राट्सेल, फ्रीड्रिख : (३० ऑगस्ट १८४४ –९ ऑगस्ट १९०४). प्रख्यात जर्मन भूगोलज्ञ. प. जर्मनीच्या बाडेन-वर्टेंबर्ग प्रांतातील कार्लझ्रूए येथे जन्म. त्याचे वडील बाडेनच्या ग्रँड ड्यूकचे कारभारी होते. कार्लझ्रूए येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर एका औषधविक्रेत्याच्या दुकानात त्याने उमेदवारी केली (१८५९ – ६३). पुढे स्वित्झर्लंडमधील रापेस्विल गावी त्याने अभिजात वाङ्मयाचा अभ्यास केला. १८६६ नंतर तो कार्लझ्रूएच्या एका शाळेत अध्यापन करू लागला. पुढे हायड्लबर्ग, येना व बर्लिन या विद्यापीठांमधून प्राणिविज्ञानाचे अध्ययन. हायड्लबर्ग विद्यापीठातून ऑलिगोकीटांवर-ॲनेलिडांचा (एक प्रकारच्या कृमी) समूह-प्रबंध सादर (१८६८). डार्विनच्या संशोधनावरील राट्सेलचा विवेचनात्मक ग्रंथ १८६९ मध्ये प्रकाशित झाला. एका फ्रेंच निसर्गवैज्ञानिकासमवेत १८६८-६९ मध्ये द. फ्रान्समध्ये भ्रमंती करण्याची संधी फ्रीड्रिखला मिळाली तिचा लाभ कोलोन जर्नल या वृत्तपत्रासाठी झूलॉजिकल लेटर्स फ्रॉम द मेडिटरेनिअन रीजन या नावाची लेखमाला लिहिण्यात त्याने उठविला. या कामगिरीमुळे त्याला प्रवासी वार्ताहराची नोकरी मिळाली. या नात्याने तो पूर्व व दक्षिण यूरोप फिरला, फ्रँको-प्रशियन युद्धात (१८७०-७१) त्याने वार्ताहराचा व्यवसाय सोडून पायदळामध्ये स्वयंसेवकाचे काम पत्करले. युद्धसमाप्तीनंतर राट्सेलने म्यूनिक येथे मोरिट्झ वॅगनर या निसर्गवैज्ञानिकाच्या-मानवजातिवैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. मोरिट्झ वॅगनरचा राट्सेलच्या उत्तर आयुष्यातील कार्यकर्तृत्वावर फार मोठा प्रभाव पडल्याचे आढळते. १८७२ मध्ये राट्सेलने पुनश्च कोलोन जर्नलचा फिरता वार्ताहर म्हणून यूरोपचा प्रवास केला. त्याने १८७४ व १८७५ मध्ये उत्तर व दक्षिण अमेरिकेचा दीर्घ दौरा केला. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील सामाजिक परिस्थितीचा राट्सेलच्या विचारांवर प्रभाव पडल्याचे त्याच्या नंतरच्या लिखाणावरून आढळते. पुढे त्याची म्यूनिक तंत्रविद्या विद्यापीठात प्रथम भूगोलाचा अधिव्याख्याता (१८७५) व नंतर प्राध्यापक (१८७६) म्हणून नियुक्ती करण्यात आली. राट्सेलला १८८६ मध्ये लाइपसिक विद्यापीठात निमंत्रित करण्यात आले, तेथे तो मृत्युपावेतो भूगोलाचा प्राध्यापक म्हणून राहिला.
