मोर : याचा समावेश पक्षी वर्गातील गॅलिफॉर्मिस या गणाच्या फॅजिॲनिडी या कुळात केलेला आहे. याला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतात आढळणाऱ्या मोराचे शास्त्रीय नाव पॅव्हो क्रिस्टेटस हे आहे. भारतात हा जरी सर्वत्र आढळत असला, तरी वेगवेगळ्या भागांत याची संख्या कमीजास्त आहे. हिमालयात १,६०० मी. उंचीवरही हा आढळला आहे. श्रीलंका व बंगालादेशातही याचे वास्तव्य आहे. पॅ. म्युटिकस या जातीचा पण रंगाने हिरवा असणारा मोर प्रामुख्याने ब्रह्मदेशात आढळतो. याचा प्रसार मणिपूर, मिझोराम (चितगाँग) या भागांत विशेशेकरून आहे.

भारतातील मोरांचे वास्तव्य झुडपांच्या दाट जंगलात व विशेषतः नद्या व ओढे यांच्या सान्निध्यात असते. यांच्या लहान लहान टोळ्या असतात. खेड्यांच्या आसपास, मनुष्यवस्तीच्या नजीकही यांचे थवे आढळतात. दिवसभर भक्ष्य गोळा करीत हिंडून रात्री मोठ्या झाडांच्या फांद्यांवर ते विसावतात.

या पक्ष्याच्या नरास सर्वसाधारणपणे मोर असे म्हणतात. मादी लांडोर या नावाने ओळखली जाते. नर गिधाडाएवढा असतो, तर मादी नरापेक्षा थोडी लहान असते. नराचे डोके निळे असून त्यावर पंख्यासारखा तुरा असतो. मानेचा रंग गडद निळा व पाठीवर खवल्यासारखी बिरंजी-हिरव्या रंगाची पिसे असतात. पंखाच्या बहुतेक भागावर काळे व पिवळसर आडवे पट्टे असतात. नराला शेपटीभोवती पिसारा असतो. असा पिसारा लांडोरीला नसतो. ही शेपटीला झाकणारी पिसे लांब असून त्यांचा बनलेला पिसारा सु. ९० ते १२० सेंमी. लांबीचा असतो. त्याचा रंग बिरंजी-हिरवा असतो. पिसाऱ्यातील बहुतेक पिसांच्या टोकावर ‘डोळा’ असतो. प्रत्येक डोळ्याच्या मध्यभागी जांभळट काळ्या रंगाचा हृदयाकृती मोठा ठिपका असून तो निळ्या रंगाने वेढलेला असतो आणि त्याच्या भोवती नामवर्णी रुंद वलय असते. पिसाऱ्यात सर्वसाधारणपणे २०० च्या जवळपास पिसे असतात. शेपटी दाट तपकिरी असून खालचा भाग गडद तकतकीत हिरव्या रंगाचा असतो.

लांडोरीचे डोके तांबूस तपकिरी असून डोक्यावर तुरा असतो. वरची बाजू तपकिरी असून तीवर फिकट ठिपके असतात. पंख व शेपूट गडद तपकिरी रंगाचे असते. मानेच्या खालची बाजू हिरवी व शरीराच्या खालची बाजू पिवळसर पांढरी असते.

