रंजक व  रंजकद्रव्ये : रंजक व रंजकद्रव्य हे शब्द येथे अनुक्रमे  dye  व  dyestuff  यांचे प्रतिशब्द म्हणून वापरलेले आहेत. तथापि हे दोन शब्द  ‘ रंगदायी द्रव्य ’ या समानार्थी वापरण्यात येत असल्याने प्रस्तुत लेखात रंजकद्रव्य हाच शब्द विवेचनात वापरलेला आहे.

   रंगदायी द्रव्ये रंजकद्रव्य व रंगद्रव्य  ( पिगमेंट) अशा दोन प्रकारची आहेत आणि हे प्रकार रासायनिक संघटनांपेक्षा ते वापरण्याच्या पद्धतींवरून करण्यात येतात. मूळचा रंग नसलेल्या पदार्थाच्या पृष्ठभागावर वाहक द्रव्याचा उपयोग करून रंगद्रव्याच्या अतिसूक्ष्म कणांचे पटल लावले ,  तर तो पदार्थ रंगीत दिसतो. हा रंग प्रदूषणाने किंवा काळजीपूर्वक खरडून काढल्यास मूळ पदार्थाचा रंगहीन पृष्ठभाग पुन्हा दिसू लागतो. या रंग लावण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत रंगद्रव्याचे कणरूप वा स्फटिकरूप तसेच टिकून  राहते [ ⟶ रंगद्रव्ये]. रंजकद्रव्ये ही गडद रंग असणारी द्रव्ये असून कागद, कातडे, फर, केस, लाकूड, रबर, खाद्यपदार्थ, औषधे, सौं   दर्यप्रसाधने, मेणे, ग्रीजे, खनिज तेलजन्य पदार्थ, प्लॅस्टिके आणि विशेषतः कापड तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ (कापूस, लोकर, रेशीम, रेयॉन, नायलॉन, पॉलिएस्टर वगैरे) यांसारख्या विविध प्रकारच्या पदार्थाना रंग देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. या पदार्थाचे गुणधर्म निरनिराळे असल्याने ते रंगविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंजकद्रव्यांचे व रंगविण्याच्या क्रियेचेही [ ⟶ रंजनक्रिया] निरनिराळे प्रकार प्रचारात आले आहेत. रंजकद्रव्याने रंगविलेला पदार्थ अंतर्बाह्य रंगलेला असतो. तो कोणत्याही प्रकारे कापला, तरी सर्व जागी नवीन दिलेला रंगच आढळतो. रंजकद्रव्य हे पदार्थात धरू   न राहण्यास भौतिक अधिशोषण (आकृष्ट करून पृष्ठभागी साचवून ठेवणे), लवण अथवा धातवीय अणू अंतर्भूत असणारे जटिल संयुग तयार होणे, विद्राव, यांत्रिक रीत्या धरणे अथवा सहसंयुजी रासायनिक बंध (ज्यात बंधित अणूंच्या जोडीतील प्रत्येक अणूकडून एकेक इलेक्ट्रॉन घेऊन इलेक्ट्रॉन जोडी बनते असा बंध) तयार होणे या गोष्टी कारणीभूत होतात. पदार्थाना रंजकद्रव्ये लावण्याच्या पद्धती विविध असून त्या रंगवावयाचा पदार्थ व रंजकद्रव्याचा प्रकार यांवर अवलंबून असतात. रंजनक्रियेमध्ये रंजकद्रव्याची स्फटिकी संरचना विरघळण्याच्या अथवा बाष्पीभवनाच्या (बाष्परूपात उडून जाणाऱ्या) क्रियेमुळे नाहीशी होते. काही रंजकद्रव्यांच्या बाबतीत मात्र स्फटिकी संरचना रंजनक्रियेतील नंतरच्या एखाद्या टप्प्यात पुन्हा प्राप्त झालेली आढळ्ते.

   रंजकद्रव्ये अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. कापड, कागद, शाई, साबण, रबर, प्लॅस्टिके, लाकूड इ. उद्योगधंद्यात रंजनासाठी तसेच छायाचित्रणात पायसाची (प्रकाशसंवेदी रसायनांच्या मिश्रणाची) सर्वसाधारण किंवा एखाद्या विशिष्ट रंगासाठीची संवेदनशीलता वाढविण्यासाठी, रासायनिक विश्लेषणात  ⇨दर्शके म्हणून आणि जीवविज्ञानात सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अभ्यास करण्याकरिता अभिरंजन करण्यासाठी [⟶ रंजक, जीवविज्ञानीय] रंजकद्रव्यांचा उपयोग करण्यात येतो. या सर्वांत कापड उद्योगात रंजकद्रव्यांचा जास्त उपयोग करण्यात येत असल्याने यापुढील विवेचन प्रामुख्याने कापड उद्योगासाठी लागणाऱ्या रंजकद्रव्याविषयी केलेले आहे.

   औषधे, सौं दर्यप्रसाधने, मेणे, तसेच रबर, फर, चामडे आणि मुख्यत्वे कापड असे निरनिराळे पदार्थ आधुनिक काळात रंगवावे लागत असल्याने रंजनक्रिया अतिशय जटिल झालेली आहे. कापड उद्योगात सेल्युलोज, ॲसिटेट, नायलॉन, पॉलिएस्टर इ. संश्लेषित (कृत्रिम) तंतू मोठ्या प्रमाणावर वापरात आलेले असल्याने, तसेच जास्त चांगल्या पक्केपणाच्या (न विटण्याच्या) गुणधर्मां   ची आवश्यकता व अखंडित रंजनक्रिया यांमुळे रंजकद्रव्ये तयार करणाऱ्या व रंजनक्रिया करणाऱ्या तंत्रज्ञांपुढे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी एकमेकींशी निगडित आहेत. उदा., पॉलिएस्टर तंतू हे काही वेळा अखंड औष्णिक प्रक्रियेने रंगवावे लागतात. तेव्हा बाष्परूपाने उडून जाण्याच्या बाबतीतील पक्केपणाचा गुणधर्म महत्त्वाचा ठरतो. सेल्युलोज  ॲ सिटेटाकरिता नवीन अपस्करण (द्रवामध्ये विखुरलेल्या स्वरूपातील) रंजकद्रव्ये जास्त जलद्वेषी (पाण्याविषयी आसक्ती नसलेली) असावी लागतात. ही रंजकद्रव्ये अबाष्पनशील (बाष्परूपाने न उडून जाणारी) असून त्यांचे भौतिक रूप चूर्ण किंवा पेस्ट या ठराविक स्वरूपात असावे लागते. यामुळे त्याचे रंगविण्याच्या कुंडात जलद व स्थिर अपस्करण तयार होते.

    इतिहास :  रंजकद्रव्याच्या वापराविषयीचा सर्वांत जुना प्रत्यक्ष पुरावा अश्मयुगात वापरल्या गेलेल्या गेरू विषयीचा आहे. दिव्याची काजळी पहिले मानवनिर्मित रंगदायी द्रव्य असून ते अजूनही वापरले जाते. ईजिप्शियन ब्ल्यू हे संश्लेषित अकार्बनी रंगदायी द्रव्य इ. स. पू. सु. ३००० मध्ये ईजिप्तमध्ये तयार होत असे परंतु संश्लेषित कार्ब नी  रंगदायी द्रव्ये इ.स. १७७१ पर्यं त निर्माण झाली नव्हती. त्या वर्षी पी. वुल्फ यांनी निळीवर नायट्रिक अम्लाची विक्रिया करून काही रंजकद्रव्ये तयार करण्यासाठी प्रारंभीचे रसायन म्हणून उपयोगी पडणारे पिक्रिक अम्ल तयार केले.

   भारतात प्राचीन काळापासून रंजकद्रव्ये वापरात असल्याचे उल्लेख आढळतात. इ. स. पू. ५०० च्या सुमारास पाणिनी यांनी नीळ व लाख यांचा आपल्या ग्रंथात उल्लेख केलेला होता. एका बौद्ध ग्रंथात रंजकद्रव्यांचा उगम वृक्षाच्या मूळ, खोड, साल, पाने, फुले व फळे या सहा भागांत असल्याचे वर्णन केले आहे. पूर्वी भारतात मुख्यतः  नीळ, लाख, हळद, मंजिष्ठ ( ॲ लिझरीन) व राळ ही नैसर्गिक रंजकद्रव्ये प्रचलित होती. काही तज्ञांच्या मते इ. स. पू. चवथ्या शतकात भारतात शाई वापरली जात होती. कापडाला दिलेले रंग पक्के करण्यासाठी तुरटीचा उपयोग होत असे. अशा लवणांना रंगबंधक असे म्हणतात. ही वनस्पतिज रंजकद्रव्ये सोडल्यास विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यं त भारतात रंजकद्रव्यांच्या बाबतीत काहीच प्रगती झाली नव्हती. निळीचे उत्पादन मात्र भरपूर होई व तिची निर्यातही होत असे परंतु एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संश्लिष्ट रंजकद्रव्ये तयार होऊ लागल्यावर निळीचा उद्योग मागे पडत गेला.

   यूरोपात मंजिष्ठ, नीळ, लॉगवुड (पतंगी), फुस्टिक इ. वनस्पतिज आणि कोचिनियल व कर्मीस ही कीटकजन्य रंजकद्रव्ये वापरात होती. संश्लिष्ट रंजकद्रव्ये तयार करण्याच्या दृष्टीने १८५० पर्यं   त रसायनशास्त्राची विशेष प्रगती यूरोपात झाली नाही. १८५६ मध्ये विल्यम हेंरी पर्किन यांनी व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे असलेले मॉव्ह हे पहिले कार्बनी रंजकद्रव्य प्रयोगशाळेत तयार केले व यामुळे आधुनिक रंजकद्रव्य उद्योगास प्रारंभ झाला. त्या अगोदर १८३४ मध्ये एफ्. रू गे यांनी फिनॉल व ऑक्झॅलिक अम्ल ही सल्फ्यूरिक अम्लामध्ये तापवून आरीन नावाचे रंजकद्रव्य प्रयोगशाळेत बनविले होते परंतु उद्योगधंद्यात त्याचा विशेष उपयोग होऊ शकला नाही. पार्किन यांनी तयार केलेले रंजकद्रव्य रंगारी सहज वापरू शकल्याने पार्किन यांनी त्याच्या व्यापारी उत्पादनाकडे लक्ष दिले व १८५७ पर्यत लंडनमध्ये रेशीम रंगविणाऱ्यांच्या गरजा ते पूर्णपणे भागवू शकत होते.


