रॉकी पर्वत : उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील एक प्रमुख पर्वतश्रेणी. दक्षिणेस अ. सं. सं. तील मेक्सिको राज्यापासून उत्तरेस वायव्य अलास्कापर्यंत पसरलेल्या या पर्वतश्रेणीची लांबी ४,८०० किमी.,रुंदी ११२ किमी. ते ६४४ किमी. व सस. पासून उंची १,५०० मी. ते ४,३९८ मी. पर्यंत आढळते. कोलोरॅडो राज्यातील मौंट एल्बर्ट (उंची ४,३९८ मी.) हे या पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. पूर्वेकडील विशाल मैदानी प्रदेश व पश्चिमेकडील रुंद द्रोणी प्रदेश आणि पठारी प्रदेश यांदरम्यान रॉकी पर्वताचा विस्तार आहे. या पर्वतश्रेणीमुळे पॅसिफिक महासागराकडे वाहत जाणाऱ्या नद्यांपासून आर्क्टिक व अटलांटिक या महासागरांकडे वाहत जाणाऱ्या नद्या अलग केल्या गेल्या आहेत. अटलांटिक महासागराकडे वाहत जाणाऱ्या रीओ ग्रँड, आर्कॅन्सा, प्लेट, यलोस्टोन, मिसूरी व सस्कॅचेवन आर्क्टिक महासागराकडे वाहत जाणाऱ्या पीस, ॲथाबास्का व लीआर्ड आणि पॅसिफिक महासागराकडे वाहत जाणाऱ्या कोलोरॅडो, कोलंबिया, स्नेक, फ्रेझर व यूकॉन या सर्व मुख्य नद्या रॉकी पर्वतात उगम पावतात. कोलोरॅडो नदीची प्रसिद्ध ग्रँड कॅन्यन रॉकी पर्वतप्रदेशातच आहे.
मध्यजीव कल्पातील व नूतनजीव महाकल्पाच्या पूर्वार्धातील पर्वतनिर्माणकारी हालचालींच्या वेळी रॉकी पर्वताची निर्मिती झाली. प्रत्येक पर्वतनिर्माणकारी हालचालींच्या काळात या जटिल पर्वतप्रदेशाची उंची वाढत गेल्याचे आढळते. पर्वताचे खननही बरेच झालेले दिसते. उत्तरेकडील श्रेण्या व दक्षिणेकडील उंच शिखरांच्या भागात आजही हिमनद्या व हिमक्षेत्रे पहावयास मिळतात. पूर्वी त्यांचे प्रमाण अधिक होते. अल्पाइन हिमानी कल्पातील अनेक अपक्षरण भूविशेष या संपूर्ण श्रेणीमध्ये पहावयास मिळतात. भूमिस्वरूपाच्या दृष्टीने रॉकी पर्वताचे मुख्य पाच विभाग पाडता येतात. (१) दक्षिण रॉकी (२) मध्य रॉकी (३) उत्तर रॉकी (४) कॅनडातील रॉकी पर्वतश्रेणी व (५) अलास्कातील ब्रुक्स रेंज.
दक्षिण रॉकी पर्वतविभागाचा विस्तार न्यू मेक्सिको, कोलोरॅडो व वायोमिंग या राज्यांत असून, तेथे दक्षिणोत्तर असे वलीपर्वताचे दोन ठळक पट्टे आढळतात. यांपैकी पूर्वेकडील पट्ट्यात लॅरमी, मेडिसिन बो, वेट व फ्रंट या पर्वतश्रेण्या, तर पश्चिमेकडील पट्ट्यात आहेत. या दोन पट्ट्यांदरम्यान तीन द्रोणीप्रदेश असून ते उत्तर, दक्षिण व मध्य पार्क या नावांनी ओळखले जातात. नैर्ऋत्य भागांत सॅन वॉन पर्वत हा विलग असा उच्चभूमीचा प्रदेश असून त्यात ज्वालामुखीजन्य खडक आहेत. दक्षिण रॉकीमध्ये सर्वाधिक उंचीची शिखरे असून त्यांची उंची ४,२६७ मी. पेक्षा अधिक आहे. त्यांपैकी मौंट एल्बर्ट व मौट मासिव्ह (४,३९५ मी.) ही प्रमुख शिखरे असून ती सावॉच पर्वतश्रेणीत आहेत. याशिवाय ग्रेझ लाँग्झ ही महत्त्वाची शिखरे आहेत. १८ व्या व १९ व्या शतकातील संशोधन मोहिमांत उपयुक्त ठरलेली येथील रॅटन खिंड प्रसिद्ध आहे.
