रॉस समुद्र : अंटार्क्टिका खंडाच्या व्हिक्टोरिया लँड व मारी बर्ड लँड (सातवा एडवर्ड द्वीपकल्प) यांदरम्यानचा दक्षिण पॅसिफिक महासागराचा भाग. क्षेत्रफळ सु.९,६०,००० चौ. किमी. खोली बहुतेक ठिकाणी ९०० मी.पेक्षाही कमी. ७५० दक्षिण अक्षांश व १७५० प. रेखांश यांच्या प्रदेशात असलेला हा समुद्र सुरुवातीला दक्षिण ध्रुवाचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध होता.
इ. स. १८४१ मध्ये जेम्स क्लार्क रॉस या ब्रिटिश समन्वेषकाने या भागाचा शोध लावला. त्याच्या नावावरूनच याला रॉस समुद्र हे नाव देण्यात आले. समुद्रामुळे अंटार्क्टिका खंडाचा गोलाकार तुटला आहे. समुद्राच्या पश्चिम भागात रॉस व पूर्व भागात रूझवेल्ट ही प्रमुख बेटे असून रॉस बेटावर मौंट एरेबस हा प्रसिद्ध जागृत ज्वालामुखी आहे.
या समुद्राचा दक्षिण भाग तरत्या, परंतु स्थिर अशा प्रचंड रॉस हिमतटाने व्यापलेला असून तो जगातील एक मोठा तरता हिमतट मानला जातो. हा ‘रॉस बॅरिअर’ या नावानेही ओळखला जातो. हा हिमतट दक्षिण ध्रुवापर्यंत (सु. ५५० किमी.) पसरलेला असून याचे क्षेत्रफळ सु. ५,००,००० चौ. किमी. जाडी सु. १८० ते ३०० मी. व पाण्याबाहेरील उंची ७० मी. आहे. याला सु. ६४४ किमी. लांबीच्या सागरी किनारा असून पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या. जोरदार सागरी प्रवाहांमुळे याचे अनेक हिमनग व हिमगठ्ठे (पॅक आइस) वाहून समुद्रात जातात. व्हेल उपसागर हा या हिमतटाचा एक खाडीसारखा भाग असून १९११ साली दक्षिण धुव्राच्या शोधासाठी नॉर्वेजियन समन्वेषक आमुनसेन याने याच भागात आपला तळ ठोकला होता. अंटार्क्टिका संशोधनासाठी रिचर्ड बर्ड या अमेरिकन संशोधन १९२८ साली उभारलेला ‘लिटल अमेरिका’ हा तळ याच भागात रॉस हिमतटावर होता. रॉस समुद्राच्या पश्चिम भागातील मॅकमर्दो साउंड हा उन्हाळ्यांत काही काळ बर्फमुक्त असतो. द. ध्रुवाच्या संशोधनाची सुरुवात या प्रदेशातून होते.
पहा : अंटार्क्टिका रॉस, जेम्स क्लार्क.
चोंडे, मा. ल.