ब्राझील : दक्षिण अमेरिकेतील क्षेत्रफळ व लोकसंख्या यांनुसार सर्वांत मोठे प्रजासत्ताक संघराज्य. येथील ब्राझील वुड या वृक्षांमुळे पोर्तुगीजांनी देशाला ‘ब्राझील’ हे नाव दिले. या देशाने दक्षिण अमेरिकेचा जवळजवळ अर्धा भाग व्यापला असून आकाराच्या दृष्टीने याचा रशिया, कॅनडा, चीन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ५ १६’ उ. ते ३३ ४५’ द. व ३४ ४५’ प. ते ७४ ३’ पश्चिम यांदरम्यान असून पूर्व पश्चिम कमाल लांबी ४,३२८ किमी. व उत्तर दक्षिण रुंदी ४,३१९ किमी. आहे. क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी. लोकसंख्या ११,९०,९८,९९२ (१९८०). ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनामा, गुयाना, व्हेनेझुएला वायव्येस कोलंबिया पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया नैर्ऋत्येस पॅराग्वाय, अर्जेंटिना व दक्षिणेस यूरग्वाय हे देश येतात. म्हणजेच चिली व एक्वादोर वगळता द. अमेरिकेतील सर्व देशांच्या सीमा ब्राझीलच्या सीमेला येऊन भिडलेल्या आहेत. देशाच्या आग्नेय, पूर्व व ईशान्य सीमा (सु. ७,८८६ किमी.) अटलांटिक महासागराने व्यापलेल्या असून द. अमेरिकेच्या एकूण किनारपट्टीच्या १/४ किनारपट्टी एकट्या ब्राझीलला लाभली आहे. फेरनँदू दी नुरोन्या आणि रोकस या बेटांसह ईशान्य किनाऱ्यालगतच्या २४० किमी. पर्यंतच्या सागरप्रदेशातील अनेक लहान बेटांचा समावेश ब्राझीलमध्ये होतो. ब्राझील्या (लोकसंख्या ४,११,३०५ १९८०) ही ब्राझीलची राजाधानी आहे.

भूवर्णन: ब्राझीलचा बराच मोठा भाग डोंगराळ, उंचवट्याचा पठारी असून येथे मैदानी प्रदेश फारच कमी आहेत. सर्वांत मोठा मैदानी प्रदेश ॲमेझॉन खोऱ्याच्या वरच्या भागात येतो. किनाऱ्यावर कोठेही विस्तृत मैदाने नाहीत. मुख्य पर्वतरांगा, उत्तरेस व्हेनेझुएला व गुयाना देशांच्या सीमेलगत व पूर्वेस, विशेषतः आग्नेय किनाऱ्याला, लागून आहेत.

भूपृष्ठरचनेच्या दृष्टीने ब्राझीलचे पुढील विभाग केले जातात (१) ॲमेझॉन खोरे, (२) गियाना उच्चभूमी, (३) ब्राझीलियन उच्चभूमी, (४) अटलांटिक किनाऱ्यालगतचा प्रदेश (यात ईशान्य ब्राझील व पूर्व-आग्नेय किनापट्टीचा समावेश होतो), (५) मध्य व दक्षिण पठारी प्रदेश.

(१) ॲमेझॉन खोरे प्राचीन काळी ॲमेझॉन खोऱ्याच्या जागी अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा सागर भाग होता. या खोऱ्यात सध्या १,००० हून अधिक उपनद्या आहेत. जगातील ही सर्वांत मोठा सखल भाग असून त्याचे क्षेत्रफळ १८,००,००० चौ. किमी. आहे. ॲमेझॉन खोऱ्याचा उतार सामान्यतः पश्चिमेकडून पूर्वेकडे असून त्याने ब्राझीलचा उत्तर व पश्चिम भाग बराच व्यापला आहे. या खोऱ्याचा विस्तार उत्तरेस गियाना उच्चभूमीपासून दक्षिणेस मध्य ब्राझीलच्या तेरा दृश पारेसीस व सेरा दू रोंग्कदॉर या डोंगररांगा व माटू ग्रोसू पठारापर्यंत झालेला आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन खोरे बरेच रुंद (१,२९० किमी.) असून ते पूर्वेकडे अरुंद होत जाते. सँतारेमजवळ गुयाना व ब्राझीलियन उच्चभूमी जवळजवळ आली असून तेथे या खोऱ्यांची रुंदी बरीच कमी (सु. २४० किमी.) झाली आहे. दक्षिणेकडून शींगू ही उपनदी येऊन मिळाल्यावर खोऱ्याची रुंदी पूर्वेकडे वाढत गेलेली आहे. ते खोरे पूर्णतः चिखल, रेती व गाळयुक्त आहे. ॲमेझॉन नदीमुखाजवळ माराझॉ हे ३५,००० चौ किमी. क्षेत्रफळाचे बेट असून ते गोड्या पाण्याने वेढलेले जगातील सर्वांत मोठे बेट (१९८२) आहे.

(२) गियाना उच्चभूमी ॲमेझॉन खोऱ्याच्या उत्तरेकडील डोंगररांगांच्या प्रदेशाचा समावेश हिच्यात होत असून तो ॲमेझॉन खोऱ्याने ब्राझीलियन उच्चभूमीपासून अलग केला आहे. ॲमेझॉन खोऱ्याच्या उत्तरेची गियाना उच्चभूमी व दक्षिणेची ब्राझीलियन उच्चभूमी यांची भूस्तररचना सारखीच असून ती पृथ्वीवरील अतिप्राचीन व अतिशय जटिल भूरचना असून तिला ‘ब्राझीलियन जटिल भूरचना’असे म्हणतात. या जटिल भूस्तररचनेत अग्निजन्य खडक तसेच उष्णता व दाब यांमुळे तयार झालेले रूपांतरित खडक आढळतात. हिचा पृष्ठभाग वालुकाश्म, शेल व चुनखडक यांनी युक्त आहे. मौंट रॉराइमा (२,८१० मी.) हा गियाना उच्चभूमीतील सर्वोच्च भाग आहे. या उच्चभूमीत असलेल्या पर्वतरांगांपैकी व्हेनेझुएला सीमेवरील सेरा कुरपिरा, सेरा पारीमा व सेरा पाकाराइमा गुयाना, सुरिनाम व फ्रेंच गियाना देशांच्या सीमेवर सेरा अकाराई, सेरा तूमूक-ऊमाक या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांची निर्मिती कँब्रियन पूर्वकालीन असून त्यांमधील कणाश्म, पट्टिताश्म व प्रस्तरभ्रंशित घडीच्या खडकांतून सोने, हिरे व इतर अनेक मौल्यवान खनिज पदार्थ मिळतात. या प्रदेशातील आमापा हे मँगॅनीज उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. स्फटिकमय खडकस्तरांचे हे भूपृष्ठ जास्त पावसामुळे माथ्याकडे गोलाकार टेकड्यांचे, बहिर्गोल उतारांचे व अरुंद दऱ्यांचे बनलेले आहे.

(३) ब्राझीलियन उच्चभूमी : ॲमेझॉन खोऱ्याच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण अशा पठारी भागास ‘ब्राझीलियन उच्चभूमी’ म्हणतात. सुपीक शेती क्षेत्रासाठी व मौल्यवान खनिजसाठ्यांसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. ब्राझीलियन उच्चभूमीतील सेरा द मँटीकेरा या रोओ दे जानेरोजवळील किनाऱ्याला समांतर डोंगररांगेत पीकू दा बांदेरा (२,८९० मी.) हे उंच शिखर आहे. या डोंगररांगा एकीपेक्षा एक अधिक उंचीच्या व तीव्र उताराच्या आहेत. रीओ दे जानेरोच्या पश्चिमेस सेरा दू मार ही रांग आहे. या डोंगरांचा सागराकडील भाग तुटलेल्या कड्यांचा (विशाल भृगू) आहे. या विशाल भृगूच्या उत्तर भागात व सेरा दू इश्पीन्यासू पर्वताच्या पूर्व भागात झिकीतीन्योन्या, दोसी व पाराईबा या नद्यांनी किनारपट्टीचे क्षरण केलेले आहे. दोसी नदीचे खोरे सपाट असल्याने त्यातून अंतर्गत डोंगराळ भागात मार्ग काढणे सुलभ होते. या नद्यांनी मुखालगत पूरमैदाने व त्रिभुज प्रदेशांची निर्मिती केलेली आहे. ब्राझीलियन उच्चभूमीचा पूर्वेकडील समुद्रापर्यंतचा उतार तीव्र असून काही ठिकाणी तो पायऱ्यापायऱ्यांचा आहे. रीओ दे जानेरो, सँतुस, परानाग्वा या बंदरांच्या बाजूचा प्रदेश एकदम ७९२.४८ मी. पर्यंत उतरत गेला आहे. हा उतार सॅल्व्हादॉर बंदरापासून दक्षिणेस पोर्तू आलेग्रेपर्यंत उभट सुळक्यासारखा आहे. काही तज्ञांच्या मते विशाल भृगू हा तुटलेला कडा नसून घडीचा भूआकार एका बाजूने खचल्याने त्याची निर्मिती झाली. या उच्चभूमीत कँब्रियन पूर्व काळात क्वॉर्ट्झाइटची व चुनखडकांची निर्मिती झाली असून याच काळात देशाच्या मध्य भागातील सेरा दू इश्पीन्यासू व पूर्व भागातील सेरा झिराल दी गॉइआस या पर्वतांची निर्मिती झाली असावी. या भागातून लोह, सोने, मँगॅनीज ही खनिजे मिळतात. रीओ दे जानेरोच्या दक्षिण बाजूस डोंगराची कड उंच व अजस्त्र आहे. सेरा दू इश्पीन्यासू या डोंगररांगेच्या पश्चिम बाजूने दक्षिणोत्तर वाहणारी साऊं फ्रँसीश्कू ही नदी बार्बारेम पठाराच्या दक्षिणेकडून पूर्वेस वळते, त्या ठिकाणी पाउलू आफोंसू धबधबा निर्माण झाला आहे. ही नदी पुढे अटलांटिक महासागरास मिळते. सेरा दू इश्पीन्यासू डोंगराच्या नैऋत्येस सेरा दा मँटीकेरा हा डोंगर आहे. पूर्व किनाऱ्यावर रीओ दे जानेरोपासून दक्षिणेस साऊँ पाउलूपर्यंत किनाऱ्याला समांतर असे पाराईबा खोरे आहे.


(४) अटलांटिक किनाऱ्यालगतचा प्रदेश : देशाचा संपूर्ण अटलांटिक किनारा अरुंद असून किनाऱ्यावर अनेक किमी. लांबीची पांढरी वालुका पुळणे, तर अनेक ठिकाणी वालुकागिरी, वालुकाभिंती व खारकच्छे आहेत. ब्राझीलच्या ईशान्य किनाऱ्यालगत क्रिटेशस, तृतीयक व आधुनिक काळांतील खडक आढळतात. सॅल्व्हादॉरपासून साऊँ फ्रॅसीश्कू नदीच्या मुखालगतच्या भागापर्यंत गाळाच्या किनाऱ्यावर मेसासारखे भृ आकार आढळून येतात. या किनाऱ्यावर रीओ दे जानेरोपासून ईशान्य टोकाकडील रीओ ग्रांदे दू नॉर्सीपर्यंत क्षितिजसमांतर वालुकाश्माचे थर असून माथ्याकडे त्यांचा आकार मेसासारखा आहे. मेसांची उंची ४५ ते १५० मी. पर्यंत आढळते. दक्षिण ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर वालुकाभिंती, खारकच्छ अधिक प्रमाणात आढळतात. याच भागात दुस पातुस व मीरीं ही खारी सरोवरे वालुकाभित्तींमुळे सागरापासून अलग झाली आहेत. रीओ दे जानेरोच्या उत्तरेकडील ग्रॅनाईट टेकड्यांचा आकार प्रसिद्ध शुगर लोफ मौंटनसारखा आहे. या टेकड्यांच्या पायथ्याकडील किनाऱ्यालगतच्या अवशिष्ट तांबूस सुपीक मृदेत कापूस, तंबाखू, ऊस ही पिके घेतली जातात. ईशान्य ब्राझीलच्या खंडांतर्गत डोंगराळ भागात पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे तेथील कोरड्या टापूत दुष्काळ पडतात.

(५) मध्य व दक्षिण पठारी प्रदेश : दक्षिण ब्राझीलमध्ये पर्मियन कल्पातील खडक असून यात कमी प्रतीचा कोळसा मिळतो. साऊँ फ्रँसीश्कू खोऱ्यात चुनखडकाचे प्रमाण जास्त असून या भागात कार्स्ट भूमिस्वरूपे आढळतात. याच्या दक्षिण भागात ट्रायासिक कल्पातील मृदू, तांबूस वालुकाश्म तसेच अधूनमधून बेसाल्टचे पातळ थर आढळतात. त्यामुळे ‘क्वेस्ट’ व ‘मेसा’ हे भू आकार निर्माण झालेले असून नद्यांच्या प्रवाहमार्गांत धबधबे व धावत्यांची निर्मिती झालेली आढळते. दक्षिण ब्राझीलमध्ये पाराना पठार प्राचीनकालीन आडव्या क्षितिजसमांतर लाव्हा संचयनाने बनलेले असून हे जगातील एक मोठे लाव्हा पठार आहे. या पठारावरून पाराना नदी तिच्या ईग्वासू उपनदीसह उथळ व रुंद दरीतून वाहते. पाराना नदीवर पॅराग्वाय ब्राझील सीमेवर ग्वाइरा व अर्जेंटिना ब्राझील पॅराग्वाय देशांच्या सीमेवर ईग्वासू (उंची ७० मी., रुंदी ३ किमी.) हे जगातील दोन प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. पाराना पठाराच्या उत्तरेस व पश्चिमेस, म्हणजेच मध्य ब्राझीलच्या माटू ग्रोसू व ग्वाइरा या प्रांतांमध्ये ६०० ते १,२०० मी. उंचीच्या दरम्यान अनेक विस्तृत पठारे व टेबललँड आहेत. येथील विखुरलेल्या वसाहती पशुपालन व्यवसाय करतात. लोकांमध्ये सतत सीमावाद असतो. हा पठारी प्रदेश पूर्वी सोने व हिऱ्यांसाठी प्रसिद्ध होता.

माटू ग्रोसू प्रांताच्या नैऋत्येस पॅराग्वाय नदी खोऱ्यात पँटनाल हा दलदलीचा प्रदेश आहे. येथील नद्यांना उन्हाळी पावसामुळे महापूर येतात. हिवाळ्यात या प्रदेशात अवर्षणे पडतात. येथील गवत उच्च प्रतीच्या गुरांना योग्य व पोषक नसते. या प्रदेशातील काँरूंबा हे प्रमुख शहर साऊँ पाउलूशी लोहमार्गाने जोडलेले आहे. सुपीक मृदा, समृद्ध खनिजे तसेच साऊँ पाउलू, रीओ दे जानेरो यांसारखी मोठी शहरे असल्याने ब्राझीलच्या दक्षिण व मध्य पठारी प्रदेशाला ‘संपन्न मध्यवर्ती प्रदेश’ असे म्हणतात. या भागातच ब्राझीलचे निम्म्याहून अधिक लोक राहतात. या भागात कॉफीचे मळे, गायराने, पाइन वृक्ष आणि द्राक्षमळे आहेत.

मृदा : ईशान्य ब्राझीलच्या कोरड्या प्रदेशातील मृदा नापीक असून ईशान्य किनाऱ्यालगतची मृदा चिकणमातीयुक्त आहे. दोसी व झिकीतीन्योन्या या नद्यांच्या मुखालगत त्रिभुज प्रदेशात सुपीक गाळाची मृदा आढळते. दक्षिण पठारी भागातील मृदा गर्द जांभी असून ती कॉफीच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. ॲमेझॉन खोऱ्यातील मृदा दलदलयुक्त असून ती शेतीस निरुपयोगी आहे. स्थानिक स्थलांतरित शेती पद्धतींमुळे काही भागांतील मृदा नापीक बनलेली आहे. साऊँ पाउलू व दक्षिण मीनास झिराइस यांच्या परिसरात भूमिगत जलपातळी भूपृष्ठाला जवळ असलेल्या भागात आर्द्र मृदा आढळते.

ब्राझीलमध्ये तीन प्रमुख नदीप्रणाली आढळतात : उत्तरेकडील ॲमेझॉन नदीप्रणालीचा उगम अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर झालेला आहे. ॲमेझॉन नदी ही लांबीने जगात दुसऱ्या क्रमांकाची असून ती पेरूमधील ऊक्याली व मारान्यॉन या उपनद्यांच्या प्रवाहांपासून बनली आहे. या नदीने ब्राझीलचे विस्तृत ॲमेझॉन खोरे तयार केले आहे. तिची ब्राझील व इतर देशांमधील एकूण लांबी ६,४३७ किमी. असून ब्राझीलमध्ये मुखापासून ३,१५८ किमी. व पुढे पेरूतील इकीटॉसपर्यंत ५४२ किमी. ती वर्षभर जलवाहतुकीस उपयोगी पडते. नदीचा उतार अतिशय मंद असून ती पूर्वेस अटलांटिक महासागरास जाऊन मिळते. या नदीला डाव्या बाजूने ग्वपूरे, निग्रो व उजव्या बाजूने झूर्वा, पुरूस, मादीरा, तापाझोस, शींगू, झामूंदा, टोकँटीन्स या प्रमुख उपनद्या मिळतात. ब्राझीलियन उच्चभूमीवरून उतरणाऱ्या उपनद्यांवर अनेक ठिकाणी धावत्या व धबधबे आढळतात. भरपूर पावसामुळे त्यांना मुबलक पाणी असते व भूप्रदेशाचे विदारणही त्या मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे भरपूर गाळ सागराकडे वाहून नेला जातो. ॲमेझॉन नदीच्या पूरतटाचा विस्तार काही ठिकाणी ८० किमी. पर्यंत रुंद आढळतो. ॲमेझॉन व तिच्या उपनद्यांच्या काठाजवळील भागात नेहमीच पूरपरिस्थिती आढळते. मात्र थोड्या उंचवट्याचा अरण्यमय व गवताळ भागांत ही परिस्थिती आढळत नाही. या नदीच्या मुखालगतचा किनारा खचणारा असल्याने तेथे त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत.

