मोळ :(लॅ. पेनिसेटम ॲलोपेक्युरॉस, कुल-ग्रॅमिनी). हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) व बाजरीच्या प्रजातीतील गवत भारतात (प. द्वीपकल्प, राजस्थान, मध्यप्रदेश इ.) व सिंधमध्ये सामान्यपणे आढळते. याच्या तळाशी अनेक जाड खोडांचा झुबका असून प्रत्येकाला वर फांद्या असतात व त्या सरळ वाढतात. खोडाची उंची ६०–९० सेंमी. असून त्यावर अरुंद पण लांब चिवट पाने (३० – ४० X ०·२५ – ०·४१ सेंमी) असतात व तळाशी मऊ केसांचा झुबका असतो. फुलोरा कणिशाप्रमाणे (→ पुष्पबंध), १२–१८ सेंमी लांब असतो व ऑक्टोबरात येतो. याची विशेष शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनी किंवा तृण कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. ओसाड पण भरपूर पाणी मिळेल तेथे व बांधावर हे गवत वाढते. अबूच्या पहाडावर याच्या पानांपासTन दोर करतात. पानांच्या व फुलोऱ्याच्या झाडण्या बनवितात.

पहा : गवते, ग्रॅमिनी, बाजरी.

ठोंबरे, म. वा.