दक्षिण रॉकी पर्वतविभागाच्या उत्तरेकडील, ईशान्य उटा आणि पश्चिम वायोमिंग राज्यांतील रॉकी पर्वतप्रदेश मध्य रॉकी या नावाने ओळखला जातो. वायोमिंग द्रोणीमुळे दक्षिण व मध्य रॉकी या नावाने ओळखला जातो. वायोमिंग द्रोणीमुळे दक्षिण व मध्य रॉकी पर्वत विभाग वेगळे झालेले आहेत. येथील रांगा सामान्यपणे कमी उंचीच्या व तुटक-तुटक आहेत. वॉसॅच व टीटॉन या गट पर्वतरांगा, ज्वालामुखीजन्य खडकयुक्त यलोस्टोन पठार ॲबसारका रांगा, बिग्हॉर्न, ब्रिजर, शोशोन, बेअरटूथ, आउलक्रीक, यूइंटा व विंड रिव्हर रांग हे रुंद वली पर्वत या सर्वांचा समावेश मध्य रॉकी पर्वतविभागात होतो. या विभागाचे बरेच खनन झालेले आहे. दोन रांगांमधील खोरी अधिक रुंद आहेत. विंड रिव्हर रांगेतील गॅनिट शिखर (४,२०२ मी.) व टीटॉन रांगेतील ग्रँड टीटॉन (४,१९६ मी.) ही मध्य रॉकीमधील सर्वाधिक उंचीची शिखरे आहेत.
ईशान्य वॉशिंग्टन, उत्तर व मध्य आयडाहो आणि वायव्य वायेमिंग राज्यांतील रॉकी पर्वत उत्तर रॉकी म्हणून ओळखला जात असून, त्याचा विस्तार दक्षिणेस यलोस्टोन नॅशनल पार्कपासून उत्तरेस संयुक्त संस्थाने-कॅनडा सरहद्दीपर्यंत असलेला आढळतो. क्लिअरवॉटर, सॅमन, सॉटूथ, लॉस्ट रिव्हर, बिटररूट ह्या या भागातील प्रमुख पर्वतरांगा आहेत. दक्षिणोत्तर पसरलेल्या या श्रेण्या अरुंद खंदकांनी व दऱ्यांनी एकमेकींपासून अलग केलेल्या आहेत. रॉकी मौंटन व पर्सेल या यथील दोन प्रसिद्ध दऱ्या आहेत. दक्षिणेकडील रॉकी पर्वतविभागापेक्षा उत्तर रॉकी पर्वतविभागांतील शिखरे कमी उंचीची आहेत. लॉस्ट रिव्हर पर्वतश्रेणीतील बोरा (३,८५७ मी.) व लेदरमन (३,७२८ मी.) ही या विभागातील प्रमुख शिखरे आहेत. उत्तर रॉकी पर्वतावर वळ्या क्रिटेशियस काळाच्या उत्तरार्धात निर्माण झाल्या. त्यानंतर आदिनूतन काळात तेथे ज्वालामुखी क्रिया घडून त्या प्रदेशात लाव्हारसाचे संचलन झाले. तदनंतर मध्यनूतन व अतिनूतन कालखंडांत येथील बराचसा भाग उंचावला गेला. नद्यांच्या खनन कार्यामुळे येथील पर्वतश्रेण्या एकमेकांपासून अलग झाल्या. तसेच हिमनद्यांनीही पर्वतमाथ्याच्या खननाचे बरेच कार्य केलेले दिसते.
