रायोलाइट : फिकट रंगाचा सिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक असलेला) ज्वालामुखी खडक. हा खोल जागी बनलेल्या ग्रॅनाइटाशी रासायनिक दृष्ट्या तुल्य असा अदृश्यकणी (स्फटिक नुसत्या डोळ्यांनी न दिसू शकणारा) अग्निज खडक आहे. पूर्ण स्फटिकीभवन झालेल्या रायोलाइटात अल्कली फेल्स्पारे (सॅनिडीन, ऑलिगोक्लेज) व मुक्त सिलिका ही प्रमुख खनिजे असून कृष्णाभ्रक, हिरवे हॉर्नब्लेंड किंवा पायरोक्सीन ही यातील लोह-मॅग्नेशियमयुक्त गडद खनिजे आहेत. झिर्‌कॉन, स्फीन, मॅग्नेटाइट, ॲपेटाइट तर कधीकधी टिटॅनाइट, ॲनॅटेज, तोरमल्ली, फ्ल्युओराइट, कुरुविंद या पुष्कराज ही यातील गौण खनिजे होत. याचा रंग फिकट पिवळा, करडा वा गुलाबी असून याचे भंजन शंभाख असते. हा बहुधा काही प्रमाणात काचमय वा गूढस्फटिकी असतो तसेच स्फटिक मोठे असल्यास ग्रॅनाइटासारखा दिसतो. त्यामुळे रासायनिक विश्लेषणाद्वारे हा चटकन ओळखता येतो.

रायोलाइटाचा आधारक पुष्कळदा काचमय अथवा प्रवाही-पट्टन, प्रवाही-पर्णन असलेला असतो. कधीकधी आधारकात क्वॉर्ट्‌झ वा फेल्स्पार यांचे मोठे स्फटिक जडविले गेलेले आढळतात व या वयनाला पृषयुक्त वयन म्हणतात. आधारकातील स्फटिकी भागात क्वॉर्ट्‌झ व ट्रिडिमाइट यांचे स्फटिक फेल्स्पाराच्या स्फटिकात वाढलेले म्हणजे आंतरवृद्ध झालेले आढळतात. काचमय रायोलाइटात गोलाकार, ग्रंथिल किंवा शिलाकंदी रचनाही आढळतात. लाव्ह्यातून वायुरूप द्रव्ये निघून गेल्याने बनलेल्या पोकळ्याही पुष्कळदा यात आढळतात. रायोलाइटी लाव्हा अधिक श्यान (दाट) असतो व त्यामुळे स्फटिकीभवनास त्यात विरोध होऊन खडक बऱ्याचदा काचमय होतो. पूर्णतया काचमय प्रकाराला ⇨ ज्वालाकाच, ⇨पिचस्टोन, पर्लाइट किंवा ⇨पमीस अशी नावे आहेत. लाव्हा बाहेर पडण्यापूर्वी स्फटिकीभवनास सुरुवात झाल्याचे पृषयुक्त वयनावरून सूचित होते. जेवढ्या अधिक खोलीवर स्फटिकीभवन सुरू होते तेवढे स्फटिक अधिक चांगले व मोठे बनतात. कधीकधी काचमय द्रव्याचे विकाचीभवन (स्फटिकात रूपांतर) होऊन खडकाची रचना ⇨फेल्साइट खडका प्रमाणे होते.

पोटॅश वा सोडायुक्त फेल्स्पारानुसार याचे पोटॅशयुक्त व सोडायुक्त (पँटेलेराइट) रायोलाइट असे प्रकार केले जातात. रासायनिक दृष्ट्या ⇨ग्रॅनोडायोराइटाशी तुल्य असलेल्या रायोलाइटाला क्वॉर्ट्‌झ लॅटाइट म्हणतात.

बेसाल्ट व ⇨अँडेलाइट यांच्या बरोबर व यांच्या खालोखाल विपुल प्रमाणात आढळणारा हा ज्वालामुखी खडक असून जगात सर्वत्र व सर्व काळांमधील खडकांत आढळतो. हा लाव्हा प्रवाह, कोणाश्म कधीकधी ज्वालामुखी ग्रीवा, भित्ती किंवा शिलापट्ट आणि क्वचित छोटे घुमट या रूपांत आढळतो. अचानकपणे थंड झालेल्या मोठ्या अग्निज राशींच्या सीमावर्ती भागातही हा आढळतो. क्वचित डकाइट व क्वॉर्ट्‌झ लॅटाइट या रूपांतही हा असतो.

ज्वालामुखी क्रिया घडलेल्या वा घडत असणाऱ्या भागात हा आढळतो. रायोलाइटाशी निगडित असलेली ज्वालामुखी क्रिया सामान्यतः खंडांवरच आढळते. ती बहुधा गिरजननाशी निगडित असून या खडकाचे प्रवाह हे तेथील पर्वताच्या गाभ्यापासून म्हणजे ⇨बॅथोलिथापासून भूपृष्ठावर आलेल्या शाखा असाव्यात. पृथ्वीच्या सियाल (सिलिका व अँल्युमिनियम यांनी युक्त) नावाच्या थराचा काही भाग वितळून किंवा बेसाल्टी शिलारसाचे भिन्नीभवन होऊन रायोलाइटी शिलारस बनू शकतो. याच्याच जोडीने कदाचित सिलिकायुक्त द्रव्याचे शिलारसात सात्मीकरण होत असावे [⟶ शिलारस-१ अग्निज खडक].

उत्तर वेल्स, न्यूझीलंड, स्कॉटलंड, केन्या, सोमालीलँड, सोकोत्रा, यलोस्टोन प्रदेश, नैर्ऋत्य अमेरिका इ. भागांत रायोलाइट आढळतो. महासागरात असलेल्या काही बेटांवरही हा आढळला आहे. भारतामध्ये मालानी (राजस्थान) सरगुजा, डोंगरगढ, नर्मदा खोरे (मध्य प्रदेश) पावागढ, जुनागढ, गीर जंगल, पोरबंदर (गुजरात) काश्मीर खोरे, किराणा टेकड्या (पंजाब) शिमोगा (कर्नाटक) तसेच पश्चिम घाटातील काही ठिकाणी रायोलाइट आढळतो.

हंगेरीतील ⇨ट्रॅकाइटाच्या एका प्रकारात वैशिष्ट्यपूर्ण प्रवाही रचना आढळते म्हणून तिच्यावरून १८६१ साली फॉन रिख्थोफेन यांनी याला लाव्ह्याचा प्रवाही खडक या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून रायोलाइट हे नाव दिले. त्याच वर्षी जे. रॉय यांनी या खडकाला लिपारी बेटांवरून लिपाराइट हे नाव सुचविले होते. मात्र लिपाराइट हे नाव पुढे मुख्यत्वे पृषयुक्त वयनाच्या रायोलाइटासाठी वापरले जाऊ लागले.

पहा : अग्निज खडक ज्वालामुखी -२.

ठाकूर, अ. ना.