राजहंस : राजहंसाचा समावेश ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲन्सरिनी उपकुलात करतात. ॲन्सरिनी शीळउपकुलाच्या सिग्नस प्रजातीतील पक्ष्यांना राजहंस असे म्हणतात. डौलदार लांब मान, लांबट, निमुळते परंतु मजबूत शरीर आणि मोठे पाय अशी याची सर्वसाधारण लक्षण असतात. चोच चपटी, मोठी असून टोकाशी किंचित वर उचललेली असते. कधीकधी तिच्या बुडाशी मोठी मांसल, गोळीसारखी वाढ असते. ॲनॅटिडी पक्षिकुलातील व पाण्यात राहणाऱ्या सर्व पक्ष्यांमध्ये राजहंस आकाराने मोठा व वजनाने जास्त असतो परंतु कोणताही पक्षी याच्याइतका वेगाने व लांब अंतरापर्यंत पोहू किंवा उडू शकत नाही. हा प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधात, पाण्यात व पाण्याच्या जवळपास आढळतो.

सामान्य राजहंसाचे शास्त्रीय नाव सिग्नस सिग्नस आहे. त्याचे शरीर मोठे, लांबी सुमारे १५० सेमी. व मानेची लांबी ७५ सेमी. असते. रंग पांढरा शुभ्र, चोच पिवळट रंगाची व टोकाशी किंचित काळी असते. याच्या चोचीच्या बुडाशी मांसल वाढ नसते. चोच आणि डोळ्याच्या मधल्या भागांवर पिसे नसतात. पाय आणि पायांचे पंजे काळे असतात. बोटे पडद्याने जोडलेली असतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात पण मादी नरापेक्षा आकाराने लहान असते. नराचे वजन सु. ७ ते १२ किग्रॅ. व मादीचे सु ६–१० किग्रॅ. असते.

राजहंस अत्यंत डौलदारपणे पोहतो. पोहताना काही पक्ष्यांची मान सरळ रहाते, तर काहींच्या मानेला इंग्रजी एस (S) अक्षरासारखा (अवग्रह चिन्हाचा) आकार येतो. उडताना राजहंस मान पुढे लांबवून अगदी सावकाशपणे पंख वर-खाली हलवीत संथपणे उडत असतो. स्थानांतर करताना यांचा थवा इंग्रजी व्ही (V) अक्षराच्या आकारात उडत जातो. पाय शरीराच्या बरेच मागच्या बाजूस असल्याने जमिनीवर चालताना मात्र राजहंस कुरूप दिसतो.

राजहंस निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढू शकतात. त्या आवाजावरून त्यांना श्रृंगवाकू (ट्रंपेटर), शीळ घालणारा (व्हिसलिंग), खोकणारा (व्हूपर) अशी निरनिराळी नावे दिलेली आहेत. मूक (म्यूट) हंस म्हणून ओळखला जाणारा राजहंसदेखीस फिस्कारल्यासारखा, डुरकल्यासारखा, घोरल्यासारखा असे आवाज काढू शकतो.

सामान्यतः राजहंसांचे मोठाले थवे आढळतात. प्रजोत्पादनाच्या काळात मात्र नरमादी जोड्या आढळतात. नरमादीची जोडी जन्मभर टिकते. त्यांचे घरटे ओबडधोबड जमिनीवरच्या खळग्यात जमवलेल्या पानांच्या ढिगाऱ्याचे असते. अगदी क्वचित ते लवदार पिसांनी ते आच्छादिलेले असते. मादी एकावेळी सु. ६–८ फिक्कट पिवळट रंगाची अंडी घालते. मादी अंडी उबवते त्यावेळी नर तिचे व अंड्याचे रक्षण करतो क्वचित नरदेखील अंडी उबविण्यास मदत करतो. शत्रूला पळवून लावल्यानंतर विजय जाहीर करण्यासाठी मोठा आवाज करतो. पिल्ले आखूड मानेची असनू त्यांना मऊ लवदार पिसे असतात. पिल्लांचा रंग फिक्कट तपकिरी किंवा फिक्कट पिवळट करडा असतो. जन्मल्यापासून काही तासातच पिल्ले पोहू व उडू शकतात. काही जातींत पिल्ल मोठी होईपर्यंत मादी त्यांना पोहताना आपल्या पाठीवर घेते. तिसऱ्या ते चौथ्या वर्षी राजहंस वयात येतो. राजहंस नैसर्गिक परिस्थितीत सु. २० वर्षे व पाळल्यावर सु. ५० वर्षे जगतो.

सिग्नस प्रजातीतील आणखी दोन जाती भारतात आढळतात. हे भारतात उन्हाळी पाहुणे म्हणून येतात. त्यांपैकी शीळ घालणारा राजहंस दिल्ली आणि कच्छ या भागात आढळतो. याचे शास्त्रीय नाव सि. कोलंबियानस आहे. याचा रंग पांढरा शुभ्र, चोच पिवळट आणि चोचीवर बुडाशी पिवळट रंगाचा मोठा डाग असतो. चोचीचे टोक काळसर असते. मूक राजहंस सिंधू नदीच्या काठी, पंजाबमध्ये सापडतो. याचे शास्त्रीय नाव सि. ओलोर असे आहे. चोचीच्या बुडाजवळ असलेल्या मोठ्या काळ्या गुठळीमुळे हा चटकन ओळखू येतो. रागावल्यावर हा मान शरीराजवळ दुमडून ओढून घेतो व पंख पसरून शरीराला चिकटवून उभे करतो.

काळा राजहंस मुख्यत्वे ऑस्ट्रेलियात सापडतो. याचे शास्त्रीय नाव सि. मेलँकोरिफस असे आहे. याचे संपूर्ण शरीर गडद काळ्या रंगाचे असून त्यावर हिरवट चमक असते. चोच गडद तांबडी असून तिच्या बुडाशी लाल रंगाची मांसल गुठळी असते.

पाणवनस्पती हे राजहंसाचे प्रमुख खाद्य आहे. यासाठी तो पाण्यात खोलवर बुडी न मारता वनस्पतीबरोबर वेचून खातो. याखेरीज पाळलेला राजहंस तृणधान्ये, गवताचे बी देखील खातात.

राजहंसाच्या सौंदर्यामुळे आणि डौलदारपणामुळे ललित वाङ्मयात फार पूर्वीपासून स्थान मिळाले आहे आणि त्याच्याबद्दल तो मोत्यांचा चारा खातो. दूध-पाणी मिसळून ठेवल्यास पाणी वगळून फक्त दूध पितो, मरण्याची त्याला आधीच चाहूल लागते व त्यानंतर तो स्वर्गीय सुस्वर काढायला सुरुवात करतो वगैरे दंथकथादेखील प्रसृत आहेत.

जोशी, लीना