म्यूलर, जार्ज एलिस : (२० जुलै १८५०–२३ डिसेंबर १९३४). जर्मन मानसशास्त्रज्ञ, जन्म लाइपसिकजवळील ग्रिमा येथे. इतिहास व तत्त्वज्ञान या विषयांतील शिक्षण लाइपसिक व बर्लिन विद्यापीठांतून पूर्ण केल्यानंतर १८८० मध्ये गटिंगेन येथे त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. गटिंगेन येथे असताना त्यांच्यावर ⇨ रुडॉल्फ लोत्सेचा प्रभाव पडला आणि त्यांनी स्वतःला प्रायोगिक मानसशास्त्रास वाहून घेतले. १८८३ मध्ये त्यांनी गटिंगेन विद्यापीठातून ‘वेदनात्मक अवधान’ या विषयांवर प्रबंध लिहून डॉक्टरेट संपादन केली. प्रायोगिक मानसशास्त्रात त्यांना ⇨ व्हिल्हेल्म व्हुंटच्या खालोखाल महत्त्व आहे. क्यूल्पे, काट्‌झ, येन्श हे त्यांचे मान्यवर शिष्य होते. एबिंगहाऊसने ‘स्मरणा’ वर केलेले संशोधन म्यूलर आणि शूमान यांनी पुढे चालू ठेवून त्यात मोलाची भर घातली. म्यूलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानसंपादनाच्या अधिक प्रभावी पद्धती शोधून काढल्या. ते वेबर व फेक्नर यांच्या कार्याचे एक टीकाकार होते आणि त्यांनी संवेदन व मज्जाउद्दीपनाच्या संबंधाविषयी जे मूलभूत सिद्धांत प्रतिपादन केले ते पुढे व्यूहमानसशास्त्राच्या समरचना (आयसोमॉर्फी) तत्त्वामध्ये परिणत झाले. त्याचप्रमाणे त्यांनी शूमान व पिल्झेकर यांच्या सहकाराने साहचर्यात्मक व पराप्रभावी (रिट्रोॲक्टिव्ह) निरोधनाची तत्त्वे शोधून काढली. एबिंगहाऊसच्या प्रयोगपद्धतीबरोबर त्यांनी प्रयुक्ताच्या अंतर्निरीक्षणाचाही उपयोग करून प्रतिपादन केले, की ज्ञानसंपादन ही केवळ पुनरावर्तनाने होणारी यांत्रिक क्रिया नाही, तर त्यात ज्ञानसंपादनकाराचे संबोध व सक्रिय संघटनात्मक कार्यही असते. रंगदृष्टी (कलर व्हिजन), दिक्-संवेदन (स्पेस पर्सेप्शन) आणि अवधान यांविषयीचे त्यांचे संशोधन विशेष महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे दहा-बारा अनुयायी पुढे ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावले. १९२१ मध्ये ते निवृत्त झाले. गटिंगेन येथे त्यांचे निधन झाले.

पहा : प्रायोगिक मानसशास्त्र व्यूह मानसशास्त्र.

भोपटकर, चिं. त्र्यं.