यतेबॉर्य : गॉथनबर्ग. स्वीडनमधील यतेबॉर्य ऑबूह्यूस परगण्याची राजधानी, देशातील प्रमुख सागरी बंदर व मोठे शहर. लोकसंख्या ४,२४,१८६ (१९८३ अंदाज) यतेबॉर्य हे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील कॅटेगॅट सामुद्रधुनीला मिळणाऱ्या यता नदीमुखखाडीवर वसले आहे. नवव्या चार्ल्‌स राजाने मध्ययुगीन वसाहतीच्या जागी या शहराची स्थापना केली (१६०३). त्याकाळी अटलांटिकमधील थेट वाहतुकीचे देशातील हे मुख्य निर्गमद्वार होते. डेन्मार्कशी झालेल्या कालमार युद्धात (१६११–१३) यतेबॉर्य उद्ध्वस्त झाले, तेव्हा गस्टाव्हस आडॉल्फस राजाने शहराची पुनःस्थापना केली व अल्पावधीतच ते प्रमुख व्यापारी केंद्र बनले. येथील बरेचसे मूळ रहिवासी डच होते. शहरावर त्यांचा ठसा विशेष जाणवतो. येथील कालव्याचीही बांधणी त्यांनीच केली. १७३१ मध्ये येथे स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. नेपोलियनच्या खंडीय नाकेबंदीमुळे उत्तर यूरोपमधील मुख्य वखार व बंदर म्हणून ब्रिटनला यतेबॉर्यचा वापर करावा लागला. तेव्हापासून हे स्वीडनचे प्रमुख बंदर बनले. १८३२ मध्ये बांधण्यात आलेला यता कालवा व येथून सुरू झालेली सागरी वाहतूक हा यतेबॉर्यच्या विकासाचा दुसरा टप्पा होय. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अटलांटिकमधील वाहतुकीचे हे प्रमुख बंदर बनले. व्यापारी व औद्योगिक दृष्ट्या यतेबॉर्य महत्त्वाचे आहे. वाहतुकीस वर्षभर खुल्या असणाऱ्या या बंदरातून कागद, लाकूड व आनुषंगिक उत्पादने यांची निर्यात, तर खनिज तेल, लोखंड व फळे यांची आयात होते. जहाजबांधणी ह्या प्रमुख उद्योगाशिवाय खाद्यपदार्थ प्रक्रिया, लोह व पोलाद, मत्स्योद्योग, गोलकधारवा, यंत्रे, मोटारगाड्या, रसायने, विद्युत्‌ उपकरणे, कातडी, कापड, साखर इ. उद्योगधंदे येथे चालतात. देशातील महत्त्वाच्या शहरांशी हे रस्ते, लोहमार्ग व यता कालव्याने जोडलेले असून नॉर्वेशी येथून सडकांनी व लोहमार्गाने वाहतूक चालते. जवळच तोर्सलँडा येथे देशातील एक मोठा विमानतळ असून तेथून अंतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक चालते. पूर्वीच्या काळची शहराभोवतीची तटबंदी स्कान्सेन लेजोनेट व स्कान्सेन क्रोनान हे किल्ले, कॅथीड्रल (१६३३), क्रिस्टाइन चर्च (१६४८) इ. प्राचीन वास्तू वा त्यांचे अवशेष येथे पहावयास मिळतात. त्यांपैकी काहींची पुनर्बांधणीही केलेली आहे. शहरात स्लॉट्स्‌कोगेन वनस्पती उद्यान, ट्राडगार्ड्‌सफोरनिंगेन उद्यान संस्था व लिसबर्ग मनोरंजनात्मक उद्यान, सांस्कृतिक, सागरी व निसर्गेतिहासरविषयक वस्तुसंग्रहालये व एक प्रशस्त क्रीडागार आहे. येथे राज्य विद्यापीठ (१८९१), चामर्झ तांत्रिक महाविद्यालय (१८२९), सागरविज्ञान संस्था व इतर अनेक विद्यासंस्था आहेत.

चौधरी, वसंत