रामदासी पंथ : महाराष्ट्रात इसवी सन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात समर्थ रामादासांचे कार्य आणि शिकवण यांतून प्रवर्तित झालेला एक पंथ. समर्थ संप्रदाय हे त्याचे प्रचलित असलेले दुसरे नाव. श्रीरामचंद्र ही प्रमुख देवता, श्रीहनुमान ही दुसरी. रामनवमी व हनुमानजयंती हे दोन प्रमुख उत्सव. समर्थांच्या निर्णयानंतर त्यांत दासनवमीची भर पडली. चाफळ व सज्जनगड ही दोन प्रमुख स्थने सांप्रदायिकांना पूज्य. दासबोध आणि मनाचे श्लोक या समर्थांच्या दोन रचना सर्वांत महत्त्वाच्या व नित्यपाठातील. समर्थांनी स्थापन केलेले मठ व तेथे नियुक्त केलेले महंत ही संप्रदाय स्थापन केल्याची महत्त्वाची खूण. नासिक-टाकळी येथे बारा वर्षे केलेल्या पुरश्चरणानंतर समर्थांनी भारतातील सर्व भागांत तीर्थयात्रा केली. त्या काळातच त्यांनी शिष्य करण्यास प्रारंभ केला, तेथे या संप्रदायाच्या संकल्पाची मूळ प्रेरणा शोधता येते. ही प्रेरणा त्या काळातील इस्लामच्या सार्वत्रिक स्वरूपाच्या धार्मिक व राजकीय आक्रमणांशी संबंधित होती, हा या संप्रदायाचा सर्वाधिक महत्त्वाचा विशेष होय. त्यातच त्याचे वेगळेपण शोधता येते. समर्थांनी अकराशे मठ स्थापन केले अशी समजूत आहे. इतिहासाच्या निकषावर ती टिकत नाही. मठांची गावे व मठपतींची नावे यांच्या आधारे साठसत्तर मठांची माहिती मिळते. आंध्र प्रदेशात इंदूरबोधन व दक्षिणेत तंजावरजवळ मठ होते. तेथवर संप्रदायाचा प्रसार पोहोचला होता. काशी, अयोध्या, मथुरा, अवंती, द्वारका, बद्री-केदार अशा दूरच्या स्थळी मठ असल्याचा उल्लेख आढळतो. पण त्यांचे अस्तित्व संशयास्पद आहे. अशा स्थळी समर्थांचा एखादा अनुग्रहीत असणे शक्य आहे.

समर्थांना अभिप्रेत असलेले तत्त्वज्ञान प्राधान्याने त्याच्या जुना आणि नवा दासबोध, आत्माराम, पंचसमासी, सप्तसमासी अशा ग्रंथांतून व स्फुट प्रकरणांतून पाहता येते. परंपरागत अद्वैतसिद्धांत आणि त्याला भक्तीची जोड हाच त्यांच्या तत्त्वज्ञानावर द्वैतमताची छाया होती, असे म्हणण्याचा प्रयत्न एकदोन विद्वानांनी केला आहे, पण समर्थांचे ग्रंथ पाहता तो टिकत नाही. ज्ञानोत्तर कर्म व अवतार-कल्पना भगवद्‍गीतेतून, तर नवविद्या भक्तीची कल्पना समर्थांनी भागवतातून घेतली आहे. पण कोणत्याही एका ग्रंथाचे वा आचार्याचे अनुकरण त्यांनी केलेले नाही. अंतरात्मा, जगज्जेती, चंचल आणि निश्चल ब्रह्म, किंवा चंचल कर्ता व निश्चल देव, अशा काही संज्ञा समर्थ वेगळ्या अर्थाने वापरतात. सगुणापेक्षा निर्गुणाचे महत्व आणि आत्मनिवेदन भक्तीचा वेगळा उलगडा व पुरस्कार हे त्यांच्या विचारांचे विशेष आहेत.