कॅनडातील रॉकी पर्वतसंतीचे प्रमुख दोन विभाग पडतात : (१) पूर्वेकडील उंच ओबडधोबड शिखरांचा मुख्य कॅनडियन रॉकी व (२) पश्चिमेकडील कोलंबिया पर्वतगट. ब्रिटिश कालंबिया व ॲल्बर्टा यांच्या सरहद्दींदरम्यान मुख्य कॅनडियन रॉकी पर्वतप्रदेश येतो. रॉब्सन (३,९५४ मी.) हे या कॅनडियन रॉकीमधील सर्वोच्च शिखर असून, कोलंबिया (३,७४८ मी.) व फोर्ब्झ (३,६२८ मी.) ही इतर महत्त्वाची शिखरे आहेत. या पर्वतविभागात पीस, फ्रेझर, कोलंबिया व कूटने या नद्यांची खोरी आहेत. पश्चिमेकडील कोलंबिया पर्वतगटामध्ये सेलकर्क, पर्सेल, मनॅशी व कॅरिबू पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. रॉकीचा विस्तार पुढे यूकॉन व वायव्य प्रदेशांमध्येही आढळत असून तेथे मॅकेंझी, रिचर्ड्सन व फ्रँकसिन ह्या प्रमुख पर्वतश्रेण्या आहेत. कॅनडातील रॉकी पर्वत तीव्र उताराचा, हिमाच्छादित व हिमनदीयुक्त असा आहे.
उत्तरेकडे अलास्कामध्येही रॉकी पर्वताचा विस्तार आढळत असून तेथे ब्रुक्स ही पर्वतश्रेणी महत्त्वाची आहे. चेंबलीन (२,७४९ मी.) हे तेथील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. ब्रुक्स रांगेची उंची पूर्व भागात २,४३८ मी. व पश्चिम भागात ३०५ मी. आहे. हा पर्वतीय भाग अतिशय थंड हवामानाचा हिमाच्छादित व वृक्षरहित असा आहे. हाच रॉकीचा सर्वांत उत्तरेकडील भाग आहे. याचे विशेष समन्वेषण अजून झालेले नाही. रॉकी पर्वताच्या वरील वर्गीकरणाशिवाय पश्चिम रॉकी आणि पूर्व रॉकी असेही रॉकी पर्वताचे वर्गीकरण केले जाते.
खाणकाम व्यवसायाच्या दृष्टीने संपूर्ण रॉकी पर्वतश्रेणी महत्त्वाची असून सोने, चांदी, जस्त, शिसे, तांबे, मॉलिब्डेनम, टंगस्टन, बेरिलियम व युरेनियम ही येथील महत्त्वाची खनिजे आहेत. संयुक्त संस्थानांचे मॉलिब्डेनम, बेरिलियम व युरेनियमचे बहुतेक सर्व उत्पादन रॉकी पर्वतप्रदेशांतून होते. यांशिवाय फॉस्फेट, पोटॅश, मॅग्नशियम, लिथियम सॉल्ट, ग्लाउबर सॉल्ट, जिप्सम, चुनखडक, डोलोमाइट ही अधातू खनिजे येथून मिळतात. कोलोरॅडोतील सॅन वॉन पर्वत, लिडव्हील व क्रिपल क्रीक माँटॅनातील ब्यूट-ॲनकाँडा आयडाहोतील कूर दालीनी व ब्रिटिश कोलंबियातील कूटने विभाग इ. खाणकामाची प्रमुख क्षेत्रे आहेत. वायोमिंगमधील जॅस्पर व इव्हानस्टन यांदरम्यानचे वायोमिंग खोरे खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. तेथे कोळसा, तैलशेल व युरेनियमचेही साठे आहेत. रॉकी पर्वतप्रदेशातील खाणकाम व्यवसायात सु. ५० लाख लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. पर्वतात विस्तृत अशी लाव्हाक्षेत्रे आहेत. रॉकी पर्वतावर विस्तीर्ण अरण्यमय प्रदेश असून कमी उंचीच्या उतारांवर पिनॉन पाइन व जूनिपर वृक्ष अधिक आहेत, तर जास्त उंचीच्या भागात फर, पाइन, स्पूस वृक्ष अधिक आहेत. माँटॅना, आयडाहो व ब्रिटिश कोलंबियात व्यापारी दृष्ट्या उपयुक्त अशी अरण्ये आणि वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध असल्याने तेथे लाकूडतोड व इतर अरण्योद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. अस्वल, हरिण, ससा, सांबर, मिंक, सायाळ, खार, चिपमंक, कॉयॉट, मूस, चिचुंद्री, हे प्राणी रॉकीमध्ये भरपूर आहेत. येथील प्रवाहांमध्ये विविध प्रकारचे मासे आढळतात. पशुपालन हासुद्धा या भागातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. उन्हाळ्यात गुरे व मेंढ्या पर्वतीय प्रदेशाकडे, तर हिवाळ्यात पायथ्याकडील सखल खोऱ्याकडे आणल्या जातात. कोलोरॅडो, आयडाहो, माँटॅना व उटामधील या पर्वतप्रदेशात धान्ये बटाटे, साखरबीट व भाजीपाला ही कृषी उत्पादने घेतली जातात.
