राबात : आफ्रिकेतील मोरोक्को देशाची राजधानी. लोकसंख्या ९,००,००० (१९८२ अंदाज). हे शहर देशाच्या वायव्य भागात अटलांटिक महासागर किनाऱ्यावर, बू रेग्रेग नदीमुखाच्या दक्षिण तीरावर वसले असून समोरच उत्तर तीरावर साले हे शहर आहे. कॅसाब्लांकाच्या ईशान्येस ८० किमी. अंतरावर असलेली राबात ही एक सुंदरशी जुनी नगरी आहे. येथील हवामानही सौम्य आहे. रोमन काळापासून याच्या परिसरात वस्ती आहे. तेथे रोमनकालीन वास्तूंचे अवशेषही आढळतात. बाराव्या शतकात ‘रिबात’ म्हणजे ‘लष्करी ठाणे’ म्हणून येथे छावणी उभारण्यात आली. मूर नेता अब्दुल मुमिन (कार. ११३० – ६३) याने राबात बंदराजवळ किल्ला बांधून वसाहतीला तटबंदी करून घेतली. राबातचा विकास प्रामुख्याने नजीकच्या साले या ठिकाणाशी निगडित होता. सतराव्या शतकापासून फ्रेंचांचा संरक्षित भाग होईपर्यंत (१९१२) या दोन्ही ठिकाणांमध्ये खूपच स्पर्धा होती. स्पेनमधून हाकलून दिलेले मूर निर्वासित मोठ्या संख्येने येथे १६०९ मध्ये येऊन स्थायिक झाले. त्यानंतर साले व राबात ही चाचेगिरीची प्रमुख केंद्रे बनली होती. अलाऊइट राजवंशाच्या कारकीर्दीत मोरोक्कोच्या सुलतानांचे येथे वास्तव्य असे. त्या काळात येथे अनेक सुंदर स्मारके उभारण्यात आली. राबात १९१२ मध्ये फ्रेंचांच्या संरक्षणाखाली आले. फ्रेंच अंमलात ही संपूर्ण देशाची राजधानी होती. मोरोक्कोच्या स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये २,१०० चौ. किमी. चा साले हा स्वतंत्र प्रति करून राबात ही देशाती प्रशासकीय राजधानी करण्यात आली.

राबात बंदराचे दृश्यराबातचे जुने व नवे असे दोन विभाग पडतात. जुना विभाग किनाऱ्यालगत असून तो मदीना नावाने ओळखला जातो. मदीनामध्ये लहान पांढऱ्या रंगाची व सपाट छपराची घरे, अरुंद रस्ते, लहानलहान दुकाने, मशिदी आढळतात. जुन्या राबात नगराच्या सभोवती अजूनही तटबंदी पहावयास मिळते. जुन्या नगर विभागात बाराव्या शतकातील किल्ला, मद्रसा महाविद्यालय, मोरोक्को कलासंग्रहालय, हसन स्तंभ (बारावे शतक), अबू युसुफ याकुब अल्-मन्सूर या जगप्रसिद्ध मशिदीचे अवशेष, पुराणवस्तुसंग्रहालय, अल् मोहद राजघराण्याच्या कारकीर्दीतील (११३० – १२६९) वातसंरक्षक द्वार इ. पहावयास मिळतात. जुन्या मदीनाच्या सभोवती आधुनिक शहराचा विस्तार झालेला दिसतो. आधुनिक शहरातील व्यापारी, प्रशासकीय व निवासी विभागांतील रस्ते रुंद, वाहतूकनियंत्रक वर्तुळे व दुतर्फा झाडी असलेले आहेत. हा भाग स्वच्छ असून येथे यूरोपीय धर्तीची घरे आहेत. या विभागात शाही राजवाडा (१९५०), पाचवा मुहम्मद विद्यापीठ (१९५७), राष्ट्रीय ग्रंथालय, शासकीय कार्यालयांच्या इमारती, राजदूतावास इ. वास्तू पहावयास मिळतात. या विभागात बागाही बऱ्याच असल्यामुळे ती ‘उद्यान नगरी’ म्हणून शोभते.

राबात हे छोट्या उद्योगांचे नगर असून येथे वस्त्रनिर्मिती, हातमागावरील सतरंज्या, कांबळी, चामड्याच्या व कलाकुसरीच्या वस्तू, बेलबुट्टीदार कापड, विटा, ॲस्बेस्टस, साखर, तंबाखू दारू गाळणे, फळे व भाजीपाला डबाबंदीकरण आणि परिरक्षण इ. प्रमुख उद्योगधंदे आहेत. समुद्रात व खाडीत मासेमारी केली जाते. तेथे नौकाविहाराच्या सुविधाही आहेत. बू रेग्रेग नदीमुख हे राबतला लाभलेले बंदर आहे. नदीमुखामध्ये होणाऱ्या गाळाच्या संचयनामुळे बराच काळपर्यंत बंदर म्हणून याला विशेष महत्त्व नव्हते. कॅसाब्लांका व केनित्रा ही उत्तम बंदरे जवळ असल्याने बंदर म्हणून राबातला म्हणावे तसे महत्त्व प्राप्त झाले नाही. कॅसाब्लांका व तँजिअरशी राबात रस्त्यांनी व लोहमार्गांनी जोडलेले आहे. येथे विमानतळही आहे.

चौधरी, वसंत