नराचे वजन ४ ते ६ किग्रॅ पर्यंत, तर मादीचे ३ ते ४ किग्रॅ पर्यंत असते. मोर बहुपत्नीक आहे. बहुधा एका मोराबरोबर तीन ते पाच लांडोरी असतात. आपला पिसारा एखाद्या पंख्याप्रमाणे पसरून, ताठ उभारून, पुढेमागे हालवीत आणि शरीर व अर्धवट मिटलेले लोंबते पंख थरथरवीत तो लांडोरीपुढे नाचतो किंवा ठुमकत चालतो. मध्येच थांबून पुन्हा हे नाचणे चालू असते. लांडोरीचे मन आकर्षणे हा जरी मुख्य हेतू असला, तरी स्वतःस आनंद झाला म्हणजेच तो असाच नाचतो. विणीचा हंगाम जानेवारीपासून ऑक्टोबरपर्यंत असतो. तो भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस आढळतो. सर्वसाधारणपणे मध्य व उत्तर भारतात पावसाळ्याच्या सुमारास जूनमध्ये या हंगामास सुरुवात होते व तो सप्टेंबरपर्यंत चालू असतो, दक्षिण भारतात तो प्रामुख्याने एप्रिल व मेमध्ये आणि श्रीलंकेत जानेवारी ते मार्चपर्यंत असतो. पिसारा फुलवून नाचणे हे या हंगामाचे वैशिष्ट्य आहे. विणीच्या हंगामानंतर पिसाऱ्यातील पिसे गळून पडतात. पिसे गळण्याच्या वेळाही निरनिरळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या आहेत. विणीचा हंगाम संपल्यावर मोराचे बहुपत्नीकत्व व कुटुंब संपुष्टात येते आणि मोर, लांडोऱ्या व पिले यांचे स्वतंत्र कळप आढळतात. या कळपांची स्वतःची अशी सरहद्द असते. या कळपांचे तसेच त्यातील नरांची व माद्यांची श्रेष्ठत्त्वासाठी भांडणे होतात. तसेच त्यांच्या कळपात शिरू पाहणाऱ्या नाग, ससे किंवा इतर पक्षी यांना ते हुसकून लावतात. मोर हा जात्या लाजाळू प्राणी आहे. थोडेसे अंतर जावयाचे असले, तर तो ते पायांनी चालून जातो. नदीप्रवाहाच्या किंवा जलाशयाच्या दुसऱ्या बाजूस जावयाचे असल्यास उडून जातो. सायंकाळी विश्रांतिस्थानाकडे परतताना ते जलाशयाजवळ थांबतात, त्या वेळी कधीकधी त्यांच्या समवेत वानरे, हरणे, पारवे इ. प्राणीही आढळतात.

मोर हा जात्या भित्रा असला, तरी जागरूक असतो. कसलीही चाहूल लागताच तो झुडपातून नाहीसा होतो. धान्य, वनस्पतीचे कोवळे कोंब, किटक, गोगलगाई, सरडे, पाली, साप वगैंरे त्याचे भक्ष्य आहे. मोराचे ओरडणे ‘मीऊ मीऊ’ असे किंकाळी फोडल्यासारखे असते. आकाशात ढग आले म्हणजे मोराला आनंद होतो व तो टाहो फोडू लागतो, असे म्हणतात. मोराच्या शत्रूत रानकुत्रा, चित्ता, रानमांजर, मोठी मुंगसे व गरूड यांची प्रामुख्याने गणना होते.


सुरक्षित व एकांत ठिकाणी, जमिनीवरच काटेरी झाडाझुडपामध्ये यांचे घरटे आढळते. घरट्यात काड्या, पाने वगैरे असून ते उथळ असते. यांची अंडी गोलाकार फिकट, पिवळ्या रंगाची असतात. मादी एका वेळी ४ ते ६ अंडी घालते. अंडे ७० मिमी, लांब व ५० मिमी. रुंद लांबट आकाराचे असते. सुमारे २८ दिवस मादी अंडी उबविते. पिल्ले साधारण दोन महिन्यांची होऊन उडू लागल्यावर वसतीकरिता झाडावर जातात.