आधुनिक भूगोलशास्त्रात पहिल्या पिढीतील एक आघाडीचा भूशास्त्रज्ञ असे राट्सेलचे उच्च स्थान आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मानवजातीची उत्क्रांती व विकास यासंबंधी मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू झाला. मानवी स्थानांतरण, सांस्कृतिक आदानप्रदान, मनुष्य व त्याच्या भौतिकीय पर्यावरणाचे अनेक घटक यांमधील संबंध वा नाते यांसारख्या विषयांत राट्सेलला विशेष रुची होती. मानव व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधांचा प्रथमच पद्धतशीर विचार झाला. या संबंधांबाबत राट्सेलने स्वतंत्र मते मांडली. यांतूनच ‘लेबॅझरॅउम’ (लिव्हिंग स्पेस) या संकल्पनेचा जन्म झाला. एखाद्या राष्ट्राची स्वतःच्या तर्कसंगत सामर्थ्यानुसार वा क्षमतेनुसार आपल्या सीमांचा विस्तार वा संकोच करण्याची प्रवृत्ती म्हणजे ‘लेबंझरॅउम’ होय. नाझी राजवटीने आपल्या फायद्यासाठी या संकल्पनेचा गैरवापर केला, तरी ती संकल्पना मूलभूत स्वरूपात कायम राहिली. ‘सांस्कृतिक भूभाग’ ही राट्सेलने भूगोलशास्त्राला बहाल केलेली आणखी एक मूलभूत संकल्पना होय. मानवनिर्मित किंवा मानवाशी संबंधित अशा ज्या काही गोष्टी, उदा., शेती, शहरे, भाषा, वंश यांचे आजचे वितरण हे हजारो वर्षांचे आदानप्रदान, देवघेव यांचा परिणाम वा परिपाक असल्याचे राट्सेलचे मत होते. अँथ्रोपोजिऑग्रफी खंड १ (१८८२) व खंड २ (१८९१) या द्विखंडीय ग्रंथात या संकल्पनेचे विशदीकरण (स्पष्टीकरण) राट्सेलने केले आहे.
पंचवीस ग्रंथ व ५१८ लहान पुस्तके असे राट्सेलचे विपुल लेखन आहे. राट्सेलचा द हिस्टरी ऑफ मॅनकाइंड (१८८५ –८८) हा त्रिखंडीय ग्रंथ मानवजातिवर्णनावरील असून तो आधुनिक, सामाजिक विज्ञानांच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा म्हणून मानण्यात येतो. अनेक आदिम जमातींचे नैसर्गिक पर्यावरण, जातिवैशिष्ट्ये, सामाजिक संघटना, धर्म इत्यादींची सविस्तर माहिती त्यात आढळते. एथ्नॉलॉजी (१८८५ –८८) या द्विखंडीय ग्रंथातून राट्सेलने मानवजातिविज्ञानाचा वैश्विक आढावा घेतला आहे. नवीन परिस्थितीमध्ये वनस्पती, त्याचप्रमाणे प्राणी तसेच विविध जातिजमातींचे लोक कशा पद्धतीने वसती करतात व स्थिरावतात याचे निरीक्षण करून त्यावरून काही निष्कर्ष काढण्याचा राट्सेलचा प्रयत्न दिसतो. जैव भूगोलविज्ञानाची ही संकल्पना अभिनव आहे. ए पोलिटिकल जिऑग्राफिकल स्टडी ऑफ द युनायटेड स्टेट्स (१८७८ – ८०) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांवरील राट्सेलचा द्विखंडीय ग्रंथ म्हणजे पहिला सारभूत भौगोलिक अभ्यासपूर्ण ग्रंथ मानावा लागेल. विभागीय वा प्रदेशीय पाठ्यपुस्तकाचा तो एक नमुनाच मानला जातो.
राट्सेलच्या इतर ग्रंथांमध्ये पोलिटिकल जिऑग्रफी (१८९७), अर्थ अँड लाइफ : ए कंपॅरेटिव्ह जिऑग्रफी (१९०१-०२) हे ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. पोलिटिकल जिऑग्रफी या ग्रंथात त्याने आकुंचन व प्रसरण ही जीवशास्त्रीय संकल्पना राष्ट्रांच्या बाबतीत लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्ररचनेमधील ‘क्षेत्र’ (राउम) व ‘स्थान’ (लागे) या दोन मूळ घटकांच्या आधारे त्याने वरील प्रकारचा अन्वय लावणारी मीमांसा केली आहे. जीवशास्त्र, मानवजातिवर्णन व भूगोल या शास्त्रांच्या पद्धती व संकल्पना यांचे एकात्मीकरण करण्याचा आद्य प्रयत्न राट्सेलने केला. हीच त्याची मोठी कामगिरी मानावी लागेल. बव्हेरियातील आमरलँड येथे आपल्या कुटुंबियांसमवेत सुटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने राट्सेलचे निधन झाले.
संदर्भ : 1. Dickinson, Robert, The Makers of Modern Geography, London, 1978.
2. Harris, Marvin, The Rise of Anthropological Theory, New York, 1968.
3. Wanklyn, H. G. Friedrich Ratzel : A Biographical Memoir and Bibliography,
Cambridge, 1961.
गद्रे, वि. रा.