रॉब –ग्रीये, आलँ : (१८ ऑगस्ट १९२२ – ) विख्यात फ्रेंच कादंबरीकार, पटकथाकार आणि चित्रपटदिग्दर्शक. जन्म ब्रेस्त येथे. शिक्षण पॅरिसमध्ये झाले. संख्याशास्त्र आणि कृषिशास्त्र हया विषयांतील तज्ञ. ले गॉम्स (१९५३, इं. भा. द इरेजर्स, १९६४) ही त्याची पहिली कादंबरी

त्याच्या अन्य कादंबऱ्या अशा : लू व्हाय्यर (१९५५, इं. भां, द व्हाय्यर, १९५८), ला ज्यालुझी मममम(१९५७, द ज्यॅलसी, १९५९), ला मेझाँ द् रांदेव्हू (१९६६, इं. भा. द हाउस ऑफ ॲसिग्नेशन १९७०), प्रॉजॅ पूर यून रेव्हॉल्युस्याँ आ न्यूयॉर्क (१९७०, इं, भा. प्रॉजेक्ट फॉर ए रेव्हलूशन इन न्यूयॉक, १९७२), तोपोलोजी द्यून सिते फांतोम (१९७६, इं. भा. टोपॉलॉजी ऑफ ए फँटम सिटी, १९७७), ला बॅल काप्तीव्ह (१९७६), अँ रेजीसीद (१९७८, इं. शी. ए रेजिसीद) आणि जीन (१९८१, इं. भा. १९८२) ले रॉमानेस्क ही त्यांची एक तीन भागांतील कादंबरी ल मिरवार की रव्हियां (१९८५), आंज्येलीक उ लांशांतमां (१९८८) व ला मॉर द कोरॅद (अप्रकाशित) ही त्या तीन भागांची नावे.

फ्रेंच साहित्यातील ‘नुव्हो रॉमां’ चा−म्हणजे नव कादंबरीचा−खंदा पुरस्कर्ता आणि प्रतिनिधी म्हणून रॉब-ग्रीये ओळखला जातो. वस्तू, माणसांच्या हालचाली आणि प्रसंग ह्यांच्यातील दुवे शोधून काढणे हाच त्यांचा कांदरीलेखनाचा प्रमुख उद्देश म्हणूनच व्यक्तींच्या कृतींवर मानसशास्त्रीय वा तात्त्विक स्वरूपाचे असे कोणतेही भाष्य करावयाचे तो टाळतो. वस्तूचे वर्णन तो अत्यंत महत्त्वाचे मानतो. त्यामुळेच त्याचे साहित्य म्हणजे शब्दांच्या साहाय्याने केलेले वस्तूंचे अचूक छायाचित्रण, असे म्हणता येईल उदा., अँस्तातांने (१९६२, इं. शी. स्नॅन शॉट्‌स) हया त्याच्या साहित्यकृतीत कथानक आणि व्यक्तिचित्रण ह्यांना गौणत्व देण्यात आले असून वस्तुवर्णनालाच प्राधान्य दिले गेले आहे. अपल्या साहित्यकृतींत तो वस्तूंची तपशील वार जंत्री देतो, कालप्रवातीत भूत-वर्तमान-भविष्यातील घटना मागेपुढे करून तो सूत्रब्द काळांची संकल्पनाच मोडून टाकतो. शिवाय वास्तव व कल्पित घटना तो एकच स्तरावर चित्रित करतो.

आपले तंत्र त्याने आपल्या चित्रपटांतील−विशेषतः लाने दॅरनियॅर आ मारियनवाढ (१९६१ इं. अर्थ लास्ट यीअर ॲट मारियनवाढ) ह्या चित्रपटात−वापरले. हया चित्रपटाला व्हेनिस येथील चित्रपटमहोत्सवात गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.त्याचे इतर उल्लेखनीय चित्रपट असे : त्रास अरॉप एक्स्प्रॅस (१९६६), लॉम की मा (१९६८), लेदॅन ए आँम की मा (१९७०), एन आमी लेदे (१९७१), लज आव्हॅक लफ्य (१९७५). पूर अँ न्यु नुव्हो रॉमां (१९६३ इं. भा. टुवर्ड ए न्यू नॉव्हेल : एंजेस ऑन फिक्शन, १९६५) ह्या आपल्या लेखसंग्रहात भावी कांदबरी कशी असावी, हया विषयाचे विचार त्याने प्रकट केले आहेत. पूरक ज्यॅम बार्थ (१९७८) हा त्याचा टीकाग्रंथही उल्लेखनीय आहे.

संदर्भ : 1. Cohn, Dorrit, Castles and Anti Castles or Kafka and Robbe-Grillet in Novel, 1971.

2. Gardies, Andre, Alain Robbe-Grillet , Paris, 1972.

3. Murissette, Bruce, Alain Robbe-Grillet, 1965.

4. Stoftxfus, Ben, Alain Robbe-Grillet and the New French Novel, Carbondale (III), 1964.

सरदेसाय, मनोहरराय