यवतमाळ शहर : महाराष्ट्रातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ८९,०७३ (१९८१). याचे मूळ नाव ‘यवत’ किंवा ‘यवते’ असावे आणि त्याला माळ (टेकडी किंवा मैदान) किंवा महाल (परगण्याचे मुख्य नगर) हा प्रत्यय जोडला जाऊन यवतमाळ हे नाव बनले असावे. आईन-इ-अकबरी मध्ये याचा ‘योत-लोहार’ असा उल्लेख आहे. लोहार हे यवतमाळच्या पश्चिमेस ५ किमी.वरील खेडेगाव असून ‘याते’ हा मूळ यवताचा उर्दू अपभ्रंश असावा. यवतमाळ या गावाला पूर्वी कोणतेच महत्त्व नव्हते. परंतु तत्कालीन ऊन जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून यवतमाळची निवड झाल्यानंतर त्याचे महत्त्व वाढले. १९०५ मध्ये ऊन (वणी) जिल्ह्याचे यवतमाळ जिल्हा असे नामकरण करण्यात आले. सभोवतालच्या प्रदेशापेक्षा हे काहीशा उंचीच्या भागावर वसले असल्याने तेथील हवामान साधारण थंड आहे. शहरात १८९४ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
शहरात कापूस वटण व दाबणी गिरण्या, लाकूड कटाई, तेलगिरण्या, विड्या वळणे, तढव व घोंगड्या विणणे इ. उद्योगधंदे चालतात. जवळच एक औद्योगिक वसाहत निर्माण झाली आहे. येथे कापसाचा तसेच गुरांचा मोठा व्यापार चालतो. पहाडात वसलेले शहर असल्यामुळे तेथील रस्ते चढ-उताराचे आहेत. येथे कृषी संशोधन व कुक्कुटपैदास केंद्र आहे. भुसावळ-नागपूर या रुंदमापी लोहमार्गावरील मुर्तिजापूर (अकोला जिल्हा) प्रस्थानकाहून यवतमाळपर्यंत एक अरुंदमापी लोहमार्ग फाटा आलेला आहे. शहरात १० महाविद्यालये, १४ माध्यमिक व ३४ प्राथमिक शाळा आहेत. येथील जिल्हा रुग्णालयात कुष्ठरोग, क्षयरोग चिकित्सालय, प्रसूतिगृह, स्त्रीरोग चिकित्सालय इ. विभागांच्या सोयी आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील केदारेश्वराचे मंदिर प्रेक्षणीय आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम (स्था. १९३२) ही संस्था येथे असून तीत ताम्रपट व शिलालेख, प्राचीन नाणी व इतर पुरातत्त्वविषयक बाबींचा संग्रह केला आहे. या संस्थेकडून दुर्मिळ मौल्यवान हस्तलिखितांचा शोध घेऊन ती प्रकाशित केली जातात.
चौधरी, वसंत.