नाभा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्व पंजाबमधील फूलकियान संस्थानांपैकी एक संस्थान. क्षेत्रफळ २,५०० चौ. किमी. लोकसंख्या सुमारे ३,४०,०४४ (१९४१). वार्षिक उत्पन्न ३६ लाख रुपये. अठराव्या शतकापूर्वीचा नाभा संस्थानाचा इतिहास म्हणजे फूलकियान जमातीचा इतिहास होय. अमलोहाच्या आसपासचा भाग हमीरसिंग याला १७६३मध्ये मिळाला. त्याने नाभा शहराची आणि स्वतंत्र गादीची स्थापना केली. जींदकडून भादसोन, हान्सीच्या मुसलमानांकडून रोरी (१७७६), रणजित सिंगच्या मदतीने कोटबसिया, तलवंडी, जग्रओन, खन्ना (१८०६–०८) हे प्रदेश घेतल्याने संस्थानाचा थोड्याच अवधीत विस्तार झाला. हमीरसिंगानंतर (१७८३) त्याचा धाकटा मुलगा जसवंत सिंग (१७९०–१८४०) गादीवर आला. तो अज्ञान असल्यामुळे विधवा राणी देसूही १७९० पर्यंत राज्यकारभार पाही. जींदकडून राणी देसूने १७९० पर्यंत बराच भाग जिंकून घेतला होता. संस्थानाने १८०१मध्ये शिद्यांची आणि १८०९मध्ये इंग्रजांची मांडलिकी पतकरली. पतियाळा–जींद या इतर फूलकियान संस्थानांशी नेहमी संघर्ष असूनही जसवंतसिंगचे उत्पन्न दीड लाख रु. होते. पहिल्या इंग्रज–शीख युद्धात मदत न केल्याबद्दल इंग्रजांनी त्याचा मुलगा देविंद्रसिंगला पदच्युत करून एक चतुर्थांश संस्थान जप्त केले. १८५७मधील मदतीबद्दल बावल वगैरे एक लाखाचा प्रदेश त्यास परत मिळाला. त्याचा मुलगा भगवान सिंग याच्या मृत्यूनंतर गादीवर आलेला दत्तकपुत्र हीरासिंग (१८७२–१९२२)  इंग्रजनिष्ठ होता. उत्तम शासनाबद्दल त्याचा लौकिक होता. त्याच्या काळात कालवे, सुताच्या व तेलाच्या गिरण्या, रेल्वे, पक्क्या सडका अशा अनेक सुधारणा झाल्या आणि धान्याची निर्यातही वाढली. त्याच्या नंतर गादीवर आलेल्या रिपुदमनसिंगला १९२८ मध्ये इंग्रजांनी गैरकृत्याबद्दल पदच्युत केल्यामुळे संस्थानात बराच असंतोष पसरला होता. त्यानंतर ब्रिटिशांनी प्रतापसिंह बहादूर याला १९२८ मध्ये गादीवर बसण्यास संमती दिली पण तो अज्ञान असल्यामुळे त्याला राज्यकारभाराचे पूर्ण अधिकार १९४१ साली मिळाले. याला पंधरा तोफांच्या सलामीचा मान होता. संस्थानात ४ शहरे आणि ४८८ खेडी असून प्रदेश सलग नव्हता. ब्रिटिश डाकेवरच नाभाचा वेगळा शिक्का असे. संस्थानाची वेगळी नाणी फक्त विशेष प्रसंगी पाडली जात. १९४८मध्ये संस्थान ‘पेप्सू’ संघात विलीन झाले आणि १ नोव्हेंबर १९६६पासून पंजाब राज्यात समाविष्ट झाले. संस्थानचा राजवंश शिखांपैकी जाट जातीचा होता पण ७५ टक्के प्रजा मात्र हिंदू होती.

कुलकर्णी,ना.ह.