   इ. स. १८५८ मध्ये पीटर ग्राहस यांनी  ⇨डायाझो संयुगांचा शोध लावला. एखाद्या अमाइनाची नायट्रस अम्लाबरोबर विक्रिया करून मिळालेल्या संयुगाचा अमाइने व फिनॉले यांच्याशी संयोग करून रंगीत ⇨ ॲझो  संयुगे  मिळविता येतात. ॲनिलीन यलो हे व्यापारी तत्त्वावर १८६३ मध्ये तयार करण्यात आलेले पहिले ॲझो  रंजकद्रव्य होय. मँचेस्टरच्या रॉवर्टस, डेल अँड कंपनीने शोधून काढलेले बिस्मार्क ब्राउन अथवा मँचेस्टर ब्राउन हे व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे असलेले पहिले रंजकद्रव्य होय. १८६२ मध्ये ई. सी. निकल्सन यांनी निकल्सन ब्ल्यू अथवा अल्कली ब्ल्यू हे पहिले रंजकद्रव्य (अम्लीय गट असलेले रंजकद्रव्य) शोधून काढले. हे लोक रंगविण्यासाठी चांगले उपयुक्त आहे. १८३४ मध्ये ॲनिलिनाचे ऑक्सिडीकरण [ ⟶ ऑक्सिडीभवन] केले असता रूंगे यांना मिळालेला काळा अवक्षेप (साका) पुढे १८६२ मध्ये ॲनिलीन ब्लॅक या नावाने कॅलिको छपाईत वापरला जाऊ लागला. व्हॅट रंजकद्रव्ये (विरघळणाऱ्या व रंगहीन रूपात क्षपणक्रियेने आणून तंतूमध्ये सहजपणे अंतर्भूत करता येणारी आणि नंतरच्या ऑक्सिडीकरणाने अंतिम रंग येणारी रंजकद्रव्ये) व गंधकयुक्त रंजकद्रव्ये यांचा शोध लागेपर्यत ॲनिलीन ब्लॅकचाच काळे रंजकद्रव्य म्हणून उपयोग करण्यात येत होता. पर्किन यांच्या शोधानंतरच्या दशकात मॅजेन्टा, रोझॅलीन ब्ल्यू, मिथिल व्हायोलेट, होफमान व्हायोलेट व आल्डिहाइड ग्रीन या रंजकद्रव्यांचे शोध लागले पण ते शास्त्रीय आधारावर न लागता अनुभवसिद्ध प्रयोगांद्वारे लागले.

  सी . ग्रेबे व सी. लिबरमान यांनी ॲलिझरीन १८६९ मध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने संश्लेषित केले. निसर्गात आढळणाऱ्या रंजकद्रव्याचे हे पहिले संश्लेषण होय. यामुळे पर्किन यांचे लक्ष पुन्हा व्यापारी निर्मितीकडे लागून त्यांनी रंजकद्रव्य निर्मितीचा कारखाना चालू केला. या कारखान्यात १८७१ मध्ये रंजकद्रव्यांचे २२० टन आणि १८७३ मध्ये ४३५ टन इतके उत्पादन झाले. यामुळे ब्रिटिश शास्त्रज्ञांचे लक्ष रंजकद्रव्यांच्या संशोधनापेक्षा उत्पादनाकडे अधिक गेले.

   पीटर ग्राइस यांनी ॲरोमॅटिक अमाइनाचे  ⇨डायाझोटीकरण आणि संयुग्मीकरण या क्रिया करून १८५८ मध्ये ॲझो  संयुगे तयार केल्यामुळे तसेच १८६५ मध्ये एफ्. ए. केकूले यांनी वेंझिनाची रासायनिक वलयी रचना सिद्ध केल्यामुळे रंजकद्रव्य उद्योगाचा व संशोधनाचा पुढील टप्पा सुरू झाला. १८७० मध्ये केकूले यांनी फिनॉलाचे डाझाझोटीकरण केलेल्या फिनॉलाबरोबर संयुग्मीकरण करून पहिले हायड्रॉक्सी ॲझो रंजकद्रव्य बनविले. ए. फोन बेयर यांनी १८७० मध्ये नीळ तयार केली परंतु १८९० पर्यं   त तिचे तांत्रिक संश्लेषण झाले नव्हते, ते के. होइमान यांनी केले. १८७१ मध्ये बेयर यांनी फ्ल्युओरेसीन हे अनुस्फुरक रंजकद्रव्य (उच्च प्रकाशीय परावर्तनक्षमता असलेले व पदार्थाच्या चमकदारपणात भर टाकणारे रंजकद्रव्य) तयार केले. १८७३ साली लाकडाचा भुसा गंधक व दाहक (कॉस्टिक) सोडा यांच्याबरोबर तापवून कॅच्यू द लाव्हल हे पहिले गंधकयुक्त रंजकद्रव्य तयार करण्यात आले. या गंधकयुक्त रंजकद्रव्यामुळे कापड तपकिरी रंगात सहजपणे आणि स्वस्तात रंगविता येऊ लागले, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यत खराखुरा लाल रंग वगळता बहुतेक सर्व रंग या रंजकद्रव्यांमध्ये उपलब्ध झाले.

  पी . बोटिजर यांनी काँगो रेड हे रंजकद्रव्य १८८४ मध्ये शोधून काढले. हे रंजकद्रव्य पहिले सरळ रंजकद्रव्य म्हणजे तंतूला रंगबंधक लावल्याशिवाय वापरता येणारे रंजकद्रव्य आहे. हे रंजकद्रव्य बेंझिडीन रंजकद्रव्य-मालिकेतील पहिले होय. अशी सरळ रंजकद्रव्ये पुढे प्रमुख औद्योगिक रंजकद्रव्ये झाली.

  ए . लिओनार्ड कंपनीतील एफ्. बेंडर या शास्त्रज्ञांनी १८८६ साली स्टिल्बिन रंजकद्रव्य-मालिकेतील ब्रिलियंट यलो व क्रियोफेनीन-जी ही रंजकद्रव्ये तयार केली.

  ए . जी. ग्रीन यांनी १८८७ मध्ये तयार केलेले प्रिम्युलीन हे पिवळे सरळ रंजकद्रव्य प्रथम उपयोगी पडले नाही पण नंतर त्याचे डायाझोटीकरण व विकसन (डायाझोनियम लवणाबरोबर संयुग्मीकरण) केल्यावर तंतूंवर चमकदार व पक्की छटा मिळते, असे आढळून आले. त्यामुळे त्याचा बराच वापर होऊ लागला.

 आ र्. लॉच, के. क्रेकलर व एच् .क्युझेल यांनी १८८९-९० मध्ये लोकरीकरिता असलेल्या पहिल्या क्रोम रंजकद्रव्याचा शोध लावला. ही रंजकद्रव्ये प्रथम लोकरीवर लावून मग त्यावर पोटॅशियम डायक्रोमेटाची प्रक्रिया करतात. यामुळे पक्केपणा इ. उत्तम गुणधर्म प्राप्त होतात. १८९३– ९९ या काळात एच्. आर्. व्हीदाल यांनी गंधकयुक्त रंजकद्रव्ये तयार करण्यासाठी उपयुक्त असणारी थायोनीकरण ही प्रकिया सोडियम पॉलिसल्फाइड वापरून शोधून काढली. २, ४-डाय-नायट्रो-फिनॉलावर ही प्रक्रिया केल्यास सल्फर ब्लॅक हे रंजकद्रव्य मिळते व ते अद्यापही खूप प्रचारात आहे.

  ग्रेबे व लिबरमान यांनी १८७१ मध्ये ॲलिझरिनाचे  ⇨सल्फॉनीकरण  केल्यास लोकरीकरिता विद्राव्य रंजकद्रव्य मिळू शकते, असे दाखविले. १८९३– ९७ या काळात आर्. ई. श्मिट यांनी लोकरीकरिता महत्त्वाची निळी व हिरवी रंजकद्रव्ये (उदा., ॲलिझरीन सफायरॉल व ॲलिझरीन सायनीन ग्रीन) तयार केली. १८९९ मध्ये ओ. उंगर यांनी ॲलिझरीन स्काय ब्ल्यू हे रंजकद्रव्य सल्फॉनीकरणाद्वारे मिळविले. या रंजकद्रव्यांसंबंधीच्या संशोधनामुळे लोकरीकरिता चांगली चमकदार निळी सल्फॉनीकृत अँथ्रॅ क्वि नोन अम्ल रंजकद्रव्ये तयार करण्याचा पाया घातला गेला.

   रने बोन यांनी शोधून काढलेले इंडान्थ्रोन ब्ल्यू हे संश्लेषित निळीनंतरचे पहिले संश्लेषित व्हॅट रंजकद्रव्य होय. या निळ्या रंजकद्रव्यानंतर इतर रंगांची अशी रंजकद्रव्ये मिळविण्यात आली आणि त्यामुळे रंजकद्रव्याच्या पक्केपणाची नवीन परिमाणे निश्चित झाली. १९१० पर्यं त बहुतेक सर्व वर्गातील रंजकद्रव्यांवर संशोधन झाले होते. त्यानंतरच्या संशोधनामुळे रंजकद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियांमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या, पण नवीन रंजकद्रव्ये शोधली गेली नाहीत. उदा., वीटा-हायड्रॉक्सी नॅप्थॉइक ॲनिलाइड याचा वीटा नॅप्थॉलाऐवजी पॅरा रेड हे रंजकद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत उपयोग केल्याने विविध रंगछटा मिळून कापसाकरिता उत्तम पक्केपणाचा गुणधर्म असलेली रंजकद्रव्ये उपलब्ध झाली आणि त्यांची बरोबरी त्यांपेक्षा खूपच महाग असलेल्या व्हॅट रंजकद्रव्यांबरोबर होऊ लागली. १९१५ मध्ये धातु-जटिलयुक्त रंजकद्रव्यांची (उदा.,निओलान रंजकद्रव्ये) एक मालिका बाजारात आली. यात धातूच्या एका अणूमागे रंजकद्रव्याचा एक रेणू असतो या रंजकद्रव्यांत क्रोमियम धातु-जटिल रूपात असल्याने पूर्वीच्या क्रोम रंजकद्रव्यांप्रमाणे या रंजकद्रव्याच्या बाबतीत पोटॅशियम डायक्रोमेटाची वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही.

