राधास्वामी पंथ : उत्तर भारतातील एक आधुनिक हिंदु-धर्मीय पंथ. या पंथाचे ‘राधास्वामी सत्संग’ असेही नाव प्रचलित आहे. हा एकेश्वरवादी पंथ असून त्याचे प्रवर्तन आग्रा येथे शिवदयाल साहेब ऊर्फ स्वामीजी महाराज (१८१८– ७८) यांनी १८६१ मध्ये केले. शिवदयाल यांचा जन्म आग्रा येथे एका पंजाबी खत्री जातीत झाला. ते गृहस्थाश्रमी होते. लहानपणीच त्यांनी विविध धर्ममतांचे सखोल अध्ययन करून निवडक शिष्यांना उपदेशही देण्यास सुरुवात केली. प्राचीन भारतीय परंपरेतील ‘सुरत शब्दयोगा’ चा त्यांनी सातत्याने १५ वर्षे सखोल अभ्यास केला.

राधास्वामी या पंथनामाचा कृष्णाशी संबंध नाही. राधास्वामी म्हणजे परमेश्वर. पंथनाम राधास्वामी पडण्याचे कारण पंथप्रवर्तक स्वामीजी महाराजांच्या पत्नीचे नावही राधाच होते. अनुयायांकडून गुरुपत्नी व गुरू यांच्या एकत्र निर्देशाने पंथाचे नावही ‘राधास्वामी’ पडले असावे, असे जे. एन्. फार्कर म्हणतात. राधा म्हणजे कृष्णाची विशुद्ध चिततशक्ती वा स्वतःचा अंतर्यामी असलेला जीवात्मा. ह्या राधेचा स्वामी म्हणजे तिचा नियामक परमेश्वर, असाही अर्थ काही अभ्यासक करतात.

गुरूभक्तीला पंथात कमालीचे महत्व असल्याने पंथास ‘गुरुमत’ असेही म्हटले जाते. संत सत्‍गुरुस पंथात परमेश्वररूप मानण्यात येते. उपासनेतही सत्‍गुरुस महत्त्वाचे स्थान आहे. शीख धर्माशी याबाबत पंथाचे साम्य आहे. पंथात गुरूच्या निधनानंतर त्याचे देहावशेष समाधीस्थळी ठेवून समाधी बांधतात आणि समाधीवर गुरूचे छायाचित्र ठेवतात. नंतर त्या समाधीवर स्मारकवास्तू उभारली जाते. ह्या स्मारकवास्तूस ‘गुरुद्वार’ म्हणतात. आग्रा-शाखेच्या पहिल्या तीन गुरूंची तीन गुरुद्वारे अनुक्रमे आग्रा येथील राधास्वामी बागेत, आग्रा येथील पीपलमंडीत आणि बनारस येथे आहेत.

दीक्षाविधीच्या वेळी गुरू अनुयायास ‘सुरत शब्दयोगा’ चा उपदेश देतो.‘सुरत’ म्हणजे मानवी जीवात्मा, ‘शब्द’ म्हणजे चैतन्याचा ध्वनिस्त्रोत वा नाद आणि ‘योग’ म्हणजे मीलन. जीवात्म्याचे चैतन्याशी मीलन वा एकरूपता हाच अंतर्नादयोग होय. गुरू शिष्यास या योगाची माहिती गुप्ततापूर्वक देतो. पंथाचा मंत्र ‘राधास्वामी’ हा असून त्याला ‘आदिनाद’ असेही नाव आहे.

धर्मसिद्धांत : पंथात सृष्टीची विभागणी तीन प्रकारे केलेली आहे : (१) चेतन, (२) चेतन-जड, (३) जड-चेतन. पहिला प्रकार केवळ विशुद्ध चेतनाचा (जडाने मलीन न झालेल्या चेतनाचा) दुसरा वासनारहित आणि जडावर संपूर्ण वर्चस्व असलेल्या जडयुक्त चेतनाचा आणि तिसरा जडाचे चेतनावर वर्चस्व असलेल्या व वासनांनी बंधनात पडलेल्या जड-चेतनाचा. जीव हा मूलतः सर्वोच्च अशा चेतन परमेश्वराचाच अंश आहे पण तो जडाच्या संपर्काने बंधनात अडकतो. विशुद्ध व सर्वोच्च चेतनाच्या मार्गदर्शनाशिवाय त्याला बंधनातून सुटता येत नाही. संत व परमसंत परमेश्वराची लाडकी लेकरे होत. करुणेने व प्रेमाने त्यांची हृदये ओतप्रोत असतात. विशिष्ट काली ते भूतलावर जन्म घेतात व बंधनात अडकलेल्या जीवांचा उद्धार करून त्यांना पुन्हा परमेश्वराप्रत नेतात. ह्या सर्वोच्च परमेश्वराचे नाव ‘राधास्वामी’ आहे. तो मूलतः अव्यक्त आहे पण सृष्टीच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारांत तो संत व परमसंत म्हणून व्यक्तिरूप धारण करतो. सृष्टीच्या ह्या तीन प्रकारांना दयालदेश, ब्रह्मांडदेश व पिंडदेश अशीही नावे आहेत. ह्या तीन प्रकारांचीही पुन्हा प्रत्येकी सहा म्हणजे एकूण १८ उपप्रकारांत विभागणी केली आहे. मनुष्याची सर्व सतकृत्ये ही त्याला जडाच्या बंधनातून सोडवून परमेश्वराप्रत नेतात तर दुष्कृत्ये ही त्याला जडाच्या बंधनात खोलवर रुतवून ठेवतात. सत्‍गुरू, सत्‍संग, सत्‍नाम व अनुराग ह्या चार बाबींना आध्यात्मिक उन्नतीसाठी पंथात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. सत्‍गुरूशिवाय जीवास बंधनातून सुटता येत नाही. पीतांबर दत्त बडथ्वाल यांनी शिवदयाल यांचे दर्शन विशिष्टाद्वैती असल्याचे म्हटले आहे.