ब्राझीलची दुसरी नदी प्रणाली पॅराग्वाय पाराना ला प्लाता या नद्यांनी मिळून बनलेली आहे. पॅराग्वाय नदी ही माटू ग्रोसू प्रांतात उगम पावून दक्षिणेकडे पॅराग्वाय प्रांताच्या नैर्ऋत्य टोकास पाराना नदीला जाऊन मिळते. मीनास झिराइसपासून दक्षिणेस ब्राझीलियन उच्चभूमीपर्यंतच्या नैऋत्य भागातून अनेक जलप्रवाह पाराना नदीला जाऊन मिळतात. या नदीवरच प्रसिद्ध ईग्वासू व ग्वाइरा धबधबे आहेत. पाराना नदी आग्नेय ब्राझीलच्या मध्यवर्ती पठारी भागात उगम पावून पुढे नैऋत्येस व पूर्वेस वळते. ब्बेनस एअरीझजवळ ही नदी रीओ द ला प्लाता या नदीमुखखाडीला-अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ब्राझीलच्या अगदी दक्षिणेकडील प्रांतातील यूरग्वाय नदी रीओ द ला प्लाता या नदीमुखखाडीला मिळते. पॅराग्वाय, पाराना, यूरग्वाय या तीन नद्यांचा वाहतुकीस फार उपयोग होतो. या नद्या गजबजलेला जलवाहतूक प्रदेश म्हणून ओळखल्या जातात.


साऊँ फ्रँन्सीश्कू नदी ही ब्राझीलची तिसरी प्रमुख नदीप्रणाली असून तिचा संपूर्ण विस्तार केवळ ब्राझीलमध्येच झालेला आहे. पूर्व ब्राझीलच्या मीनास झिराइसच्या नैऋत्येस सेरा दा कानास्त्रा डोंगरात ही नदी उगम पावून ईशान्येस वाहत जाऊन पुढे बार्बारेम पठाराच्या दक्षिणेकडून ती पूर्वेस वळते व अटलांटिक महासागरास जाऊन मिळते. या नदीची लांबी सु. २,८८० किमी. आहे. बाईआ विभागात नदीची लांबी सु. १,६०० किमी. आहे. मुखाकडे ही नदी फक्त २७५ किमी. जलवाहतुकीस उपयोगी पडते. ब्राझील शासनाने नदीवर पाउलू आफोंसू येथे जलविद्युत प्रकल्प उभारला आहे.

याशिवाय ब्राझीलमध्ये अटलांटिक महासागरास जाऊन मिळणाऱ्या अनेक लहान उपनद्या आहेत. त्या दाट लोकवस्तीच्या भागातून वाहात असल्याने अधिक महत्त्वाच्या आहेत. दोसी ही पूर्व ब्राझीलमधील नदी सेरा दू इश्पीन्यासूच्या पूर्व उतारावर पोंती नॉव्हाच्या वरच्या भागात उगम पावून ईशान्येस व नंतर पूर्वेस वाहत जाऊन अटलांटिक महासागरास मिळते. तिची लांबी सु. ५७६ किमी. आहे.

पाराईबा ही ईशान्य ब्राझीलमधील नदी साऊँ पाऊलू प्रांतात सेरा दू मार डोंगरात उगम पावते व प्रथम ईशान्येस व नंतर पूर्वेस वाहत जाऊन कँपूसजवळ अटलांटिक महासागरास जाऊन मिळते. हिची लांबी सु. १,०१५ किमी. असून ही जलवाहतुकीस उपयोगी पडते. रीओ दे जानेरो व मीनास झिराइस या प्रांताच्या सीमेवर ही नदी घळईतून वाहते. ईशान्य ब्राझीलमध्ये पर्नाईबा ही एक महत्त्वाची नदी असून ती सेरा दा ताबातींगा या डोंगरात उगम पावते व पुढे ईशान्येस अनेक मुखांनी अटलांटिक महासागरास जाऊन मिळते. पर्नाईबा नदीची एकूण लांबी सु. १,२०० किमी. असून तिच्या बालसस, पुती, लोंगा, कानींदे इ. प्रमुख उपनद्या आहेत. पर्नाईबा नदी पडाववाहतुकीस उपयोगी पडते.

पूर्व ब्राझीलमध्ये सेरा दू इश्पीन्यासू डोंगरात दीआमँतीनाच्या दक्षिणेस झिकीतीन्योन्या नदी उगम पावते व ईशान्येकडे अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. दक्षिण ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर दुस पातुस व मीरीं ही खारकच्छे वालुका भिंतीमुळे सागरापासून विलग झाली आहेत.

हवामान : ब्राझील हा उष्ण कटिबंधीय प्रदेशातील देश असून भूपृष्ठरचनेच्या विविधतेमुळे येथील हवामानातही विविधता आढळते. येथील काही भाग अतिउष्ण, अतिआर्द्र, तर काही भाग एकसारख्या तपमानाचे आहेत. येथील तपमान व पर्जन्यात विपरीतता आढळत नाही. ॲमेझॉन खोऱ्यातील वार्षिक सरासरी तपमान २५ ते २६ से. असून थंड व उबदार ऋतूंत ते २.६ से.नी कमी होते वा वाढते. ३८ से. पेक्षा जास्त व १० से. पेक्षा कमी तपमान ॲमेझॉन खोऱ्यात कधीच आढळत नाही. या खोऱ्यातील वार्षिक पर्जन्यमान १८० सेंमी. ते २३० सेंमी. असते. तेथील तपमानाचे व आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. उदा., ॲमेझॉन नदीच्या उजव्या तीरावर विषुववृत्ताजवळ दक्षिणेस वसलेले सँतारेम या ठिकाणाचे कमाल तपमान ३६ से. व किमान तपमान १८ से. असते. हिवाळ्यात या खोऱ्यात दक्षिणेकडून येणाऱ्या थंड वायुराशींमुळे येथील हवा थंड व पावसाळी बनते.

ईशान्य ब्राझीलचा प्रदेश कोरड्या हवामानाचा असल्याने तेथे नेहमी तीव्र दुष्काळ पडतात. या प्रदेशाचा विस्तार किनाऱ्यापासून ते खंडान्तर्गत भागातील साऊँ रॉकी भूशिरापर्यंत असून येथे अनियमित व कमी पर्जन्यप्रमाण आढळते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५० ते ६५ सेंमी. असून १८३५ ते १९३५ या काळात या भागात अतिवृष्टीने व अनावृष्टीने अनेक वेळा दुष्काळ पडले. ईशान्य ब्राझीलमध्ये दरवर्षी कोरड्या ऋतूत ३८ से. पेक्षा अधिक तपमान आढळते. देशाचा हा अतिउष्ण भाग असून येथील तपमान १२ ते ४२ से. पर्यंत आढळते. पावसाळा डिसेंबर ते एप्रिल पर्यंत असतो.

अटलांटिक किनाऱ्यावर व विशाल भृगू प्रदेशात उष्ण कटिबंधीय हवामान आढळते. बाईआ प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावर वर्षभर उबदार व आर्द्र हवामान असते. येथे वर्षभर पाऊस पडतो पण पुढे दक्षिणेस उन्हाळे उष्ण व आर्द्र, तर हिवाळे थंड व कोरडे असतात. रीओ दे जानेरो येथील हिवाळ्यातील तपमान १० से. व उन्हाळ्यातील तपमान ३७ से. असते. येथील अतिआर्द्र फेब्रुवारी महिन्याचे तपमान २६ से., तर थंड हिवाळी जुलै महिन्याचे सरासरी तपमान २० से. असते.


ब्राझीलियन उच्चभूमीवर उन्हाळे उबदार असून या काळात पाऊस पडतो. हिवाळे थंड कोरडे असतात. ॲमेझॉन खोरे व किनाऱ्यावरील प्रदेशांपेक्षा या उच्चभूमीचे तपमान थंड असून येथील पर्जन्यप्रमाणही कमी असते. ब्राझीलियन उच्चभूमीच्या पूर्वेकडील विशाल भृगूजवळील भागात तपमान विपरीतता जास्त असून येथील वार्षिक पर्जन्यमान १८० सेंमी. पर्यंत असते व उन्हाळी तपमान पावसाळ्यापूर्वी ३८ सें. पर्यंत असते पण सरासरी तपमान मात्र २८ ते ३० से. च्या दरम्यान असते. उच्चभूमीवरील गवताळ प्रदेशात कोरड्या हिवाळी ऋतूत १ ते ५ महिन्यांच्या काळात ५ सेंमी. पाऊस पडतो. त्यामुळे  गवताची पुरेशी वाढ होत नाही. ब्राझीलचा मध्य आणि दक्षिण पठारी प्रदेश सामान्यतः थंड व कोरडा असतो. दक्षिण ब्राझीलमध्ये जून ते सप्टेंबर हिवाळा असून साऊँ पाउलूजवळील पठारी भागात वारंवार हिमतुषार व धुके असते. काही वेळा पर्वतभागात हिमवृष्टी होते. सांता कातारीना येथे हलकी हिमवृष्टी होते. साऊँ व पाउलू व दक्षिणेकडील प्रांतात सरासरी तपमान १४ ते १८ से. असते. दक्षिण व मध्य पठारी प्रदेशांतील वार्षिक पर्जन्यमान १३० सेंमी. असून पावसाळा नोव्हेंबर ते मेपर्यंत असतो. किनाऱ्यापासून खंडांतर्गत भागाकडे सामान्यपणे पावसाचे प्रमाण घटत जाते.

वनस्पती व प्राणी: ब्राझीलचा सु. २/३ भाग अरण्यव्याप्त असून त्याने जगाचा १०% जंगल भाग व्यापलेला आहे. येथील सु. ७५% अरण्यक्षेत्र अगम्य आहे. अरण्ये पुढील प्रकारची आढळतात : (१) उष्ण कटिबंधीय वर्षारण्ये (सेल्व्हा), (२) अर्ध पानझडी अरण्ये, (३) काटेरी वनस्पती. ॲमेझॉनच्या खोऱ्यात व अटलांटिक किनाऱ्यावरील जास्त पावसाच्या भागात उष्ण कटिबंधीय वर्षारण्ये आढळतात. ही रुंदपर्णी सदाहरित घनदाट अरण्ये होत. १ चौ. किमी. प्रदेशात सु. ३,००० वनस्पतींच्या जाती आढळतात. अरण्ये उंच, सरळ वाढणारी, गर्द छतांची, वेलीयुक्त असून ती भरपूर पाऊस व भरपूर तपमान यांमुळे ॲमेझॉन खोऱ्यात व अटलांटिक किनाऱ्यावर सॅल्व्हादॉर व सँतुस यांदरम्यान आढळून येतात. अरण्यात निचरा होणारी मृदा आढळते. ॲमेझॉनच्या पूर मैदानी भागात बॉग पाम, नेचे या वनस्पतींनी ८ मी. उंचीच्या वृक्षांवर आच्छादन केलेले असून त्यांच्या बुंध्याजवळ लव्हाळा व वेत या वनस्पती आढळतात. या भागातील बऱ्याचशा वनस्पती अजूनही अस्पर्शित आहेत. अटलांटिक किनाऱ्यावर कठीण लाकडाच्या वृक्षांची अरण्ये आढळतात. जेथे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचतो तेथे दाट स्वरूपात वेली, प्रवेली किंवा महालता, अनेक प्रकारचे वृक्ष व इतर अपिवनस्पती आढळतात. त्यामुळे जंगलांतून मार्ग काढणे दुर्गम असते. ॲमेझॉन खोऱ्यात रबराची झाडे असून हे खोरे रबराच्या झाडांचे उगमस्थान आहे. मुबलक वनस्पतींमुळे व दलदलींमुळे येथील जमीन शेतील निरुपयोगी आहे. काही ठिकाणी स्थानिक स्थलांतरित शेतीप्रकारामुळे मृदा नापीक बनते व त्यामुळे शेतीविकास व उत्पादवाढ होत नाही.

पूर्व ब्राझीलमध्ये कमी पावसाच्या, थंड हवेच्या व कोरड्या भागांत अर्ध-पानझडी अरण्ये आढळतात. ही अरण्ये वर्षारण्यापेक्षा कमी उंचीची असून ती नाताळच्या दक्षिणेस पोर्तू आलेग्रेपर्यंतच्या प्रदेशात आढळतात. याच अरण्यांनी दक्षिण मीनास झिराइस व साऊँ पाउलू प्रांतांचा विस्तृत प्रदेश व्यापला आहे. या प्रदेशात जेथे भूमिगत जलपातळी भूपृष्ठाजवळ आहे, तेथील आर्द्र जमिनीवर सदारहित रुंदपर्णी वृक्ष व काही प्रमाणात अर्ध-पानझडी वृक्ष आढळतात. या अरण्यांनी ब्राझीलियन उच्चभूमीचा पूर्व भाग व्यापला असून अवर्षणकाळात ह्या झाडांची पाने गळतात.

दक्षिण प्रांतात हिमतुषारयुक्त हवामानाच्या प्रदेशात मिश्र स्वरूपाची रुंदपर्णी समशीतोष्ण कटिबंधीय अरण्ये आढळतात. त्यांत पाराना पाइन वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतो. तो व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष असून सांता कातारीना प्रांतातील कागद कारखान्यांत त्याचा उपयोग केला जातो. याच प्रदेशात माते ही रुंदपर्णी वनस्पती असून तिच्यापासून पेय तयार केले जाते. येथील कार्नोबा पामपासून मेण तयार केले जाते.

माटू ग्रोसू व गॉइआस भागांपासून पूर्वेस साऊँ फ्रँसीश्कूच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात व मीनास झिराइस व साऊँ पाउलूच्या काही भागात गवताळ प्रदेश असून. त्यांतून विखुरलेल्या स्वरूपात झुडुपे आढळतात.

ईशान्य ब्राझीलमध्ये वारंवार दुष्काळ पडणाऱ्या भागात काटेरी वनस्पती, तर किनाऱ्यालगत नारळ, आंबा, फणस हे वृक्ष आढळतात. ब्राझीलियन उच्चभूमीपासून दक्षिणेकडे रीओ ग्रांदे दू सूलच्या दक्षिण भागापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात प्रेअरी गवताळ प्रदेश आहेत.

तंतू, नीळ, ब्राझील नट, वैद्यकीय औषधी, मेण, टणक लाकूड, कच्चे रबर, पाइन, टुंग तेल ही ब्राझीलची प्रमुख अरण्य-उत्पादने आहेत.

ॲमेझॉनच्या वर्षारण्यांत विविध प्रकारचे तालशुक, मॅकॉ, मोठ्या चोचीचा टूकन, पोपट इ. पक्षी आढळून येतात. विविधरंगी फुलपाखरे, विविध प्रकारची माकडे, ॲनॅकाँडा अजगर, स्लॉथ, अनेक प्रकारचे सर्प, कृंतक, मुंगी खाऊ, सुसर, मगर, वाघ, अस्वल, आर्मडिलो, चित्ता, रानडुक्कर हे प्राणी व नरभक्षक मासे, पिरान्हा हे जलचर प्राणी आढळून येतात. देशात व्यापारी दृष्ट्या मत्स्यसंपदा मुबलक असली, तरी तिचा वापर अजूनही केला जात नाही. देशात शेतीला कीटकांचा फार उपद्रव होतो. येथे २०० हून अधिक विषारी साप असून ते लोकवस्तीच्या क्षेत्रात क्वचितच आढळतात. वस्तुतः ब्राझीलमध्ये वसाहत भागात रानटी श्वापदांची कमतरता आहे. आफ्रिकन अरण्यांप्रमाणे ब्राझीलच्या सॅव्हाना प्रदेशात प्राणी आढळत नाहीत. ॲमेझॉन प्रदेशात सु. ५० प्रकारची रुंद नाकाची माकडे आढळतात. अशा प्रकारे ब्राझीलचे प्राणिजीवन वैविध्यपूर्ण असून आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिकेशी तुलना करता ब्राझीलमध्ये सस्तन प्राण्यांची मात्र वाण आढळते.

सावंत, प्र. रा. चौधरी, वसंत


इतिहास व राजकीय स्थिती : ब्राझील हा शब्द ‘ब्रासा’ या मूळ पोर्तुगीज शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ ‘प्रज्वलित निखारे’ असा आहे. ‘ब्राझील वुड’ म्हणून ओळखला जाणारा वृक्षप्रकार येथील अरण्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो आणि त्याच्या लाकडापासून लाल रंगाची निर्मिती केली जाते. म्हणून ब्राझीलला ‘ताम्रवर्णी अरण्यांचा प्रदेश’ असेही म्हणतात.

ब्राझीलचा शोध आणि पहिल्या वसाहतीसंबंधीचा विचार स्पेन व पोर्तुगाल यांच्या आक्रमक वसाहतवादाच्या संदर्भात करावा लागतो. या दोन्ही दर्यावर्दी राष्ट्रांमध्ये या प्रदेशातील व्यापार व मालकी हक्क यांबाबत संघर्ष चालू होता. पण तत्कालीन पोपच्या मध्यस्थीने ७ जून १४९४ रोजी तॉरदेसील्यासचा तह होऊन ब्राझील पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. १५०० सालच्या एप्रिल महिन्यात पोर्तुगीज दर्यावर्दी पेद्रू आल्व्हारिश काब्राल याने ब्राझीलच्या पश्चिम किनाऱ्यावर पाऊल ठेवले व ब्राझीलवर पोर्तुगीज सत्ता स्थापन झाल्याची अधिकृतपणे घोषणा केली. सोळाव्या शतकात ब्राझीलमधील व्यापार व वसाहती यांबाबत स्पेन, नेदर्लंड्स, फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये अनेकवेळा चकमकी उडत होत्या. अशा रीतीने ब्राझीलच्या शोधापासूनच हा प्रदेश आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेचे केंद्र बनलेला होता. पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन याने इतर यूरोपीय लोकांच्या आक्रमणापासून या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी काही संरक्षक दले पाठविली होती.

ब्राझीलमधील पहिल्या वसाहती पोर्तुगीज सरकारने वसविल्या नव्हत्या, तर त्याच्या संमतीने निरनिराळ्या पोर्तुगीज दर्यावर्दी लोकांनी व व्यापारी नेत्यांनी वसविल्या होत्या. या वसाहतींना ‘कप्तानी विभाग’ (कॅप्टन्सी) असे म्हणत. या वसाहतकारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पशुसंवर्धन आणि उसाची लागवड करून शेती संपन्न केली. त्यामुळे पोर्तुगीज समाजरचना, भाषा, संस्कृती यांचा ठसा ब्राझीलवर उमटला.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्राझीलवर बाह्य आक्रमणे व अंतर्गत संघर्ष नाहीसा करण्यासाठी पोर्तुगीज सरकारने मुक्त वसाहतीची पद्धत बंद करून या प्रदेशावर एका गव्हर्नर जनरलची नेमणूक केली. याच काळात जेझुइट मिशनऱ्यांनी या प्रदेशात अनेक शैक्षणिक केंद्रांची स्थापना केली.

सतराव्या शतकात सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या खाणींचा शोध लागल्यामुळे इंग्रज, फ्रेंच व डच यांनी ब्राझीलवर आक्रमणे केली. माद्रिद (१७५०), एल् पार्दो (१७६१) आणि सान ईल्दोफोन्सो (१७७७) या अठराव्या शतकातील तीन तहांन्वये ब्राझीलवर पोर्तुगीजांचे वर्चस्व स्थापन झाले. याच काळातील उत्तर अमेरिकेतील वसाहतींचा ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्यसंग्राम, स्वातंत्र्यप्राप्ती, घटनात्मक शासन आणि लोकशाहीची मूल्ये यांचा प्रभाव ब्राझीलमधील बुद्धिवंतांवर पडल्यामुळे १७८९ मध्ये मीनास झिराइस येथे पोर्तुगीज सत्तेविरूद्ध पहिला उठाव झाला पण पोर्तुगीजांनी तो क्रूरपणे चिरडून टाकला.