  वि साव्या शतकाच्या सुरुवातीचे महत्त्वाचे संशोधन म्हणजे अपस्करण रंजकद्रव्यांविषयीचे होय. सुरुवातीला ती सेल्युलोज ॲसिटेटाकरिता मुद्दाम वापरली जात होती परंतु नंतर इतर कृत्रिम तंतूंकरिताही ती वापरण्यात येऊ लागली. यानंतरचे महत्त्वाचे शोध थॅलोसायनिने (१९२८) व शेवटी तंतू-विक्रियाशील रंजकद्रव्ये यांचे होत. थॅलोसायनिनाचा शोध हा मॉव्हच्या शोधाप्रमाणेच आकस्मिकपणे लागला. डँड्रिज यांना एक लोखंडी पात्रास थॅलिमाइड तयार करताना त्यात निळे रंगद्रव्य तयार झाल्याचे आढळले. १९५४ मध्ये लिनस्टीड यांनी थॅलोसायनिनांचे रासायनिक गुणधर्म शोधून काढले आणि त्याच वर्षी इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज कंपनीने पहिले कॉपर थॅलोसायनीन रंगद्रव्य (मोनॅस्ट्रल फास्ट ब्ल्यू बीएस) बनविले. त्यानंतर उत्तम निळ्या आणि हिरव्या रंगछटा असलेल्या रंगद्रव्यांची व विद्राव्य रंजकद्रव्यांची मालिका बाजारात आली. १९५६ मध्ये याच कंपनीने सेल्युलोजाबरोबर सहसंयुजी बंध तयार करणारे रंजकद्रव्ये (प्रोसिऑन रंजकद्रव्ये) बाजारात आणली. या तंतू-विक्रियाशील रंजकद्रव्याचे धुलाईच्या बाबतीतील पक्केपणाचे गुणधर्म पुष्कळच चांगले असल्यामुळे या रंजकद्रव्यांची एक नवीन मालिका प्रस्थापित झाली.


  ब्रिटनमध्ये १८५७ साली पर्किन अँड सन्स या कारखान्याची स्थापना झाल्यापासून पुढील सु. पंधरा वर्षे रंजकद्रव्ये केवळ ब्रिटनमध्येच तयार होत होती. ब्रिटिश रंजकद्रव्यशास्त्रज्ञ पर्किन, निकल्सन, मेडलॉक यांसारखे प्रथितयश उद्योजक ब्रिटनमध्ये असल्याने एक प्रकारची मक्तेदारी निर्माण झाली परंतु याच काळात कारो, मार्टसीउस, व्हिट व पीटर ग्राइस हे शिक्षणाकरिता ब्रिटनमध्ये राहिले व त्यांनी रंजकद्रव्य निर्मितीकला हस्तगत केली. यानंतर पर्किन, निकल्सन वगैरे लागोपाठ निवृत्त झाले. १८७७ मध्ये फ्रँको-प्रशियन युद्ध सुरू झाल्यावर जर्मन शास्त्रज्ञ मायदेशी परत गेले. त्या वेळचे ब्रिटनमधील औद्योगिक धोरण वशुद्ध रसायनशास्त्रापेक्षा तांत्रिक रसायनशास्त्र कमी लेखण्याची प्रवृत्ती यांमुळे ब्रिटिश रंजकद्रव्य उद्योग खालावत गेला. याउलट जर्मनीमध्ये हा उद्योग भरभराटीस आला आणि थोड्याच वर्षात जर्मनीने आपले अग्रस्थान प्रस्थापित केले. बीएएसएफ्. फार्बवेर्क हेक्स्ट, एजीएफए इ. नामवंत कंपन्या आणि इतर लहानमोठे कारखाने पुढील काही वर्षात जर्मनीत स्थापन झाले.

  वि साव्या शतकाच्या प्रारंभी उच्च संशोधन व विकास करण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो व तो छोट्या कारखान्यांना परवडत नाही, असे दिसून आले. यामुळे हा प्रश्न काही कंपन्यांचे एकत्रीकरण करून सोडविण्यात आला. यासाठी बेयर, बीएएसएफ व एजीएफए यांचा एक, तर हेक्स्ट, कॅसेला आणि कॅले यांचा दुसरा असे गट तयार झाले परंतु ब्रिटनमधील लोकांनी काळाची गरज लक्षात न घेतल्याने त्यांचा रंजकद्रव्य उद्योग विस्कळीत राहिला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीमध्ये जगातील ८५ टक्के रंजकद्रव्याचे उत्पादन होत होते. ब्रिटनमध्ये ९० टक्के रंजकद्रव्ये आयात करावी लागत असल्याने शेवटी सरकारी मदतीने १९१५ मध्ये ब्रिटिश डाइज ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यानंतर १९२६ पर्यंत बऱ्याच लहानमोठ्या कंपन्या एकत्रित होऊन इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज ही जगातील एक नामांकित कंपनी स्थापन झाली. १९३८ पर्यंत ब्रिटनला देशाची रंजकद्रव्यांची ९० टक्के गरज भागविणे शक्य झाले.

  फ्रा न्समध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळी केवळ दोनच रंजकद्रव्ये कारखाने होते आणि ते देशाची फक्त १० टक्के गरज भागवू शकत होते. पुढे ब्रिटनप्रमाणे लहानमोठे कारखाने एकत्र करून १९२६ मध्ये फ्रान्समध्ये एक मोठी कंपनी स्थापन करण्य़ात आली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा फ्रान्सवर ताबा असताना सर्व कंपन्यांचे एकत्रीकरण करून फ्रँकलर ही संघटना स्थापन करण्यात आली व ती जर्मनीतीतील आयजी या कंपनीच्या अखत्यारीखाली काम करू लागली. युद्धानंतरही ही संघटना पुढे चालू ठेवण्यात आली.

  स्वित्झर्लंडच्या रासायनिक उद्योगाची परिस्थिती ब्रिटन वा फ्रान्सपेक्षा जास्त चांगली होती. गायगी, सँडोझ व सीबा या स्वित्झर्लंडमधील नामवंत कंपन्या जर्मनीस काही खास प्रकारची रंजकद्रव्ये निर्यात करीत असत. पहिल्या महायुद्धानंतर जर्मन आयजीच्या पद्धतीवर स्वित्झर्लंडमधील रासायनिक उद्योगाची फेररचना करण्यात आली. त्यामुळे पुढे स्वित्झर्लंड हे रंजकद्रव्ये निर्यात करणारा एक प्रमुख देश बनला.

  अमेरिकेमध्ये १९१५ च्या सुमारास रंजकद्रव्यांचे सात कारखाने होते व ते देशाची केवळ १० टक्के गरज भागवू शकत होते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे रंजकद्रव्य तंत्रज्ञान व यंत्रसामग्री ताब्यात घेतल्यावर अमेरिकेत अनेक नवीन कारखाने स्थापन झाले आणि १९३८ पर्यत अमेरिकेने रंजकद्रव्य उत्पादनात जर्मनीनंतर दुसरा क्रमांक पटकाविला. अमेरिकेतील घू पाँ, नॅशनल ॲनिलीन अँड केमिकल कंपनी, कॅलको, जनरल ॲनिलिन अँड फिल्म कॉपोरेशन वगैरे कंपन्या रंजकद्रव्य उत्पादनात आघाडीवर आहेत.

  दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जर्मनीतील बहुतेक सर्व तंत्रज्ञान इतर देशांत जाऊन पोहोचले. या कामी ब्रिटन व अमेरिकेतील दोन समित्यांनी जर्मंनीतील बहुतेक धंद्यांतील महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून ती खंडशः    प्रसिद्ध केली. त्यामुळे इतर देशांतील उद्योगधंद्यांना मार्गदर्शन होऊन त्यांना आपले उत्पादन वाढविता आले.

  कार्बनी रसायनशास्त्र व रासायनिक उद्योग यांच्या प्रगतीमध्ये रंजकद्रव्ये व त्यांच्या उत्पादनात लागणारी मध्यस्थ रसायने (प्राथमिक कच्च्या मालापासून अंतिम पदार्थ मिळविण्याच्या क्रियेत मधल्या टप्प्यांमध्ये मिळणारी रसायने) यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. पुष्कळसे प्रसिद्ध कार्बनी रसायनशास्त्रज्ञ हे मूलतः रंजकद्रव्यांविषयीचे तज्ञ होते. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे पुढे औषधिद्रव्ये, कीटकनाशके, तृणनाशके, कापड उद्योगातील रसायने इ. उद्योगांचा पाया बळकट झाला.

   कच्चा माल, मध्यस्थ रसायने व उत्पादन प्रक्रिया   : रंजकद्रव्यांची पूर्वगामी संयुगे ही रंजकद्रव्य मध्यस्थ किंवा मध्यस्थ रसायने म्हणून ओळखली जातात. ती  बें झीन, नॅप्थॅलीन यांसारख्या साध्या कच्च्या मालापासून विविध रासायनिक प्रक्रियांनी (उदा., नायट्रीकरण, सल्फॉनीकरण, डायाझोटीकरण इ.) तयार केली जातात. सामान्यतः कच्चा माल वलयी  ⇨ॲरोमॅटिक संयुगांच्या रूपात असतो. ही संयुगे प्रामुख्याने कोकच्या उत्पादनात दगडी कोळशापासून मिळणारे ⇨डांबर व खनिज तेल [⟶ खनिज तेल रसायने] यांपासून मिळवितात. आता खनिज तेल उद्योग हा बेंझीन, टोल्यूइन, झायलिने व नॅप्थॅलीन यांच्या पुरवठ्याचा प्रमुख उद्गम झालेला आहे. वलयी मध्यस्थांमध्ये सु. १,००० संयुगांचा समावेश होतो. यांत बहुसंख्य असलेल्या कार्बन वलयी ॲरोमॅटिक संयुगांत वलयी ॲलिफॅटिक व विषमवलयी संयुगे यांचा अंतर्भाव होतो.

