रामप्रसाद सेन : (१७२० – ८१). बंगाली कवी व शाक्तसाधक. चोवीस परगणा जिल्ह्यातील हालिशहरजवळच्या कुमारहाट गावचे ते रहिवासी. पित्याचे नाव रामराम. रामप्रसाद हे प्रथम कलकत्यास एका धनाढ्य व्यक्तीकडे कारकुनी करीत. पुढे त्यांना नवद्वीपचे राजे कृष्णचंद्र राय यांचा आश्रय लाभला. तांत्रिक शक्तिसाधक म्हणून त्यांचा फार दबदबा होता. काव्य, साधना व गायन या तीन स्वतंत्र विद्या त्यांना अवगत असल्यामुळे कवी, साधक व गायक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

विद्यासुंदर काव्य हे अठराव्या शतकाच्या सहाव्या सातव्या दशकात रामप्रसादांनी रचलेले काव्य होय. याच विद्या व सुंदर यांच्या प्रेमकहाणीवर रामप्रसादांचे ज्येष्ठ पण समकालीन प्रख्यात कवी ⇨भारतचंद्र (१७१२ – ६०) यांनीही एक काव्य अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिले होते. एकाच विषयावरील या दोन कवींच्या काव्यांची तुलना केल्यास भारतचंद्रांचे काव्य अधिक सरस ठरते. रामप्रसादांच्या काव्यात कल्पनाशक्तीची झेप जाणवते पण क्वचित शृंगाररसाचा अतिरेक खटकतो. असे असले तरीही कालीमातेच्या भक्तीचा सूर स्पष्टपणे जाणवावा इतका प्रभावी आहे. कालीकीर्तन ही रामप्रसादांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असून ती नव्या ‘पांचाली’ काव्यशैलीत आहे.

रामप्रसाद यांच्या नावावर जी तीनशेहून अधिक पदे व गीते प्रसिद्ध आहेत ती सर्व त्यांचीच आहेत की नाहीत, याबाबत बंगाली साहित्याच्या अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. पण या सर्व पदांमधून कालीमातेच्या भक्तीची व्याकुळता सतत जाणवते. उमा (अल्पवयीन पार्वतीचे मुग्ध प्रेमिकारूप) व विजया (प्रौढ पार्वतीचे वीरांगनारूप) या पार्वतीच्या दोन प्रमुख रूपांवरील पदे फारच थोडी असून तिच्या मातारूपावर रामप्रसादांचा विशेष भर दिसतो. त्यामुळे या लोकप्रिय पदांमध्ये वात्सल्यपूर्ण भक्तिभावना प्रकर्षाने जाणवते.

रामप्रसाद हे बंगाली साहित्यातील शाक्तगीतांच्या नवप्रवाहाचे प्रवर्तक मानले जातात. त्यांना कृष्णचंद्र राय यांनी ‘कविरंजन’ हा किताब देऊन गौरविले.

सेन, सुकुमार (बं.) आलासे, वीणा (म.)