गुरुपरंपरा : आद्य गुरू स्वामीजी महाराज यांचे पट्टशिष्य रायबहादुर शालिग्राम साहेब (१८२८–९८) आग्रा येथे जन्मले. स्वामीजी महाराजांनी यांच्याच आग्रहावरून १८६१ मध्ये राधास्वामी मताचे प्रवर्तन केले. स्वामीजी महाराजांचे १८७८ मध्ये निधन झाले. त्यांचा सारबचन नावाचा एक पद्य व एक गद्यग्रंथ उपलब्ध असून त्याला पंथात पवित्र धर्मग्रंथाचे महत्त्व आहे. एस्. डी. माहेश्वरी यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर करून तो आग्रा येथून तीन खंडांत (गद्य–१ खंड, १९५८ व पद्य – २ खंड, १९७०) प्रसिद्धही केला आहे.

दुसरे गुरू शालिग्राम साहेब. त्यांची कारकीर्द १८७८ ते १८९८ असून ते १८९८ मध्ये आग्र्यास निधन पावले. हिंदीत त्यांनी प्रेमबाणी (पद्य –४ खंडांत), प्रेमपत्र (गद्य – ६ खंडांत) तसेच पंथाच्या शिकवणुकीचा व धर्मसिद्धांतांचे विवरण करणारा इंग्रजी ग्रंथ राधास्वामी मतप्रकाश (१८९६) लिहिला.‘हुजूर महाराज’ म्हणून ते पंथात प्रख्यात होते. आद्य गुरूच्या शिकवणुकीस अनुसरून त्यांनी पंथ सुसंघटित केला आणि त्याला आधुनिक व कालोचित असे नेटके रूप दिले.

तिसरे गुरू म्हणून १८९८ मध्ये पंडित ब्रह्मशंकर मिश्र ऊर्फ महाराज साहेब (१८६१ – १९०७) गादीवर आले. त्यांचा जन्म बनारस येथे झाला. १९०२ मध्ये त्यांनी पंथाची घटना व नियमावली तयार करून केंद्रीय प्रशासन मंडळ स्थापले. पंथाच्या मालमत्तेचा ट्रस्ट केला. त्यांची काही पद्यरचना उपलब्ध आहे. त्यांनी तयार केलेला डिसकोर्सेस ऑन राधास्वामी फेथ हा इंग्रजी ग्रंथ १९०९ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांची काही इंग्रजी पत्रे नंतर सॉलेस टू संत्‍संगीज नावाने प्रसिद्ध झाली. त्यांची समाधी नंदेश्वर कोठी, बनारस येथे आहे.

कामताप्रसाद सिन्हा साहेब ऊर्फ सरकार साहेब हे १९०७ मध्ये चौथे गुरू म्हणून गादीवर आले तथापि १९१३ मध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर आनंदस्वरूप साहेब ऊर्फ साहेबजी महाराज हे १९१३ मध्ये गादीवर आले. राधास्वामी सत्‍संग पंथाच्या कायमस्वरूपी मुख्यालयाची व प्रतिष्ठानाची स्थापना त्यांनी १९१५ मध्ये आग्रा येथे दयालबागेत केली. अनेक शैक्षणिक, औद्योगिक व लोकसेवापर संस्था सुरू करून त्या नावारूपास आणल्या. १९३६ मध्ये साहेबजी महाराजांनंतर गुरूचरनदास मेहता ऊर्फ मेहताजीसाहेब गादीवर आले. यांच्या कारकीर्दीत अनेक उद्योगधंदे उभारले जाऊन कार्याची चांगली प्रगती झाली. १९७६ मध्ये एम्. बी. लाल गादीवर आले. त्यांनी इतरत्रही शाखा उघडून पंथाचा विस्तार केला.

