म्यूज नदी : प्राचीन मोझा. फ्रान्स, बेल्जियम व नेदर्लंड्स या देशांतून सुरुवातील दक्षिणोत्तर व शेवटच्या टप्प्यात पश्चिमेस वाहत जाऊन उत्तर समुद्राला मिळणारी नदी. लांबी सु. ९२५ किमी. बेल्जियम आणि नेदर्लंड्स या देशांत ही नदी ‘मास’ या नावाने ओळखली जाते.

म्नूज नदी ईशान्य फ्रान्समधील लँग्रा पठारावर उगम पावून प्रथम उत्तरेस व नंतर वायव्य (तूला शहाराच्या पश्चिमेस) वाहत जाते. या भागात या नदीने तीव्र उताराच्या खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. व्हर्डन शहरापासून पुढे ही नदी आर्देन उच्च प्रदेशातून वळणावळणाने पुढे जाऊन, शार्ल्‌व्हील् शहराजवळ पुन्हा उत्तरेकडे वळून झीव्हे गावाजवळ ही नदी बेल्जियममध्ये प्रवेश करते. या देशातील नामुर शहराजवळ तिला पश्चिमेकडून सांब्र नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह वळण घेऊन ईशान्य दिशेने वाहू लागते. आर्देन उच्च प्रदेश ओलांडल्यावर ल्येझ शहराजवळ म्नूज नदी उत्तर दिशेला वळुन बेल्जियम व नेदर्लंड्स यांच्या सरहद्दीवरून जाऊन माझाइक गावाजवळ नेदर्लंड्समध्ये प्रवेश करते. ल्येझ शहराजवळ या नदीने खोल व अरुंद दरी निर्माण केली आहे. व्हेन्लो शहरापासून ही नदी वायव्येस वाहत जाऊन नाइमेगन शहराच्या दक्षिणेस ती एकदम पश्चिमेस वळते. पुढे तिचा  एक फाटा उत्तरेस ऱ्हाईन नदीच्या व्हाल या प्रमुख डाव्या फाट्याला, व्हाउड्रिखम येथे मिळून मेर्वेद या नावाने उत्तर समुद्राला मिळतो तर दुसरा बेर्क्स मास हा फाटा डॉर्डरेख्ट शहराच्या दक्षिणेस समुद्राला मिळते. ओल्ड मास फाटा ऱ्हाईन नदीच्या लेक या उत्तर फाट्याला मिळतो. या शेवटच्या टप्प्यात ऱ्हाईन व म्यूज या दोन नद्यांनी संयुक्तपणे त्रिभुज प्रदेश तयार केले आहेत. म्यूज (मास) नदीच्या मुख्य व मोठा प्रवाह रॉटरडॅमच्या दक्षिणेस उत्तर समुद्राला मिळतो. सांब्र, ऊर्त, गीर, रुर या म्यूजच्या प्रमुख उपनद्या आहेत.

म्यूज नदीचा उपयोग प्रामुख्याने जलवाहतूक व जलसिंचन यांसाठी करून घेण्यात आला आहे. या नदीपासून सागरी बंदरापर्यंत काढलेला कालव्यांतूनही वाहतूक केली जाते. फ्रान्समधील ट्रुसे ते झीव्हे शहरापर्यंत ही नदी ३०० टनी बोटींना वाहतुकीच्या दृष्टीने उपयोगी ठरते. यूलीआना, ॲल्बर्ट इ. मोठ्या कालव्यांनी बेल्जियममधील रॉटरडॅम, अँटवर्प व इतर बंदरे म्यूज नदीशी जोडली आहेत. यूरोपातील एक महत्त्वाचा जलमार्ग म्हणून हे कालवे प्रसिद्ध आहेत.

बेल्जियममधील म्यूज नदीखोऱ्यात, विशेषतः नामुर आणि ल्येझ शहरांच्या परिसरात, खाणकाम व अनेक उद्योगधंदे विकसित झाले आहेत. फ्रान्स व बेल्जियममधील या नदीचे खोरे पूर्वीपासूनच युद्धभूमी बनले होते त्यामुळे या नदीकाठावरील अनेक शहरांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. व्हर्डन, शार्ल्‌व्हील, नामुर, सरँ, ल्येझ, मास्ट्रिख्ट, व्हेन्लो, नाइमेगन, डॉर्डरेख्ट, रॉटरडॅम इ. या नदीकाठावरील महत्त्वाची औद्योगिक व व्यापारी केंद्रे आहेत.

चौडे, मा. ल.