कां : फ्रान्सच्या वायव्येकडील काल्वादोस प्रांताची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह १,५२,३३२ (१९६८). हे ऑर्न नदीवर, इंग्लिश खाडीपासून १४ किमी. आत, पॅरिसच्या वायव्येस २०० किमी. आहे. कांचा परिसर शेती व दुग्धव्यवसायासाठी विख्यात असून येथे जहाजबांधणी, रंगकाम, अँगोरा-रॅबिट हातमोजे, कापसाचे आणि लोकरीचे कापड, कातडी पदार्थ इत्यादींची कारखानदारी आहे. इंग्लंडविजेता विल्यम द काँकररचे हे आवडते निवासस्थान होते. त्याने बांधलेला पुरुषांचा मठ व त्याची पत्नी माटिल्डा हिने बांधलेला स्त्रियांचा मठ तसेच सेंट निकोलस चर्च हे अकराव्या शतकातील सर्वोत्कृष्ट वास्तुशिल्पाचे नमुने मानले जातात. दुसऱ्या महायुद्धात या शहराची फार पडझड झाली.
ओक, द. ह.