संबळपूर : भारताच्या ओरिसा राज्यातील त्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व भूतपूर्व संस्थानची राजधानी. पश्र्चिम ओरिसातील हे एकमेव मोठे शहर व मोठी बाजारपेठ आहे. लोकसंख्या १,१२,६३१ (१९८१). पहाडी परिसरामुळे शहरास नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. हे शहर भुवनेश्वरच्या वायव्येस सु.२१६ किमी.वर महानदीकाठी राष्ट्रीय महामार्गावर आहे. नागपूर- हावडा (कोलकाता) रेल्वेच्या एका फाटयाचे हे शेवटचे स्थानक आहे. समलाई या ग्रामदेवतेवरून संबळपूर हे नाव पडले असावे, असे परंपरा सांगते.

या शहराचा विश्र्वसनीय प्राचीन इतिहास ज्ञात नाही. इ. स. सोळाव्या शतकात चौहान वंशातील बलरामदेव याने संबळपूरची गादी स्थापन केली आणि तेथील आदिवासींसाठी समलाईचे मंदिर बांधले. १७९७ ते १८१७ या काळात येथे नागपूरकर भोसल्यांचा अंमल होता. नंतरच्या काळात ब्रिटिशांनी पुरूष-वारसाच्या अभावी मोहन कुमारी (कार. १८२७-३३) या विधवा राणीस मान्यता दिली. मोहन कुमारीविरूद्ध जमीनदार व गोंड प्रमुखांनी बंड केल्याने ब्रिटिशांनी राणीच्या नारायणसिंग नामक एका नातेवाईकास त्याच्या मर्जीविरूद्ध गादीवर बसविले (१८३४). त्याच्या मृत्यूनंतर (१८४९) औरस पुत्र नसल्याचे निमित्त साधून संस्थान खालसाकेले आणि ते बंगाल प्रांतास जोडले. अठराशे सत्तावनच्या उठावात राजघराण्यातील सुरेंद्रसाई आणि त्याचे तीन भाऊ व मुलगा यांनी इंग्रजांना जेरीस आणले. त्याला पकडण्यासाठी बक्षिसासह अनेक प्रयत्न झाले. अखेर १८६२ मध्ये सुरेंद्रसाई शरण आला. त्याला इंग्रजांनी निवृत्तिवेतन दिले. १८६७ मध्ये संबळपूर नगरपालिका स्थापन झाली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत येथील स्थानिक क्रांतिकारक चंद्रशेखर बेहेरा, फकीर मिश्र इत्यादींनी भाग घेतला. येथील फेझर प्रेस (१९०५) आणि राष्ट्रीय शाळा (१९२१) या संस्थांनी स्वातंत्र्यलढयात महत्त्वाचे योगदान दिले. फेझर प्रेस या मुद्रक – प्रकाशक संस्थेने विविध नियतकालिकांव्दारे ब्रिटिशांवर प्रखर टीका केली आणि जनमत जागृत केले.

संबळपुरात संस्थानकालीन बांधलेली समलाईदेवी (गुडी), जगन्नाथ, बह्मपुरा, अनंतशायी विष्णू , पटणेश्वरी अशी पाच प्राचीन मंदिरे असून त्यांपैकी बह्मपुरा व अनंतशायी ही प्रेक्षणीय आहेत. बह्मपुरा मंदिरात कोरलेल्या जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या सुबक काष्ठमूर्ती आहेत. येथे किल्ल्याचे अवशेष आढळतात. पूर्वी संबळपूरमध्ये हिरे सापडत असल्याचे काही उल्लेख मिळतात. येथे सुती कापडाचे व टसर रेशमाचे कापड विणण्याचे हातमाग असून संबळपुरी साडी, विशेषतः नक्षत्रमाला प्रकारातील, प्रसिद्ध आहे. याशिवाय लाकडी कलाकुसरीच्या वस्तूही बनविण्याचा व्यवसाय चालतो. कोसल साहित्य समाज व म्यूझिक असोसिएशन या दोन संस्था साहित्य व प्रयोगीय कलाक्षेत्रात अनुकमे अगेसर आहेत. संबळपूर विदयापीठ (१९६७) आणि विविध महाविदयालये शहरात आहेत. परिसरातील हिराकूद धरण व जलाशय, नरसिंग धबधबा, नरसिंगनाथ मंदिर, बामाच्या माजी संस्थानाधिपतींची कलाकुसरयुक्त हवेली ही काही प्रेक्षणीय स्थळे होत.

पहा : संबळपूर संस्थान.

देशपांडे, सु. र.