, व्हेंतीमील्या ही इटलीतील प्रमुख नगरे व पर्यटनस्थळे आहेत. कॅन हे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे. घरांची नमुनेदार बांधणी, आकर्षक रंगकाम, हिरव्यागार व सुगंधी वनस्पती तसेच फुलझाडांनी सुशोभित झालेल्या बागा यांमुळे येथील नगरेही रंगीबेरंगी व आकर्षक दिसतात. ती सुंदर रस्त्यांनी व लोहमार्गांनी एकमेकांना जोडलेली आहेत. काही जुने महामार्गही येथे पहावयास मिळतात. या प्रदेशात त्रिस्तरीय सुंदर मोटार रस्ते (कॉर्निश) आहेत. त्यांपैकी डोंगराकडील सर्वांच उंचावरील बाजूस गांद्रे कॉर्निश हा रस्ता असून फ्रान्सचा सम्राट पहिला नेपोलियन याने जुन्या रोमन रस्त्याच्या ठिकाणी तो बांधला. हा निसर्गसुंदर अशा ला त्यूर्बी गावामधून जातो. मोनोकोच्या सम्राटाने बांधलेला कॉर्निश हा सर्वांत कमी उंचीवरून जाणारा रस्ता असून त्यामुळे किनाऱ्यावरील प्रेक्षणीय स्थळे एकमेकांना जोडली गेली आहेत. पर्यटन व्यवसायासाठी बांधण्यात आलेला मधला रस्ता १९३९ मध्ये सुरू झाला. येथील लोहमार्गावर चुनखडकांतून अनेक बोगदे काढण्यात आले आहेत.
रिव्हिएरा प्रदेशात ऑलिव्ह, खजूर, द्राक्षे, केळी, डाळिंबे, लिंबू जातीची फळे व वेगवेगळ्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. निर्यातीसाठी व सुवासिक तेलांच्या निर्मितीसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या प्रदेशात पर्यटन व त्याच्याशी निगडित अनेक प्रमुख व्यवसाय चालतात. पर्यटन व्यवसायातून इटली व फ्रान्स या देशांना मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते. समुद्रातून मुख्यतः सार्डीन माशांचे उत्पादन घेतले जाते. अंतर्गत भागात बॉक्साइटचे बरेच साठे आहेत.
चौधरी, वसंत