पण समर्थांचा तत्त्वज्ञानविचार एवढाच नाही. तो विचार ऐहिकाच्या पातळीवर येतो व देशकालपरिस्थितीचे वास्तव भान ठेवतो, हा त्याचा इतर सर्व संप्रदायांहून असलेला वेगळेपणा आहे. दासबोधाचा उत्तरार्ध व काही स्फुट प्रकरणे यांत त्याची स्वच्छ खूण आहे. हरिकथानिरूपण मुख्य मानून त्याला त्यांनी राजकारण व सर्वविषयी सावधपण यांची जोड दिली. स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वराज्य हवे हे जाणले, प्रयत्नवाद व लोकसंग्रह यांचा पुरस्कार केला आणि परकीय आक्रमणाचा प्रतिकार पराक्रमाने करावा असा संदेश दिला. हा समर्थांनी समाजाला दिलेल्या शिकवणुकीचा सर्वांत महत्त्वाचा विशेष आहे. समर्थांचे जीवन मूलतः आध्यात्मिक पातळीवरचे, वृत्ती पूर्ण विरक्त पण त्यांच्या शिकवणुकीत परमार्थाबरोबरच प्रवृत्तिपरतेचा महिमा ठाशीवपणाने सांगितला आहे. त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध व त्या कालातील त्यांची रचना यांमध्ये त्यांचा सक्रिय प्रवृत्तिपर दृष्टिकोण दिसतो. तो ध्यानात घेतला म्हणजे त्यांनी प्रवर्तित केलेल्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान पूर्ण होते.

आपल्या संप्रदायाचे विशिष्ट आचार समर्थांनी नेमकेपणाने कोठे सांगितले नाहीत. त्याविषयीच्या त्यांच्या कल्पना निरनिराळ्या रचनांतून आलेल्या स्फुट उल्लेखांवरून ठरवाव्या लागतात. संप्रदायाची वीस लक्षणे त्यांनी एके ठिकाणी सांगितली आहेत. लिहिणे, वाचणे, अर्थांतर सांगणे, अर्थभेद व आशंकानिवृत्ती, त्याबरोबर गायन, नर्तन, टाळी वाजवणे असे मामुली तपशीलही त्यांत आले आहेत लोक राजी राखणे, प्रसंग व काळ जाणणे, सर्वांशी समान वागणे, राजकारण हे भाग लोकसंग्रहाशी संबंधित आहेत. शिष्यांसाठी नियम, निस्पृह किंवा महंत यांची लक्षणे, भिक्षानिरूपण यांवर अनेक स्थळी विवरण आहे. ब्रह्मचर्यव्रत व त्याचा पुढचा भाग म्हणजे संन्यस्त वृत्ती, उदंड भ्रमण व भिक्षावृत्ती या त्यांच्या संप्रदायातील शिष्यत्वाच्या खुणा आहेत. भिक्षेचा संबंध ते अखेर समाजनिरीक्षणाशी जोडतात. इंदूरबोधन मठाचे अधिपती श्रीसमर्थदास यांनी श्रीसमर्थसांप्रदायिक नित्यनेमसोपान या शके १८४८ (इ. स. १९२६) मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात समर्थ संप्रदायातील भिक्षेचे नियम दिलेले आहेत. मेखला, शिरोवस्त्र, झोळी, कमरेस बांधावयाचे रामनामांकित वस्त्र व भगवे निशाण अशी पंच वस्त्रे भिक्षेच्या वेळी असावीत. भिक्षा मागून झाल्यावर मनोबोधातील शेवटचा श्लोक म्हणून झोळी देवापुढे ठेवावी व तिची पूजा करून ‘सुरवरवरदायिनी’ ही आरती म्हणावी, असा भिक्षेच्या आचाराचा भाग समर्थदासांनी सांगितला आहे. तो परंपरेने त्यांच्यापर्यंत आला असावा, असे मानता येईल. हुरमुजी रंगाची वस्त्रे, मस्तकी जटाभार, गळ्यात मेखला, हातात माळ, काखेत कुबडी व पायात खडावा असा समर्थांचा वेष होता असे वर्णन आहे. शिष्यांकडून त्याचे अनुकरण होत असावे व त्यावरून तो समर्थ संप्रदायाचा विशिष्ट वेष होता, असे म्हणता येते.

दिनकरस्वामी यांचा स्वानुभवदिनकर, आत्माराम महाराजांचा दासविश्रामधाम आणि हरिस्वामींचे एक पद यांमध्ये काही संप्रदायविशिष्ट आचारांचा उल्लेख येतो. त्यांतील भजन, प्रार्थना, मंत्रजप, वैराग्य, विवेक, इंद्रियनिरोध, वर्णाश्रमधर्माचे पालन, स्नानसंध्यादी नित्यकर्मे, एकान्ती मानसपूजा अशा गोष्टी इतर धार्मिक संप्रदायांहून वेगळ्या नाहीत. सूर्यनमस्कार, हनुमंतस्मरण, श्रीरामाचे भजनपूजन, करुणाष्टके म्हणणे, दररोज दासबोधाचे दोन समास व मनोबोधाचे अकरा श्लोक वाचणे, हे भाग समर्थ संप्रदायातील आचाराने वैशिष्ट्य दर्शवणारे आहेत. शास्त्रचर्चा, आत्मनिरूपण, भाविकांना उपदेश व जडजीवांचा उद्धार यांचा संबंध समर्थांना विशेषत्वाने अभिप्रेत असलेल्या लोकजागृतीशी आहे, की ब्रह्मचर्यव्रत, हुरमुजी वस्त्रे, विवेक-वैराग्य, इंद्रियनिरोध, भिक्षावृत्ती, निस्पृहता व ईश्वरभक्ती हाच रामदासांचा संप्रदाय होय. समर्थांच्या आयुष्याचा उत्तरार्ध, त्यातून आढळणारे त्यांचे जीवन आणि पुढे शिष्यांनी आपल्या रचनांमधून केलेले असे तुरळक उल्लेख, यांवरून या संप्रदायातील आचारधर्माची कल्पना करावी लागते.