नेपोलियनच्या १८०७ मधील स्वारीच्या भीतीमुळे पोर्तुगालचा राजा सहावा जॉन आणि त्याचा परिवार यांनी ब्राझीलमध्ये आश्रय घेतला तेथे तो १८२१ पर्यंत होता. जॉनने आपल्या वास्तव्यात ब्राझीलमध्ये अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. ढासळलेली अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी त्याने नवी करयोजना अंमलात आणली खुला व्यापार, उद्योगधंद्यांना उत्तेजन, कलाविद्यालयांची स्थापना असा विविध सुधारणांमुळे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन वगैरे देशांतून कुशल कारागीर व कलावंतांचा ब्राझीलकडे ओघ सुरू झाला.

व्हिएन्ना तहान्वये (१८१५) ब्राझीलला पोर्तुगालबरोबरचा दर्जा मिळाला. पण ब्राझीलच्या सभोवती असणाऱ्या स्पॅनिश वसाहतींमधील स्वातंत्र्यचळवळी १८२० साली पोर्तुगालमध्ये हुकूमशाही राजवट नष्ट करण्यासाठी झालेला उठाव पोर्तुगीज उदारमतवाद्यांचा ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मिळालेला उघड पाठिंबा इ. कारणांमुळे जॉन राजाने २६ एप्रिल १८२१ मध्ये सत्तात्याग करून आपला मुलगा पहिला दों पेद्रू याला राज्यपद देऊन पोर्तुगालला प्रयाण केले. या संक्रमण काळात पोर्तुगालने ब्राझीलला पुन्हा वसाहतीचा दर्जा दिल्यामुळे तेथील स्वातंत्र्यचळवळ तीव्र झाली म्हणून पेद्रूने ७ सप्टेंबर १८२२ रोजी ब्राझीलच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि तेथील जनतेच्या इच्छेनुसार तो ब्राझीलचा सम्राट झाला. २५ मार्च १८२४ रोजी देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. पण १८२५ च्या एप्रिल मध्ये यूरग्वायमधील उठाव आणि ब्राझीलमधील उदारमतवाद्यांच्या शासनातील सहभागाला केलेला विरोध यांमुळे पेद्रूच्या प्रतिष्ठेला जबरदस्त धक्का बसला आणि त्याला राज्यत्याग करावा लागला. त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा पेद्रू हा २३ जुलै १८४० रोजी गादीवर आला. त्याने आपल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अंतर्गत शांतता स्थापन केली गुलामगिरी नष्ट करून लोकशाही तत्त्वांचा प्रसार केला. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रांत त्याने लक्षणीय प्रगती घडवून आणली. रेल्वे, शेती, उद्योगधंदे, दळणवळण, व्यापार इ. क्षेत्रांत विकास घडून आला. यामुळे प्रतिगामी गट रागावले आणि रोमन कॅथलिक धर्माधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद निर्माण झाले. १८६५ – ७० मधील पॅराग्वायबरोबरच्या भीषण युद्धामुळे ब्राझीलची प्रचंड प्राणहानी व वित्तहानी झाली. या सर्व कारणांमुळे असंतुष्ट झालेल्या लोकांची १५ नोव्हेंबर १८८९ रोजी जनरल मॅन्युएल दिऊदोरू दा फोन्सेका आणि फ्लोरनो पेक्झोटो यांच्या नेतृत्वाखाली रक्तहीन राज्यक्रांती घडून आली. दुसऱ्या पेद्रूने राजत्याग केला. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या जोखडातून ब्राझील स्वतंत्र झाला.

ब्राझीलचे दोन्ही अध्यक्ष, जनरल मॅन्युएल दिऊदोरू आणि फ्लोरनो पेक्झोटो हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्यामुळे ब्राझीलमध्ये अंतर्गत उठाव झाले आणि त्यांना सत्तात्याग करावा लागला. त्यानंतर निवडून आलेल्या लष्करवादी राष्ट्राध्यक्षांच्या काळात म्हणजे मॅन्युएल फेरेझ दे कॅपोस सॅलेस आणि रोड्रिग्ज आल्व्हेस यांच्या काळात विविध प्रकारच्या योजना आखून अर्थव्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण १८९० ते १९१४ पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी हुकूमशाही आणि उदारमतवादी गट यांच्यात संघर्ष होत राहिले. आर्थिक परिस्थिती ढासळत होती, तथापि ती सावरण्याचे प्रयत्नही होत होते.


पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभी ब्राझील तटस्थ असूनही त्याच्या नाविक वाहतुकीला जर्मनीने धोका निर्माण केल्यामुळे ब्राझीलने युद्धात भाग घेतला. युद्धसमाप्तीनंतर निर्माण झालेली आर्थिक मंदी, जनतेतील असंतोष व अंतर्गत उठाव यांमुळे ब्राझीलमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली.

दक्षिण ब्राझीलमधील प्रभावी व मुत्सद्दी नेता गेटिलिओ दोर्नेलेस व्हार्गास याने या परिस्थितीचा फायदा घेऊन जनतेला राजकीय सुधारणा आणि आर्थिक प्रगती करण्याचे आश्वासन दिले व लष्कर आणि राजकीय नेते यांच्या साहाय्याने ३ ऑक्टोबर १९३० रोजी उठाव करून सत्ता हस्तगत केली. त्याने आपल्या कारकीर्दीत कामगारांच्या कल्याणासाठी आठ तासांचा कामाचा दिवस, निश्चित वेतनाची हमी, बेकारांसाठी विमा इ. उपक्रम सुरू करून आर्थिक मंदीवर मात करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय विधिमंडळाची पुनर्रचना करण्याचाही त्याने प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. त्यानंतर १९३२ मध्ये रक्तरंजित उठाव झाला आणि १९३३ मध्ये घटनासमितीची निवडणूक होऊन १५ जुलै १९३४ रोजी देशाचे नवीन संविधान अस्तित्वात आले. व्हार्गास हाच राष्ट्राध्यक्ष झाला व तो १९४५ पर्यंत सत्तेवर होता. त्याने अनेक उठाव दडपून टाकून विरोधकांना नेस्तनाबूत केले. लष्करी कायद्याच्या जोरावर निवडणुका आणि विधिमंडळे बरखास्त केली. १० नोव्हेंबर १९३७ रोजी त्याने पुन्हा नवे संविधान तयार करून अनिश्चित काळापर्यंत आपली हुकूमशाही दृढ केली. राजकीय पक्षांवर बंदी घातली. ब्राझीलमधील फॅसिस्ट शक्तीच्या अमेरिकेच्या सहकार्याने नायनाट केला पण ३० ऑक्टोबर १९४५ रोजी लष्करी उठाव होऊन त्याला सत्ता सोडावी लागली. नवा राष्ट्राध्यक्ष द्यूत्रा याने १८ सप्टेंबर १९४६ रोजी नवे संविधान अंमलात आणले. पण त्याच्या कारकीर्दीत झालेली चलनवाढ, अन्नधान्याची टंचाई, महागाई व सार्वत्रिक असंतोष यांमुळे १९५१ मध्ये पुन्हा जनतेने व्हार्गासला अध्यक्ष म्हणून निवडले. पण त्यालाही देशातील अडीअडचणी सोडविता आल्या नाहीत. उलट काही खुनी व हिंसक प्रकारांनंतर सैनिकी अधिकाऱ्यांच्या एका गटाने व्हार्गासच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याप्रमाणे त्याने राजीनामा दिला व त्या दिवशी त्याने आत्महत्या केली (२४ ऑगस्ट १९५४). १९५५ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यूस्चेलिनो कुबिट्स्चेक ही ऑलिव्हेरिया निवडून आल्यानंतर त्याने ब्राझीलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भरीव उपक्रम अंमलात आणले. प्रशासकीय, आर्थिक सुधारणांबरोबरच दळणवळण, विद्युतप्रकल्प यांसाठी तसेच लोखंड, पोलाद, कोळसा, पेट्रोल इ. खनिज पदार्थांच्या उत्पादन क्षेत्रात महत्त्वाकांक्षी योजना आखून जगातील एक प्रबळ देश म्हणून ब्राझीलचे नाव व्हावे यासाठी त्याने प्रयत्न केले. ब्राझील्या येथे नवी राजधानी वसविण्याचे त्याचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या झान्यू क्वाद्रुस याने आपल्या अल्प कारकीर्दीत तटस्थेतेचे धोरण स्वीकारलेपण त्याने राजीनामा दिल्यामुळे गूलार हा अध्यक्ष झाला. त्याच्या कारकीर्दीत उदारमतवादी व लष्करी नेत्यांत सत्तास्पर्धा सुरू झाली. २ सप्टेंबर १९६१ रोजी संविधान दुरुस्ती होऊन ब्राझीलमध्ये संसदीय लोकशाहीतील पंतप्रधानपदाची निर्मिती आणि सार्वमताची तरतूद करण्यात आली. पण गूलारची कारकीर्द अयशस्वी झाली. ३१ मार्च १९६४ रोजी मॅगाल्हेस पींतू आणि सेनापती मार्शल ऊम्बेर्तू कश्तेलू ब्रांकू यांनी सत्ता काबीज केल्यामुळे गूलारला पलायन करावे लागले. राज्यक्रांतीकारकांच्या हाती सत्ता आलीभ्रष्टाचार निर्मूलन तसेच कम्युनिस्ट विचारप्रणालीला तीव्र विरोध, हे नव्या राज्यकर्त्यांचे धोरण होते. १९६७ साली सत्ताधीश झालेल्या अर्तूर दा कोऑश्त ए सेल्व्हाच्या कारकीर्दीत ब्राझीलची राजकीय स्थिती खालावली आणि त्याने संविधान बरखास्त करून आणीबाणी जाहीर केली.

वसाहतकाळापासून आधुनिक काळापर्यंत ब्राझीलच्या राजकीय परिस्थितीत सतत स्थित्यंतरे आणि संघर्ष होत राहिले. कारण सत्तेचे केंद्रीकरण, लष्करशाही आणि लोकशाही मूल्यांचा अभाव यांमुळे ब्राझीलमध्ये राजकीय स्थैर्य निर्माण होऊ शकले नाही. ब्राझीलच्या संयुक्त संस्थानांमध्ये २२ घटक राज्ये, ४ केंद्रशासित प्रदेश आणि एक केंद्रशासित जिल्हा यांचा समावेश असून राज्ये आणि प्रदेश यांतील उपविभागांना नगरपालिका-विभाग असे म्हणतात.

प्रत्येक राज्याचे प्रशासन, विधी, विधिमंडळे आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र असून त्यासंबंधीची घटना आणि कायदे हेही स्वतंत्र असतात. तथापि संविधानात्मक तत्त्वांच्या चौकटीतच राज्यांना ही स्वायत्तता देण्यात आली आहे. एखाद्या राज्याने घटनाभंग केल्यास केंद्रशासन हस्तक्षेप करू शकते. राज्यपाल आणि विधिमंडळाचे सदस्य यांच्या निवडणुका होतात, फक्त न्यायाधीशांच्या मात्र नेमणुका होतात व त्यांना न्यायालयीन शिक्षा झाली तरच काढता येते. १९७५ मध्ये रीओ दे जानेरो व ग्वानाबारा यांचे मिळून एक राज्य करण्यात आले. १९७७ साली माटू ग्रोसू हे राज्य विभागून त्याची दोन राज्ये करण्यात आली. १९७९ पासून जनरल जोआ बाप्टिस्टा डी ऑलिव्हिरा फिग्वेरिडो हा राष्ट्राध्यक्ष आहे. देशात नगरपालिकांना राजकीय व प्रशासकीय स्वायत्तता देण्यात आलेली आहे. नगराध्यक्ष व इतर सदस्य लोकनिर्वाचित असतात. देशाचे विद्यमान संविधान १९६७ साली संमत करण्यात आले. त्यात १९६९ साली महत्त्वाची घटनादुरुस्ती करण्यात आली, १९७८ मध्ये पुन्हा संविधान दुरुस्ती करण्यात आली. १९७०, १९७४ व १९७८ साली निवडणुका घेण्यात आल्या.

राष्ट्रीय काँग्रेस ही ६७ सदस्यांचे सीनेट व ४२० सदस्यांचे चेंबर ऑफ डेप्युटीज मिळून बनली आहे. सीनेटमधील २/३ सदस्य प्रत्यक्ष मतदानाने व १/३ सदस्य अप्रत्यक्ष मतदानाने निवडले जातात. चेंबर ऑफ डेप्युटीजमधील सदस्य सार्वत्रिक मतदानाने निवडले जातात आणि त्यांची मुदत ४ वर्षे असते. सीनेटची मुदत ८ वर्षे असते. राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांची राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांच्यामार्फत अप्रत्यक्ष मतदानाने निवड होते. त्यांची मुदत ६ वर्षांची असते. अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा यांबाबत आदेश काढण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षाला असतात. काँग्रेसचा सल्ला न घेता राष्ट्राध्यक्षाला राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. सामान्यतः मंत्रिमंडळाच्या (मिनिस्टर्स ऑफ स्टेट) सल्ल्याने तो कारभार पाहतो. राजकीय पक्षांच्या कार्याला १९४२ सालापासून विशेष चालना मिळाली. लोकशाहीवादी पक्ष हा पुराणमतवादी असून ग्रामीण भागातील जनतेने दिलेल्या पाठिंब्यावर कार्य करतो. १९६२ पर्यंत या पक्षाला बहुमत होतेपण १९६५ मध्ये हा पक्ष विसर्जित झाला आणि बहुसंख्य सदस्य नव्या सरकारी पक्षात गेले.

राष्ट्रीय लोकशाही संघ या पक्षाने हुकूमशाहीला विरोध करून राजकीय व आर्थिक क्षेत्रांत स्वातंत्र्य असावे, असे धोरण स्वीकारलेले होते. १९६५ मध्ये या पक्षात दुफळी पडली आणि तीतून नवे पक्ष उदयाला आले. द ब्राझीलियन लेबर पार्टी, द डेमॉक्रॅटिक नॅशनल मूव्हमेंट या पक्षांशिवाय ब्राझीलमध्ये १० लहान पक्ष आहेत. त्यांपैकी डेमॉक्रॅटिक ख्रिश्चन पार्टी, द सोशल प्रोग्रेसिव्ह पार्टी, द ब्राझीलियन कम्युनिस्ट पार्टी वगैरे पक्ष महत्त्वाचे आहेत.


राजकीय पक्षांचा दर्जा, कायदेशीर कार्यपद्धती इ. गोष्टी २० नोव्हेंबर १९६५ साली झालेल्या कायद्यानुसार निश्चित करण्यात आल्या. ब्राझीलच्या स्वातंत्र्यानंतर अर्जेटिना, चिली, पॅराग्वाय इ. देशांशी सीमाविषयक प्रश्नावरून संघर्ष निर्माण झाले आणि त्या राष्ट्रांशी असलेले संबंध बिघडले. पण एकूण शांतता आणि अलिप्तता हेच ब्राझीलच्या परराष्ट्रीय धोरणाचे सूत्र मानले जाते. पहिल्या महायुद्धात जर्मनीविरोधी भाग घेतल्यामुळे ब्राझीलला आंतरराष्ट्रीय प्रश्नांत भाग घ्यावा लागला. राष्ट्रसंघाचे सदस्यत्वही त्यास मिळाले पण १९२६ मध्ये ब्राझील त्यातून बाहेर पडला. सर्वसाधारणपणे अमेरिकेच्या धोरणाशी सुसंगत आणि अमेरिकेशी स्‍नेहाचे संबंध ठेवूनच ब्राझीलचे धोरण ठरते. हा देश संयुक्त राष्ट्रे, ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स व ‘लॅटिन अमेरिकन इंटिग्रेशन असोसिएशन’ (एल्‍एआय्‍ए) या आंतरराष्ट्रीय संस्थाचा सदस्य आहे.

न्यायव्यवस्था: ब्राझील्या येथे सर्वोच्च न्यायालय आहे. सीनेटच्या संमतीने व राष्ट्राध्यक्षाने नियुक्त केलेले ११ न्यायाधीश त्यात असतात. राज्य व केंद्रशासित प्रदेश यांतही प्रत्येक १ – १ उच्च न्यायालय आहे. निवडणुकीबाबत अधिकार असलेली निर्वाचन न्यायालये, तसेच कामगार न्यायाधिकरणेही राज्यात व केंद्रशासित प्रदेशांत आहेत. न्यायाधीशांची नेमणूक तहहयात असते. घटस्फोटाला संमती देणारे कायदे १९७७ साली संमत करण्यात आले पण एका नागरिकाला आयुष्यात एकदाच घटस्फोट घेण्यास मुभा आहे.

संरक्षण: देशात २१ ते ४५ वर्षे वयोगटातील पुरुषांसाठी सैनिकी शिक्षण सक्तीचे आहे. देशाच्या भूसेनेत ८ डिव्हिजन आहेत. भूदलातील सैनिकांची संख्या १,८२,७५० (१९८०) होती. ब्राझीलचे नौदल प्रभावी आहे व त्यात विमानवाहू नौका, पाणबुड्या, क्रूझर व इतर लढाऊ जहाजे यांचा समावेश होतो. या बाबतीत देशाला अमेरिकेची बरीच मदत होते. देशात नौसेनेचे सहा तळ असून देशाच्या भूसेनेचे आधुनिकीकरण करण्याचे अनेक प्रकल्प योजलेले आहेत. नौदलात १९८१ मध्ये ३,९०० अधिकारी ४१,६०० सैनिक आणि १२,००० सहायक दलातील सैनिक होते.

ब्राझीलची स्वतंत्र वायुसेना १९१८ पासून अस्तित्वात आहे. तिचे ६ प्रादेशिक विभाग आहेत. अत्याधुनिक लढाऊ विमानांचा त्यांत समावेश होतो. १९८१ अखेर वायुसेनेत ४२,८०० सैनिक व ६०० च्या वर विविध प्रकारची विमाने होती.

जोशी, ग. भा. जाधव, रा. ग.

