संध्यावंदन : त्रैवर्णिकांनी नित्य करावयाची एक धार्मिक उपासना. हिला ‘संध्या’ असेही म्हणतात. संधिकाळ हा ‘संध्या’ या शब्दाचा शब्दश: अर्थ परंतु त्या शब्दाने प्रात:काळच्या आणि सायंकाळच्या संधिकाळात करावयाच्या प्रार्थनेचा बोध होतो. मुलाचे उपनयन होताच, त्याच्या या उपासनेस प्रारंभ होतो. ही उपासना दिवसातून तीन वेळा, मध्यान्ह काळी आणि सूर्यास्ताच्या वेळी करावी, असे काही ठिकाणी सांगितलेले असले, तरी सामान्यत: दोन वेळा संध्या करावी, असे धर्मगंथ सांगतात. संध्या म्हणजे आदित्य या देवतेचे ध्यान होय. प्रात:संध्या सूर्योदयावेळी आणि सायंसंध्या सूर्यास्ताच्या पूर्वी करावी.

संध्योपासनेसाठी पाट, तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, भस्म, सोवळे असे साहित्य लागते. संध्येला बसण्यासाठी पाटापेक्षा मृगाजिन (हरणाचे कातडे) मिळाले, तर ते अधिक चांगले समजले जात असे.

संध्येत आचमन, प्राणायाम, मार्जन (अंगावर पाणी शिंपडणे), अघमर्षण, सूर्याला अर्घ्य देणे, आसनविधी, न्यास, गायत्री मंत्राचा जप आणि उपस्थान (म्हणजे प्रात:काळी सूर्याच्या स्तुतिपर आणि सायंकाळी वरूणाच्या स्तुतिपर मंत्र म्हणणे) असे भाग असतात. महाराष्ट्रात संध्येच्या आरंभी विष्णूची चोवीस नावे म्हणण्याची प्रथा आहे, परंतु स्मृतींनी किंवा प्राचीन टीकाकारांनी तसा नियम नमूद केलेला नाही. प्रात:संध्या उभ्याने, पूर्वा- भिमुख होऊन व क्वचित प्रसंगी उत्तराभिमुख होऊन करावी सायंसंध्या बसून आणि वायव्येस तोंड करून करावी, असे म्हटले आहे. तथापि सायंसंध्येची अर्घ्ये पश्र्चिमेकडे मुख करून दयावी, असेही म्हटले आहे.

केशव, नारायण आणि माधव ह्या विष्णूच्या तीन नावांनी तीन आचमने करतात. प्राणायाम करताना गायत्रीचे शिर (ॐ आपोज्योति ……..हा मंत्र), ओंकारपूर्वक तीन व्याहृती (ॐ भू: भुव: स्व:) आणि गायत्री मंत्र ह्यांचा मनातल्या मनात उच्चर करतात. ॐ भू: पासून सात व्याहृतींचा उच्चर करावा, असेही म्हणतात. ह्या सात व्याहृती अशा : (१) ॐ भू: (२) ॐ भुव: (३) ॐ स्व: (४) ॐ मह: (५) ॐ जन: (६) ॐ तप: आणि (७) ॐ सत्यं. ह्या सात व्याहृतींचा उच्चर केल्यानंतर तत्सवितु: पासून प्रचोदयातपर्यंतचा गायत्री मंत्र आणि ‘आपोज्योती रसो ऽ मृतं बह्मभूर्भुव: स्वरोम् ’ हे गायत्रीचे शीर्ष असे मंत्र म्हणावेत, असेही म्हटले जाते. मार्जनात एखादया तांब्याच्या किंवा लाकडाच्या पात्रातील पाण्यात कुशाच्या काडया बुडवून ते पाणी काही मंत्र म्हणत अंगावर शिंपडतात. पाणी डाव्या हातात घेऊन उजव्या हातात घेतलेल्या दर्भाने ते पाणी मस्तकावर आणि अंगावर शिंपडणे, अशा प्रकारेही मार्जनक्रिया केली जाते. अघमर्षण म्हणजे पाप बाहेर टाकणे. उजव्या हाताच्या तळव्याचा गोकर्णासारखा आकार करून, त्यात पाणी घेऊन ते आपल्या नाकाजवळ धरून त्यावर ‘ ऋतं च सत्यं च ’ या ऋग्वेदातील तीन ऋचा (१०.१९०. १-३) म्हणावयाच्या व नंतर ते पाणी डाव्या बाजूला जमिनीवर फेकावयाचे. अर्घ्य म्हणजे सूर्याला आदराने पाणी अर्पण करावयाचे. दोन्ही हातांच्या ओंजळीत पाणी घेऊन, गायत्री मंत्राचा जप करून ते पाणी सूर्य-सन्मुख होऊन तीन वेळा खाली सोडायचे. त्यानंतर आसनविधी, न्यास म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांत देवतांची भावना करून त्या त्या अवयवांना स्पर्श करणे. गायत्री मंत्राचा जप १०८ वेळा, २८ वेळा किंवा किमान १० वेळा तरी करावा. उपस्थान म्हणजे सूर्य, अग्नी, यज्ञपती व दशदिशा इत्यादींच्या प्रार्थना करून संध्येच्या अखेरीस स्वत:भोवती फिरून दाही दिशांना नमस्कार करायचा असतो. आपल्या हातून घडलेल्या पातकांचा नाश व्हावा आणि आपल्यावर ईश्वराची कृपा व्हावी, हे संध्यावंदनाचे हेतू सांगितले जातात.

कुलकर्णी, अ. र.