पंथप्रवर्तक स्वामीजी महाराजांचे शालिग्राम साहेबांशिवाय आणखी एक शिष्य जैमल सिंग हे पंजाबी होते. त्यांनी पंजाबात अमृतसरजवळ बिआस नदीकाठी पंथाची स्वतंत्र शाखा स्थापिली. आग्रा शाखा व बिआस शाखा ह्या दोन शाखांचा विकास स्वतंत्रपणे झाला. १९०३ मध्ये जैमल सिंगांनंतर बिआस शाखेचे प्रमुख सावन सिंग झाले. ते लष्करात अभियंता होते. त्यांनी उत्कृष्ट संघटना बांधून १,२४,००० अनुयायांना दीक्षा दिली. आपल्या गुरूच्या स्मरणार्थ त्यांनी ‘डेरा बाबा जैमल सिंग’ हे आधुनिक शहर वसविले. पंथाचे हे ‘व्हॅटिकन’ सारखे प्रमुख केंद्र झाले असून ‘बिआस डेरा’ म्हणून ते ओळखले जाते. अमेरिका, द. आफ्रिकादी देशांतही पंथाची सु. ३६० वर केंद्रे आज कार्यरत आहेत. बिआस शाखेतून वेगळी निघालेली आणखी एक शाखा किरपाल सिंग यांची असून ती दिल्लीत आहे.‘रूहानी सत्‍संग’ हे तिचे नाव असून तिचा प्रसार अमेरिकेत विशेष झाला आहे.

आचार विचार : राधास्वामी सत्संग हा मुख्यत्वे धार्मिक पंथ असून ज्यांना ईश्वरी अनुभूती आवश्यक वाटते, अशा कोणाही व्यक्तीस त्याचे अनुयायी होता येते. मद्य-मांस सोडण्याची शपथ घेऊन शब्दयोगाचा अभ्यास करावा लागतो. पंथात जातिपंथभेद मानला जात नाही. सर्वजण एकत्र भोजन घेतात. आंतरजातीय तसेच आंतरराष्ट्रीय विवाहही पंथात प्रचलित आहेत. विधवाविवाह, विवाहसुधार, स्त्रीपुरूष समानता इ. सुधारणांपर बाबतींत पंथ अग्रेसर राहिला आहे, राजकारणापासून पंथ संपूर्णपणे अलिप्त आहे.

गुरुभक्तिशिवाय पंथात धर्मग्रंथपठन, स्तोत्रगायन, प्रार्थना, प्रवचन इत्यादींचा प्रतिदिन अंतर्भाव असतो. कबीर, गुरू नानक इ. संतांच्या रचना तसेच पंथीय गुरूंच्या रचनांचे पठन होते. जप, व्रत, तीर्थ, मंदिर, मूर्तिपूजा इत्यादींना पंथात स्थान नाही. गृहस्थाश्रमाचा व आपल्या मूळ जात, धर्म, पंथाचा त्याग न करताही, सर्व स्त्रीपुरुषांना पंथाचे सदस्य होता येते. सर्वच धर्म सत्य आहेत अशी पंथाची शिकवण आहे. पंथाची शिकवण हिंदू-विशेषतः वैष्णव – धर्मशास्त्रास अधिक जवळची आहे. नैतिक मूल्ये, उच्च आदर्श व आधुनिक दृष्टिकोण यांस अनुसरून पंथाची कालोचित जडणघडण झाली आहे. आग्रा येथील राधास्वामी प्रतिष्ठानाचा व्याप आजमितीस बराच वाढला आहे. प्रतिष्ठानाने शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक आणि कृषिविषयक केलेले कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते. प्रेमप्रचारक हे पंथाचे साप्ताहिक हिंदी, उर्दू, तेलुगू व तमिळ भाषांतून तसेच दयालबाग हेरल्ड हे साप्ताहिक इंग्रजीतून प्रतिष्ठान प्रकाशित करते. देशात ५७५ सत्संग शाखा कार्यरत आहेत.

संदर्भ : 1. Farquhar, J. N. Modern Religious Movements in India (Indian Edition), Delhi, 1967.

2. Rai, Saligram Bahadur, Radhasoami Mat Prakash, Benaras, 1896.

3. Schomer, Karine Mcleod, W. H. Ed. The Saints : Studies in a Devotional Tradition

of India, Delhi, 1987.

४. चतुर्वेदी, परशुराम, उत्तरी भारत की संत-परंपरा (२ री आवृ.), अलाहाबाद, १९६४.

५. लाला प्रतापसिंह सेठ, जीवनचरित्र हुजूर स्वामीजी महाराज, प्रयाग, १९०९.

सुर्वे, भा. ग.