 

आर्थिक स्थिती: विविध व विपुल नैसर्गिक संपत्तिसाधने असूनही ब्राझील अंशतः विकसित देश मानला जातो. ब्राझीलच्या आर्थिक इतिहासात निरनिराळ्या काळांत लाकूड, पशुधन, सोने, साखर, रबर व कॉफी ह्या विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनात तेजी मंदीची चक्रे आलेली दिसून येतात. जेव्हाजेव्हा त्या वस्तूंची जागतिक मागणी वाढली, तेव्हातेव्हा ब्राझील त्यांचा पुरवठा करणारा एक प्रमुख देश ठरला, असे दिसून येते. सतराव्या शतकात कापूस व साखर, अठराव्या शतकात सोने, एकोणिसाव्या शतकात रबर व गेल्या साठ वर्षांत कॉफी ह्या वस्तू ब्राझीलच्या समृद्धीस आधारभूत ठरल्या. १९४५ पूर्वी ब्राझीलची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असून निर्मित वस्तू आयात केल्या जात. १९६४ नंतर औद्योगिक विकासावर अधिक भर देण्यात आल्यामुळे ब्राझीलमध्ये प्रतिवर्षी सरासरी १०% नी राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे. जलद आर्थिक विकास होत असला, तरीही दारिद्र्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. उत्पन्नाच्या वाटपातील विषमतेमुळे दारिद्र्यातही वाढ झालेली दिसून येते. सुमारे २६% राष्ट्रीय उत्पन्न खनिज, निर्मिती उद्योगधंदे, बांधकाम, सार्वजनिक सेवा या विभागांद्वारे, तर १०% शेतीद्वारे निर्माण होते. १९७९ मध्ये ब्राझीलचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न १६,६३४.४ कोटी डॉलर व दरडोई उत्पन्न १,४४८२ डॉ. होते.

शेती : ब्राझीलला विस्तृत भूक्षेत्र लाभलेले असूनही केवळ २% जमीन म्हणजे सु. ३०५ लक्ष हेक्टर जमीन कायम पिकांखाली आहे. शेतजमिनीचे धारणक्षेत्र लहान आकाराचे असून त्याचे वाटपही विषम प्रमाणात झालेले आढळून येते. ब्राझीलचा औद्योगिक विकासाचा उच्च दर असूनही तो शेतीप्रधान देश मानला जातो. एकूण श्रमशक्तीपैकी सु. ६०% रोजगार आणि ८०% निर्यात वस्तू शेतीतून निर्माण होतात. विस्तृत भूक्षेत्रामुळे ब्राझीलच्या कृषिउत्पादनात विविधता आढळते. कापूस व तांदूळ ईशान्य भागात, तर दक्षिणेकडील प्रांतांत गहू, साऊँ पाउलू प्रांतात कॉफी अशी प्रमुख पिके घेतली जातात. कॉफीची लागवड देशभर सर्वत्र होत नाही, तरीही ब्राझील हे जगातील प्रथम क्रमांकाचे कॉफी उत्पादक राष्ट्र मानले जाते. मध्य आफ्रिका व लॅटिन अमेरिकी राष्ट्रांप्रमाणे ब्राझीलची कॉफी मात्र दर्जेदार मानली जात नाही. कॉफी, कापूस, कोको यांच्या निर्यातीद्वारे ६०% ते ७०% उत्पन्न ब्राझीलला मिळते. ब्राझीलमध्ये कॉफीची पाराईबा खोऱ्यात प्रथम लागवड झाली. १८८२ नंतर दक्षिणेकडील पाराना राज्यापर्यंत व पश्चिमेकडील माटू ग्रोसू व उत्तरेकडील गॉइआसपर्यंत लागवडीचे क्षेत्र विस्तारले. १९६१ ते १९६९ ह्या काळात कॉफीची दर हेक्टरी उत्पादकता व दर्जा सुधारण्यासाठी सरकारी मदतीद्वारे नवी लागवड करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. साऊँ पाउलू, पाराना, इश्पीरीतू सँतू, मीनास झिराइस ही राज्ये कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कॉफीच्या जागतिक उत्पादनापैकी २६% उत्पादन ब्राझील मध्ये व तेथून कॉफीची निर्यात १५% होत असल्यामुळे कॉफीला देशाच्या अर्थव्यवस्थेत केंद्रस्थान मिळाले आहे. किंमतीची अनिश्चितता असल्यामुळे कॉफीखालील क्षेत्र १९५९ मधील ४३ लक्ष हेक्टरांवरून १९७९ मध्ये २४ लक्ष हेक्टरांपर्यंत घटलेले आढळते.


कोको हे दुसरे महत्त्वाचे पीक असून १९७९ मध्ये ४.५ लक्ष हेक्टर क्षेत्र ह्या पिकाखाली होते. सुमारे १०० वर्षांपासून हे पीक ब्राझीलमध्ये घेतले जात आहे. ९५% कोको उत्पादन बाईआ राज्यात होते. कोकोची निर्यात करणारे ब्राझील हे जगातील घाना व नायजेरिया यांच्यानंतरचे तिसरे राष्ट्र मानले जाते. जुनी झाडे व उत्पादनाचे जुने तंत्र असल्यामुळे कोकोचे उत्पादन घटत आहे.

जागतिक दृष्ट्या ब्राझील हा भात पिकविणारा एक अग्रेसर देश मानला जातो. सर्व प्रांतांमध्ये हे पीक घेतले जाते. कापूस हे येथील पारंपारिक पीक असून ते प्रामुख्याने आग्नेय राज्यामध्ये होते. साऊँ पाउलूच्या सुपीक प्रदेशात उसाची लागवड केली जाते. माटू ग्रोसू व मीना झिराइस ह्या राज्यांत मक्याचे उत्पादन काढले जाते. सुमारे ३३% शेतजमीन मक्याच्या पिकाखाली आहे. गव्हाखालील क्षेत्रही मोठे असले, तरी उत्पादन अपुरे पडते व गव्हाची आयात करावी लागते. अन्नधान्याबाबत ब्राझील स्वयंपूर्णतेच्या मार्गावर आहे. रबर हे नैसर्गिक पीक असून आमाझोनास, आक्री व पारा ह्या राज्यांत आढळून येते. १९७९ मध्ये नैसर्गिक व रासायनिक रबर उत्पादनाने उच्चांक गाठला होता. संत्र्यांच्या जागतिक उत्पादनात ब्राझीलचा अमेरिकेखालोखाल दुसरा क्रमांक मानला जातो. एकूण शेतजमिनीपैकी १% क्षेत्र तंबाखूच्या लागवडीखालील असून बाईआ, रीओ ग्रांदे दू सूल व सांता कातारीना राज्यांत तंबाखूचे पीक घेतले जाते. बाईआ तंबाखू गर्द काळ्या रंगाचा असून तो सिगारसाठी, तर फिकट रंगाचा तंबाखू सिगारेट निर्मितीसाठी वापरला जातो. जागतिक उत्पादनापैकी ८% तंबाखू ब्राझीलमध्ये होतो. भारतीय तागाला पर्याय म्हणून कॅरोआ तंतू वनस्पतीची लागवड केली जात आहे. १९३० पासून टुंग वृक्षांची लागवड करण्यात आली असून टुंग तेल व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहे. बटाटे, ऊस, घेवडा, सोयाबीन, भुईमूग ही पिकेही ब्राझीलमध्ये काढली जातात. जागतिक उत्पादनापैकी ४८% वाख ब्राझीलमध्ये होतो. कार्नोबा मेणाचा ब्राझील हा प्रमुख उत्पादक देश मानला जातो. ब्राझीलमध्ये अद्यापही रीओ दे जानेरोच्या उत्तरेकडील भागात फिरत्या शेतीची पद्धती प्रचलित आहे. द. ब्राझीलमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण झालेले आढळून येते. इतरत्र पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. ब्राझीलच्या जमिनीत क्षारता अधिक आढळते, परंतु खतांचा दर हेक्टरी वापर मात्र अल्प प्रमाणावर होतो. शेतजमिनीचे सरासरी आकारमान १९६९ मध्ये ७९.४ हेक्टर होते. ब्राझीलचा एक शेतकरी पाच व्यक्तींना पुरेसे धान्य पिकवू शकतो हेच प्रमाण अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये १ : ३० असे आहे. साऊँ पाउलू, पाराना, मीनास झिराइस ह्या त्रिकोणी पट्ट्यात प्रगत शेती तंत्र वापरले जाते व ह्याच भागातून देशातील शेती उत्पादनातील मोठा हिस्सा निर्माण होतो. उत्तर ब्राझीलमध्ये शेतजमिनीचे मोठे आकारमान, तर ईशान्येकडे निर्वाह पातळीपेक्षाही कमी आकाराचे क्षेत्र आढळते. अपुरा पतपुरवठा, गुदामांच्या अपुऱ्या सोई व सदोष वितरणव्यवस्था ह्या ब्राझीलच्या शेती विकासातील प्रमुख अडचणी होत.

देशातील १९७९ मधील काही प्रमुख कृषीउत्पादने पुढीलप्रमाणे-(हजार टन) : कॉफी २,५८९ कोको ३०४ तांदूळ ७,५८९ टॅपिओका २४,९३४ गहू २,९२३ मका १६,३०८ बटाटे २,१४८ टोमॅटो १,५०० घेवडे २,१८७ केळी ४०९ संत्री ९,८८२ कापूस १,६३६ ताग २९ तंबाखू ४२३ एरंडी ३,२७८ द्राक्षे ७०४ सोयाबीन ९,९५९ ऊस १,३८,३२५.

सबंध जगात पशुधनाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या देशांमध्ये ब्राझीलची गणना होते. डुकरांच्या पैदाशीत ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो. मांस उत्पादन प्रामुख्याने अंतर्गत बाजारपेठांसाठी होते. शेतजमिनीपैकी ५०% जमीन चराऊ कुरणांसाठी राखून ठेवली जाते. केवळ मोठ्या शहरांमध्ये दुग्धव्यवसाय विकसित झालेला असल्यामुळे देशाच्या समग्र अर्थव्यवस्थेत त्याचे किरकोळ स्थान आहे. प्रामुख्याने झेबू जातीची गुरे पाळली जातात. ५०% पशुधन मीनास झिराइस, माटू ग्रोसू, गॉइआस ह्या राज्यांत आहे. पाराना, मीनास झिराइस, रीओ ग्रांदे दू सूल ही राज्ये वराहपालनासाठी, तर मीनास झिराइस व रीओ ग्रांदे दू सूल ही राज्ये घोड्यांच्या पैदाशी साठी प्रसिद्ध आहे. रीओ ग्रांदे दू सूल, कांता कातारीना तसेच मीनास झिराइस, रीओ दे जानेरो, साऊँ पाउलू, पाराना या राज्यांत दूध व तज्ज्न्य उत्पादनासाठी डच व जर्सी गुरे पाळली जातात. एकूण मेंढ्यांपैकी ५०% रीओ ग्रांदे दू सूल ह्या प्रांतात आहेत. एकूण कृषि विभागातील उत्पन्नापैकी सु. ३३% कृषिउत्पादन पशुपालनाद्वारे निर्माण होते. १९७९ मध्ये देशात पुढील प्रमाणे पशुधन होते (आकडे लक्षांत) : गुरे ९०० डुकरे ३६० मेंढ्या १८० शेळ्या ७४ घोडे ६० गाढवे १७.५० खेचरे १७ कोंबड्या (१९७८) ३२००.

देशातील सु. ६५% भाग वनव्याप्त असून जगातील १०% सर्वसंपन्न अरण्यप्रकार ब्राझीलमध्ये आढळतात. असे असूनही केवळ ६% वनव्याप्त क्षेत्राचाच वापर केला जातो. ॲमेझॉन व अटलांटिक किनाऱ्यांलगतच्या प्रदेशात टणक लाकूड असलेल्या, तर दक्षिणेकडे पाराना पाइन वृक्षांचे अरण्य आहे. ॲमेझॉन प्रदेशातील पर्जन्यवनांत वाहतुकीच्या अपुऱ्या सोयी व हेक्टरी सु. १०० विविध वृक्षप्रकार असल्यामुळे त्यांची व्यापारी दृष्टीने उपयुक्तता कमी मानली जाते. दक्षिणेकडील प्रांतांत होणारे ॲरॉकॅरीआ हे मऊ लाकूड औद्योगिक उपयोगांसाठी वापरले जाते. ॲमेझॉन प्रदेशातील टणक लाकूड उत्कृष्ट दर्जाचे असूनही त्याचा उपयोग अद्याप केला जात नाही. माते, सेरा या प्रकारच्या ताडांपासून लाख, डिंक व फळे मिळतात. ब्राझीलवुडचा वापर रंग तयार करण्यासाठी होतो. पाराना पाइन ह्या प्रकारच्या वृक्षाच्या लाकडाला अधिक मागणी असून लोणारी कोळसा, सरपण यांसाठी ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. रोझवुड हे फर्निचरसाठी वापरले जाणारे लाकूड प्रामुख्याने इश्पीरीतू सँतू ह्या राज्यात होते बॉबासू, ब्राझील नट या वृक्षांचीही लागवड फर्निचर लाकडासाठी मोठ्या प्रमाणात केली जाते. माते ह्या वनस्पतीचा उपयोग पेय तयार करण्यासाठी केला जातो. इपेकॅक, कोकेन, अफू इत्यादींचे उत्पादन करता येईल अशा अनेक औषधी वनस्पतीही ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. नीळ, रेझिन, सेल्यूलोज, तेलांश असलेली फळे, वाख, रबर ही इतर महत्त्वाची वनउत्पादने होत. १९७५ मधील लाकडाचे उत्पादन (लक्ष घ. मी.) मृदू लाकूड २३९.९ त्यांपैकी कापीव लाकूड, रेल्वे स्लीपरसाठी फळ्या ७०.२० औद्योगिक उपयोगासाठी ३,७ सरपण १५०.० लगदा १६.० कठीण लाकडाचे एकूण उत्पादन (लक्ष घ. मी.) १,४०० पैकी कापीव लाकूड, स्लीपरचे लाकूड ९३.०५ लगदा २४.००, इतर औद्योगिक उपयोग ३३.००, सरपण १,२५०.०.

मत्स्योद्योग: ब्राझीलला सु. ७,८४० कि. मी. लांबीचा द. अटलांटिक सागराचा विस्तीर्ण किनारा लाभलेला असूनही मासेमारीकडे व्यापारी दृष्टीने लक्ष देण्यात आलेले नाही. दक्षिणेस रीओ ग्रांदे दू सूल, सांता कातारीना आणि ईशान्येकडील पारा, मारान्यँओंच्या किनाऱ्यावर प्रामुख्याने मासेमारी चालते. हा व्यवसाय अद्यापि अविकसित आहे. १९७७ मध्ये ७.५२ लक्ष टन मासे पकडण्यात आले. ईशान्य किनाऱ्यावर अद्यापही मच्छीमारी बेभरवशाच्या तराफ्यांतून जुन्या तंत्रानुसार हा व्यवसाय करतात. ईशान्य किनाऱ्यालगत ग्रुपर, बॅराकुडा, व्होडर जातींचे मासे सापडतात. उत्तर किनाऱ्याजवळ खेकडे, झिंगे, शेवंडा, कासवे सापडतात. दक्षिण किनाऱ्याजवळ सार्डीन, अँकोव्ही, म्युलेट, कॉर्व्हिना व बॅगारे हे मासे सापडतात. रीओ ग्रांदे दू सूलच्या किनाऱ्यापासून दूर समुद्रात ट्यूना मासा अलीकडे मोठ्या प्रमाणात मिळू लागला आहे. थोड्या प्रमाणात शेवंडा निर्यात केला जातो. अलीकडे अमेरिकी व जपानी मच्छीमार कंपन्यांनी समुद्रात मासे पकडण्याचा परवाना मिळविला असून डबाबंद उद्योगाचा विकास केला जात आहे. १९७१ मध्ये किनाऱ्यापासून ३२० किमी. पाण्यात मासेमारी करण्याचा अधिकार ब्राझीलला मिळाला आहे.

शक्तिसाधने: जगातील सर्वाधिक जलविद्युत् निर्मितीची संभाव्यता असणाऱ्या देशांत ब्राझीलची गणना केली जाते (अंदाजे १,०४,४५० मेवॉ.) १९७८ मध्ये ब्राझीलची प्रतिष्ठापित क्षमता २५,२२९ मेवॉ. होती. १९७७ मध्ये १,२२८.४० लक्ष कि. वॉ. ता. एवढे वीज उत्पादन झाले. त्यापैकी ९३% जलविद्युत् उत्पादन होते. कोळशाची कनिष्ठ प्रत तसेच अपुरा अशुद्ध तेलपुरवठा यांमुळे देशातील औष्णिक वीजनिर्मितीवर मर्यादा पडते. ब्राझीलमध्ये पहिला अणुशक्ती प्रकल्प रीओ दे जानेरो येथे १९७५ मध्ये पूर्ण झालेला असून त्याची विद्युत् निर्मितीक्षमता ६,००,००० किवॉ. आहे. १४ जलविद्युतकेंद्रे, ३ अणुशक्ती प्रकल्प व अनेक औष्णिक प्रकल्पांद्वारे १९७६ ते १९८७ या अवधीत २२,७९७ मेवॉ. वरून ५०,९५६ मेवॉ. पर्यंत विद्युत निर्मितिक्षमता वाढविण्याचे ब्राझीलचे उद्दिष्ट आहे. पाराना नदीवरील प्रकल्पांपैकी झूप्या येथे असलेल्या धरणाची वीजनिर्मितीक्षमता १२ लक्ष किवॉ. असून इल्हा सोल्तेइरा येथे ३२ लक्ष किवॉ. विद्युतक्षमतेचे धरण बांधले जात आहे. पाराना नदीवरील ईताश्पू प्रकल्पामुळे ब्राझीलची एकूण प्रतिष्ठापित क्षमता १९१० मध्ये ६,३६,००० मेवॉ. पर्यंत जाईल असा अंदाज आहे. युरेनियमचे दोन मोठे निक्षेप सापडल्यानंतर ब्राझीलने १९७७ मध्ये प. जर्मनीशी आण्विक करार केला असून त्यानुसार १९९० पर्यंत १०,००० मेवॉ. क्षमतेची ८ अणुविद्युतकेंद्रे उभारली जाणार आहेत. ब्राझीलचे पहिले अणुशक्तिकेंद्र रीओ दे जानेरो राज्यातील आंग्रा दुस रेस येथे उभारण्यात आले असून त्याची क्षमता ६३० मेवॉ. आहे. तेथेच आणखी दोन प्रकल्प उभारण्यात यावयाचे आहेत.


खनिज संपत्ती: ब्राझील हा विपुल खनिज संपत्ती असलेला देश म्हणून ओळखला जातो. वसाहत राजवटीत सोन्याच्या व हिऱ्यांच्या खाणींकडे अधिक लक्ष पुरविण्यात आले. नंतरच्या काळात औद्योगिक हिरे, बिलोरी स्फटिक, क्रोम यांना महत्व प्राप्त झाले. आधुनिक काळात लोह व मँगॅनीजच्या खाणींना महत्व प्राप्त झाले आहे. अद्यापही ब्राझीलची खनिजोत्पादन संभाव्यता पूर्णपणे विकसित झालेली नाही.