  वलयी मध्यस्थांच्या बरोबर अनेक ॲलिफॅटिक विक्रियाकारक व अकार्बनी रसायने रंजकद्रव्य उद्योगात वापरली जातात. त्यांत सल्फॉनी करणासाठी साधे व वाफाळणारे सल्फ्यूरिक अम्ल, नायट्रीकरणासाठी नायट्रिक अम्ल, हॅलोजनीकरणासाठी क्लोरीन आणि ब्रोमीन, संगलन (वितळविणे) व  ⇨उदासिनीकरणासाठी दाहक सोडा व दाहक पोटॅश, डायझोटीकरणासाठी सोडियम नायट्राइट आणि यांशिवाय अमोनिया, हायड्रोक्लोरिक अम्ल, क्लोरोसल्फ्यूरिक अम्ल, सोडियम कार्बोनेट, बायकार्बोनेट व सल्फाइड यांचा समावेश होतो.

  मध्यस्थ व रंजकद्रव्ये यांच्या उत्पादन प्रक्रिया बीड, अगंज पोलाद अथवा रबर, एनॅमल किंवा कार्बन ठोकळे यांचे अस्तर असलेले पोलाद यांपासून बनविलेल्या किटल्यांमध्ये करण्यात येतात. त्यांच्या भोवती नळ्यांचे वेटोळे बसवून तापमान वाढविण्यासाठी त्यांतून उकळता द्रव, वाफ किंवा गरम पाणी यांचे आणि तापमान उतरविण्यासाठी हवा, थंड पाणी व अधिक थंड केलेले मिठाचे पाणी यांचे अभिसरण करतात. शक्य तेव्हा मध्यस्थ रसायने त्यानंतर मध्यस्थांच्या वा रंजकद्रव्यांच्या उत्पादनाकरिता काढून घेता येतात.

  उत्पादनात सामान्यतः गट प्रक्रिया वापरली जाते परंतु संगणक, इलेक्ट्रॉनीय मंडले व उपकरणे यांतील प्रगतीमुळे स्वयंचलित प्रक्रिया नियंत्रण वाढत्या प्रमाणात वापरले जात आहे.

  काही रंजकद्रव्ये विषारी आहेत. त्यांचे तीव्र अथवा अल्पकालीन परिणाम सर्वसाधारणपणे माहीत आहेत. या रसायनांचे कामाच्या जागेमधील वातावरणातील प्रमाण विहित मर्यादेखाली ठेवून आणि त्यांच्याशी शारीरिक संपर्क टाळून यांचे परिणाम मर्यादित ठेवता येतात. रंजकद्रव्ये व मध्यस्थ तयार करणाऱ्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर जैव प्रक्रिया सामान्यतः करतात. [ ⟶ वाहितमल संस्करण व विल्हेवाट].


    वर्गीकरण :  जगामध्ये रासायनिक दृष्ट्या निरनिराळी व व्यापारी महत्त्वाची आठ हजारावर रंजकद्रव्ये उपलब्ध आहेत. रंजकद्रव्ये तयार करणारे व ती वापरणारे (रंगारी) यांच्या सोयीच्या दृष्टीने रंजकद्रव्यांचे दोन प्रकारे वर्गीकरण करतात. पहिल्या पद्धतीत रासायनिक संघटनानुसार वर्गीकरण करतात आणि ते रंजकद्रव्यांतील क्रोमोफोरवर म्हणजे रेणूतील रंगदायी एककावर आधारलेले आहे (पहा कोष्टक क्र.१). दुसरी पद्धत रंजकद्रव्यांच्या उपयोगावर आधारलेली आहे. पहिली पद्धत रासायनिक दृष्ट्या रंजकद्रव्य-उत्पादक, तर दुसरी पद्धत रंगारी वापरतात. दुसऱ्या पद्धतीनुसार केलेल्या रंजकद्रव्याच्या विविध वर्गांची  माहिती खाली दिली आहे. काही रंजकद्रव्ये (उदा., ॲझो, थॅलोसायनीन, ॲझीन या गटांतील रंजकद्रव्ये) ही न विरघळणाऱ्या स्वरूपात रूपांतरित करून रंगद्रव्ये म्हणूनही वापरण्यात येतात. त्यांची माहिती  ‘रंगद्रव्ये’ या नोंदीत दिलेली आहे. यांखेरीज अँथोसायनिने व अँथो झँथिये, ॲक्रिडीन, ॲझो संयुगे, क्विनोने, क्विनोलीन व आयसोक्विनोलीन, डायाझो संयुगे या नोंदीही पहाव्यात.

 कोष्टक क्र. १.संश्लेष्ट रंजकद्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण  

 वर्ग    

 क्रोमोफोर    

 उपलब्ध रंगछटांची संख्या   

 मुख्य उपयोग    

 ॲक्रिडीन  

 &gt   C= N − व   C=C &lt

 १ ,०००

 कापड व चामडे  

 ॲमिनो कीटोन  

 O=C − NH2

         ∣    

 १ ,०००

 मधस्थ रसायने  

 अँथ्रॅक्विनोन  

 &gt   C=O व &gt C=C&lt

 १५ ,०००

 कापड  

 ॲझीन

 − C − N=C −   

     ∣∣            |

 − C − N=C −   

 १ ,०००

 कापड व चामडे    

  

 ॲझो     

 मोनॅझो   एक  –   N = N –    

 डायझो   दोन  −   N = N  −   

 ट्रायाझो   तीन  −   N = N  −   

 पॉलिॲझो चार वा अधिक  −   N = N  −   

 ९ ,०००    

 ९ ,०००    

 ५ ,०००    

 २ ,०००

 कापड

 ॲझोइक

 − N = N  −   

 ३ ,०००

 कापड    

 डायफिनिलमिथेन

 &gt C=N  −   

 १ ,०००

 कापड

 हायड्रॉक्सी कीटोन

 O=C − OH

          ∣    

 १ ,०००

 मध्यस्थ रसायने

 इंडामीन

 दोन  &gt   C=N −   

 ३००

 मध्यस्थ रसायने

 इंडिगॉइड

         I     I       I       I

 O=C    C=C − C=O

 १ ,०००

 कापड

 इंडोफिनॉल

 &gtC=N −  व  &gt C=O

 ३००

 रंगीत छायाचित्रण

 लॅक्टोन

 &gtC=O

 १ ,०००

 लोकर

 मिथाइन

 &gtC=C &gt

 १ ,०००

 कागद , छायाचित्रण

 नायट्रो

 − NO2

 ७००

 कापड

 नायट्रोसो

 − N=O किंवा =N − OH

 ३००

 कापड

 ऑक्सॅझीन

   C–N =C-  

      ∣∣             |

 − C − O     C =

 १ ,०००

 कॅलिको छपाई

 थॅलोसायनीन

 &gtC=N −  

 १ ,०००

 कागद

 क्विनोलीन

 &gtC=N व &gtC=N −   

 १ ,०००

 कागद , लोकर

 स्टिल्बिन

 − N=N −  व  &gt C=C&lt

 १ ,०००

 कापूस

 गंधक

      ∣    

 =C − S − C ≡   

 किंवा    

      ∣    

 =C − S − S − C ≡   

  

 २ ,०००

 कापड

 थायाझीन

 − C − N=C –

     ∣∣           |

 − C − S − C&lt

 १ ,००

 कापड

 थायझोल

 &gtC=N −  व  − S − C ≡   

 ४००

 मध्यस्थ रसायने

 ट्रायअरिलमिथेन

 &gtC =Ar=NH

       किंवा    

 &gtC=Ar=O

 ३ ,०००

 कापूस , रेशीम, लोकर

 झँथीन

 − O − c6H4 − O −   

 १ ,०००

 कापूस ,रेशीम, लोकर

  

   अम्ल रंजकद्रव्ये :  ही कार्बनी सल्फॉनिक अम्ले असून बाजारात सामान्यतः त्यांच्या उपलब्ध असतात. अम्ल गटांमुळे त्यांची पाण्यातील विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) चांगली असते. रासायनिक संरचनेनुसार ही रंजकद्रव्ये पुढील रासायनिक गटांत अंतर्भूत होतात :  ॲझो , अँथ रॅ क्विनोन, ट्रायफिनिलमिथेन, पायरॅझोलोन, ॲझीन, नायट्रो आणि क्विनोलीन यांपैकी ॲझो रंजकद्रव्ये हा सर्वांत मोठा व महत्त्वाचा गट असून त्याखालोखाल अँथ्रॅक्विनोन व ट्रायफिनिलमिथेन यांचा क्रम लागतो. इतर गट व्यापारी  दृ ष्ट्या फारसे महत्त्वाचे नाहीत.   


   ही रंजकद्रव्ये पॉलिअमाइड, लोकर, रेशीम, परिवर्तित ॲक्रिलिक व पॉलिप्रोपिलीन तंतूकरिता तसेच या तंतूंच्या कापूस, रेयॉन, पॉलिएस्टर, ॲक्रिलिक इ. तंतूंबरोबरील मिश्रणाकरिता वापरतात.  

  अम्ल रंजकद्रव्यांची चार गटांत विभागणी करता येते : (१) यांत एकच सल्फॉनिक अम्ल गट असून त्यांचे रंगाचा एकसारखेपणा, पसरणे व बाण्याला समांतर असणारे कापडातील दोष झाकून टाकणे या बाबींतील गुणधर्म उत्तम असतात. प्रकाशाच्या बाबतीतील पक्केपणा उत्तम असतो पण गर्द रंगछटांचा आर्द्रतेच्या बाबतीतील पक्केपणा मर्यादित असतो.  

  (२) यांतही एकच सल्फॉनिक अम्ल गट असतो. त्यांचे रंगाचा एकसारखेपणा, पसरणे व बाण्याला समांतर असलेले दोष झाकून टाकणे या बाबतीतींल गुणधर्म पहिल्या गटातील रंजकद्रव्याइतकेच जवळजवळ असतात तथापि मोठ्या रेणवीय आकारमानामुळे या रंजकद्रव्यांचा आर्द्रतेच्या बाबतीतील पक्केपणा अधिक चांगला असतो.

  (३) यात दोन सल्फॉनिक अम्ल गट असून त्यांचा आर्द्रतेच्या बाबतीतील पक्केपणा सर्वोत्कृष्ट असतो. त्यांचे रंगाचा एकसारखेपणा व पसरणे हे गुणधर्म पहिल्या व दुसऱ्या गटांतील रंजकद्रव्यांपेक्षा अगदीच कमी दर्जाचे असतात.

