रामशास्त्री प्रभुणे : ( ? –१७२० – १५ ऑक्टोबर१७८९). उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश. त्यांचा जन्म साताऱ्याजवळच्या माहुली तीर्थक्षेत्रात ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील विश्वनाथ व आई पार्वतीबाई. ते रामशास्त्रींच्या बालपणीच वारले. तेव्हा काकाने त्यांचा काही काळ सांभाळ केला. मोठा होऊनही काही द्रव्यार्जन करीत नाही, हे पाहून काकाने त्यास घराबाहेर काढले. तेव्हा सातारचे सावकार अनगळ यांचे घरी ते शागिर्दी करू लागले. नंतर त्यांच्या प्रोत्साहनाने प्रौढपणी काशीस जाऊन त्यांनी धर्मशास्त्रादी विद्यांचा अभ्यास केला आणि १७५१ मध्ये पेशवे दरबारात एक शास्त्री म्हणून प्रथम नोकरीस लागले. पेशवे दरबाराचे न्यायाधीश बाळकृष्णशास्त्री मरण पावल्यावर त्यांची न्यायाधीशाच्या जागी इ. स. १७५९ मध्ये नेमणूक झाली. रामशास्त्री थोरल्या माधवराव पेशव्यास हरेक विषयांत मार्गदर्शन करीत असत. खुद्द माधवराव पेशवेही प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न, युद्धसंग्राम, जयापजय, नफानुकसान, खाजगी किंवा सार्वजनिक कोणतीही बाब इत्यादींबाबत रामशास्त्री यांचा सल्ला घेत असत. तरीही ह्या पेशव्यास, ‘ब्राह्मण असलात तरी राज्यकर्ते आहात, तेव्हा स्नानसंध्येत जास्त वेळ घालविण्याचा तुम्हास अधिकार नाही’, असे बजावण्यास ते कचरले नाहीत.

पेशवा नारायणराव ह्याच्या खुनास (१७७३) त्याचा चुलता रघुनाथराव हाच जबाबदार आहे, असे गृहीत धरून त्याबद्दल त्याचे देहान्त प्रायश्चितच घेतले पाहिजे, असे त्यांनी उद्गार काढले आणि लगेच न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन ते वाईजवळ पांडेवाडी किंवा मुगाव येथे जाऊन राहिले. पुढे रघुनाथरावाविरुद्ध एकत्र आलेल्या बारभाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाना फडणीस, सखाराम बापू वगैरे कारभाऱ्यांची रघुनाथरावाविरुद्धची योजना यशस्वी होऊन तो पदभ्रष्ट झाल्यावर १७७७ मध्ये कारभाऱ्यांनी रामशास्त्रींची पेशवे सरकारात पुन्हा न्यायाधीश पदावर नेमणूक केली. सारस्वत ब्राह्मणांस उच्च समजल्या जाणाऱ्या अन्य ब्राह्मणांप्रमाणे लेखणे, प्रभुंच्या मागण्यांचा उदार वृत्तीने विचार करणे, अपात्र ब्राह्मणांची केवळ ब्राह्मण म्हणून तरफदारी न करणे, या त्यांच्या काही गोष्टी उल्लेखनीय आहेत. यांवरून ते त्यांच्या काळाच्या संदर्भात प्रागतिक होते हे लक्षात येते.

शनिवार वाड्यात रामशास्त्री न्यायनिवाडे व विद्वानांच्या परीक्षा करीत. त्यांनी अग्निहोत्र घेतले होते. निर्भीड व निस्पृह न्यायाधीश म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती झाली. तसेच त्यांच्या कडक परीक्षा पद्धतीमुळे ते विख्यातही झाले व अप्रियही झाले. इ. स. १७८० साली त्यांना रु. २,००० तनखा, रु. १,००० पालखीसाठी व श्रावणमास दक्षणा रु. १,००० पेशवे दरबारातून मिळत होती. याशिवाय पेशवे सरकारने त्यांची कर्जे फेडली, पत्नीच्या उत्तरक्रियेचा खर्च केला आणि दुसऱ्या लग्नासाठी पैसे दिले तथापि एकूण चाळीस वर्षांच्या त्यांच्या सेवेबद्दल पेशव्यांकडून त्यांना एकूण ५५,९६८ रुपयेच मिळाल्याचे दिसते.

रामशास्त्रींच्या खाजगी जीवनाविषयी फारशी माहिती अद्यापि उजेडात आली नाही. त्यांनी पहिला विवाह १७५८ साली केला. या पत्नीपासून त्यांना एक मुलगा असावा. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी १७७८ मध्ये काशीबाई या मुलीबरोबर दुसरे लग्न केले. तिच्यापासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. त्यांचे पश्चात मुलगा गोपाळशास्त्री यास प्रथम पेशवे दरबाराकडून व पुढे इंग्रज सरकारकडून तनखा होता. रामशास्त्री स्पष्टवक्ते व निस्पृह होते. धार्मिक व्यवहारात कालमान व परिस्थिती ओळखण्याचे त्यांचे मनोधैर्य, मराठी राज्याविषयीची अनुपम निष्ठा आणि निवाडे करण्याची काटेकोर पद्धती यांच्या योगाने ते इतिहासातील एक अविस्मरणीय असे न्यायाधीश झालेले आहेत. त्यांचे निधन पुण्यात झाले. त्यांचे वंशज पुणे जिल्ह्यात जेजुरीजवळ राखी गावी राहतात.

संदर्भ : १. आठवले, सदाशिव, रामशास्त्री प्रभुणे : चरित्र व पत्रे, पुणे, १९८८.

२. केळकर, य. न. काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे, पुणे, १९६७.

३. पारसनीस, द. ब. इतिहास संग्रह : जुन्या ऐतिहासिक गोष्टी, भाग २, मुंबई, १९६६.

४. वाकसकर, वि. स. अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे, बडोदे, १९२७.

५. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, उत्तर विभाग, भाग १ व २, पुणे १९२७.

खोबरेकर, वि. गो.