मीनास झिराइस येथे १६९३ मध्ये सोने सापडल्यामुळे ब्राझील जगातील एक प्रमुख सुवर्णोत्पादक देश ठरला. परंतु पोर्तुगीज वसाहतीने त्याचा सतत १०० वर्षे लाभ घेतल्याने हा साठा संपुष्टात आला. लोह खनिज निक्षेप मोठ्या प्रमाणात असणारे ब्राझील हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र मानतात. मीनास झिराइस आणि आमाझोनास राज्यांतही लोह खनिज साठे मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. आग्नेय भागात हेमॅटाइटच्या टेकड्या असून तेथील खनिजात ५०% ते ६५% लोह मिळते, तर माटू ग्रोसू राज्यातील तांबड्या मातीच्या शंक्वाकृती डोंगरदऱ्यांमधील खनिजातील लोहप्रमाण ५८% आढळते. आमाझोनासच्या उत्तरेस मकापा येथे व इतर विभागांतही लोह खनिज आहे. पारा राज्यातील काराझास येथे जगातील सर्वांत मोठ्या लोह खनिज निक्षेपांपैकी एक असल्याचे आढळले असून तेथील खनिज काढण्याचे काम चालू झाले आहे (अंदाजे साठा १,८०० कोटी टन). सबंध जगातील उच्च प्रतीच्या लोह खनिजांपैकी ६६% लोह खनिज येथील साठ्यांमध्ये असल्याचे आढळले आहे.

मँगॅनीज निक्षेप मोठ्या प्रमाणात असलेला ब्राझील हा जगातील एक महत्त्वाचा देश मानला जातो. एकूण मँगॅनीज निक्षेपांपैकी ६६% माटू ग्रोसू व ३४% आमापा, मीनास झिराइस व बाईआ राज्यांत आहे. एकट्या आमापा विभागातच सु. १ कोटी टनांवर मँगॅनीज निक्षेप आहेत. रीओ ग्रांदे दू सूल, सांता कातारीना, पाराना व साऊँ पाउलू या राज्यांत कोळशाचे अंदाजे ५०० कोटी टन साठे आहेत.

खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचाही विस्तृत साठा देशात आहे. त्यापैकी ७७.२% उत्पादन बाईआ राज्यात होते. परंतु  खनिज तेलाबाबत ब्राझील स्वयंपूर्ण नाही. सुमारे ७५% गरजा तेल आयातीद्वारे भागवाव्या लागतात. १,१३० ल. मे. टन तेलसाठा ब्राझीलमध्ये असल्याचे मानले जाते. खनिज तेल शुद्धीकरणाचे १३ प्रकल्प ब्राझीलमध्ये आहेत. १९७४ मध्ये घेतलेल्या तेलशोधाचे निष्कर्ष आशादायक आहेत. त्यामुळे सु. ९०% खनिज तेल अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकले. खनिज तेलास पर्यायी इंधन म्हणून अल्कोहॉल वापरण्यास सरकार प्रोत्साहन देत असून १९८२ पासून सु. ९० हजार मोटार गाड्या इंधनासाठी अल्कोहॉलचा वापर करतील, असा अंदाज आहे. विद्युत् उपयोगासाठी लागणारा क्वॉर्टझ पुरविणारा ब्राझील हा एकमेव देश आहे. पाश्चात्य जगतात क्रोमाइट खनिज उत्पादनात ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अभ्रकाच्या जागतिक उत्पादनात ब्राझील हा पाचवा, तर झिर्कोनियमच्या उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सैंधव, टंगस्टन, रॉक क्रिस्टल, बॉक्साइट, ॲस्बेस्टस, डोलोमाइट अशी विविध खनिजे आणि निकेल, कथिल, जस्त, चांदी, मौल्यवान रत्ने यांची खनिजे ब्राझीलमध्ये सापडतात. मीनास झिराइसमधील एकाच खाणीतून सोने मिळते. हिऱ्यांच्या खाणीतील उत्पादन घटत आहे.

देशातील काही खनिजोत्पादने पुढीलप्रमाणे होती (१९७८) (लक्ष मे. टनात) : लोह खनिज १,०३८.९६ बॉक्साईट १४.०१ कथिल ०.१ कोळसा (१९७९) ११८.१६ अशुद्ध खनिज तेल (१९८०) ८९.५४ टंगस्टन ४.३० शिसे २.७४ ॲस्बेस्टस २०.८० टिटॅनियम ०.२० मॅग्नेसाइट ४.०९ ग्रॅफाइट ०.५३ क्रोम ९.५७ क्वॉर्टझ ०.९५. यांशिवाय त्याच वर्षी सोने ९,४५९ किग्रॅ. हिरे ८५,८०३ कॅरट व नैसर्गिक वायू २४.९० लक्ष घ. मी. (१९७९) असे उत्पादन झाले. सबंध जगात ब्राझील हा बेरिलियमचे उत्पादन करणारा पहिला क्रमांकाचा देश असून (१९७४ : ४३ टन), झिर्कोनियमचे उत्पादन करणारा तिसऱ्या क्रमांकाचा (१९७८ : ४,३०१ टन), तर अभ्रकाचे उत्पादन करणारा पाचव्या क्रमांकाचा (१९७७ : ३७० टन) देश मानला जातो.

उद्योगधंदे : १९७४ मध्ये औद्योगिक क्षेत्रात सु. ३४ लक्ष कामगार गुंतलेले होते. एकूण कामगारांशी हे प्रमाण २० टक्के आहे. १९७१ ते १९७५ ह्या काळात ब्राझीलचा औद्योगिक वाढीचा दर १०% होता. ब्राझीलमध्ये साखर, अन्नप्रक्रिया, सुती कापड, रेशीम, रेयॉन, लोकर, ताग हे पारंपारिक कच्च्या मालावर आधारलेले जुने उद्योग असून प्रशीतक, दूरचित्रवाणी संच, स्वयंचलित वाहने, धुलाई यंत्रे इत्यादींची देशात निर्मिती होत आहे. पूर्वी मात्र त्यांची आयात करावी लागत असे. पोलाद, खनिज तेल रसायने, सिमेंट, बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री, स्वयंचलित वाहने व त्यांचे सुटे भाग, विद्युत् साहित्य ह्या उत्पादनांद्वारे देशाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत.

साऊँ पाउलू हे प्रमुख औद्योगिक केंद्र असून देशातील एकूण उत्पादन मूल्यापैकी ५०% उत्पादन तेथे होते साऊँ पाउलू राज्यात कापड, रसायने, औषधे, विद्युत् उत्पादने, स्वयंचलित वाहने, सिमेंट, रबर, लोखंड व पोलाद, यंत्रनिर्मिती  हे उद्योग विकसित झाले आहेत. ह्या राज्यात साऊँ पाउलू, सुरुकाबा, रीबेरँओं प्रेतू, झूंद्याई ही प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. रीओ दे जानेरो शहराच्या उपनगराच्या आसपासच्या १,०७० चौ. किमी. परिसरात अन्नप्रक्रिया, कापड, रसायने, विविध प्रकारच्या धातूंच्या वस्तू व भांडी, सिगार व सिगारेटी, रबरी वस्तू, कागद असे विविध उत्पादनांचे कारखाने आहेत.

बेलेम येथे प्रक्रिया उत्पादने व साखर बेलारीझाँती येथे लोखंड व पोलाद, कापड कॅपीनास येथे कातडी वस्तू, कागद, साखर पोर्तू आलेग्रे येथे अन्नप्रक्रिया, जहाजबांधणी रेसीफे येथे कापड, साखर सॅल्व्हादॉर येथे कापड, अन्नप्रक्रिया व साखर कारखाने आहेत. मीनास झिराइस, रीओ दे जानेरो विभागांत ५०% कारखाने व ७५% कामगार असल्यामुळे तेथे औद्योगिक केंद्रीकरण झालेले आढळून येते. कँपूस हे साखर व फळांवरील प्रक्रियांसाठी व याच राज्यातील झ्वीस दी फॉरा हे शहर कापड निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.


औद्योगिक क्षेत्रातील एकूण भांडवल गुंतवणुकीपैकी ८०% अवजड उद्योगांत असून त्यापैकी लोखंड व पोलाद उद्योगात सर्वाधिक भांडवल गुंतलेले आहे. रीओ दे जानेरो ते साऊँ पाउलू या लोहमार्गावरील पाराईबा खोऱ्यातील व्हॉल्ता रिदोंदा येथील पोलाद प्रकल्प हा लॅटिन अमेरिकी राष्ट्रांतील सर्वांत मोठा मानला जातो. मोटारगाड्यांच्या निर्मितीत ब्राझीलने लक्षणीय प्रगती केलेली आहे. १९७७ मध्ये ब्राझील हे मोटारगाड्या निर्मितीमध्ये जगातील पाचव्या क्रमांकाचे राष्ट्र होते. कापड उद्योगाद्वारे देशातील २०% रोजगार पुरविला जातो. ब्राझीलमध्ये ३० सिमेंट कारखाने आहेत. सिगारेट उत्पादनात १० मोठ्या राष्ट्रांपैकी ब्राझील हे एक राष्ट्र समजले जाते. माँती आलेग्रे येथे दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठी कागद व लगदा तयार करणारी गिरणी आहे. फर्निचर, घरगुती वापराची साधने, कातडी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, रेडिओ व दूरचित्रवाणी संच, टायर इ. वस्तूंचे निर्मितिउद्योगही महत्त्व पावले आहेत. औद्योगिक दृष्ट्या ब्राझीलने स्वयंपूर्णता गाठली असून कृषि उद्योग, रसायने, खते, कागद, अलोह धातू, औषधे, सेल्यूलोज इत्यादींच्या निर्मितीमध्ये वेगाने प्रगती घडवून आणण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. एकेकाळी नैसर्गिक रबराच्या उत्पादनात अग्रेसर असलेला  हा देश १९६२ पासून कृत्रिम रबर निर्मितीकडे वळला आहे. रासायनिक उद्योगात विविधता येत आहे. औषधी उद्योगातही लक्षणीय प्रगती झालेली आहे. ब्राझीलमध्ये सु. ४५० औषधी प्रयोगशाळा व प्रकल्प असून त्यांतील बहुतेक साऊँ पाउलू येथे असून ह्या उद्योगातील सु. ८०% कंपन्या परकीय मालकीच्या आहेत. जपान, हॉलंड आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या राष्ट्रांच्या मदतीने ब्राझील सरकारने १९५८ मध्ये जहाजबांधणी व्यवसाय सुरू केलेला आहे. विशिष्ट विभागात उद्योगधंदे विकसित होण्यासाठी काही काळपर्यंत उद्योसंस्थांना करमाफी दिली जाते. देशातील १९७९ मधील काही प्रमुख उत्पादने पुढीलप्रमाणे होती : पोलाद १३० लक्ष टन सिमेंट २४, ८७६ टन रेडिओ संच ७५९ हजार नग दूरचित्रवाणी ४,८३८ हजार नग सुती कापड १,०७६ ह. मीटर नत्रयुक्त खते २,७३,००० मे. टन फॉस्फेट ११,८६,००० मे. टन कागद (१९७८) २५,३४,००० मे. टन मोटारी १० लक्ष टुंग तेल ८,८८६ टन.

कामगार संघटना: ब्राझीलमध्ये ४५%, तर औद्योगिक क्षेत्रात १८% श्रमशक्ती गुंतलेली आहे. १९६९ मध्ये २ हजार कामगार संघटनांची नोंदणी झालेली असून त्यांपैकी ४०० साऊँ पाऊलू विभागात होत्या. औद्योगिक कलह सोडविण्यासाठी कामगार न्यायालये व कामगार समेट मंडळे यांना महत्त्व आहे. १९६४ पासून कामगार संघटनांचे सामर्थ्य क्षीण झालेले आहे. राज्य घटनेने सार्वजनिक सेवा व अत्यावश्यक सेवा यांव्यतिरिक्त  अन्य क्षेत्रांत कामगारांचा संप करण्याचा हक्क मान्य केलेला आहे. किमान वेतन कायदा केवळ शहरांत अंमलात आलेला आहे. तसेच महत्त्वाच्या मोठ्या शहरांत चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. डॉक्टरांची व वैद्यकीय, तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

सार्वजनिक उपयुक्ततेच्या सेवा व उपक्रम यांमध्ये १९७८ च्या वटहुकुमाद्वारे संप करण्यास मनाई घालण्यात आलेली आहे. त्यांमध्ये खनिज तेल, वाहतूक संदेशवहन, रुग्णालये, विद्युत् उद्योग आणि इतर सार्वजनिक सेवांचा समावेश होतो. जर कामगार संपावर गेला, तर त्याला समज दिली जाईल अथवा तात्काळ बडतर्फ केले जाईल किंवा २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल, असे सरकारने कडक धोरण स्वीकारले आहे. उद्योग, वाहतूक, शिक्षण, व्यापार, शेतमजूर या क्षेत्रांतील ९ महासंघांचे एकत्रीकरण करून ‘नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ इंटस्ट्रियल वर्कर्स’ अशी एक मध्यवर्ती संघटना स्थापन केली जाईल, असे सरकारने १९७८ मध्ये जाहीर केले.

ब्राझीलमध्ये १९२३ पासून सामाजिक सुरक्षा पद्धती कार्यवाहीत आहे. १९६३ मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल सिक्युरिटी’ या संस्थेद्वारे सामाजिक सुरक्षा लाभ देण्याचे कार्य सुरू झाले.

देशात १९७८ मध्ये राष्ट्रीय सामाजिक विमा पद्धति कार्यवाहीत आली. आरोग्य, शुश्रूषा आणि सामाजिक विमा व साहाय्य यांसाठी दोन संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. कामगारांच्या वेतनापैकी ८%व तितकीच रक्कम मालक व सरकार या दोघांकडून घेतली जाऊन त्या निधीतून सामाजिक सुरक्षेवर खर्च केला जातो. आजारपणातील अर्थसाहाय्य, वार्धक्यवेतन, प्रसूती व कुटुंब-भत्ता, सेवानिवृत्तिवेतन अशा प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजना चालू आहेत.

आर्थिक धोरण व नियोजन: १९६४ नंतर अंदाजपत्रकातील तूट कमी करणे, राष्ट्रीयीकरण रद्द करून खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे हे शासकीय धोरणाचे प्रमुख सूत्र दिसून येते. काही उद्योगांत खाजगी क्षेत्रात एकूण स्थिर भांडवल उभारणीत शासनाने प्रत्यक्ष सहभाग दिलेला आहे. खाजगी उपक्रमांवर शासनाने थोडी बंधने घातली आहेत. अशुद्ध खनिज तेल व जलविद्युत् विकास, वाहतूक व संदेशवहन हे विभाग ब्राझीलियन नागरिक व उद्योगसंस्था यांसाठी कायद्याने राखून ठेवले आहेत. सरकारने खनिज तेल निक्षेपाचे पूर्वेक्षण, समन्वेषण, अशुद्ध तेलाचे शुद्धीकरण आणि किनाऱ्यालगतच्या नळमार्गाने खनिज तेलाची वाहतूक करणे, खनिज तेल व उपउत्पादनांची जहाज वाहतूक करणे ही कार्ये आपल्या अखत्यारीत ठेवली आहेत. संघराज्याचा अधिक आर्थिक सहभाग असलेल्या ‘पेट्रोबाझ’ह्या संयुक्त महामंडळाकडे या कार्याबाबत एकाधिकार देण्यात आलेला आहे. पेट्रोबाझला खनिज तेलाची आयात करण्याचीही मक्तेदाही देण्यात आली आहे. ‘पेट्रोक्विसा’ही पेट्रोब्राझची संलग्न संस्था असून ती खनिज तेल रसायन विकासासाठी खाजगी भांडवलाचा सहयोग घेऊ शकते. ‘नॅशनल फ्लीट ऑफ पेट्रोलियम टँकर्स’ही संस्थाही पेट्रोब्राझची दुसरी संलग्न संस्था असून ती खनिज तेलाची वाहतूक करते. सार्वजनिक उपयुक्तता सेवांमध्ये सरकारचा सहभाग आहे. ब्राझीलमधील १३ ते २५ रेल्वे कंपन्यांचे सूत्रसंचालन ‘फेडरल रेल्वे नेटवर्क’करते. ‘मर्चंट्स मरीन कमिशन’जहाजबांधणी व वाहतुकीवर देखरेख करते. ‘इलेट्रोबाझ’ह्या महामंडळाद्वारे सरकारने विद्युतनिर्मितीत सहभाग घेतलेला आहे. हे संमिश्र महामंडळ १९६२ मध्ये स्थापन झाले असून ७ दुय्यम संस्था व २८ सहयोगी कंपन्या यांद्वारे देशातील सर्व विद्युत् सेवांना वित्त प्रबंध करण्याचे व राष्ट्रीय विद्युतशक्ती विकासाच्या नियोजनाचे काम पाहते. इलेट्रोबाझ हा लॅटिन अमेरिकेतील एक मोठा उपक्रम मानला जातो.

आर्थिक नियोजनासाठी संघराज्य, राज्य आणि उपराज्य अशा पातळ्यांवर अनुक्रमे नियोजन व आर्थिक समन्वय मंत्रालय, नियोजन सल्लागार समिती व अंतर्गत मंत्रालये या तीन मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. विकास कार्यक्रमात खासगी क्षेत्रांची उद्दिष्टे अंतर्भूत असतात. ही उद्दिष्टे सरकारच्या आर्थिक प्रोत्साहनामुळे स्वयंस्फूर्तीने पूर्ण केली जावीत, असे सरकारचे धोरण दिसते. उद्योगांची स्थापना व विस्तार, कृषी विकास, वन व मत्स्योत्पादन यांचा विकास, चलनवाढविरोधी धोरण, मागास विभागांचा विकास ही नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. उत्तरेकडील व ईशान्येकडील मागास विभागांचा विकास करण्यासाठी विकास अधीक्षणालये स्थापन करण्यात आली आहेत. या विभागांतील मान्यताप्राप्त प्रकल्पांना आयात कर, औद्योगिक वस्तूंवरील कर माफ करण्यात आले असून प्राप्तिकारंत ५०% पर्यंत सूट देण्यात येते. शेती उत्पादनवाढीसाठी किमान किंमती, पतपुरवठा व खतांच्या वापरासाठी अर्थसाहाय्यही देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

ब्राझीलमध्ये घडून आलेल्या १९६४ च्या लष्करी क्रांतीनंतर नव्या सरकारने त्वरित सार्वजनिक खर्चात कपात करून अंदाजपत्रकातील तूट कमी केली व चलनवाढ रोखण्याच्या दृष्टीने पावले टाकली रेल्वे, पोस्ट व जलवाहतूक दरांत वाढ करून पगारवाढ रोखली. कायदेशीर किमान वेतन एक वर्षातून एकदा ठरवून द्यावे असे निर्धारीत करण्यात आले. पुढे १९७० मध्ये नवे किमान वेतन दर प्रत्येक ३ वर्षानंतर ठरवून देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यांत बदल करण्याची परवानगी नव्हती. काही अन्नधान्यांच्या कमाल किंमती ठरवून देण्यात आल्या व किंमती रोखण्यासाठी कंपन्यांच्या करांत सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. हा काळ (१९६४-७४) अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणाचा होता, त्यामुळे आर्थिक वाढ १% पेक्षा कमी होती. १९६७ पासून सरकारने हा दर वाढविण्यासाठी विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले. १९६४ मध्ये क्रूझेरोचे एक ते दोन टक्क्यांनी महिन्या-दोन महिन्यांनंतर अवमूल्यन करण्यात आले.


