युका : (इं. ॲडम्स नीड्ल, स्पॅनिश-बायोनेट, बिअरग्रास, सोपविड, माउंड लिली कुल-ॲगेव्हेसी). सदाहरित, झुडूपवजा वनस्पतींची एक प्रजाती. तीत सु. ४० जातींचा समावेश असून या वनस्पतीचे मूलस्थान मेक्सिको, वेस्ट इंडिज व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांतील रुक्ष प्रदेश असून त्या अन्यत्र शोभेच्या वनस्पती म्हणून लावलेल्या आढळतात. काही जातींपासून वाख (भरड धागा) मिळू शकतो. भारतात चार जाती आणल्या गेल्या असून युका ग्लोरिओजा या जातीचे काही ठिकाणी देशीयभवन (सभोवतालच्या परिस्थितीशी समरस होणे) झालेले आहे.

 युका ग्लोरिओजा (संपूर्ण वनस्पती) : (१) पानांचा झुपका, (२) फुलोरा, (३) फूल, (४) केसरदले व किंजमंडल, (५) किंजमंडल, (६)किंजपुटाचा आडावा छेद, (७) फळ, (८) फळाचा आडवा छेद, (९) बी.सामान्यतः युकाच्या जाती दोन प्रकारांत विभागतात : बुटक्या व खोड जमिनीवर क्वचित वाढणाऱ्या आणि (२) उंच खोडाच्या आणि वृक्षासारख्या काही जातींची पाने लवचिक असतात, तर इतरांची पाने संगिनीच्या (बायोनेटच्या) आकाराची व कडक असतात.

युकाच्या जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) असून सामान्यतः एकदलिकित वनस्पतींत न आढळणारी द्वितीयक वाढ त्यांत आढळते. त्यांना भुसभुशीत, हलकी व पिकाऊ जमीन लागते. त्यांची लागवड बिया, छाट कलमे व मुनवे लावून करतात परंतु जमिनीखालील खोडाचे ७·५−१० सेंमी. लांबीचे तुकडे १० सेंमी. खोल व ओळीत लावणे ही पद्धत सर्वांत चांगली आहे. हेक्टरी वीस हजार झाडे लावतात. कोळपणी व निंदणी (खुरपणी) करतात. जस्त, बोरॉन, मँगॅनीज यांसारखी लेशमात्रायुक्त वरखते देणे फायद्याचे असते. भारतात युकाच्या लागवडीचे पद्धतशीर प्रयत्न झालेले नाहीत. झाडे तीन वर्षांची झाल्यावर वाखासाठी बाहेरील बळकळ पानांची कापणी करतात. यांत्रिक व रासायनिक पद्धतींनी किंवा पाने कुजवून वाख काढतात. ताज्या पानाच्या वजनाच्या वीस टक्के वाख मिळू शकतो. जातीपरत्वे उत्पन्नात फरक पडतो. हेक्टरी २,६९० किग्रॅ.पर्यंत वाखाचे उत्पन्न येते. जंगली झाडांपासून वाख मिळवितात. तो चिवट, बळकट व तलम असून त्याचे गुणधर्म घायपात, ताग इत्यादींच्या वाखाप्रमाणे असतात. त्याचा उपयोग इतर वाखात मिसळून अगर एकटाच दोर, दोरखंडे इत्यादींसाठी करतात. फुलांच्या कळ्या किंवा नुकतीच उमललेली फुले सॅलडप्रमाणे कच्ची किंवा उकडून खातात. मांसल फळे खाद्य असून ती खातात व त्यांच्यापासून मद्ययुक्त पेय बनवितात. टंचाईच्या काळात पाने जनावरांना खाऊ घालतात. वनस्पतीच्या जमिनीखालील भागात प्रक्षालक गुणधर्म असून त्यांचा उपयोग धुलाईसाठी आणि स्नानाच्या साबणात करतात. उंच खोडे मेढेकोट व घरांच्या भिंतींसाठी व पाने छप्परांसाठी वापरतात. युकाच्या जातींपासून स्टेरॉइडी सॅपोजेनिने मिळविता येतात.

भारतात आणण्यात आलेल्या तीन जाती अशा आहेत : यु. ॲलोइफोलियाचे (इं. स्पॅनिश-बायोनेट वा ॲलोयुका) जमिनीवर खोड असलेले झुडूप ७·५ मी. उंच असते. पाने खंजिरासारखी, फार तीक्ष्ण टोकांची असतात. फुले पांढरी, ६०−९० सेंमी. लांब परिमंजिरीवर येतात. फळे काळी, बैंगणी रंगाची व बदलीसारखी असतात. विविधरंगी पानांचा तिचा व्हेरिएगेटा हा प्रकार शैलोद्यानात लावण्यास योग्य आहे. यु. फिलॅमेंटोजा (इं. बिअरग्रास किंवा ॲडम्स नीड्ल) या जातीचे जमिनीवर खोड नसलेले झुडूप असते. पाने लांबट−भाल्यासारखी व ७५ सेंमी. लांब असतात. फुले पिवळसर पांढरी, १ ते ३·६ मी. उंच परिमंजिरीवर येतात. फळे शुष्क बोडे असून ती खातात. यु. ग्लोरिओजा (इं. माउंड लिली) जातीचे जमिनीवर खोड नसलेले (किंवा आखूड खोड असलेले) शाखायुक्त झुडूप ३·५ मी. असते. त्याचे हिमालयात व तामिळनाडूत देशीयभवन झालेले आहे. पाने ७५ सेंमी. लांब व ५ सेंमी. रुंद असून जमिनीजवळ किंवा खोडाच्या शेंड्याला त्यांचा झुपका येतो. फुले हिरवट पांढरी व तांबूस किंवा बैंगणी रंगाच्या छटेची असतात. फळे शुष्क लोंबती बोंडे असतात. ते शैलोद्यानात लावतात व त्याला पुष्कळ वर्षांनी एकदाच फुले येतात.

पहा : लिलिएसी.

जगताप, अहिल्या पां.