यम : हिंदू पुराणकथांमधील मृत्युदेवता. ‘नियंत्रक’ व ‘जुळे’ या दोन्ही अर्थांनी यम हे नाव सार्थ आहे. कारण, यम हा पितृ लोकाचा नियंत्रक आहे. तसेच विवस्वान् (सूर्य) व त्वष्ट्याची कन्या सरण्यू (वा संज्ञा) यांना झालेल्या यम व यमी या जुळ्या अपत्यांमध्ये त्याचा अंतर्भाव आहे.
सूक्तरचना करणारा एक वैदिक ऋषी, दक्षिणेचा दिक्पाल, पहिला मृत, प्रजेच्या हिताकरिता अमरत्वाचा त्याग करून यज्ञामध्ये आत्मबलिदान करणारा पहिला यज्ञकर्ता, पहिला राजा, मानव जातीचा आद्य जनक, यमीने समागमासाठी केलेले आवाहन नाकारून बहीण-भावांचा विवाह निषिद्ध ठरविणारा समाजसुधारक (ऋ. १०·१०), यमसंहिता व यमस्मृति हे ग्रंथ लिहिणारा शास्त्रकार, दूतांना यमगीता व नचिकेत्याला मृत्यूचे रहस्य सांगणारा उपदेशक, ऐतिहासिक व्यक्तीचे झालेले दैवतीकरण, मावळत्या सूर्याचे वा चंद्राचे प्रतीक, इंडो-इराणी पुराणकथेतील यीम, कॅननाइट देव यम इ. विविध स्वरूपांत यमाचे वर्णन आढळते. परंतु ज्याचे आयुष्य संपले आहे, त्याच्या प्राणांचे आपल्या दूतांमार्फत हरण करणारी भयप्रद देवता व दूतांनी मृताच्या जीवाला संयमिनी नावाच्या यमपुरीत आणल्यावर चित्रगुप्त या अधिकाऱ्याने सांगितलेल्या त्याच्या पापपुण्याच्या हिशोबानुसार त्याला नरकादी ठिकाणी पाठविणारा कठोर न्यायाधीश, हेच त्याचे प्रमुख रूप होय.
तो काळ, कृतांत, अंतक, प्रेतराज, श्राद्धदेव, पितृपती, यमधर्म, धर्म इ. नावांनी ओळखला जातो. त्याचा एक पाय अधू, रंग हिरवा व वस्त्रे लाल असतात. त्याच्या एका हातात गदा व एका हातात कालसूत्र नावाचा पाश असतो. रेडा हे त्याचे वाहन, कबूतर व घुबड हे पक्षिदूत आणि प्रत्येकी चार डोळे असलेले दोन कुत्रे हे रक्षक आहेत. त्याची मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातात लेखणी, पुस्तक, कोंबडा व दंड असतो. बौद्ध पुराणकथेत मृत्युदेवता यम षड्भुज असून तिच्या मूर्तीच्या हृदयावर चक्राकृती अलंकार असतो.
यमीचे रूप असलेली यमुना नदी, ही बहीण, धूमोर्णा ही पत्नी, अश्विनीकुमान हे सख्खे भाऊ, छायेचे पुत्र वैवस्वत, मनू व शनी हे सावत्र भाऊ, अंगपत्नी व वेनमाता सुनीथा ही कन्या, युधिष्ठिर हा अंश व विदुर हा शापामुळे घ्यावा लागलेला त्याचा अवतार होय. कार्तिक शु. द्वितिया ही यमद्वितीया व भाऊबीज [⟶ दिवाळी] म्हणून साजरी केली जाते.
लेखक : साळुंखे, आ. ह.