  (४) ही पूर्व धातवीकृत रंजकद्रव्ये असून त्यांत एक व दोन सल्फॉनिक अम्ल गट असलेली अशी दोन्ही प्रकारची रंजकद्रव्ये येतात. पूर्व धातवीकृत रंजकद्रव्यांनी एकसारखा रंग देण्याची रंजनक्रिया करणे अतिशय अवघड असते. यांचा आर्द्रतेच्या बाबतीतील पक्केपणा तिसऱ्या गटातील रंजकद्रव्यांशी तुल्य वा अधिक चांगला असतो.

   क्षारकीय रंजकद्रव्ये :  ही रंजकद्रव्ये ॲक्रिलिक (ऑरलॉन, ॲक्रिलान, क्रेसलान, झेफ्रान) व परिवर्तित ॲक्रिलिक (व्हेरेल) या तंतूंसाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. अलीकडे यांत अम्लीय गटांचा समावेश करण्यात आलेला असल्याने त्यांचा उपयोग पॉलिएस्टर व पॉलिअमाइड तंतूंकरिताही करता येतो. यामुळे त्यांचा खप पुष्कळच वाढलेला आहे. याखेरीज त्यांचा उपयोग परिवर्तित नायलॉन, कागद व शाई यांसाठीही करण्यात येतो. ही रंजकद्रव्ये रासायनिक दृष्ट्या पुढील गटांत समाविष्ट होतात : मिथाइन, डायफिनिलमिथेन, ट्रायअरिलमिथेन,  ॲझो , ॲझाइड, झँथीन, थायाझोल, ॲक्रिडीन, ऑक्सॅझीन व अँथ्रॅक्किनोन. ही रंजकद्रव्ये पाण्यात विद्राव्य असून त्यांचे धनायनात (विद्रावातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता धनाग्राकडे जाणारे ऋण विद्युत् भारित अणू वा अणुगट) व रंगीत ऋणायन (विद्रावातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता ऋणाग्राकडे जाणारे धन विद्युत् भारित अणू वा अणुगट) यांत वियोजन  होते.

  ऋणायनांना  ॲ क्रिलिक तंतूंतील अम्लीय गटांची (सल्फॉनिक वा कार ् बॉक्सिलिक) तीव्र आसक्ती असून त्यांच्या बरोबर लवणे बनतात. या बळकट बंधामुळे या रंजकद्रव्यांचा धुलाईबाबतचा पक्केपणा विशेष चांगला असतो मात्र प्रकाशाबाबतच्या पक्केपणात रंजकद्रव्यांनुसार बराच फरक पडतो.

   सरळ रंजकद्रव्ये :  ही रंजकव्ये पाण्यात विद्राव्य असून कापूस, रेयॉन, लिनन यांसारख्या सेल्युलोजयुक्त तंतूंवर त्यांचे पूर्णपणे अधिशोषण होते. रासायनिक दृष्ट्या यांचा पुढील गटांत समावेश होतो :  ॲझो , थॅलोसायनीन, स्टि ल्बि न, ऑक्सॅझीन व थायाझोल. बहुतेक सर्व सरळ रंजकद्रव्ये ही  ॲझो  संयुगे असून त्यांत एक वा अधिक सल्फॉनिक गट असल्याने ती जलविद्राव्य बनतात. बहुतेक सरळ रंजकद्रव्यांत दोन वा तीन ॲझो गट असतात. या रंजकद्रव्यांचे जलीय विद्रावात विगमनाने ऋणायन बनतात, त्यांचे रेणू हायड्रोजन बंधांनी जोडले गेलेले असतात व त्यामुळे त्यांचे मोठे पुंजके बनतात. या पुंजक्यांचा लांबट आकार सेल्युलोज रेणूच्या समांतर मांडणीला जुळता होऊन अनेकविध ते हायड्रोजन बंधांनी मजबूतपणे जोडले जातात.

  ही रंजकद्रव्ये सुती व रेयॉनच्या कापडांकरिता सर्व प्रकारच्या रंगछटांत मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. यांखेरीज चामडे, कागद आणि लिनन, ताग, हेंप, रेशीम, पॉलिअमाइड, नायलॉन व इतर तंतूंचे मिश्रण यांकरिता ही रंजकद्रव्ये वापरली जातात. ही रंजकद्रव्ये लावण्यास सुलभ असून पदार्थात उत्तम प्रकारे शिरतात, एकसारखी पसरतात आणि रंगवावयाच्या पदार्थाच्या तेजावर त्याचा अनिष्ट परिणाम सहसा होत नाही.

   अपस्करण रंजकद्रव्ये :  यांची पाण्यातील विद्राव्यता अतिशय कमी असून ही रंजकद्रव्ये पाण्यात मोठ्या प्रमाणात अपस्करित (विखुरलेल्या) स्थितीत जलद्वेषी तंतूंसाठी वापरण्यात येतात. १९६० सालानंतर पॉलिएस्टर व नायलॉन हे मुख्य मानवनिर्मित तंतू  प्रचारात आल्यापासून अपस्करण रंजकद्रव्यांचे महत्त्व अतिशय वाढले आहे. ही रंजकद्रव्ये  ॲझो , अँथ्रॅक्किनोन, नायट्रो व मिथाइन या गटांमध्ये अंतर्भूत होतात. यांपैकी ॲझो व अँथ्रॅक्किनोन रंजकद्रव्ये ही प्रामुख्याने वापरली जातात. ही मुख्यत्वे पॉलिएस्टर सेल्युलोज ॲसिटेट व ट्राय-ॲसिटेट तंतूसाठी वापरली जातात. नायलॉनाच्या रंजनक्रियेत विशेषतः गालिचे व होजिअरी यांतील बाण्याला समांतर असलेले दोष झाकण्यासाठी या रंजकद्रव्यांचा उपयोग केला जातो. पॉलिअमाइड, ॲक्रिलिक, प्लॅस्टिके यांच्याकरिताही ही रंजकद्रव्ये वापरण्यात येतात. या रंजकद्रव्यांचा धुलाई व प्रकाश यांच्या बाबतीतील पक्केपणा फारच मर्यादित असून फिकट रंगछटांकरित मुख्यत्वे त्यांचा उपयोग करतात.

   अंतर्विष्ट किंवा ॲझोइक घटकयुक्त रंजकद्रव्ये :  ही रंजकद्रव्ये एखाद्या प्रकारच्या रासायनिक क्रियेने रंगवावयाच्या पदार्थावर सरळ तयार केली जातात. ही रंजकद्रव्ये  ॲझो इक व ऑक्सिडीकरण गटांत समाविष्ट होतात. काही वेळा थॅलोसायनीन प्रकारची रंजकद्रव्ये खास संस्करणाने तंतूंवर विकसित करण्यात येतात. ही रंजकद्रव्ये कापूस, रेयॉन, सेल्युलोज,  ॲसिटेट  व पॉलिएस्टर यांच्याकरिता वापरतात.

  ॲझो इक रंजकद्रव्ये ही पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारी) ॲझो संयुगे असून ती रंगवावयाच्या पदार्थात मध्यस्थ घटकाच्या रासायनिक विक्रियेने तयार होतात. सामान्यतः रंजनक्रिया करताना कापड एका घटकाच्या (हायड्रॉक्सी अथवा ॲमिनो घटकाच्या) विद्रावात प्रथम बुडविले जात. नंतर ते न खळबळविता वाळवितात. त्यानंतर दुसऱ्या घटकाच्या (बहुधा डायाझो घटक) विद्रावाचे संस्करण करतात. या दुसऱ्या घटकाचा विद्राव त्याचे अपघटन (घटक द्रव्यांत अलग होण्याची क्रिया) होऊ नये म्हणून थंड राखणे आवश्यक असते. याकरिता बर्फ वापरण्यात येत असल्याने या रंजकद्रव्यांना ‘आइस कलर्स’ असे म्हणतात. विक्रियेत तयार होणारे द्रव्य सबंध तंतूभर निक्षेपित होते (बसते) आणि ते पाण्यात अविद्राव्य असल्याने रंजकद्रव्याऐवजी प्रत्यक्षात रंगद्रव्य असते. ही रंगद्रव्ये कापूस व रेयॉन यांच्याऐवजी, तसेच मोठ्या प्रमाणावर कापड छपाईकरिता वापरतात.

  ऑक्सिडीकरण रंजकद्रव्ये ही विशिष्ट ॲरोमॅटिक अमाइनांचा रंगविण्याच्या पदार्थात शिरकाव केल्यानंतर करण्यात येणाऱ्या ऑक्सिडीकरण क्रियेने सरळ होतात. अंतिम द्रव्य रंजकद्रव्याऐवजी रंगद्रव्य असण्याची शक्यता असते. ही रंजकद्रव्ये केस व फर रंगविण्यासाठी वापरतात.


    रंगबंधक रंजकद्रव्ये :  विशिष्ट पदार्थाच्या बाबतीत आसक्ती नसलेली रंजकद्रव्ये रंगबंधकाचा उपयोग केल्यास त्या पदार्थावर लावता येतात. रंजकद्रव्याचे स्थिरीकरण मुख्यत्वे रंगबंधक द्रव्याशी विक्रिया झाल्याने होते. या रंजकद्रव्याची किंमत फार असल्याने ती फार मोठ्या प्रमाणावर आता तयार करीत नाहीत तथापि त्यांच्या विविध रंगछटा व उत्तम पक्केपणा हे गुणधर्म रंजकद्रव्य या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. डाय व ट्राय-हायड्रॉक्सिअँथ्रॅक्किनोने ही जुन्या प्रकारची रंगबंधक रंजकद्रव्ये आहेत. ही पूर्वी मंजिष्ठ, मोरिंडा यांसारख्या वनस्पतीपासून मिळविली जात परंतु नंतर डांबरापासून संश्लेषित करण्यात आली. ही रंजकद्रव्ये  ॲझो  व अँथ्रॅक्किनोन या गटात अंतर्भूत होतात. ही लोकर, चामडे व ॲनोडाइइड ( ॲल्युमिनियम  ऑक्साइडाचा लेप दिलेले)  ॲल्युमिनियम  यांकरिता वापरतात. ही रंजकद्रव्ये कापड छपाईसाठीही मोठ्या प्रमाणात वापरीत असत. प्रकाशाच्या बाबतीतील त्यांचा पक्केपणा चांगला असला, तरी धुलाई, आर्द्र-संस्करण व घाम यांच्या बाबतींतील त्यांचा पक्केपणा कमी दर्जाचा असतो. या रंजकद्रव्याची निरनिराळ्या धातूंबरोबर जटिले तयार होतात. रंगबंधनासाठी लोह, तांबे,  ॲल्युमिनियम  व कोबाल्ट या धातू वापरण्यात आलेल्या असल्या तरी क्रोमियम ही धातू अधिक पसंत केली जाते. तयार होणाऱ्या रंजकद्रव्याचा रंग पिवळा ,  लाल ,  नारिंगी ,  तपकिरी ,  हिरवा ,  निळा ,  जांभळा व काळा असे विविध असून वापरलेली धातू व अँथ्रॅक्विनोन संयुगाची संरचना यांवर रंग अवलंबून असतो.