ख्रिस्ती शतकापूर्वी अनेक शतके भूमध्य समुद्रालगतच्या देशांत मोरांचा प्रवेश झाला होता. ईजिप्त व आशिया मायनरचे राजे यांनी आपल्या उद्यांनात मोर बाळगले होते. हेरा या ग्रीक देवतेला मोर अर्पण केल्याचा उल्लेख आढळतो. सध्याच्या काळात जगातील सर्व देशांच्या पक्षिसंग्रहालयात व उद्यांनात मोर ठेवलेले दिसून येतात. भारतीय मोरांची परदेशात बराच काळ पैदास झालेली असल्याने त्यांच्यात काही बदल झालेले आढळून येतात. त्यांच्या शरीर प्रमाणात फारच थोडा बदल झालेला दिसतो. ते थोडे जास्त वजनदार व आखूड पायांचे असतात. मात्र त्यांच्या रंगात बदल झालेला आढळतो. विवर्णता बऱ्याचदा दिसून येते आणि संपूर्ण पांढरा मोर व अधूनमधून पांढरे झालेले भाग असलेला (पाइड) मोर ह्या अभिजाती निर्माण झाल्या आहेत. पांढऱ्या मोराच्या पाठीवरील व पिसाऱ्यावरील पिसांची ठेवण नेहमीच्या मोरासारखीच असते आणि त्याच्या सवयींत व गरजांतही काही फरक नसतो.

मोर हा भारतीयांचा आवडता प्राणी आहे आणि १९६३ मध्ये तर त्याला ‘राष्ट्रीय पक्षी’ हे अत्यंत मानाचे स्थान अधिकृतपणे मिळाले. मोरांचे सौंदर्य कोणालाही मोह पाडील असेच असल्यामुळे जगातील सर्व लोकांनाही तो आवडतो. मोराच्या सौदर्यांने प्रभावित होऊन मोगल बादशहा शहाजहान यांनी सुप्रसिद्ध मयुरसिंहासन तयार करविले असावे.

भारतात मोर फार पवित्र मानलेला आहे. स्कंद पुराणात याचा उल्लेख आहे. यजुर्वेदसंहितेत अश्वमेधाच्या वेळी दिलेल्या बळीमध्ये मोराचे नाव आहे. अथर्ववेद आणि ऋग्वेद यात लांडोरीचा उल्लेख आहे. देवांचा सेनापती कार्तिकेय आणि वाग्देवी सरस्वती यांचे मयूर हे वाहन आहे. मोराचे पीस बालकृष्णाचे शिरोभूषण होते. संस्कृत व भारतातील सर्व प्रादेशिक भाषांच्या लोककथा, लोकगीते, भक्तिगीते अशा प्रकारच्या साहित्यात मोराचे उल्लेख वारंवार आलेले आहेत. भारतातील चित्रकला, शिल्पकला, धातू व हस्तिदंत यांवरील कोरीव आणि कलाकुसरीच्या कामात आज कित्येक शतके मोराच्या प्रतिमेचा उपयोग केला जात आहे.

कविकल्पनांत व लेखनातही मोरास महत्त्वाचे स्थान आहे. मोराच्या ओरडण्यास वाङ्‌मयात ‘मधुर केकारव’ म्हणतात. केकारवात मोराच्या आवाजासारखी आर्तता गर्भित आहे. अठराव्या शतकातील मराठी कविवर्य मोरोपंतांनी आपल्या एका काव्य रचनेस केकावली हे नाव दिले आहे.

विणीच्या हंगामानंतर गळून पडणारी मोराची पिसे मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात येतात. पूर्वी ही पिसे यूरोपात व अमेरिकेत निर्यात करण्यात येत होती, परंतु त्यावर आता कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. या पिसांचा उपयोग मुख्यत्वे पंखे आणि इतर काही शोभिवंत वस्तू तयार करण्यासाठी करण्यात येतो.

जखम विषारी होऊ नये म्हणून त्या जागी हळकुंड व मोरपीस बांधतात, मोरपीस चिलमीत घालून ओढले, तर जहाल सर्प विष उतरते, अशीही काही लोकांची समजूत आहे. 

संदर्भ : Salim Ali Ripley, S. D. Handbook of the Birds of India and Pakistan, Vol. 2, Bombay, 1969.

इमानदार, ना. भा, कर्वे, ज. नी.