उद्धव चिद्‌घन : (सतरावे शतक, उत्तरार्ध). चैतन्य संप्रदायातील एक मराठी कवी. त्याचे स्वतःचे नाव उद्धव असून त्याच्या गुरूचे नाव चिद्‌घन. उद्धव चिद्‌घन असे गुरूच्या नावासह त्याचे नाव रूढ आहे. त्याचे आडनाव कोकिळ होते. हा बीड जिल्ह्यातील धारूरचा राहणारा. त्याची उपलब्ध कविता काव्यसंग्रहात छापली असून ती विविध वृत्तांत आहे. या कवितेशिवाय त्याने लिहिलेली मंत्रमाळा, भिल्ली नाटक इ. सोळा प्रकरणे विजापूर येथे मिळाली आहेत. नागनाथ, हेमराज आणि बहिरा पिसा (नागनाथाचे शिष्य), मृत्युंजय, गोरा कुंभार यांच्यावरील चरित्रपर काव्यग्रंथ त्याने रचिले आहेत. तसेच अनुभवशतक, गीतार्थमंजरी, शुकरंभासंवाद हेही त्याचेच काव्यग्रंथ होत. भक्तकथामृतसार या ग्रंथाचा कर्ता म्हणून तो विशेष प्रसिद्ध असला, तरी हा ग्रंथ मात्र अनुपलब्ध आहे. त्याने रचिलेली एक संतमाला, महाराष्ट्र कवि या मासिकात प्रसिद्ध झाली असून तीत अनेक संतांची माहिती आहे. संतमणिमालेत मोरोपंतांनी त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्याची कविता साधी आणि भक्तिरसपूर्ण आहे.

संदर्भ : आजगावकर, ज. र. महाराष्ट्रकविचरित्र, भाग तिसरा, मुंबई, १९९४.

सुर्वे, भा. ग.