राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी, डेहराडून : भारतातील सैनिकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी डेहराडून येथील प्रसिद्ध संस्था. ⇨डेहराडूनच्या परिसरातील शिवालिक डोंगररांगांच्या पायथ्याशी सु. ५६ हेक्टर क्षेत्रात ही संख्या वसलेली आहे. द्रोणाचार्यांनी याच परिसरात कौरव-पांडवांना धनुर्विद्येचे शिक्षण दिले होते, अशी आख्यायिका आहे. या संस्थेला लागूनच राष्ट्रीय सैनिकी महाविद्यालयही (अधिकृत नाव ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज’) आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (खडकवासला) प्रवेश परीक्षेसाठी त्यात उमेदवारांना शिक्षण देण्यात येते.
राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनीला इतिहास आहे. ब्रिटिश काळात वारंवार मागणी करूनही भारतीयांना देशातच उच्च सैनिकी शिक्षण मिळण्याची व्यवस्था ब्रिटिश शासनाने दीर्घकाळपर्यंत केली नाही. इंग्लंडमधील सँडहर्स्ट येथील ⇨रॉयल मिलिटरी अकॅडेमीत निवडक भारतीयांना प्रशिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज या नावाने १९२२ साली सुरू झालेल्या येथील संस्थेत भारतीयांना प्राथमिक स्वरूपाचे सैनिकी प्रशिक्षण देण्यात येई. त्यांतील निवडक उमेदवारांना इंग्लंडमध्ये उच्च सैनिकी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येई. पहिल्या गोलमेज परिषदेनंतर (१९३०) संरक्षण उपसमितीच्या शिफारशीनुसार हिंदुस्थानात सैनिकी महाविद्यालय स्थापन करण्याची योजना पुढे आली. त्यानुसार १० डिसेंबर १९३२ रोजी डेहराडून येथे या प्रबोधिनीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून संस्थेच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल करण्यात आले. १९४६ पासून सैन्यातील रीतसर कमिशनपुरतेच सैनिकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ठेवण्यात आली. स्वतंत्र भारतातील सैनिकी अधिकाऱ्यांच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम पहिल्यांदा याच प्रबोधिनीत सुरू करण्यात आला (१९४८). १९४९ साली ‘आर्मूड फोर्सेस अकॅडेमी’ आणि १९५० साली ⇨राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे या संस्थेचे नामांतर करण्यात आले. पुढे खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी स्थापन करण्यात आली व डेहराडून येथील या संस्थेचे विद्यमान नाव राष्ट्रीय सैनिकी प्रबोधिनी असे कायम झाले.
या संस्थेत खडकवासल्याच्या प्रबोधिनीतून बाहेर पडणाऱ्या उमेदवारांना सैनिकी कमिशन देण्यापूर्वी एक वर्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि सैनिकी सेवा निवड मंडळ यांच्या परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी दीड वर्षांचा एक अभ्यासक्रम आहे. तसेच सैन्यातील तांत्रिक विभागांतील विशेष कमिशन मिळवू इच्छिणाऱ्या निवडक पदवीवरांसाठी या प्रबोधिनीत एक वर्षांचा अभ्यासक्रम आहे. ‘आर्मी कॅडेट कॉलेज’ मध्ये तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतलेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाच्या प्रशिक्षणाची व्यवस्थाही या प्रबोधिनीत आहे. या प्रशिक्षणानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना भूसेनेत कमिशन देण्यात येते.
आधुनिक भारताच्या लष्करी जडणघडणीत डेहराडूनच्या राष्ट्रीय सैनिकी महाविद्यालय आणि प्रबोधिनी या संस्थांना अत्यंत महत्त्व आहे.
संकपाळ, ज. बा. जाधव, रा. ग.