    रंगद्रव्ये : कित्येक विद्राव्य रंजकद्रव्यांचे अविद्राव्य लवण बनवून  ( म्हणजे रंजकद्रव्य लवणातील सोडियमाच्या जागी कॅल्शियम आणून) त्यांचे रंगद्रव्यांत रूपांतर करतात. त्यांचा उपयोग लॅकर ,  रंगलेप ,  छपाईची शाई ,  प्लॅस्टिके व कापड यांकरिता करतात. या अविद्राव्य लवणाला टोनर म्हणतात व ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइडासारख्या अकार्बनी भरणद्रव्यावर ‘लेक’ तयार करण्यासाठी त्याचे निक्षेपण करतात. ही रंगद्रव्ये ॲझो ,  क्षारक ,  थॅलोसायनीन ,  क्विनॲक्रिडोन ,  ऑक्सॅझीन ,  अँथ्रॅक्विनोन व इंडिगॉइड या रासायनिक गटांतील आहेत. [ ⟶ रंगद्रव्ये] 

    विद्रावक रंजकद्रव्ये : ही रंजकद्रव्ये बेंझीन ,  पेट्रोल ,  अल्कोहोल ,  ॲसिटोन ,  तेले ,  वसा ,  मेण यांसारख्या कार्बनी विद्रावकांत विरघळतात. विद्रावक रंजकद्रव्य रंगवावयाच्या पदार्थात केवळ विरघळवून रंगविण्याचे कार्य करतात. ही रंजकद्रव्ये ॲझो ,  ट्रॉयफिनिलमिथेन ,  अँथ्रॅक्विनोन व थॅलोसायनीन या रासायनिक गटांत अंतर्भूत होतात. यांचा उपयोग पेट्रोल ,  व्हार्निश ,  लॅकर ,  लोणी ,  मार्गारीन ,  वसा ,  तेले ,  मेणे ,  छपाईची व लिहिण्याची शाई ,  प्लॅस्टिके आणि रेझिने यांना रंग देण्यासाठी करतात.

    गंधकयुक्त रंजकद्रव्ये : ही रंजकद्रव्ये विविध प्रकारच्या कार्बनी संयुगांवर गंधक व सोडियम सल्फाइड यांच्या संस्करणाने तयार करतात. काही अपवाद वगळता विक्रियेत तयार होणाऱ्या अंतिम द्रव्यांची संरचना ज्ञात संरचनेच्या रासायनिक संयुगाशी जुळणारी आढळत नाही. पाण्यात अविद्राव्य असणारी ही रंजकद्रव्ये क्षारीय  ( अल्कलाइन) सोडियम सल्फाइड विद्रावात विरघळवितात. क्षपण झाल्यावर रंजकद्रव्याला सेल्युलोज तंतूंसंबंधी अधिक आसक्ती असते. हा विद्राव क्षपणकारक [ ⟶ क्षपण] व क्षार म्हणून उपयोगी पडतो. रंजकद्रव्य पांढऱ्या  ( ल्यूको) विद्राव्य रूपात लावल्यानंतर ऑक्सिडीकरणाने तंतूवर अविद्राव्य रंजकद्रव्य तयार होते.

   महत्त्वाच्या दृष्टीने ही रंजकद्रव्ये व्हॅट ,  सरळ व तंतु-विक्रियाशील रंजकद्रव्यांच्या दरम्यान येतात. कमी खर्चात व जलद प्रक्रिया होऊन ही देता येत असली ,  तरी त्यांचा प्रकाशाच्या व आर्द्रतेच्या बाबतीतील पक्केपणा चांगला असतो. ही रंजकद्रव्ये मुख्यत्वे सेल्युलोजयुक्त तंतूंकरिता किंवा त्यांच्या पॉलिऍक्रिलेट ,  पॉलिअमाइड ,  पॉलिएस्टर यांसारख्या संश्लिष्ट तंतूंबरोबरील मिश्रणांकरिता वापरण्यात येतात. रेशीम व कागद यांकरिता विशिष्ट परिस्थितींत थोड्या प्रमाणात वापरतात.

    व्हॅट रंजकद्रव्ये : ही रंजकद्रव्ये लावण्याकरिता विशिष्ट प्रक्रिया उपयोगात आणावी लागते व तिला व्हॅटिंग प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेत पाण्यात अविद्राव्य असलेले रंजकद्रव्य क्रोमोफोरच्या  ( =  C  = O  कीटोन गट) क्षपणाने पांढऱ्या संयुगात  ( ≡  C − OH  गट) रूपांतरित होते. या संयुगापासून क्षाराच्या उपस्थितीत पाण्यात विद्राव्य असलेले पांढरे लवण  ( ≡  C  −  O − क्षार) तयार होते. या व्हॅट विद्रावाचा रंग बहुधा मूळ अविद्राव्य रंजकद्रव्यापेक्षा निराळा असतो व त्याला सेल्युलोजयुक्त तंतूंकरिता आसक्ती असते. यामुळे त्या तंतूंना व्हॅट विद्रावाची रंगछटा येते. हवेने अथवा ऑक्सिडीकारक पदार्थाने ऑक्सिडीकरण होऊन उलट विक्रिया होते व मूळ पाण्यात अविद्राव्य असलेले रंजकद्रव्य तयार होऊन तंतूमध्ये रंगद्रव्य म्हणून साचते.  

   व्हॅट रंजकद्रव्यांच्या एका गटात स्थिरीकृत पांढरी लवणे अंतर्भूत असतात. ही लवणे ल्यूको-एस्टरांपासून बनलेली असतात आणि ही एस्टरे पांढऱ्या संयुगांची सल्फ्यूरिक अम्लाबरोबर विक्रिया होऊन बनतात. वरील पांढऱ्या लवणांचे हवेत ऑक्सिडीकरण होत नाही. यामुळे व्हॅटिंग प्रक्रिया करावी लागत नाही आणि रंगाऱ्याला फक्त रंजकद्रव्य कापडाला लावावे लागते व नंतर अम्लीकरण व ऑक्सिडीकरण करावे लागते.  

ही रंजकद्रव्ये इंडिगॉइडे व अँथ्रॅक्विनोन या गटांत प्रामुख्याने समाविष्ट असतात. अँथ्रॅक्विनोन व्हॅट रंजकद्रव्यांचा पाणी ,  प्रकाश व रसायने यांच्या बाबतींतील पक्केपणा अतिशय चांगला असून १९०१ मध्ये पहिल्या अँथ्रॅक्विनोनाचा शोध लागल्यापासून रंजकद्रव्यांचा हा गट सर्वांत महत्त्वाचा बनला आहे. तथापि या रंजकद्रव्यांची किंमत जास्त असून ती लावण्याच्या पद्धती अवघड आहेत. या रंजकद्रव्यांचा मुख्यत्वे कापूस ,  रेयॉन व लोकर यांच्याकरिता उपयोग करण्यात येतो. कापडाची रंजनक्रिया व छपाई यांसाठी तयार केलेली ,  तसेच रंगद्रव्य म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली व्हॅट रंजकद्रव्ये रंगलेप ,  व्हार्निशे ,  एनॅमल व तत्सम द्रव्यांकरिताही वापरण्यात येतात.  

    विक्रियाशील रंजकद्रव्ये : रंजनक्रियेमध्ये रंगविण्याच्या पदार्थाबरोबर सहसंयुजी बंध तयार करणाऱ्या रंजकद्रव्यांना विक्रियाशील रंजकद्रव्ये म्हणतात. ही रंजकद्रव्ये सर्वांत नवीन असून त्यांचा विकास १९५५ सालानंतर झालेला आहे. ही व्हॅट ,  सरळ व नॅप्थॉल रंजकद्रव्यांना पूरक असून ती सर्व रंगछटांत उपलब्ध आहेत आणि त्यांच्या रंगांचा चमकदारपणा असामान्य असतो. त्यांचा पक्केपणाही उत्कृष्ट असतो. ही रंजकद्रव्ये ॲझो ,  अँथ्रॅक्विनोन व थलोसायनीन या गटांत मोडतात. मुख्यत्वे त्यांचा उपयोग सेल्युलोजयुक्त तंतूंसाठी करण्यात येतो  परंतु ती लोकर ,  रेशीम ,  पॉलिअमाइड ,  नायलॉन यांच्यासाठीही वापरता येतात.  


    अनुस्फुरक चकाकीदायी रंजकद्रव्ये : काही कार्बनी संयुगे  ( प्रामुख्याने स्टिल्बिनापासून तयार केलेली संयुगे) तंतूंवर अधिशोषित होतात  परंतु दृश्य वर्णपटातील प्रकाशाचे शोषण करीत नाहीत व त्यामुळे ती दिसत नाहीत. काही जंबुपार  ( दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांचे परिवर्तन करून दृश्य प्रकाशाच्या रूपात शोषण करतात. यामुळे त्यांपासून परावर्तित झालेल्या पांढऱ्या प्रकाशात भर पडते आणि पिवळट पडलेल्या पदार्थाला निळसरपणा येऊन ते अधिक पांढरेशुभ्र दिसते. अशा संयुगांना अनुस्फुरक चकाकीदायी रंजकद्रव्ये किंवा प्रकाशीय चकाकीदायक म्हणतात. ही रंजकद्रव्ये स्टिल्बिन ,  ॲझो ले ,  क्युमारीन ,  पायराझाइन व नॅप्थॅलिमाइडे या गटांत अंतर्भूत होतात. त्यांचा उपयोग सर्व प्रकारच्या तंतूंसाठी ,  तसेच साबण व प्रक्षालके ,  तेले ,  रंगलेप व प्लॅस्टिके यांच्यासाठी करण्यात येतो.  

