युआन-शृ-खाय्‌ : ( ? १८५९−६ जून १९१६). प्रजासत्ताक चीनचा पहिला अध्यक्ष (१९१२ −१६), मुत्सद्दी व लष्करी नेता. हूनान्‌ प्रांतातील श्यांग छंग्‌ येथे एका जमीनदार कुटुंबात जन्म. विद्यार्थिदशेत त्याचा ओढा अभ्यासापेक्षा इतर अवांतर उलाढाली करण्याकडे जास्त होता तथापि त्याच्यात धूर्तपणा आणि संघटक वृत्ती होती. परिणामतः जुजबी शिक्षण घेऊनसुद्धा त्याला कोरियाचा गव्हर्नर नेमण्यात आले. त्याने कोरियावरील चीनच्या सार्वभौमत्वाचा हक्क प्रस्थापित केला. लष्करी व आर्थिक बाबतीत त्याने योग्य ती पावले उचलली. त्याला सेऊल येथे आयुक्त नेमण्यात आले (१८८५). पुढे चिनी-जपानी युद्धाला उपयुक्त असे वातावरण त्याने निर्माण केले (१८९४−९५). चीनचा सर्व बाजूंनी या युद्धात पराभव होत असताना त्याने अद्यावत असे स्वतंत्र सैन्य आपल्या नेतृत्वाखाली तयार करून बॉक्सर बंडात चीनची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न केला (१९००). यामुळे त्सस्यी (कार. १८६१−१९०८) महाराणीचा त्याच्यावरील विश्वास वाढला. तिने त्यास जृली प्रांताचा गव्हर्नर नेमले. युआन-शृ-खाय्‌ने त्यानंतर आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केली. त्या प्रांतातील शिक्षणसंस्था व उद्योगधंदे वाढविण्याचा यत्न केला. थोड्याच काळात उत्तर चीनचा लष्करी नेता म्हणून तो प्रसिद्धीस आला. त्याने चीनच्या आधुनिकीकरणास प्रारंभ केला आणि सर्व क्षेत्रांत झपाट्याने क्रांती होऊ लागली.

मांचू महाराणी १९०८ मध्ये मृत्यू पावली आणि मांचू गादीच्या कारभाऱ्यांनी त्याला घरी पाठविले. यावेळी शत्रूंनी सर्व बाजूंनी उठाव करून चिनी क्रांतीने उग्र स्वरूप धारण केले. मांचू साम्राज्य धोक्यात आले. अशा वेळी क्रांतिकारक व साम्राज्यवादी या दोघांना देशाच्या एकात्मतेसाठी व शांततेकरिता युआन ही एकच व्यक्ती डोळ्यासमोर होती. त्यांनी प्रजासत्ताक चीनचा अध्यक्ष म्हणून त्याची निवड केली (१९११) आणि डॉ. सन्‌-यत्‌-सेनने आपल्या तात्पुरत्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

अध्यक्ष होताच स्वातंत्र्य, समता वगैरे लोकशाहीवादी संकल्पनांना धुडकावून देऊन त्याने राजेशाहीस पाठिंबा दिला व क्वोमिनतांग (ग्वोवमिन्‌दांग्‌) पक्षावर बंदी घालून त्या पक्षातील नेत्यांना शिक्षा ठोठावल्या व काहींना कैदेत ठेवले. युआन-शृ-खाय्‌च्या या धोरणास शह देण्यासाठी सन-यत्‌-सेन्‌ने प्रयत्न करण्यास सुरुवात केली पण नानकिंगच्या लढाईत त्याचा पराभव होऊन सन-येत्‌-सेन्‌ला चीन सोडून जपानला पळ काढावा लागला. यामुळे क्रांतिकारकांच्या आशा काही काळ दुरावल्या.

युआन-शृ-खायने पार्लमेंट रद्द करून हाताखालील अधिकाऱ्यांची गव्हर्नर म्हणून नेमणूक केली व एक शासकीय मंडळ स्थापन केले. थोड्याच दिवसांत त्याला बादशाह होण्याची स्वप्ने दिसू लागली व १९१६ च्या नववर्ष दिनाच्या मुहूर्तावर त्याने चीनचा बादशहा म्हणून स्वतःला घोषित केले. तथापि त्याच्या या प्रयत्नांची सर्वत्र निंदा झाली आणि त्याच्या राजवटीविरुद्ध अनेक प्रांतांत बंडे उद्‌भवली. परदेशी सत्तांनीसुद्धा त्याला दिलेला पाठिंबा काढून घेतला. असा सर्व बाजूंनी पराभव अटळ झाल्यामुळे त्याचा धीर खचला आणि त्याला मृत्यूनी गाठले.

संदर्भ : 1. Chen, Jerome, Yuan Shih-Kai, Stanford, 1972.

2. Young, E. P. Presidency of Yuan shih-Kai, Michigan, 1977.

भिडे, ग. ल.