पहिली विकास योजना १९६९ ते १९७३ ह्या वर्षात कार्यवाहित आली. पहिल्या योजनेत सु.७%ते ९%राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे, औद्योगिक उत्पादन ११%, गुंतवणूक १२%, निर्यात १०%वाढविण्याचे उद्दिष्ट होते. १९७५-७९ मध्ये दुसरी राष्ट्रीय विकास योजना कार्यान्वित झाली. तिचे उद्दिष्ट दरडोई उत्पन्न १,२६४ डॉलरपर्यंत उंचावण्याचे होते. शिक्षण, आरोग्य, सेवा विकास व अधःसंरचना सुधारणे ही इतर महत्त्वाची उद्दिष्टे होती.

ईशान्य विभागाचा विकास करण्यावर १९७१ नंतर अधिक भर देण्यात आला आहे. ट्रान्स-आमाझोनिका आणि कूयबा-सँतारेम ह्या महामार्गाची बांधणी सुरू झाल्यामुळे ३७ हजार चौ. किमी. प्रदेश विकासासाठी खुला झाला आहे.

ब्राझीलचा आर्थिक विकासाचा दर १९७१ नंतर सतत उच्च राहिला आहे. ब्राझीलच्या लोह खनिजाची जागतिक मागणी वाढली आहे. जागतिक बाजारात ब्राझीलियन वस्तू स्पर्धा करीत आहेत. अद्यापही ब्राझील कॉफीच्या निर्यातीवर विसंबून राहतो. आंतरराष्ट्रीय कॉफी कराराचे भवितव्य अनिश्चित असल्यामुळे हे उत्पादन भरवंशाचे नाही. ब्राझीलने अपारंपारिक पिके घेणे आवश्यक आहे. ब्राझीलमध्ये परकीय गुंतवणूक व कर्जे वाढत आहेत. अद्यापही ब्राझीलमध्ये उत्पादन क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. निर्यात मागणी व अंतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांची सुप्त क्षमता व मनुष्यबळ पूर्णपणे वापरात आले पाहिजे. चलवाढीची समस्या अद्यापही सुटू शकली नाही. आर्थिक वाढीचा १०% हा दर चलनाच्या अवमूल्यनामुळे राखता आलेला आहे. दक्षिण व नैऋत्य प्रदेश मध्यम प्रमाणात विकसित आहेत, पण उरलेला सर्व प्रदेश अद्यापही अविकसित आहे. ब्राझीलमध्ये दरवर्षी कामगारसंख्येत १० लाखांची भर पडत आहे. अशा अनेक समस्यांना ब्राझीलला सामोरे जावे लागत आहे.

व्यापार : ब्राझीलमध्ये साऊँ पाउलू, रीओ दे जानेरो ही प्रमुख व्यापारकेंद्रे आहेत. आयात निर्यात, विक्री व वितरण संस्थांची प्रमुख कार्यालये ह्या शहरांत स्थापन झालेली आहेत. रेसीफे, पोर्तू आलेग्रे ही इतर महत्वाची केंद्र मानली जातात. ॲमेझॉन नदीखोऱ्यास बेलेम या शहरातून निर्मिती वस्तूंचा पुरवठा होतो. बाईआमध्ये व शेजारील राज्यांत सॅल्व्हादॉर हे केंद्र विविध वस्तूंचा पुरवठा करते. विपणी कायद्यानुसार नोंदणी केलेल्या सर्व व्यक्तींना व्यापार करता येतो. मोठ्या शहरांमध्ये सुपर बाजार व विभागीय भांडारे आहेत. व्यापारी संस्थांमध्ये सरासरीने सहांपेक्षा कमी नोकर आढळून येतात. सरकार, कामगार संघटना, उपभोक्ते यांद्वारे स्वतंत्रपणे सहकारी संस्था चालविल्या जातात. शेतीमध्ये व मासेमारीत उत्पादकांच्या सहकारी संस्था आहेत. कामाचे तास सकाळी ८ ते ९ पासून सायंकाळी ५ ते ६ पर्यंत असून अनेक व्यवसाय व दुकाने शनिवारी दुपारी बंद असतात. १९४७ नंतर विविध माध्यमांतून जाहिरात व्यवसाय वाढत गेलेला आहे. सुमारे ४०० जाहिरात वितरण संस्था ब्राझीलमध्ये काम करतात, त्यांपैकी बहुतेक साऊँ पाउलू येथे आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार: १९५७ ते १९७० ह्या काळात ब्राझीलचा वर्षानुवर्षे अनुकूल असलेला व्यापार प्रतिकूल झाला. खनिज तेलाची मोठ्या प्रमाणावर झालेली आयात व तेलाच्या वाढत्या किंमती यांमुळे ब्राझीलचा व्यवहारशेष प्रतिकूल झाला. १९७९ मध्ये ५०,०१३.४० कोटी क्रूझेरो मूल्याची आयात, तर ३९,३५३.१० कोटी क्रूझेरोंची निर्यात झाली.

अशुद्ध खनिज तेल, यंत्रसामग्री, खते, अँथ्रॅसाइट, कोळसा, वाहने व गहू या प्रमुख आयात वस्तू असून निर्यात प्रामुख्याने कॉफीबिया, यंत्रसामग्री, सोयाबीन, कोकोबिया, वाहने, साखर व निर्मित वस्तू यांची केली जाते. १९७९ मध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, नेदर्लंडस, जपान, अर्जेंटिना, ग्रेट ब्रिटन, इटली, फ्रान्स आणि पोलंड ह्या राष्ट्रांकडे प्रामुख्याने निर्यात झाली आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इराक, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, प. जर्मनी, जपान या देशांतून आयात झाली. लहान उद्योगांच्या संरक्षणासाठी व शासकीय महसूल वाढविण्यासाठी ब्राझीलने १९५७ साली जकातींमध्ये सुधारणा केल्या. ब्राझील हा ‘लॅटिन अमेरिकन फ्री ट्रेड एरिया’ (लॅफ्टा) या संघटनेचा संस्थापक सदस्य होता. पुढे १९८० मध्ये हा संघ बंद पडून त्याऐवजी ‘लॅटिन अमेरिकन इंटिग्रेशन असोसिएशन’ (एल्.आय्.ए.) ह्या नव्या आर्थिक गटात ब्राझील सामील झालेला होता.

निर्यातवाढीसाठी ब्राझील नव्या बाजारपेठा शोधत आहे. तिसऱ्या जगातील देशांशी ब्राझील व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन व इतर देशांना सु. ६० कोटी डॉलरचे लोखंड व पोलाद पुरविण्याचे कंत्राट ब्राझीलला मिळाले आहे. ब्राझीलच्या निर्यातवाढीच्या मोहिमेस प्रतिसाद म्हणून अनेक देशांनी ब्राझीलला व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी सूचना केलेली आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा १०% आहे, पण देशाच्या खनिज तेलाच्या व यंत्रसामग्रीच्या तुलनेने तो फारसा मोठा म्हणता येणार नाही. निर्यातीतील कॉफीचे महत्वही कमी झालेले दिसून येते. १९६० मध्ये निर्यात उत्पन्नापैकी कॉफीद्वारे ५६% तर १९७० मध्ये ३६% उत्पन्न मिळाले. पारंपारिक निर्यात वस्तूंपैकी मँगॅनीजचा वाटाही कमी झाला आहे. बदलते विनिमय दर व चलनाचे अवमूल्यन यांद्वारे ब्राझील निर्यातवाढीसाठी प्रयत्नशील आहे.

अर्थकारण : १९६३-६४ मध्ये ब्राझील आर्थिक संकटात येण्याचे महत्त्वाचे कारण तुटीचा अर्थभरणा, हे होते. १९६५-६७ मध्ये अस्तित्वात आलेल्या राज्यघटनेनुसार सध्याची करपद्धती आहे. केंद्रसरकारद्वारे जमीन महसूल, औद्योगिक उत्पादन व आर्थिक व्यवहारांवरील कर, वाहतूक व दळणवळण कर इंधन, वंगण, वीज व खनिजोत्पादनांवरील उत्पादन कर आणि आयात, वितरण यांवरील जमा होणारा कर राज्ये व नगरपालिका यांना ठरविलेल्या प्रमाणात वाटला जातो. राज्यांना व्यापारी विक्री व्यवहार, स्थावर मालमत्तेचे हस्तांतर यांवर संघराज्य सरकारने ठरविलेल्या दरांप्रमाणे कर गोळा करता येतो. व्यक्तिगत उत्पन्नावर ३% ते ५%, तर कंपन्यांच्या नफ्यावर ३०% असा प्रत्यक्ष कर लादला जातो. अप्रत्यक्ष करांपैकी औद्योगिक वस्तूंवर मूल्यसंवर्धित कर (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स) आकारण्यात आले असून त्यांचा दर १५% ते १८% असा असतो. सार्वजनिक सेवा, काही व्यावसायिक सेवा व किंमत नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था यांना सवलतीचे दर असतात.

सार्वजनिक आय स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३०% आहे. हे प्रमाण औद्योगिक विकसित राष्ट्रांमधील आढळून येणाऱ्या प्रमाणापेक्षा अधिक मानले जाते. १९७१ मध्ये कारभार कमी करण्यासाठी औद्योगिक वस्तू व व्यापारी व्यवहार यांवरील विक्री कर कमी करण्यात आले. साक्षरता प्रसाराच्या मोहिमेस देणग्या देणाऱ्यांच्या प्राप्तिकरात सूट देण्यात आली आहे. १९७६ ते १९७८ यांदरम्यान अंदाजपत्रक शिलकी ठेवण्यात आले होते. विविध प्रकारचे कर व सरकारी मालमत्ता ही प्रमुख उत्पन्नाची साधने, तर संरक्षण, शिक्षण, वाहतूक, सामाजिक कल्याण, अर्थपुरवठा ह्या प्रमुख खर्चाच्या बाबी होत. १९७९ मध्ये असे समतोल अंदाजपत्रक होते. सार्वजनिक आय आणि व्यय प्रत्येकी ४७,०८३ कोटी क्रूझेरो होते. ३१ डिसेंबर १९८० अखेर ५,४४० कोटी अमे. डॉलर परकीय कर्जे होती. ३१ डिसेंबर १९७५ अखेर ६,०१० कोटी क्रूझेरो अंतर्गत कर्जे उभारण्यात आली होती.


आर्थिक वाढीचा उच्च दर निर्माण होण्यास १९६१ ते १९७५ ह्या काळात परकीय गुंतवणूक उपयुक्त ठरली आहे. परकीय भांडवल गुंतवणुकीस आकर्षित करण्यासाठी नफ्यातील रक्कम देशाबाहेर नेण्यास १९६४ मध्ये मनाई घातली होती, तीत थोड्या सवलती देण्यात आलेल्या आहेत.

वाहने, औषधे, सुटे भाग, रसायने, यंत्रनिर्मिती इत्यादींच्या उद्योगांत परकीय गुंतवणूक अधिक असून गुंतवणूक करणारे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, प. जर्मनी, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, जपान हे प्रमुख देश असून काही उपक्रमांना जागतिक बँक, आंतर अमेरिकन विकास बँक यांची कर्जे व अनुदाने लाभली आहेत.

चलन: क्रूझेरो हे ब्राझीलचे विधिग्राह्य चलन असून ते १०० सेंतॅव्होंमध्ये विभागलेले आहे. सध्याचे क्रूझेरो चलन १५ मे १९७० पासून अंमलात आलेले असून १९६७ मध्ये सुरू झालेल्या नव्या क्रूझेरो चलनाशी समान किंमतीचे ठेवण्यात आले आहे. नवा क्रूझेरो १,००० = जुने क्रूझेरो असा दर फेब्रुवारी १९६७ मध्ये ठरवून देण्यात आलेला होता.

१, २, ५, १०, २० आणि ५० सेंतॅव्हो व १ क्रूझेरोची नाणी असून १, ५, १०, ५०, १०० व ५०० क्रूझेरोंच्या कागदी नोटा वापरात आहेत. मार्च १९८२ मध्ये प्रचलित असलेला विदेश विनिमय दर १ अमे. डॉलर = १४० क्रूझेरो आणि १ पौंड स्टर्लिंग = २५६ क्रूझेरो असा होता.

बँका : डिसेंबर १९७८ मध्ये एकूण बँकिंग संस्था १०७ असून त्यांच्या १०,२२२ शाखा होत्या. संस्थांपैकी ५९ खासगी बँका, १६ परकीय बँका, २२ स्टेट बँका, ६ फेडरल बँका होत्या. बँकिग व वित्त पुरवठ्याची रचना १९६५ च्या बँकिंग सुधारणांवर आधारलेली असून चलन निर्गमन व बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी ३१ डिसेंबर १९६४ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ‘बँको सेंट्रल द ब्राझील’ या मध्यवर्ती बँकेकडे कामकाज सोपविण्यात आले. ‘कॉन्सेल्हो मॉनिटारिओ नॅशनल’ (नॅशनल मॉनेटरी कौन्सिल) या मंडळाचे अध्यक्ष अर्थमंत्री असून मंडळ चलनविषयक धोरण ठरविते व हे धोरण मध्यवर्ती बँक कार्यवाहीत आणते. बँक ऑफ ब्राझील ही १९०८ मध्ये स्थापन झालेली सर्वांत मोठी व्यापारी बँक असून ती १९६५ पूर्वी मध्यवर्ती बँकेचे काम पाहत असे.

ह्या व्यापारी बँकेच्या १९७८ मध्ये १,२३५ शाखा देशभर कार्य करीत होत्या. व्यापारी बँका केवळ अल्प मुदतीची (९० दिवसांसाठी) खेळत्या भांडवलाकरिता कर्जे देतात. १९५१ ते १९७१ या काळात चलनवाढीमुळे बँकांची संख्या वाढली. १९७१ ते १९७५ या काळात बँकांची संख्या मर्यादित रहावी, असा कटाक्ष ठेवण्यात आला. या काळात व्यापारी बँकांवर सार्वजनिक क्षेत्राचा प्रभाव वाढला. राज्य सरकारच्या मालकीच्या व्यापारी बँका व संघराज्याच्या मालकीची बँक ऑफ ब्राझील यांमध्ये एकूण बँकांच्या ठेवींपैकी ५०% रक्कम होती. ‘नॅशनल बँक ऑफ क्रेडिट कोऑपरेटिव्ह्ज ही बँक कृषिमंत्रालयाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली असून ती सहकारी चळवळीला अर्थप्रबंध करते.

देशात एकूण १४ वायदेबाजार असून सर्वांत मोठा वायदेबाजार रीओ दे जानेरो येथे आहे. त्याचा विकास १९६७ नंतर वेगाने झालेला आढळून येतो. येथील वायदेबाजारात सु. २०० व साऊँ पाउलू येथे सु. ५०० वायद्यांचे व्यवहार केले जातात. पोर्तू आलेग्रे, व्हितोरिया, रेसीफे, सँतुस व साऊँ पाउलू येथे कृषी बाजारपेठा आहेत. रीओ दे जानेरोचा अपवाद केल्यास सर्व वायदेबाजारांवर राज्य सरकारचे पर्यवेक्षण व नियंत्रण असते.

ब्राझीलमध्ये विमाव्यवसायही वाढत आहे. देशी विमा कंपन्यांकडे ८३% व्यवसाय असून परदेशी कंपन्यांकडे १७% आहे. तीस मोठ्या देशी विमा कंपन्या सु. ३३% व्यवसाय करतातत. देशी व परदेशी कंपन्यांना आपल्या उत्पन्नापैकी काही भाग ‘रिइन्शुअरन्स इन्स्टिट्यूट ऑफ ब्राझील’ या सरकारी संस्थेकडे पुनर्विमा म्हणून ठेवावा लागतो.

वाहतूक: ब्राझीलच्या आर्थिक विकासात रस्ते व लोहमार्ग यांच्या अपुऱ्या सोयी हा एक अडथळा मानला जातो. अटलांटिक किनाऱ्यालगतच्या दाट लोकवस्तीच्या केंद्रांमध्ये रस्ते व लोहमार्ग बांधण्यात येऊन नंतर ते अंतर्गत विभागात वाढविण्यात आले आहेत. देशात अद्यापही वाहतूकसेवांमध्ये समन्वय साधण्यात आलेला नाही. किनाऱ्यावरील जलवाहतुकीवर अधिक अवलंबून रहावे लागते. अरण्य, नद्या, पर्वत व मोठे तुटलेले कडे, भांडवलाची कमतरता ह्या अडचणींमुळे वाहतूक सोयी अधिक विकसित झालेल्या नाहीत. काही विस्तृत प्रदेशांत तर हवाई वाहतुकीवर अवलंबून रहावे लागते. ब्राझीलने त्यामुळेच अंतर्गत हवाई वाहतूक सेवेचे जाळे निर्माण केले आहे.

महामार्ग हे ब्राझीलच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असून त्याद्वारे १९७४ मध्ये ७०% माल वाहतूक व ९०% प्रवासी वाहतूक होत होती. बहुतेक रस्ते फरसबंदी न केलेले व नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे ट्रकद्वारे मालवाहतुकीचा खर्च अधिक येतो. सुमारे ७०% ट्रक वाहतुकीसाठी (खनिज तेल व सुटे भाग) परकीय चलन खर्च होते. रस्ते व लोहमार्ग समांतर असल्यामुळे काही प्रदेशांत वाहतूक सेवा पुरेशा प्रमाणात विस्तारीत झालेल्या नाहीत. पेट्रोल कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून रस्ते बांधण्यात येतात. अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांपेक्षा वाहतूक क्षेत्रात जलद प्रगती होत आहे. १९७८ मध्ये १५,४४,५१९ किमी. लांबीचे महामार्ग असून ८९,६१,३१५ मोटारगाड्या होत्या. त्यांपैकी ४७,९२,३४४ प्रवासी गाड्या २९,०७,७३१ व्यापारी वाहने ट्रॅक्टर, बसगाड्या तसेच छोट्या मालवाहतूक गाड्या मिळून १,०८,३०४ होत्या. एकूण मार्गांपैकी दक्षिणेकडील राज्यांत अधिक रस्ते केंद्रित झालेले आढळून येतात.