    अन्न ,  औषधे व सौंदर्यप्रसाधने : अनेक खाद्यपदार्थांचे बाह्य स्वरूप कृत्रिम रंगांनी आकर्षक करता येते. लोणी व मार्गारीन यांना पिवळा रंग देण्यात येतो. परिरक्षण प्रक्रियेमध्ये फळे व सॉस यांचा निस्तेज झालेला रंग त्यांत रंजकद्रव्य घातल्याने तजेलदार होतो. अल्कोहोलविरहित वातयुक्त पेये आणि विविध प्रकारच्या गोळ्या यांत मोठ्या प्रमाणात रंजकद्रव्ये वापरतात. औषधे व सौंदर्यप्रसाधने यांतही रंजकद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. काही विशिष्ट रंजकद्रव्ये वरील उपयोगांकरिता वापरण्याची बहुतेक देशांत परवानगी आहे. ही रंजकद्रव्ये ॲझो ल ,  अँथ्रॅक्विनोन ,  कॅरोटिनॉइडे व ट्रायअरिलमिथेन या गटांतील असतात. [ ⟶ खाद्यपदार्थ उद्योग  औषधनिर्मिती  सौंदर्यप्रसाधने] .

    नैसर्गिक रंजकद्रव्ये : तंतू व कापड यांकरिता नैसर्गिक रंजकद्रव्यांचा उपयोग करणे कमी झाले असले ,  तरी खाद्यपदार्थांसाठी त्यांचा वापर अलीकडे वाढू लागला आहे. संश्लेषित पदार्थांचे कर्करोगजनक व उत्परिवर्तनशीलता  ( आनुवंशिक लक्षणांत आकस्मिक बदल घडवून आणण्याची क्षमता) या दृष्टींनी मोठ्या प्रमाणावर परीक्षण करण्यात आल्याने खाद्यपदार्थ उद्योगांतील रंजकद्रव्यांसाठी  ( विशेषतः तांबड्या) नैसर्गिक पदार्थ पुन्हा वापरण्यात येऊ लागले आहेत. नैसर्गिक रंजकद्रव्ये प्राणिजन्य वा वनस्पतिजन्य पदार्थांपासून रासायनिक प्रक्रिया न करता मिळविली जातात. ही रंजकद्रव्ये प्रामुख्याने रंगबंधक प्रकारची असून काही व्हॅट ,  विद्रावक ,  रंगद्रव्य ,  सरळ व अम्ल या प्रकारची रंजकद्रव्येही माहीत आहेत.

   वनस्पतिजन्य रंजकद्रव्ये : मंजिष्ठ या वनस्पतीच्या मुळांपासून ॲलिझरीन हे प्राचीन काळापासून वापरण्यात येणारे रंजकद्रव्य मिळते. या रंजकद्रव्याचा उपयोग प्रामुख्याने कापसाला शेंदरी  ( टर्की रेड) रंग देण्यासाठी करतात. मेंदीपासून मिळणाऱ्या रंजकद्रव्याचा उपयोग लोकर व रेशीम यांना नारिंगी छटा देण्यासाठी करतात. प्रिमरोझ या वनस्पतीपासून फ्लॅव्होन हे पिवळे रंजकद्रव्य मिळते. [ ⟶ फ्लॅव्होने] .  लॉगवुड या वनस्पतीपासून हीमॅटिन व त्याचे पांढरे रूप हीमॅटोक्सिलीन ही ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची रंजकद्रव्ये मिळतात. रेशीम ,  लोकर ,  कापूस ,  चामडे ,  लाकूड तसेच प्राण्यांचे केस व फर रंगविण्यासाठी ही वापरली जातात. बिटाच्या मुळापासून मिळणारी तांबडी व पिवळी रंजकद्रव्ये खाद्यपदार्थांसाठी वापरतात. नैसर्गिक नीळ ही त्याच नावाच्या वनस्पतीच्या पानांपासून मिळते आणि ती भारतात फार पूर्वीपासून कापड रंगविण्यासाठी वापरात होती. हल्ली तिचा उपयोग कापड रंगविण्याखेरीज छपाईची शाई ,  रंगलेप इत्यादींमध्ये तसेच इंडिगोटीन ,  इंडिरुबीन ,  इंडिगो यलो इ. रंजकद्रव्ये मिळविण्यासाठी करण्यात येतो. ⇨कॅरोटिनॉइडे ही रंजकद्रव्ये अनेक वनस्पतींत आढळतात आणि त्यांचा उपयोग खाद्यपदार्थांत व औषधांत वनस्पती येतो. केशराचा उपयोग खाद्यपदार्थांत ,  तसेच सोनेरी शाईमध्ये करतात. ⇨हरितद्रव्य ( क्लोरोफिल) हे रंजकद्रव्य बहुतेक सर्व वनस्पतींच्या पानांत आढळते. त्याचा उपयोग साबण ,  रेझिने ,  शाई ,  मेणे ,  ही रंगविण्यासाठी करतात. शारीरीक दृष्ट्या अपायकारक नसल्याने ते खाद्य वसा व तेले  ( उदा. ,  च्यूईंग गम ,  मेवामिठाई इ.) आणि सौंदर्यप्रसाधने ,  औषधे इत्यादींमध्ये वापरतात.

   प्राणिजन्य रंजकद्रव्ये : कीटकांनी तयार केलेल्या लाखेपासून मिळणारी रंजकद्रव्ये शेंदरी व किरमिजी रंगांची असतात. त्यांचा प्रकाश व पाणी यांच्या बाबतींतील पक्केपणा चांगला असतो. ही रंजकद्रव्ये भारतात फार पूर्वीपासून वापरात असून ती सर्वांत जुनी कीटकजन्य रंजकद्रव्ये आहेत. भूमध्यसागरी प्रदेशातील विशिष्ट ओक झुडपांवर रहाणाऱ्या खवले कीटकांपासून मिळणारा कर्मीस अथवा कर्मिसिक अम्ल हे रंजकद्रव्यही प्राचीन आहे. हे रंजकद्रव्य गरम पाण्यात विरघळते व पिवळसर लाल विद्राव तयार होतो. संहत  ( विद्रावातील प्रमाण जास्त असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लात हे विरघळविले ,  तर जांभळट तांबडा रंग मिळतो. तुरटी रंगबंधकावर यांची रंजनक्रिया केली असता मिळणारा तेजस्वी शेंदरी रंग सुपरिचित आहे. कोचिनियल कीटकांपासून मिळणारे रंजकद्रव्य रासायनिक दृष्ट्या कर्मिसासारखेच आहे. या रंजकद्रव्यापासून तयार केलेले ॲल्युमिना लेक  ( याला कारमाइन म्हणतात) खाद्यपदार्थ रंगविण्यासाठी वापरतात. अलीकडे त्याचा उपयोग टूथपेस्ट ,  बेकरी पदार्थ ,  सफरचंदाचे सॉस व औषधी गोळ्या यांत करण्यात येतो. दूध ,  अंडी ,  यीस्ट ,  यकृत ,  मूत्रपिंड ,  हृदय इत्यादींत रिबोफ्लाविनाचे फॉस्फेट लवण आढळते. हे पिवळे रंजकद्रव्य असून खाद्यपदार्थ रंगविण्यासाठी वापरतात. वनस्पतींतील व प्राण्यांतील रंजकद्रव्यांविषयीची काही माहिती ‘रंजन ,  जैव ’ या नोंदीत दिलेली आहे.

    भारतीय उद्योग : निळीसारखी नैसर्गिक रंजकद्रव्ये एकेकाळी भारतातून निर्यात होत होती  परंतु संश्लेषित रंजकद्रव्ये प्रचारात आल्यापासून भारताची निर्यात बंद होऊन मोठ्या प्रमाणावर रंजकद्रव्ये आयात करण्यात येऊ लागली. दरम्यान भारतात कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढला व तंत्रज्ञही निर्माण झाले  परंतु रंजकद्रव्य-उत्पादनास त्या काळच्या ब्रिटिश सरकारकडून आवश्यक असे उत्तेजन व संरक्षण मिळाले नाही. १९४० मध्ये ॲसोसिएटेड रिसर्च लॅबोरेटरी या मुंबई इलाख्यातील कंपनीने रंजकद्रव्यांच्या उत्पादनास सुरुवात केली. नंतर इतर कंपन्याही स्थापन झाल्या.  


   दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीतील रंजकद्रव्य उद्योगाविषयी प्रसिद्ध झालेल्या माहितीचा भारताला बराच उपयोग झाला. विशेषतः लघू  उद्योगांनी या माहितीचा चांगला उपयोग करून सरळ अम्ल ,  रॅपिड फास्ट ,  रॅपिडोजेन ,  इंडिगोसॉल या   रंजकद्रव्यांच्या उत्पादनात बरीच मोठी प्रगती केली. विशेषतः उत्पादनाला अवघड असलेल्या व्हॅट   रंजकद्रव्यांचे इंडियन डायस्टफ इंडस्ट्रीज या कंपनीने १९५४ पासून यशस्वी उत्पादन केले. १९५१ पर्यंत ६   कंपन्या रंजकद्रव्यांचे उत्पादन करीत होत्या. त्यांचे वार्षिक उत्पादन १ , ३६३ टन होते व त्यात मुख्यतः ॲझो इक   रंजकद्रव्ये होती. त्यानंतर अतुल प्रॉडक्ट्स ,  हिक्‌सन अँड पटेल इ. कंपन्यांनी परदेशी कंपन्यांशी सहकार्य   करून ॲझो ,  सल्फर ब्लॅक इ. रंजकद्रव्यांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. इंडियन डायस्टफ इंडस्ट्रीज व   अमर डायकेम या दोन मोठ्या कंपन्यांनी पूर्णपणे भारतीय तंत्राचा वापर करून उत्पादन करण्यास प्रारंभ केला.   तथापि ,  पहिल्या पंचवार्षिक योजनेअखेरीस रंजकद्रव्यांची आयात मोठ्या प्रमाणावर करावी लागत होती. यामुळे   १९५५ मध्ये रंजकद्रव्ये आणि मध्यस्थ रसायने यांच्या आयातीवर जकात बसविण्यात आली. यामुळे ,  १९५५-५६   मध्ये ५ , ९०७ टन इतकी होणारी आयात १९६५-६६ मध्ये १ , ५५० टनांपर्यंत खाली आली. दुसऱ्या पंचवार्षिक   योजनेच्या काळात पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये रंजकद्रव्ये व मध्यस्थ रसायने यांच्यासंबंधीच्या   संशोधनाकरिता वेगळा विभाग सुरू करण्यात आला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात नॅशनल इंडस्ट्रियल   डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या सरकारी संस्थेने हिंदुस्थान ऑर्‌गॅनिक केमिकल्स ही कंपनी मध्यस्थ रसायने तयार   करण्यासाठी पनवेलजवळ रासायनी येथे स्थापन केली. १९६४ मध्ये भारतात रंजकद्रव्ये उत्पादन करणाऱ्या २१   मोठ्या व १२० लहान कंपन्या होत्या. मध्यस्थ रसायनांचे उत्पादन १९६५ मध्ये सुरू झाले. मुख्यतः ॲनिलाइडे , एच-अम्ल ,  जे-अम्ल ,  पायरोझोलॉने ,  बीटा नॅप्थॉल ,  अँथ्रॅक्विनोने या ,  तसेच क्रोम व इंडिगोसॉल या   रंजकद्रव्यांच्या मध्यस्थ रसायनांचे उत्पादन करण्यात येऊ लागले. मध्यस्थ रसायनांच्या उत्पादनास भांडवली   खर्च जास्त लागत असल्याने संघटित क्षेत्रात त्यांचे उत्पादन केले जाते.

