राऊत, सखाराम अर्जुन : (१४ मार्च १८३९–१६ एप्रिल १८८५). भारतीय वैद्य, वनस्पतिशास्त्रज्ञ व समाजसुधारक. मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार व औषधी वनस्पती यांविषयी त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली.

राऊत यांचा जन्म मुंबई येथे झाला. वयाच्या अकराव्या वर्षी अनाथ झाल्यावरही चिकाटी व दीर्घ परिश्रम या गुणांच्या जोरावर त्यांनी प्रथम एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये (सध्याच्या एल्फिन्स्टन कॉलेजात) आणि पुढे बक्षिसे व शिष्यवृत्त्या मिळवून ग्रँट मेडिकल कॉलेजात शिक्षण घेतले. १८६४ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजात वैद्यक व प्रसूतिविद्या हे विषय मराठी माध्यमातून शिकविण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे १८६८ मध्ये तत्कालीन शिक्षण मंडळाने वैद्यक व प्रसूतिविद्या हे विषय मराठीतून शिकविण्यास मान्यता दिली. मातृभाषेतून मिळणारे शिक्षण अधिक चांगले समजते यावर त्यांचा भार होता.

डब्ल्यू. ग्रे या वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापकांनी राजिनामा दिल्यावर सखारामपंतांची त्या जागेकरिता निवड झाली. शल्यक्रियातज्ञ म्हणून काम करीत असूनही त्यांनी आपली वनस्पतिशास्त्राची आवड कायम ठेवली होती. काही काळ अध्यापन कार्य केल्यावर त्यांना जमशेटजी जिजिभाई रुग्णालयात (जे. जे. रुग्णालयात) हेन्री या शल्यक्रियातज्ञांच्या हाताखाली साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा सन्मान मिळणारे ते पहिले भारतीय वैद्य होते. काही काळ त्यांनी अपमृत्यू निर्णेत्याचे (कोरोनरचे) शल्यक्रियातज्ञ म्हणूनही काम केले. पुढे अनंत चंद्रोबा यांच्या समवेत व्हाइसरॉयचे साहाय्यक शल्यक्रियातज्ञ या पदावर सखारामपंतांची नियुक्ती झाली. अनंत चंद्रोबा यांच्या मृत्यूनंतर मुंबई इलाख्याच्या लस टोचणीच्या विभागाचे अधीक्षक म्हणून सखारामपंतांची नेमणूक झाली.

शल्यक्रियेप्रमाणेच ते वनस्पतिशास्त्रही निपुण होते. त्यांच्या शास्त्रीय व्याख्यानांतून व प्रात्यक्षिकांतून, तसेच स्वतंत्र संशोधनातून त्यांची असामान्य बुद्धिमत्ता लवकरच दिसून आली. वनस्पतिशास्त्राच्या आवडीतून त्यांनी औषधी वनस्पतींचा आणि आयुर्वेद व अँलोपॅथी यांतील आंतरसंबंधाचा संशोधनात्मक अभ्यास केला. आयुर्वेदीय औषधांच्या वापरास उत्तेजन मिळण्याच्या उद्देशाने त्यांनी एक ग्रंथही लिहिला. मुंबईच्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या देशी औषधांची यादी म्हणून हा ग्रंथ उपयोगी पडावा असाही त्यांचा हेतू होता.

एका नव्या संकरित वनस्पतीच्या निर्मितीचे श्रेय सखारामपंतांना देण्यात येते. मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांना सखारामपंतांच्या कार्याची चांगली जाण होती व त्यांच्या नावावरून या वनस्पतीला ड्रॉसिएना फर्ग्युसन असे नाव देण्यात आले. ड्रॅगन ट्री या नवीन जातीच्या वनस्पतीच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. मृत्युसमयी बॉम्बे फ्लोरा या ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीविषयी ते काम करीत होते. मुंबईच्या सुप्रसिद्ध व्हिक्टोरिया गार्डनच्या (सध्याच्या जिजामाता उद्यानाच्या) व्यवस्थापनात त्यांचा निकटचा सहभाग होता व शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या नव्या वनस्पती तेथे लावण्यासाठी वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा सल्ला घेतला जाई.

सामाजिक व वैद्यकीय सुधारणांसंबंधीचे आपले विचार त्यांनी लेखनाद्वारे मांडले. त्यांच्या ग्रंथरचनेत बॉम्बे ड्रग (१८७९), विवाहविज्ञान (१८७७), देवीच्या रोगाचे स्वरूप आणि त्याच्या शमनाचे व प्रतिबंधाचे उपाय इ. ग्रंथांचा समावेश आहे. सामाजिक प्रबोधनाकरिता त्यांनी काही पुस्तके स्वखर्चाने प्रसिद्ध केली. रोग, त्यांची कारणे व उपचार यांबद्दलचे जनतेतील अज्ञान घालविण्याकरिता ते सतत प्रयत्नशील होते. स्त्री शिक्षणाबद्दलही ते जागरूक होते. त्यांनी पहिले अपत्य असलेल्या एका विधवेशी १८७० मध्ये विवाह केला. त्यांची सावत्र कन्या रखमाबाई हिने पुढे वैद्यकीय शिक्षण घेतले व ती मुंबईतील पहिली व्यावसायिक स्त्री वैद्य झाली. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली. ते मुंबई येथे मृत्यू पावले. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक रहिवाशांबरोबरच यूरोपियन लोकांनाही त्यांच्या मृत्यूचे दुःख जाणवले.

भालेराव, य. त्र्यं.