पूर्वी वाहतूकदृष्ट्या उपेक्षित असलेल्या ॲमेझॉन खोऱ्यात रस्ते बांधले जात आहेत. त्यांपैकी ब्राझील्या ते बेलेम हा उत्तरेकडील व ब्राझील्या ते पोर्तू व्हेल्यू हा पश्चिमेकडील असे दोन्ही रस्ते महत्त्वाचे मानले जातात. ट्रान्स ॲमेझॉनियन महामार्ग १९७४ मध्ये पूर्ण झाला. तो रेसीफे काबिदेलू ते पेरूच्या सीमेपर्यंत असून तो ५,००० किमी. लांबीचा आहे. कूयबा ते सँतारेम हा महामार्ग ४,१३८ किमी. लांब असून तो उत्तर दक्षिण विभाग जोडतो. ३,५५५ किमी. लांबीच्या ट्रान्स ब्राझीलियाना प्रकल्पाद्वारे ट्रान्स ॲमेझॉनियन महामार्गावरील माराबा व यूरग्वाय सरहद्दीवरील आसेग्वा ही शहरे जोडली जाणार आहेत. प्रवासी वाहतुकीसाठी लांब पल्ल्याच्या जलद बससेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ‘नॉर्दर्न पेरिमीटर हायवे’चे बांधकाम १९७३ मध्ये सुरू झाले. हा महामार्ग ब्राझीलच्या ईशान्य सीमेवरून धावतो व ट्रान्स ॲमेझॉनियन महामार्गाच्या पश्चिमेकडील शेवटच्या स्थानकास येऊन मिळतो.

राज्य व नगरपालिका यांच्या रस्त्यांच्या विकास आणि दुरुस्ती तसेच रस्त्यांचे राष्ट्रव्यापी जाळे निर्माण करण्यासाठी ब्राझीलमध्ये राष्ट्रीय रस्ता विकास मंडळ १९४५ मध्ये स्थापन झालेले आहे.


ब्राझीलमध्ये १९७७ मध्ये एकूण ३०,३०० किमी. लांबीचे लोहमार्ग असून १,१६९.९० कोटी प्रवासी किमी. वाहतूक व ६,७७२.१० कोटी टन मालवाहतूक केली जात होती. देशातील बहुतेक ठिकाणी लोहमार्गांची व्यवस्था समाधानकारक दिसून येत नाही. १९६६ – ६७ मध्ये ६,६०० किमी. लांबीचे लोहमार्ग तोट्यात चालत असल्यामुळे बंद करण्यात आले. नागमोडी वळणाचे व तीव्र चढउतारांचे मार्ग व जुनी सामग्री ही महत्त्वाची अडचण दिसून येते. ब्राझीलमध्ये ५० रेल्वे एंजिने ३० वर्षांपेक्षा जुनी दिसून अनेक डबे लाकडी आहेत. देशात पाच विविध मापी मार्ग वापरले जातात त्यांपैकी ९०% मार्ग मीटर मापी आहेत. एकूण लोहमार्गांपैकी ५०% साऊँ पाउलू, रीओ दे जानेरो, मीनास झिराइस, ग्वनबार राज्यांत आहेत. ब्राझीलमध्ये सु. ४० लोहमार्ग असून त्यांतील अनेक मार्ग सुसूत्रपणे जोडलेले नाहीत. बहुतेक लोहमार्ग बंदरांशी जोडलेले आहेत, वाहतूक घनता दक्षिणेकडे  सर्वाधिक, तर ईशान्येकडे सर्वांत कमी आढळते. लोहमार्गांची मालकी संघराज्याची व राज्य सरकारांची आहे.

ब्राझीलची अर्थव्यवस्था विकसित होत असता रेल्वेमार्गाचा विस्तार न झाल्यामुळे रस्तावाहतूक आणि व्यापारी हवाई वाहतूक यांवर ताण पडतो. लहान मापी मार्गांच्या रुंदीकरणासाठी व आधुनिकीकरणासाठी सरकारने योजना आखलेल्या आहेत.

फेडरल रेल्वे कॉर्पोरेशन ह्या रेल्वे प्रशासन महामंडळाची स्थापना १९५७ मध्ये झाली असून या प्रशासनाखाली १४ रेल्वे मार्गांचे ४ विभाग येतात १९७० मध्ये एकूण २४,८६४ किमी. लोहमार्गांचे प्रशासन हे महामंडळ करीत होते. हे महामंडळ संमिश्र असून त्याचे अधिक भाग संघराज्याने घेतलेले आहेत. याव्यतिरिक्त राज्य सरकारच्या मालकीचेही लोहमार्ग असून त्यांपैकी साऊँ पाउलू लोहमार्ग महत्त्वाचा आहे. ह्या महामंडळाची स्थापना १९७१ मध्ये झाली असून १९७९ मध्ये २,३८७ किमी. लोहमार्गावर वाहतूक केली जात होती.  काही खासगी मालकीचेही लोहमार्ग आहेत. नव्या वाघिणी, विद्युतीकरण, मार्गरुंदीकरण, नवे मार्ग ह्यांद्वारे वाहतूक सुधारण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय वाहतूक योजनेद्वारे १९७९ अखेर २,३०० किमी. नवे मार्ग आणि ५०० किमी. मार्गांचे रुंदीकरण, ९०० किमी. मार्गांचे विद्युतीकरण व १४,००० किमी. मार्गांवर सुधारणा व्हावयाच्या होत्या.

ॲमेझॉन, पाराना, साऊँ फ्रॅसीश्कू ह्या तीन मोठ्या नद्यांतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक होऊ शकते. ॲमेझॉनमधून पेरूतील ईकीटॉसपर्यंत ३,८६० किमी. सुलभपणे वाहतूक होऊ शकते. महासागरगामी बोटी नदीपात्रातून आत मानाऊस शहरापर्यंत (१,६०० किमी.) येऊ शकतात. नद्यांतून सु. ३५,२६० किमी. वाहतूक होऊ शकते. नद्यांतून वाहतूक वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून ॲमेझॉन व पाराना नद्या जोडून देशाच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची सोय उपलब्ध करण्याची योजना आहे.

ब्राझीलच्या किनाऱ्यालगतच्या व्यापारासाठी (कच्चा माल, अन्नधान्य व निर्मित वस्तू) जहाजवाहतूक महत्त्वपूर्ण आहे.

सागरी वाहतुकीसाठी ब्राझीलमध्ये खोल पाणी असलेली ३६ बंदरे असून त्यांपैकी सँतुस ह्या एका बंदराद्वारे ३० टक्के वाहतूक हाताळली जाते. रीओ दे जानेरो हे दुसरे प्रमुख बंदर असून इतर १८ मोठी बंदरे आहेत. सँतुस हे बंदर बोलिव्हिया व पॅराग्वाय देशांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. सँतुस, रीओ दे जानेरो, परानाग्वा, रेसीफे, व्हितोरिया, तूबारँओं ही लोहखनिज निर्यातीची  बंदरे म्हणून ओळखली जातात. सँताना बंदरातून मँगॅनीज निर्यात होते. रेसीफे व मकीओ बंदर साखर निर्यातीसाठी, तर ईल्येऊस हे बंदर कोको निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

साऊँ सिबास्तँओं (साऊँ पाउलू), ब्रेझू दा माद्री दा देउस (बाईआ) येथे तेल आयात केले जाते. ह्या बंदरांचा विस्तार करण्यात येत आहे. सिपिटीबा येथे लोहखनिज निर्यातीसाठी व साऊँ पाउलू राज्यात साखर निर्यातीसाठी बंदरे बांधण्याची योजना आहे.

ब्राझीलची सागरी वाहतूक क्षमता इतर लॅटिन अमेरिकी राष्ट्रांपेक्षा अधिक आहे. १९७८ मध्ये ब्राझीलमधील बंदरांनी ३४,५८९ जहाजांना सेवा उपलब्ध करून दिली. त्याच वर्षी ब्राझीलकडे १०० टन आणि त्यांपेक्षा अधिक वहनक्षमता असलेली ५८५ जहाजे होती आणि एकूण टनभारक्षमता ४०,०७,४८९ टन इतकी होती.ब्राझीलमधील बंदरांतून ८,७५,१७,००० मे. टन माल १९७८ मध्ये चढविण्यात आला, तर ६,९७,९०,००० मे. टन माल उतरविण्यात आला.

रस्ते व लोहमार्ग यांच्या अपुऱ्या सोयींमुळे हवाई वाहतूक विकासाला चालना मिळाली आहे. ब्राझीलमध्ये एकूण १,४५३ विमानतळ असून त्यांपैकी १०३ तळांवरून नियमित व्यापारी हवाई वाहतूक व ३५ जेट विमानांची वाहतूक होते. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रामुख्याने रीओ दे जानेरो व साऊँ पाउलू येथून होते. रीओ दे जानेरो येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १९७७ मध्ये झाले असून साऊँ पाउलू येथील दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ १९८३ मध्ये बांधून पूर्ण होईल. पोर्तू आलेग्रे, कँपू ग्रँडी, ब्राझील्या, सॅल्व्हादॉर, रेसीफे, बेलेम व मानाऊस येथेही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

ब्राझीलमध्ये ३८ विमानकंपन्या वाहतूक करतात. त्यांपैकी २५ परकीय आहेत. चार ब्राझीलियन कंपन्या देशभर हवाई वाहतूक करतात. हवाई वाहतुकीमुळेच ब्राझीलच्या प्रत्येक विभागात प्रवेश करता येणे शक्य झाले आहे. १९७९ मध्ये १.०२ कोटी प्रवाशांची व १७८.९ कोटी टनांची मालवाहतूक करण्यात आली. ३१ डिसेंबर १९७८ रोजी ब्राझीलकडे व्यापारी वाहतुकीसाठी एकूण १९ विमाने होती. ‘व्हॅस्प’ ही देशांतर्गत हवाई वाहतूक करते‘व्हॅरिग’ व ‘क्रूझेरो’ या दोन ब्राझीलियन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कंपन्या अनुक्रमे दीर्घ पल्ल्याची व दक्षिण अमेरिकी देशांना हवाई वाहतूक सेवा उपलब्ध करतात.

देशात १९७८ मध्ये डाक व तार कार्यालयांची संख्या ४,३२३ होती. देशातील प्रमुख नागरी विभाग दूरध्वनी व बिनतारी संदेशांद्वारे जोडण्यात आले असून १९७७ मध्ये ४७,०८,००० दूरध्वनी संच होते.

देशात १९७७ मध्ये एकूण ३१८ दैनिक वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असून त्यांचा खप १३,२१,००० होता. लोकसंख्येच्या तुलनेने वृत्तपत्रांचा खप कमी वाटतो. ओ एस्तादू द साऊँ पाउलू (१.९२ लक्ष प्रती), जर्नल दू ब्राझील (१.७० लक्ष) व ओ ग्लोबो(२.०० लक्ष) ही सर्वाधिक खपाची दैनिके होत. वृत्तपत्रांचा खप कमी असण्याचे प्रमुख कारण वितरणातील येणाऱ्या अडचणी हे होय. त्यामुळेच ब्राझीलमध्ये राष्ट्रीय पातळीवर वृत्तपत्रे निघण्यात अडचणी येतात. १९६७ च्या वृत्तपत्र कायद्यान्वये निनावी पत्रकारिता, सैन्यदले व इतर सार्वजनिक संस्था यांविरुद्ध बदनामीकारक मजूकर छापण्यास बंदी आहे.

परकीय नागरिक किंवा प्रमंडळांना वृत्तपत्र किंवा बिनतारी संदेश केंद्र चालविण्यास मनाई घालण्यात आलेली आहे. १९७८ मध्ये सरकारने अभ्यवेक्षण शिथिल केलेले आहे.


लोक व समाजजीवन: दक्षिण अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ निम्मी लोकसंख्या एकट्या ब्राझीलमध्ये एकवटलेली आहे. परंतु ही जागतिक लोकसंख्येच्या फक्त २.६ टक्के आहे. कायमच्या वसाहतकाळापासून (१५३२) विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत (१९८०) देशातील लोकसंख्येत खूपच झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते. वसाहतकाळात देशात स्थानिक इंडियनांशिवाय ५७,००० इतर लोक होते तर १९०० साली ही संख्या १,७३,१८,००० व त्यानंतर १९८० साली १२,३०,००,००० पर्यंत वाढली. १९७४ मध्ये देशातील जननप्रमाण दर हजारी ३६.८ होते. देशातील लोकसंख्येत दरवर्षी स्थलांतरितांचीही भर पडते. स्थलांतरितांत प्रामुख्याने पोर्तुगीजांचे प्रमाण जास्त असून त्यांच्या खालोखाल स्पॅनिश, इटालियन, जर्मन, पोलिश व जपानी लोकांचा समावेश असतो. हे स्थलांतरित देशाच्या दक्षिण भागातील औद्योगिक परिसरात वास्तव्य करतात. १९६९ पासून स्थलांतरितांचे प्रमाण कमी झाले आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ६५ वर्षे वयाच्या आतील लोकांची संख्या जास्त असल्याने हा ‘तरुण लोकसंख्येचा देश’ म्हणून समजला जातो. देशातील स्त्री पुरुषांचे प्रमाण जवळ जवळ सारखेच (१०० ९८.८) आहे. इतर देशांप्रमाणेच ब्राझीलमध्येही खेड्यांतील लोकांचा ओघ औद्योगिक क्षेत्रांकडे वाढत आहे. दक्षिण व आग्नेय भाग औद्योगिक व दाट लोकवस्तीचा, तसेच आधुनिकीकरण झालेला आहे तर त्यामानाने उत्तर व ईशान्य भाग ग्रामीण, पारंपारिक रूढींचा व उमराव शाहीचा असल्याने सामाजिक दृष्ट्या देशाचे दोन भाग पडतात. शिवाय सागरी किनाऱ्यावरील लोकांना यूरोपीय व उ. अमेरिकन यांच्या अनुकरणाची ओढ आहे तर अंतर्गत भागांत राहणाऱ्यांना भविष्यकाळात संपूर्ण देशाची प्रगती होणे आवश्यक वाटते. त्यांच्या प्रभावामुळेच १९६० साली सागर किनाऱ्यावरील रीओ दे जानेरो येथील राजधानी अंतर्गत भागातील ब्राझील्या येथे हलविण्यात आली. देशात १९८० साली लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला १५ होती. औद्योगिकीकरणामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात (विशेषतः आग्नेय) लोकसंख्येची घनता जास्त (दर चौ. किमी. ला १००) आहे. देशातील सु. ९०% लोक या भागात राहतात. देशाच्या एकूण क्षेत्रापैकी सु. २/३ भाग विरळ वस्तीचा असून या भागात प्रामुख्याने श्वेतवर्णीय, निग्रो व इंडियन यांचे प्रमाण जास्त आढळते.

ब्राझीलमधील समाज अनेक वंशांच्या मिश्रणातून बनलेला असल्याने येथील वांशिक गटांचे वर्गीकरण करणे अवघड आहे. सुरुवातीच्या काळात देशात इंडियन हे मूळ रहिवासी, पोर्तुगीज वसाहतकार, आफ्रिकेतून आणलेले निग्रो गुलाम, अन्य यूरोपीय व आशियाई देशांतून आलेले लोक, असे वांशिक गट होते. परंतु कालांतराने पोर्तुगीज व इंडियन यांतून निर्माण झालेले मामलुक तसेच आफ्रिकेतील निग्रोंपासून झालेले मुलेटो यांच्यातून निर्माण झालेले कॅफुसोस असे गट निर्माण झाले. वर्णानुसार देशात १९५० साली श्वेतवर्णीय ६२% निग्रो ११%, तपकिरी २७% व पूर्वेकडील देशांतील ०.५% असे प्रमाण होते. यांशिवाय काही प्रमाणात अमेरिकन इंडियन असून ते ॲमेझॉन व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतील जंगलांत राहतात. मध्य ब्राझीलच्या  पठारी प्रदेशात इंडियनांच्या काही भटक्या जमाती आढळतात. देशात हळुहळू श्वेतवर्णीयांचे प्रमाण वाढत आहे. उत्तरेस ॲमेझॉनच्या खोऱ्यात बव्हंशी तपकिरी (पार्दो) वर्णाचे लोक असून ईशान्येस व पूर्वेस तपकिरी ४०% व निग्रो १३%, तर दक्षिण भागात या दोहोंचे प्रमाण प्रत्येकी १०% आढळते. क्लिष्ट व बहुजातीय संमिश्रण झाल्याने ब्राझीलमधील लोकांत जातीयवाद फारसा आढळत नाही.

ब्राझील हा बहुसंख्य रोमन कॅथलिक धर्माचे लोक असलेला जगातील एक मोठा देश आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ९१% लोक या धर्माचे आहेत. १९७० साली त्यांची संख्या ८,५४,७२,०२२ होती, तर याच वर्षी प्रॉटेस्टंट पंथीय ४८,१४,७२८ व चैतन्यवादी (स्पिरिच्युॲलिस्ट) ११,७८,२९३ होते. आधुनिक काळात ब्राझीलमधील चर्चनी प्रसिद्धी पद्धतींचा वापर करून राजकीय व सामाजिक जीवनात प्रवेश केल्याचे दिसून येते. देशातील सामाजिक जीवनात प्रगती घडवून आणण्यात (विशेषतः ग्रामीण व गरीब लोकांत) रोमन कॅथलिक चर्चचा मोठा वाटा आहे. कॅथलिक धर्मप्रसारकांनी देशातील बऱ्याच भागांत गरीब व ग्रामीण लोकांसाठी घरे व शिक्षणाच्या सोयी केल्या आहेत. देशात प्रॉटेस्टंटांची फक्त ५% चर्च असून ती बव्हंशी ल्यूथरन पंथीयांची आहेत. देशाच्या दक्षिण व पूर्व भागांतील शहरांत ॲग्लिकन, इव्हँजेलिकल व मेथडिस्ट पंथीयांची चर्च असून यांच्या अनुयायांत बव्हंशी मध्यमवर्गीयांचा समावेश आहे. चैतन्यवादी या तिसऱ्या धार्मिक गटाचे दोन पंथ आहेत. पहिला एकोणिसाव्या शतकातील ‘यूरोपियन स्पिरिच्युॲलिस्ट’ चळवळीच्या अनुयायांचा असून त्यात मध्यमवर्गीय व कामकऱ्यांतील उच्च वर्गाचे लोक आहेत. ‘उम्बांडा’ या दुसऱ्या पंथात कामकरी वर्गातील (प्रामुख्याने ईशान्य व पूर्व भागांतील) लोक जास्त असलेले दिसून येतात. येथील मूळचे इंडियन व आफ्रिकेतून आलेले निग्रो गुलाम यांच्या धार्मिक रूढी व चालीरीतींवर या धार्मिक गटाची मूलतत्वे आधारित आहेत.

ब्राझीलच्या मानवी जीवनावर यूरोपचा व आफ्रिकेचा प्रभाव जास्त पडलेला दिसून येतो. ईशान्य ब्राझीलच्या कमी उत्पादक व शेती व्यवसायातील लोकांचे राहणीमान कमी प्रतीचे, तर औद्योगिक क्षेत्रात ते उच्च प्रतीचे आहे. लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात व कडधान्ये यांचा समावेश असतो. ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांच्या आहारात टॅपिओका वनस्पतीच्या मुळापासून बनविलेल्या पिठाचा समावेश असतो. राष्ट्रीय आहारात भाजलेले डुकराचे मांस व गोमांस यांचा समावेश असतो. द. ब्राझीलमध्ये शिजविलेल्या गोमांसाच्या ताटाला ‘चुरास्को’ म्हणतात. देशातील लोकांचे कॉफी हे मुख्य व आवडते पेय आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात ‘माते’ या रुंदपर्णी वनस्पतीच्या पानांपासून ‘येर्बा माते’ (कडक चहा) हे पेय तयार करतात.