समर्थांनी केलेले अपार लेखन हा त्यांच्या संप्रदायातील वाङ्‍मयाचा मूलाधार होय. गिरिधरांसारख्या त्यांच्या सहवासात अल्पकाळ वावरलेल्या शिष्य़ांपासून समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ किंवा रामीरामदास, मेरुस्वामी, माधवस्वामी, हरिबुवा भोंडवे, आत्माराममहाराज एक्केहाळीकर ते एकोणिसाव्या शतकातील हंसराजस्वामी येथवर या संप्रदायातील ग्रंथकारांची परंपरा येऊन पोहोचते. समर्थचरित्रपर, तत्त्वज्ञानपर, कथापर व स्फुट अशी ही रचना आहे. समर्थांच्या शिष्या वेणाबाई यांच्या रचनेचा स्वतंत्र उल्लेख करणे आवश्यक आहे. वाङ्‍मयीन गुणांच्या अभावामुळे पहिले रामदास व अखेरचे हंसराज वगळता इतर कोणालाही मराठी वाङ्‍मयात महत्त्वाचे स्थान लाभलेले नाही. समर्थांचे तेज तर कोणालाच आढळत नाही. प्रपंचपरमार्थाचा विवेक, प्रयत्नवादाचा पुरस्कार, लोकसंग्रहाचा ध्यास व देशकालपरिस्थितीचे उत्कट भान हे समर्थांच्या विचारांतील विशेष कोणामध्येही नाहीत. त्यांच्या शिकवणुकीतील ज्योत जागती ठेवील अशा धारणेचा एकही शिष्य समर्थांना लाभला नाही. त्यामुळे त्यांच्यानंतर संप्रदायातील चैतन्य ओसरत गेले व मठांचे केवळ सांगाडे उरले. हरिकथानिरूपण, राजकारण सर्वविषयी सावधानता व साक्षेप ही समर्थ संप्रदायाची चतुःसूत्री आहे, असे एक मत आहे. ते मानले तर त्यातील हरिकथा-निरुपण तेवढे पुढे उरले, लोकजागृती व लोकसंग्रह यांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आणि दैनंदिन पूजाअर्चा, भजनकीर्तन आणि त्याबरोबर रामनवमी (चैत्र शु. नवमी), हनुमानजयंती (चैत्री पौर्णिमा) व दासनवमी (माघ वद्य नवमी) असे वार्षिक उत्सव साजरे करणे, एवढेच मर्यादित कार्य रामदासी मठांमधून होत राहिले. एका विशेषाचा उल्लेख मात्र करावयास हावा. इंग्रजी राजवटीत पारतंत्र्याविषयीचा असंतोष उत्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ⇨ न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक किंवा इतिहासाचार्या राजवाडे असे विचारवंत मराठा राजसत्तेचे ऐतिहासिक दृष्टीने अवलोकन करू लागले आणि त्या संदर्भात संतसाहित्याची नव्या युगाच्या संदर्भात आलोचना करू लागले. त्या वेळी समर्थांचे चरित्र व त्यांच्या ग्रंथांतील शिकवणूक यांना देशभक्तीचा स्फुल्लिंग उत्पन्न करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी स्थान प्राप्त झाले.

पहा : दासबोध भक्तिमार्ग मराठी साहित्य.

संदर्भ : १. आळतेकर, स. ख. श्रीसमर्थचरित्र, कराड, १९३३.

२. कारखानीस, ग. गो, श्री समर्थ रामदास, विचार आणि कार्य, विजापूर, १९६४.

३. देव, शं. श्री. श्रीसमर्थचरित्र, तृतीय खंड, श्रीसमर्थ संप्रदाय, मुंबई, १९५५.

४. पेंडसे, शं. दा. राजगुरू समर्थ रामदास, पुणे, १९७४.

५. फाटक, न. र. रामदास : वाङ्‍मय आणि कार्य, मुंबई, १९७०.

करंदीकर, वि. रा.