रबर रसायने : सामान्य कल्पनेप्रमाणे ‘रबर रसायने’ याचा अर्थ संश्लेषित (कृत्रिम) रबर तयार करण्यासाठी लागणारी रसायने असा नसून नैसर्गिक व संश्लेषित रबर या कच्च्या मालाचे रूपांतर तयार मालात (वस्तूत) करताना आवश्यक ते किंवा असलेले गुणधर्म विकसित करण्यास किंवा वाढविण्यास मदत करणारी रसायने असा आहे. रबर रसायने व रबर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घटक द्रव्ये यांमधील हा फरक तर्कशुद्ध नाही. साधारणपणे रबर रसायने घटक द्रव्यांच्या मानाने फार थोड्या प्रमाणात वापरली जातात. ही रसायने सामान्यतः कार्बनी असून ती कच्च्या रबरात मिसळतात. रबरावरील प्रक्रिया सुलभ होण्यास, तयार माल करण्यायोग्य गुणधर्म आणण्यास, व्हल्कनीकरण [⟶ रबर] योग्य प्रकारे होण्यास, व्हल्कनीकरण झालेल्या रबरात योग्य गुणधर्म रोखण्यास आणि रबराची एकंदरीत प्रत व टिकाऊपणा वाढविण्यास ही रसायने मदत करतात. या रसायनांमध्ये व्हल्कनीकरण प्रवेगके, ऑक्सिजन व ओझोन प्रतिरोधके, स्थिरीकारके तसेच मेणे, रासायनिक प्लॅस्टिकीकारके, पुनःप्रापक द्रव्ये, व्हल्कनीकारके, मंदायके, सक्रियीकारके, यांसारख्या संकीर्ण द्रव्यांच्या गटाचा समावेश होतो. लिथार्ज, झिंक ऑक्साइड यांसारख्या अकार्बनी प्रवेगकांचा व सक्रियीकारकांचासुद्धा यांत समावेश करण्यात येतो परंतु प्रबलक रंगद्रव्यांसारखी रंगद्रव्ये किंवा भरणद्रव्ये, मृदुकारके, प्लॅस्टिकीकारके व रंग ही रसायने साधारणपणे या उद्योगातील लोक रबर रसायने समजत नाहीत. या रसायनांविषयी अधिक माहिती ‘रबर’ या नोंदीत दिली आहे.
चिपळूणकर, मा. त्रिं.