देशातील बहुतेक लोक पाश्चात्त्य पद्धतीचा पोशाख करतात. निग्रो स्त्रिया मात्र लांब झगा, डोक्यावर रुमाल व अंगावर शाल घेतात याशिवाय हातात बांगड्या, गळ्यात हार घालतात. दक्षिण ब्राझीलचा ‘काउबॉय’ मोठी जीनची टोपी व डगला, सैल पायजमा, कातडी कमरपट्टा व उंच टाचांचे बूट घालतो. ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात पँपास प्रदेशातील गुराख्याला ‘गाउचो’ म्हणतात. ब्राझीलच्या ईशान्य अर्ध शुष्क प्रदेशात गुराख्यांना ‘व्हॅक्वेइरो’ म्हणतात. काटेरी झुडुपांपासून संरक्षण व्हावे म्हणून ते पूर्णपणे कातडी पोशाख घालतात.

अनेक शेतकरी लहान घरांत राहतात. त्यांची घरे लाकूड, माती, दगड चुन्यांत बांधलेली असून छपरे कौलारू असतात. ॲमेझॉन प्रदेशातील इंडियन लोक पाम वृक्षांच्या पानांनी शाकारलेल्या झोपड्यांत राहतात. मोठमोठ्या शेतांत मध्यभागी साठागृह बांधलेले असते व त्यात पहिला मजला शेतीची अवजारे ठेवण्यासाठी आणि दुसरा मजला राहण्यासाठी असतो.

उत्तर ब्राझीलमधील घरांत खलाशांच्या झोळीसारखा झूला असतो व त्याचा बिछाना म्हणून उपयोग करतात. हा ‘इंडियन झूला’ या नावाने ओळखला जातो. ब्राझीलमध्ये राष्ट्रीय गृहनिर्माण कायदा १९६४ मध्ये करण्यात आला व त्याचबरोबर देशात राष्ट्रीय गृहनिर्माण बँक स्थापन करण्यात आली. देशात १९६४ सु. २३% लोकांना घरांची सोय उपलब्ध करून देण्यात आली. २३ जून रोजी येणारा कॅथलिकांचा ‘सेंट जॉन्स ईव्ह’ हा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी होळी पेटवून तीभोवती नातलग व मित्रमंडळी जमा होऊन कागदी चेंडूचा खेळ खेळतात व गाणी म्हणतात. याशिवाय ‘कार्निव्हल’ हा उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा करतात. रीओ दे जानेरो येथील हा उत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा करतात. रीओ दे जानेरो येथील हा उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. लेंट सणापूर्वीच्या मंगळवारी संध्याकाळी खूप मोठी मिरवणूक निघते व तिच्यातील उत्तम प्रदर्शनाला बक्षिसे दिली जातात. या उत्सवात गायन नृत्याचेही कार्यक्रम होतात. उत्सवासाठी रीओ दे जानेरोतील काही संगीत व नृत्य शिक्षणसंस्था वर्षभर तयारी करतात.


समाजकल्याण व आरोग्य : देशात समाज सुरक्षा व्यवस्था १९२३ पासून अस्तित्वात असून, १९६० मध्ये तीमध्ये काही बदल करण्यात येऊन १९६६ मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल सिक्यूरिटी’ (इनपस) ची स्थापना करण्यात आली. परंतु १९६८ मध्ये तीमध्ये पुन्हा काही बदल करण्यात आले. शहरी कामगार, ग्रामीण कामगार व नागरी कामगार यांच्या संघटना रद्द करून ‘नॅशनल सोशल इन्शुअरन्स अँड ॲसिस्टंस इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल केअर’ व ‘सोशल इन्शुअरन्स अँड ॲसिस्टंस इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शिअल ॲडमिनिस्ट्रेशन’ या संस्थांची स्थापना करण्यात आली. समाजसुरक्षा व्यवस्थेत कामगार आणि सरकार यांमार्फत इनपसमध्ये सारख्या प्रमाणात रक्कम जमा केली जाऊन त्यामार्फत आजारपण, वार्धक्य, विधवा निवृत्तिवेतन, बाळंतपण व कुटुंबभत्ता इत्यादींसाठी साहाय्य केले जाते.

देशातील लोकांचे आरोग्य सुधारणे, ही ब्राझील सरकारपुढील एक जटिल समस्या आहे. ग्रामीण भागातील वास्तव्य, लोकांचा आहार, लोकांचे राहणीमान इत्यादींमुळे आरोग्याबाबत सुधारणा करणे भाग पडते. १८०० ते १९०० च्या पूर्वार्धात उष्णकटिबंधीय विविध रोगांमुळे दरवर्षी अनेक लोक मृत्युमुखी पडत. परंतु शासनाने या बाबतीत योजनाबद्ध प्रयत्न केल्याने १९६० पासून देशातून पीतज्वर, देवी इ. रोगांचे जवळजवळ निर्मूलन झालेले आहे, तर हिवताप व बालमृत्यूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यात आले आहे. रिओ दे जानेरो येथील पीतज्वर व इतर रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय शोधणारी ‘ऑझ्वाल्दो क्रूझ इन्स्टिट्यूट’, साऊँ पाउलू येथील ‘बुटँटन इन्स्टिट्यूट’तसेच नितेरॉय येथील ‘व्हायटल ब्राझील इन्स्टिट्यूट’या दोन्ही सर्पदंशावरील औषधनिर्मितीच्या संस्था प्रसिद्ध आहेत. १९७८ मध्ये देशात १५,३६९ आरोग्यकेंद्रातून ४,४७,५९१ खाटा होत्यात्यांपैकी ३,५२,७८५ खाटा खाजगी केंद्रामध्ये होत्या.

शिक्षण: देशात शिक्षणाचा पाहिजे त्या प्रमाणात प्रसार न झाल्याने प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम १९०० च्या मध्यापासून अवलंबणे भाग पडले. सरकारने नव्याने शैक्षणिक प्रसाराच्या दृष्टीने योजनाबद्ध प्रयत्न सुरू केले असून, साक्षरतेच्या प्रामाणात वाढ होत असल्याचे १९७१ च्या पाहणीवरून दिसून आले. तसेच प्रौढांतील निरक्षरतेचे १९७० मधील प्रमाण ३५% वरून १४% पर्यंत कमी झाल्याचे १९७७ च्या पाहणीवरून आढळते. देशात प्राथमिक शिक्षण मोफत असून ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना ते सक्तीचे आहे. असे असले, तरी ग्रामीण परिसरात शाळांचे प्रमाण कमी असल्याचे आढळले असून काही मुले रेडिओच्या शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे ज्ञान मिळवितात. अनेक माध्यमिक शाळा खाजगी संस्थांकडून चालविल्या जात असून त्या शिक्षणशुल्क घेतात. मात्र शासकीय माध्यमिक शाळांमधून मोफत शिक्षण दिले जाते. शेती व औद्योगिक शिक्षणाच्याही संस्था आहेत. साऊँ झुझे दुस कँपुस येथे विमानशास्त्र व तांत्रिक शिक्षण संस्था आहेत. उच्च शिक्षणाचा प्रसार होत असून १९७८ मध्ये देशात ६४ विद्यापीठे व ८२७ इतर उच्च शिक्षणाच्या संस्थांतून ११,१७,००० विद्यार्थी होते. विद्यापीठात सर्वात जुने विद्यापीठ रीओ दे जानेरो (१९२०), साऊँ पाउलू विद्यापीठ, रीओ ग्रांद्रे दू सूल विद्यापीठ, ब्राझील्या विद्यापीठ इ. प्रसिद्ध आहेत. देशात १९७७ मध्ये १,७४,४०३ प्राथमिक शाळांतून २,०३,६८,४३६ विद्यार्थी व ८,९३,१३८ शिक्षक३०,३३१ माध्यमिक शाळांत २४,३७,७०१ विद्यार्थी व १,६८,३६६ शिक्षकतर महाविद्यालयीन व उच्च शिक्षणाच्या ४,०७२ केंद्रांत ११,५९,४०६ विद्यार्थी व ९५,७५८ शिक्षक होते. शिक्षणप्रसारासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत असले, तरी देशाच्या सर्व भागांत सारख्या प्रमाणात त्याचा प्रसार झालेला नाही.

अकादमीसारख्या संस्थांच्या स्थापनेस प्रामुख्याने १८०८ नंतरच प्रारंभ झाल्याचे आढळते. रीओ दे जानेरो येथे १८१८ मध्ये सहाव्या जॉनने सॅमल संग्रहालय स्थापलेतर ब्राझीलियन ऐतिहासिक व भौगोलिक संस्थेची स्थापना रीओ दे जानेरो येथे १८३८ मध्ये झाली. तसेच येथे अनेक कलावीथी व संग्रहालये असून त्यांत राष्ट्रीय संग्रहालय व राष्ट्रीय ऐतिहासिक संग्रहालय ही विशेष उल्लेखनीय आहेत. साऊँ पाउलू येथील कला संग्रहालय आणि ऐतिहासिक संग्रहालय, तसेच रेसीफे व सॅल्व्हादॉर येथील संग्रहालये प्रसिद्ध आहेत. साऊँ पाउलू येथील सार्वजनिक नगरपालिका ग्रंथालय व रीओ दे जानेरो येथील राष्ट्रीय ग्रंथालय यांचा द. अमेरिकेतील मोठ्या ग्रंथालयांत समावेश केला जातो.

सावंत, प्र. रा.गाडे, ना. स.

भाषा-साहित्य:ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषा बोलली जाते. फादर ज्युझॅ द आंशियॅता (१५३३-९७), बँतु तेइशेइरा (सतरावे शतक) आणि ग्रेगॉर्यु द मातुश गॅर्रा (१६३३-९६) हे ब्राझीलमधील आरंभीचे काही साहित्यिक, ज्युझॅ द आंशियॅता ह्याने ग्वारानी ह्या दक्षिण अमेरिकन इंडियन भाषेचे पहिले व्याकरण लिहिलेकाही कविता व नाटकेही लिहिली. बँतु तेइशेइरा ह्याचे प्रॉजॉपोपेया हे महाकाव्य निर्देशनीय आहे. ग्रेगॉर्यु द मातुश गॅर्रा ह्याने ‘माउथ ऑफ द हेल’(इं. शी.) ही उपरोधिका लिहिली. तथापि खास ब्राझीलियन व्यक्तिमत्त्व असलेले पोर्तुगीज साहित्य अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून निर्माण होऊ लागले. ते राष्ट्रवादी होते. त्यातून पोर्तुगीजांच्या वसाहताला विरोध होऊ लागला. अँतान्यू ज्युझॅ द सील्व्हा, सांता रीता दुरांऊ (दोघेही अठराव्या शतकातील), मानुयॅल इनासियु दा सील्वा आल्वारँगा (१७४९-१८१४) हे स्वातंत्र्यपूर्व काळातील काही उल्लेखनीय ब्राझीलियन साहित्यिक. स्वातंत्र्योत्तर काळात अँतॉन्यू गाँसाल्विश दीयाश (१८२३-६४) हा ब्राझीलचा राष्ट्रकवी मानला जातो. माशादु द आसीज (१८३९-१९०८) ह्या साहित्यिकास जागतिक कीर्ती प्राप्त झाली. तो कवी आणि कथा-कांदबरीकार होता. दाँ काजमुर्रू ही त्याची कादंबरी प्रसिद्ध आहे. अन्य उल्लेखनीय साहित्यिकांत कवी आलावु बिलाक (१८६५-१९१८), कांदबरीकार आफ्रानिउ पेइशोतु (१८७६-१९४७) आणि कथाकार मोंतैरू लाबातु (१८८६-१९४९) ह्यांचा समावेश होतो. [ ⟶पोर्तुगीज साहित्य-ब्राझील].

रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं) कुलकर्णी, अ. र. (म.)


कला व क्रीडा : ब्राझीलच्या कला, संगीत, साहित्य इत्यादींतून ब्राझीलच्या प्राचीन संस्कृती, प्रादेशिक विविधता ह्यांचा ठसा उमटलेला आहे. ब्राझीलियन वास्तुशिल्पज्ञ, चित्रकार, संगीतकार, यांनी १९०० पर्यंत यूरोपीय कला पद्धतीचा स्वीकार व अनुकरण केल्याचे दिसून येते, परंतु तदनंतर काहींनी ब्राझीलियन कला स्वतंत्रपणे समृद्ध केली. अठराव्या शतकातील प्रमुख शिल्पकार म्हणून ‘आलेझादीन्यो’या नावाने प्रसिद्ध असलेल्या अँतॉनिओ फ्रँसीश्कू लिस्बोआ (१७३०-१८१४) याचा आवर्जून उल्लेख करावयास हवा. त्याचे शंखजिऱ्यावरील सुंदर नक्षीकाम व धार्मिक मूर्ती मीनास झिराइस राज्यातील चर्चमधून पहावयास मिळतात. मारिओ क्रॅओ याच्या कलाकृतीही उल्लेखनीय आहेत. १९२० मध्ये एमील्यानो दी काव्हालकांती, अँतीआ मालफात्ती व इतर चित्रकारांनी ब्राझीलमध्ये आधुनिक कलेचा प्रसार केला. कांदीदो पोर्तीनारी (१९०३-६२) हा विसाव्या शतकातील प्रसिद्ध चित्रकार व भित्तिचित्रकार आहे. त्याने काढलेली भित्तिचित्रे वॉशिंग्टन येथील ‘काँग्रेस लायब्ररी’मध्ये व न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या इमारतीत पहावयास मिळतात. हेइटर व्हीयालोबूस (१८८७-१९५९) हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा संगीतकार असून त्याने अनेक संगीतरचना व संगीतप्रकार निर्माण केले. त्याच्या ब्राझीलियन लोकसंगीतातील अनेक रचना प्रसिद्ध आहेत. यांशिवाय कामार्गो ग्वार्न्येरी (१९०७–), अँतॉनिओ कार्लूस गोमिस (१८३६-९६), ओस्कार लोरेंथो फेर्नांदेझ (१८९७-१९४८), क्लाउद्यो सांतोरो इ. संगीतकारांचा संगीतक्षेत्रातील कार्याबद्दल आवर्जून उल्लेख करावयास हवा. ल्युसीओ कोस्टा (१९०२–) हा ब्राझीलियन वास्तुशिल्पकलेचा संस्थापक म्हणून प्रसिद्ध असून त्याने ब्राझील्या राजधानीचा आराखडा तयार केला. तसेच ओस्कार नीमाइअर (१९०७–), रॉबेर बर्ले मार्क्स, आफोंसू एद्वार्दो रीडी इत्यादींचा ब्राझीलचा कलाकृतींमध्ये बहुमोल वाटा आहे.

रीओ दे जानेरो येथे नोव्हेंबर मध्ये वाद्यवादन व संगीतस्पर्धा घेतल्या जातात. साऊँ पाउलू येथे ‘बायेनिअल’ हा द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय कला उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये संगीतिका, नाटके इ. सादर केली जातात. जगाच्या संगीत नृत्य प्रकारास ‘सांबा’ ही ब्राझीलकडून लाभलेली देणगी होय.

‘फुटबॉल’ हा देशाचा राष्ट्रीय खेळ असून याशिवाय टेनिस, गोल्फ, पोहणे इ. खेळही लोकप्रिय आहेत. पेले हा आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेला फुटबॉलपटू, तर मारिया ब्वेने ही जगातील एक उत्कृष्ट टेनिसपटू हे ब्राझीलियन खेळाडू प्रसिद्ध आहेत.

प्रेक्षणीय स्थळे : कृषिव्यवसाय, उद्योगधंदे यांमुळे देशातील शहरांची प्रगती झपाट्याने झालेली आहे. अशा शहरांमुळे तसेच नैसर्गिक वनसंपत्तीमुळे या देशात पर्यटकांची सतत वर्दळ असते. १९७८ मध्ये ब्राझीलला ७,८४,३१६ पर्यटकांनी भेट दिली व त्यांच्यापासून देशाला १०७७ लक्ष अमेरिकन डॉलर उत्पन्न मिळाले.

राजधानी ब्राझील्या ही ब्राझीलच्या वास्तुशिल्पकलेचे उत्तम प्रतीक म्हणून ओळखली जात असून देशाचे प्रमुख आर्थिक, सांस्कृतिक, व्यापार केंद्र व महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणूनही तिला महत्व आहे. शहरात प्रसिद्ध वास्तुशिल्पज्ञ ओस्कार नीमाइअर याने तयार केलेल्या आराखड्यानुसार बांधलेला ‘पॅलेस ऑफ द डॉन’ (राष्ट्रपतिभवन), सर्वोच्च न्यायालय, ब्रूनो जोर्जीचा ‘द वॉरिअर्स’ हा पुतळा इ. प्रेक्षणीय आहेत. जगातील एक प्रमुख नैसर्गिक बंदर, रमणीय शहर व ब्राझीलची जुनी राजधानी म्हणून रीओ दे जानेरो (लोकसंख्या ५०,९३,२३२ – १९८०) प्रसिद्ध आहे. येथील पुळणी, वनस्पति उद्यान (१८०८), संग्रहालये, चर्च, राष्ट्रीय वेधशाळा इ. प्रेक्षणीय आहेत. या शहरातील ट्रामगाड्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. ॲमेझॉन नदीखोऱ्यात समृद्ध वनराजी असून पर्यटकांचे ते एक विशेष आकर्षण असते. या खोऱ्यातील बेलेम, मानाऊस ही शहरे प्रसिद्ध आहेत. सॅल्व्हादॉर, साऊँ पाउलू, रेसीफे ही शहरे औद्योगिक दृष्ट्या प्रगत असून तेथील संग्रहालये व चर्च वास्तू प्रेक्षणीय आहेत. तसेच ब्राझील अर्जेंटिना सीमेवरील सु. ७० मी. उंचीचा ईग्वासू धबधबा प्रवाशांचे खास आकर्षण आहे.

सावंत, प्र. रा. गाडे, ना. स.

संदर्भ :   1. Burns, E. B. A History of Brazil, New York, 1980.

             2. Campbell, G. Brazil : Struggles for Development, London, 1973.

             3. Dickenson, J. P. Brazi,Folkestone, 1978.

             4. Fiechter, J. A. Brazil Since 1964 : Modernisation Under a Military Regime, London, 1975.

             5. Furtado, C. The Economic Growth of Brazil, Berkeley, 1963.

             6. Saunders, J. Modern Brazil : New Patterns and Development, Gainesville, 1971.

             7. Schneider, R. M. The Political System of Brazil : emergence of a modernizing authoritarlan regime, 1964 – 70, New York, 1971.

             8. Schuh, G. E. Alves, E. R. The Agricultural Development of Brazil, New York, 1970.