रब-अल्-खली : (एम्टी क्वार्टर). अरबस्तान द्वीपकल्पाच्या दक्षिण भागातील वाळवंट. ‘शून्य रण’ अथवा ‘शून्यालय’ या अर्थाचे हे अरबी नाव आहे. सुमारे १,२८० किमी. लांब, ४८० किमी. रुंद व ६,५०,००० चौ. किमी. क्षेत्रफळाचे हे वाळवंट सौदी अरेबिया, द. येमेन, ओमान व संयुक्त्त अरब अमीर राज्ये या देशांत पसरलेले आहे. सलग वाळूयुक्त्त प्रदेश असलेले हे जगातील एक मोठे वाळवंट मानले जाते. उत्तरेस नेज्द उच्चप्रदेश व दक्षिणेस हड्रामाउत पठारी प्रदेश यांदरम्यान पसरलेल्या या वाळवंटाने सौदी अरेबियाचा सु. २५% भाग व्यापलेला आहे. पूर्व भागात अर् रिमल, पश्चिम भागात अहकाफ, तर नैर्ऋत्य भागात बाहर अस् शफी अशा वेगवेगळ्या स्थानिक नावांनी ते ओळखले जाते. पूर्वी ‘दाहना’ या नावाने ते प्रसिद्ध होते. सांप्रत दाहना हे त्याच्या उत्तरेकडील एका भागाचे नाव आहे.
रब-अल्-खली वाळवंटाचा बराच भाग अद्याप निर्जन असून १९३० नंतर याच्या फारच थोड्या भागाचे समन्वेषण झाले आहे. बर्ट्रॅम टॉमस याने १९३१ मध्ये दक्षिणेस ओमानमधील सालालाहपासून उत्तरेस कॉटारमधील दोहापर्यंत या वाळवंटातून प्रथमच पायी प्रवास केला. दोनच वर्षांनी ब्रिटिश समन्वेषक फिल्मी याने विरुद्ध दिशेने जब्रिनपासून नैर्ऋत्येस सानापर्यंत प्रवास केला. या प्रवासात त्याला एल् होदेदजवळ उल्कापातासारख्या प्रचंड खळग्यामध्ये वाळूखाली गाडल्या गेलेल्या काही भिंती आढळून आल्या. प्राचीन वाबर शहराचे हे अवशेष असावेत असे मानले जाते. खनिज तेलासाठीही या भागात थोडेफार संशोधन झाले आहे.
रब-अल्-खली वाळवंटाचा किनारी भाग वगळता आर्थिक दृष्ट्या या वाळवंटाचा फारसा उपयोग होत नाही. उत्तर, दक्षिण व पूर्व किनारी भागांत काही ठिकाणी पाणवठे व हंगामी प्रवाह दिसून येतात. वाळवंटाचा जास्तीत जास्त भाग मात्र रुक्ष, ओसाड असून उंचउंच वालुकागिरींनी व्यापलेला आहे. पूर्व व ईशान्य भागांत वालुकागिरींचे प्रमाण जास्त असून अल् बॅटिन भागातील वालुकागिरी सर्वांत उंच (१८३ ते २१३ मी.) व वाहतुकीच्या दृष्टीने मोठे अडथळे आहेत. वाळंवटाचा आग्नेय भाग त्या मानाने वाहतुकीस सुकर आहे. या भागात अनेक गोड्या पाण्याच्या विहिरी, पाम वृक्षांच्या बागा, चराऊ राने आहेत. आग्नेय भागात काही मिठागरे असून ईशान्य भागात खनिज तेल संशोधनाचेही प्रयत्न सुरू आहेत. हे वाळवंट उत्तरेस दाहना या सु. १,२८७ किमी. लांबीच्या वाळवंटी प्रदेशाने नफूद वाळवंटाशी जोडलेले आहे.
चोंडे, मा. ल.