 कोष्टक क्र. २. भारतातील संघटित क्षेत्रातील रंजकद्रव्यांचे गटवार उत्पादन ( टनांत)  

 रंजकद्रव्य गट   

 उत्पादन क्षमता   (१९७५)

   

 प्रत्यक्ष उत्पादन   (१९७५)

 उत्पादन

 क्षमता   (१९८२)

   

 प्रत्यक्ष उत्पादन    (१९८२) 

 ॲझो   

 ३ ,४३१   

 १ ,९०३   

 ३ ,५४५   

 २ ,८१२   

 अम्ल व सरळ   

 ६२९   

 १६३   

 ६३९   

 २५४   

 क्षारक   

 १ ,०३७   

 ५२८   

 १ ,१३७   

 ४३५   

 अपस्करण   

 ६५५   

 २६८   

 १ ,९४७   

 १ ,१९२   

 पक्का रंग क्षारक   

 १ ,४०९   

 १ ,०५८   

 १ ,४०९   

 ६४७   

 खाद्य पदार्थ   

 १०८   

 ३६   

 ५२९   

 २९९   

 अंतर्विष्ट   

 ३१५   

 १३३   

 ३१५   

 १८७   

 नॅप्थॉल   

 १ ,२८५   

 १ ,३६९   

 १ ,८६५   

 ९०९   

 तेल व अल्कोहॉल विद्राव्य   

 १७६   

 ४३   

 १७६   

 ३१   

 अनुस्फुरक चकाकीदायी   

 १ ,२३०   

 ५६९   

 १ ,३०४   

 ८८९   

 कार्बनी रंगद्रव्ये   

 २ ,५६७   

 १ ,५७८   

 ३ ,९७४   

 २ ,१५३   

 रंगद्रव्य पायस   

 २ ,३००   

 २ ,३६२   

 ३ ,४३०   

 २ ,८५२   

 विक्रियाशील   

 १ ,२५०   

 १ ,३६५   

 ४ ,७३०   

 १ ,९०४   

 स्थिरिकृत ॲझोइक   

 ६८५   

 १५४   

 ६८५   

 १४८   

 गंधक ब्लॅक   

 २ ,५०२   

 ९६८   

 २ ,५०२   

 १ ,१५८  

 इतर गंधकयुक्त  

 १०८  

 १७  

 −  

 −  

 व्हॅट  

 १ ,५०९  

 १ ,०८४  

 १ ,६११  

 १ ,६२५  

 विद्राव्य व्हॅट  

 ३७०  

 १४७  

 ३७०  

 ११५  

 ॲ क्रिलिक तंतू  

 −  

 −  

 ४७५  

 ३७  

 एकूण  

 २१ ,५६६  

 १३ ,७४५  

 ३० ,६३३  

 १७ ,५८७  

    रंजकद्रव्यांचे उत्पादन संघटित मोठ्या कारखान्यांत ,  तसेच असंघटित लहान लहान उद्योगसमूहांत केले जाते. १९७५ मध्ये एकूण उत्पादकांची संख्या १५० होती ,  ती १९८४ मध्ये ९३७ इतकी वाढली. संघटित उत्पादकांची संख्या १९७५ मध्ये केवळ २२ होती ,  ती १९८४ मध्ये ३७ पर्यंत वाढली. १९७५ मध्ये उत्पादन १८ , ५०० टन ,  तर १९८४ मध्ये ते २८ , ००० टन झाले. या काळात हिंदु स्थान ऑर्‌गॅनिक केमिकल्सखेरीज बाकी सर्व उत्पादन खाजगी क्षेत्रात होत होते.  

   भारतातील काही प्रमुख रंजकद्रव्य उत्पादक पुढीलप्रमाणे आहेत  :  अमर डाय-केम ही कंपनी मुंबई येथे १९५४ मध्ये स्थापन झाली. ही नॅप्थॉल गटातील रंजकद्रव्ये ,  स्थिरीकृत ॲझो रंजकद्रव्ये ,  ट्रायफिनिलमिथेन गटातील रंजकद्रव्ये ,  विक्रियाशील रंजकद्रव्ये ,  रंगद्रव्ये ,  अनुस्फुरक चकाकीदायी रंजकद्रव्ये इत्यादींचे उत्पादन करते. अतुल प्रॉडक्ट्स ही कंपनी अतुल  ( गुजरात) येथे १९४७ मध्ये स्थापन झाली. ही विविध रंजकद्रव्ये व मध्यस्थ रसायने यांचे उत्पादन करते. कलर-केम ही कंपनी १९५६ साली मुंबई येथे स्थापन झाली. ही कंपनी विविध प्रकारची रंजकद्रव्ये ,  रंगबंधक व इतर संबंधित पदार्थांचे उत्पादन करते. इंडियन डायस्टफ इंडस्ट्रीज ही कंपनी मुंबई येथे १९५४ मध्ये स्थापन झाली. ही कंपनी व्हॅट रंजकद्रव्ये ,  रंगद्रव्ये ,  अनुस्फुरक चकाकीदायी रंजकद्रव्ये ,  मध्यस्थ रसायने इत्यादींचे उत्पादन करते.

   भारतातील संश्लिष्ट रंजकद्रव्यांचे उत्पादन ,  आयात व निर्यात यांसंबंधीची आकडेवारी कोष्टक क्र. २ ते ५ मध्ये दिलेली आहे.

  

                  कोष्टक क्र.३. रंजकद्रव्यांची गटवार आयात (टनांत)

 रंजकद्रव्य गट  

 १९७०-७१  

 १९८१-८२  

 अम्ल  

 १२४  

 १५०  

 क्षारक  

 ३७  

 १८२  

 सरळ  

 १०६  

 १५९  

 अपस्करण  

 १८१  

 १२९  

 लेक विद्रावक  

 २४  

 ३९  

 रंगबंधक  

 १०  

 २६  

 विक्रियाशील  

 २३७  

 ३४  

 व्हॅट  

 १८७  

 ५९  

 इतर  

 ५०  

 १२७  

 एकूण  

 १५६  

 ९०५  


                कोष्टक क्र. ४.  रंजकद्रव्यांची गटवार निर्यात (टनांत)

 रंजकद्रव्य गट  

 १९७९-८०  

 १९८१-८२  

 अम्ल  

 ४७८ ·२  

 ६३८ ·०  

 क्षारक  

 ६७२ ·६  

 ८४७ ·९  

 सरळ  

 १ ,११७ ·८  

 १ ,११२ ·८  

 अपस्करण  

 ४८ ·८  

 ३४ ·७  

 लेक विद्रावक  

 ६२७ ·६  

 ६७३ ·४  

 रंगबंधक  

 १३९ ·६  

 १३६ ·५  

 विक्रियाशील  

 ९८१ ·६  

 ५१९ ·०  

 व्हॅट  

 ७०६ ·९  

 ६५३ ·५  

 इतर  

 (नैसर्गिक नीळ व अनुस्फुरक चकाचकीदायी यांसह)  

 २३० ·२  

 २२९ ·८  

 एकूण  

 ५ ,००३ ·३  

 ४ ,८४५ ·६  

                                कोष्टक क्र.५.   रंजकद्रव्यांची देशवार निर्यात (टनांत)

 देश  

 १९७०-७१  

 १९८१-८२  

 अफगाणिस्तान  

 ५·४२  

 ३·७०  

 ऑस्ट्रेलिया  

 ९·२१  

 १०७·४०  

 हाँगकाँग  

 १४८ ·०८  

 १५२·००  

 इराण  

 ९९ ·५७  

 २३२·५०  

 नेदरर्ले‍ड्‍‍‍स  

 ४८ ·३६  

 १६५ ·१०  

 सिंगापूर  

 १५ ·२२  

 १०६ ·५०  

 थायलंड  

 ४७ ·२२  

 २०० ·००  

 संयुक्त अरब प्रजासत्ताक  

 ५८१ ·५७  

 ५९ ·००  

 ब्रिटन  

 ६० ·१३  

 २३४ ·१०  

 अमेरिकेची संयुक्त संस्थाने  

 ५१ ·३०  

 ४९१ ·२०  

 रशिया  

 १९४ ·००  

 १ ,०९५ ·१०  

 इतर देश  

 ५२७ ·९२  

 १ ,९९९ ·४०  

 एकूण  

 १ ,७८८ ·००  

 ४ ,८४६ ·००  

 पहा  :  रंगद्रव्ये  रंजनक्रिया  रंजन ,  जैव.

  

 संदर्भ  : 1. Abahart, E. N Dyes and Their Intermediates, New York, 1977.

     2. Beech, W. F. Fibre-Reactive Dyes, London, 1970.

     3. Bogie, M. Textile Dyes, Finishes and Auxiliaries, New York, 1977.

     4. Johnston, R. M. Saltzman, M., Ed., Industrial Colour Technology, 1977.

     5. Lubs, H. A., Ed., The Chemistry of Synthetic Dyes and Pigments, Huntington, 1972.

     6. Siramons, M. Dyes and Dyeing, 1978.

     7. Venkatraman, K., Ed., The Chemistry of Synthetic Dyes, Vols. 1-8, New York, 1952-78.   

  चि पळूणकर ,  मा. त्रिं.