हिमाच्छादित शिखरे, हिरवीगार सूचिपर्णी अरण्ये, मोठमोठ्या दऱ्या, स्फटिकासारखे स्वच्छ प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान, विलोभनीय सृष्टिसौंदर्य, उद्याने, सरोवर इत्यादींमुळे रॉकी पर्वतात मनोरंजनाची अनेक स्थळे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक उन्हाळ्यात व हिवाळ्यातही येथे येत असतात. संयुक्त संस्थांनांतील रॉकी मौंटन, यलोस्टोन, ग्रँड टीटॉन व ग्लेसिसर आणि कॅनडातील जॅस्पर, बॅम्फ, योहो, ग्लेसियर, कूटने व मौंट रीव्हलस्टोक ही रॉकी पर्वतसंहतीमधील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत. लेन कॅन्यन राष्ट्रीय मनोरंजन क्षेत्र उल्लेखनीय असून, ते पॉवल सरोवराच्या दोन्ही बाजूंना पसरलेले आहे.
रॉकी पर्वत हा खंडीय वाहतुकीतील प्रमुख अडथळ ठरलेला आहे. नैर्ऋत्य वायोभिंगामधील विंड रिव्हर श्रेणीच्या दक्षिण टोकाशी २,३०० मी. उंचीवर असलेली ‘साउथ पास’ ही खिंड वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यात इतरही काही खिंडी व बोगदे असून त्यांपैकी किकिंग हॉर्स (उंची १,६८८ मी.), क्रोजनेस्ट, यलोहेड खिंडी व मॉफ्ट, आयझनहौअर मिमॉरिअल हे बोगदे महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी किकिंग हॉर्स खिंडीतून ट्रान्स-कॅनडियन हा महामार्ग गेलेला आहे.
संयुक्त संस्थानांतील व कॅनडातील अनेक समन्वेषकांनी रॉकी पर्वताचे समन्वेषण केलेले आहे. सुरुवातीला रॉकीमध्ये प्रवास करणारे मुख्यतः फरचे व्यापारी, समन्वेषक किंवा भूगोलतज्ञ होते. त्यांना या पर्वत भागात आगणित असे स्फटिकमय खडकांचे तुकडे पहावयास मिळाले. तेथे जेव्हा हिमाच्छादन नसे, त्यावेळी त्या स्फटिकमय खडकांवरून सूर्यकिरणांचे परावर्तन खूप दूरपर्यंत होत असलेले दिसे. त्यामुळेच सुरुवातीच्या समन्वेषकांनी ‘चमकणारा पर्वत’ असा रॉकीचा उल्लेख केला. रॉकीमध्ये अवाढव्य खडक इतस्ततः विखुरलेले आढळत असल्यामुळे नंतरच्या समन्वेषकांनी ‘रॉकी मौंटन’ असे नाव दिलेले असावे. व्हास्केस द कोरोनादो (१५४०), मेरीवेदर ल्यूइस व विल्यम क्लार्क (१८०३−०६), स्टेफान लॉग (१९१९−२०), जॉन फ्रेमाँट (१८४६−४८), क्लारन्स किंग(१८६७−७८), जॉन वेस्ली पॉवेल (१८६९−७८), जॉर्ज एम्. व्हीलर (१८७२−७९) इ. संयुक्त संस्थानांतील रॉकी पर्वताचे समन्वेषण करणारे प्रमुख समन्वेषक आहेत, तरला व्हेरांद्रे (१७३८-३९), सर अलेक्झांडर माकेंझी (१७९२-९३), डेव्हिड टॉमसन (१७९९−१८०३) व सायमन फ्रेझर (१८०३−०७) हे प्रमुख कॅनडियन समन्वेषक होत.
चौधरी, वसंत