रियाँग : भारतातील त्रिपुरा राज्यातील एक प्रमुख वर्गीकृत जमात. १९७१ च्या शिरगणतीप्रमाणे या राज्यात त्यांची ६४,७२२ लोकसंख्या होती आणि एकूण वर्गीकृत जमातीच्या लोकसंख्येशी त्याचे प्रमाण १४·३६ टक्के होते. प्राचीन काळी ही जमात लुशाई डोंगराच्या पर्वतश्रेणीत मैनीभलंग भागात रहात असे. चौदाव्या शतकात चितगाँग पहाडी भागात त्यांनी स्थलांतर केले. ‘कुकी’ जमातीच्या याच भागातील स्थलांतरामुळे रियाँगनी त्रिपुरच्या पहाडी भागांत स्थलांतर केले व तेथे वस्ती करून आहेत. त्रिपूरा राज्याच्या जंपूई पहाडी भागात ते ‘मिझो’ जमातीचे गुलाम/नोकर असल्याचे आढळून येतात. मिझो व रियाँग या जमातीत शारीरिक दृष्ट्या बरेच साम्य आढळून येते त्रिपुरा राज्यात त्यांचा प्रथम संबंध त्रिपुरी जमातीशी आला. सुरुवातीला ते त्यांच्या पालख्या वाहून नेण्याचे काम करीत असत. नंतर ते राज्याच्या निरनिराळ्या सैन्यदलांत नोकरी करू लागले. १९४२ साली त्यांनी राज्यकर्त्याविरुद्ध बंड केले होते.
त्यांच्या राज्याच्या प्रमुखास ‘राई’ व पंतप्रधानास ‘कचऊ’ म्हणतात. निरनिराळे (सव्वीस) सरदार त्यांना मदत करीत असतात व त्यांना ‘कातरदफा’ या नावाने संबोधिले जात असे. राईनी दिलेला निकाल अंतिम मानला जाई. चौकशीनंतर निकाल दिला जात असे.
एकत्र कुटुंबपद्धती या जमातीत रूढ आहे. आई, वडील, अविवाहित मुले, मुली आणि विवाहित मुले, त्यांच्या बायका व मुलांचा कुटुंबात समावेश असे. वडील भाऊ कुटुंबाचा प्रमुख असे. गावप्रमुखास ‘चौधरी’ म्हणतात. चौधरी गावातील तंट्यांचा निवाडा करतो.
विवाह पालकांच्या संमतीने होतात. बहुधा नवरा मुलगा लग्नानंतर तीन वर्षे सासऱ्याच्या घरी रहातो, या काळातील त्याचे सेवाश्रम विवाहाचा ‘देज’ समजला जातो. घटस्फोटास मान्यता आहे.
हे लोक स्वतःचे कपडे विणतात व रंगवतात. स्त्रिया केसाची विशेष काळजी घेतात व चांदीच्या शिक्क्याच्या माळा गळ्यात घालतात.
त्यांचे प्रमुख अन्न तांदूळ व तांदळाची दारू होय. राम, सीता व शिव ही त्यांची प्रमुख दैवते. शिव व कृष्णाचे ते भक्त असल्यामुळे ते मंदिरे उभारतात. ते स्वतःस हिंदू व शाक्त पंथांचे मानतात. काही लोकांनी ख्रिस्ती धर्माचा व वैष्णव पंथाचा पुरस्कार केलेला आहे. देवतराणी देबलक्ष्मीस ते आपले पूर्वज मानतात. तुईमा (नदीची देवता), गाराई, कालाई (पहाडी देवता), बुराचा (वन देवता) या त्यांच्या प्रमख देवता होत.
मृतास ते पुरतात. ते दरवर्षी लक्ष्मीपूजा, केरपूजा, मातंगी पूजा, त्रिपुरसुंदरी पूजा व चित्रगुप्त पूजा करितात. या पूजनांची सर्व जबाबदारी कातरदफाकडे असते. यावेळेस गावप्रमुखाच्या बैठकी होऊन तंट्यांचा निकाल दिला जातो. हिंदू बंगाली लोकांचा त्यांचा जीवनावर परिणाम झालेला आढळून येतो. तसेच फिरत्या शेती ऐवजी ते आता कायम पद्धतीची सुधारित शेती करीत आहेत.
संदर्भ : Karotempral, S. The Tribes of North East India, Calcutta, 1984.
सिरसाळकर, पु. र.