राजसूय यज्ञ : राजाच्या राज्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी करावयाचा श्रौत यज्ञ. अनेक इष्टी, पशुयाग आणि सहा सोमयाग हे त्याचे घटक आहेत. दोन वर्षाहून अधिक काळपर्यंत याचे अनुष्ठान चालू असते. राजपरिवाराशी निगडित अनेक व्यक्तींच्या घरांमध्ये रोज एक याप्रमाणे बारा दिवसापर्यंत ‘रत्निनां हवींषि’ नावाच्या इष्टी राजा करतो. अभिषेचनीय नावाचा जो दुसरा सोमयाग करावयाचा असतो, तो विशेष महत्त्वाचा आहे. राजाला करावयाच्या अभिषेकासाठी विविध ठिकाणचे व विविध प्रकारचे उदक आणून ते संस्कारित केले जाते. राजाच्या अधिपत्याखालील प्रदेशाचा औपचारिकपणे उच्चार केला जातो. राजाच्या हाती धनुष्य दिले जाते. वाघाच्या कातड्यावर त्याला बसवून त्याच्या डोक्यावर छिद्रे असलेले सुवर्णाचे पात्र धरले जाते. सोमराजा, वरुण आणि धर्मप्रवर्तक देवता राजाला सर्व प्रकारचे सामर्थ्य देओत, अशी प्रार्थना केली जाते. लोकप्रतिनिधी आणि प्रमुख ऋत्विज राजाला आपल्या हातातील उदकांनी अभिषेक करतात. त्या उदकाचा शेष घेऊन ऋत्विज राजाच्या वारसदाराच्या घरी येतात. त्याच्या हाती हे उदकपात्र देऊन त्याच्या अभिषेकाची वेळ येईपर्यंत ते सांभाळून ठेवण्यास सांगतात. राजाच्या पूर्वजांचा नामोच्चार करून राजाला राजसूयाचा अभिषेक केल्याची घोषणा करतात.

उत्तर दिशेला रथ उभे असतात. वारसदाराच्या हातातील धनुष्य घेऊन राजा रथावर आरूढ होतो. पाठोपाठ वारसदार रथावर चढतो. त्याच्या हातात धनुष्य देऊन राजा त्याला आज्ञा करतो, ‘येथून काही अंतरावर अमुक अमुक क्षत्रिय आपल्या सैन्यानिशी मुक्काम ठोकून आहे. त्याला जिंकून दक्षिणापथाने घालवून दे.’ रथ धावू लागतात परत येऊन उभे राहतात. राजप्रतिनिधी त्यातून खाली उतरतो. त्याच्या हातातील धनुष्य घेऊन राजा विजयाचा अभिनय करतो. वारसदाराकडे धनुष्य परत देऊन त्याच्या राज्याभिषेकापर्यंत ते सांभाळून ठेवण्यास सांगतो.

यज्ञमंडपाच्या पश्चिमेस उभारलेल्या कुटीमध्ये उंबराच्या लाकडाचे आसन मांडलेले असते. राजा त्यावर बसतो. ऋत्विज आणि राजपरिवारातील अधिकारी सभोवती बसतात. हे सर्व राजाचा गौरव करून एक प्रकारे त्याला साहाय्याचे आश्वासन देतात. नंतर सुवर्णाच्या फाशांनी द्यूताचा खेळ होतो. राजा डाव जिंकतो. होता हा ऋत्विज राजाला शुनःशेपाचे आख्यान ऐकवितो. काही दिवसांनी दशपेय नावाचा तिसरा ⇨सोमयाग होतो. ज्यांच्या कुळात दहा पिढ्यांपर्यंत अविच्छिन्न रीतीने सोमयाग झाले आहेत, असे प्रसर्पक म्हणजे पाहुणे यज्ञात उपस्थित असतात. त्यांना ऋत्विजांबरोबर सोमाचे पान करण्याचा अधिकार असतो. यानंतर आणखी इष्टी, पशुयाग आणि तीन सोमयाग होतात. शेवटी सौत्रामणी याग होतो. या विधीत आणि क्रमात थोडाबहुत बदल निरनिराळ्या ग्रंथांत आढळतो. राजसूयाची माहिती इतर वेदांच्या सूत्रात अंशतः आलेली असून यजुर्वेदाच्या मंत्रब्राह्मणातही हा विषय आहे. मात्र येथे तो क्रमाने अगर तपशीलवार नाही. आपस्तंब (१८.८-२२), सत्याषाढ,वैखानस, मानव (९.१), वाराह (३-३), कात्यायन (१५) या यजुर्वेदाच्या सहा श्रौतसूत्रांत राजसूय यज्ञाची माहिती तपशीलवार आढळते.

राजसूय याग ज्याने केला तो राजा होतो ज्याने वाजपेय याग केला तो सम्राट होतो असे वचन आहे. काही ठिकाणी राजसूय वाजपेयापेक्षा श्रेष्ठ मानला आहे.

युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञाचे वर्णन महाभारताच्या सभापर्वात आले आहे. या यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान मिळाल्यावर शिशुपालाने त्याचा अपमान केला आणि मग कृष्णाने त्याचा वध केला अशी कथा आहे. पुराणकालात हरिश्‍चंद्राने आणि इतिहासकालात कनौजच्या जयचंदाने राजसूय केल्याचे सांगितले जाते.

पहा: यज्ञसंस्था.

संदर्भ: 1. Caland, W. Ed. The Baudhayana Srauta Sutra, Vol I &ampII (2 nd Edition), Prasana XII, New Delhi, 1982.

2. Kane, P.V. History of Dharmashatra, Vol II, Part II, Pune, 1974.

काशीकर,चिं.ग.