पेनसिल्व्हेनिया: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मध्य अटलांटिक विभागातील एक राज्य. अमेरिकेच्या पहिल्या तेरावसाहतींपैकी एक असलेल्या या राज्यासकीस्टोन असेही म्हणतात. विस्तार ३९º ४४ उ. ते ४२º १५ उ. अक्षांश आणि ७४º ४३ प. ते ८०º ३१ प. रेखांश यांदरम्यान. क्षेत्रफळ १,१७,४१२ चौ.किमी. पैकी १०३३.४ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या १,१८,६२,००० (१९७६). याच्या दक्षिणेस डेलावेअर, मेरिलंड व वेस्ट व्हर्जिनिया, पश्चिमेस वेस्ट व्हर्जिनिया व ओहायओ, उत्तरेस ईअरी सरोवर व न्यूयॉर्क राज्य आणि पूर्वेस न्यूयॉर्क व न्यू जर्सी ही राज्ये आहेत. हॅरिसबर्ग [लोकसंख्या ६८,०६१ (१९७०)] ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : पेनसिल्व्हेनियाचे भूरचनेच्या दृष्टीने आग्नेयीकडून वायव्येकडे अटलांटिक किनारपट्टीचा मैदानी प्रदेश, पीडमाँट पठार, न्यू इंग्लंडचा डोंगराळ भाग (रीडिंग प्राँग) साउथ मौंटन्स (ब्लू पर्वतरांगा), ग्रेट ॲपालॅचिअन व्हॅली, ॲपालॅचिअन पठार आणि ईअरी सरोवरालगतचे ग्रेट लेक्स मैदान असे सात विभाग पडतात. 

 

अटलांटिक किनारपट्टीचा मैदानी प्रदेश व पीडमाँट पठाराचा प्रदेश हे शेतीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. न्यू इंग्लंडचा डोंगराळ प्रदेश व ब्लू पर्वतरांग यांच्या काही भागांचा या राज्यात समावेश होतो. हे प्रदेश पीडमाँट पठार आणि ग्रेट ॲपालॅचिअन व्हॅली यांदरम्यान आहेत. ग्रेट ॲपालॅचिअन व्हॅली हा भाग नैर्‌ऋत्य-ईशान्य दिशेने पसरला आहे. पालॅचिअन पर्वतरांगेत हा भाग समाविष्ट होतो. यामध्ये ब्लू, तस्कारॉर, बाल्ड ईगल या पर्वतांचा तर लिहाय, लेबानन, कंबर्लंड या मोठ्या दऱ्यांचा समावेश होतो. या व्हॅलीच्या पलीकडे ॲपालॅचिअन पठार असून विभागाने राज्याचा निम्म्यापेक्षा जास्त प्रदेश व्यापला आहे. या विभागात जास्तीत जास्त उंची उत्तरेस ६०० मी. आहे. या पठराच्या ईशान्य भागात पोकानो पर्वत आहे. मौंट डेव्हिस (९८० मी.) हे राज्यातील सर्वोच्च शिखर याच विभागात आहे. या पठाराच्या आग्नेय भागात ॲपालॅचिअन कडा व व्हॅली ही एकमेकांस मिळतात. तो भाग येथे ‘ॲलेगेनी फ्रंट म्हणून ओळखला जातो. राज्याच्या वायव्य कोपऱ्यात ईअरी सरोवराच्या किनारी भागात ग्रेट लेक्स हा मैदानी प्रदेश आहे.

राज्याच्या पूर्व सीमेवरून वाहणारी व डेलावेअर सरोवरास मिळणारी डेलावेअर नदी, मध्य भागातील सस्क्वेहॅना आणि पश्चिमेकडील मनाँगहीला व ॲलेगेनी यांच्या संगमापासून बनलेली ओहायओ या तीन प्रमुख नद्यांनीच राज्यातील बहुतेक भागाचे जलवहन केले आहे. यांशिवाय लिहाय, स्कूलकिल, वेस्ट ब्रँच, जूनीॲटा या नद्याही महत्त्वाच्या आहेत. राज्यात नैसर्गिक व मानवनिर्मित अशी ३०० पेक्षा जास्त सरोवरे आहेत. त्यांमध्ये कॉनीऑट हे मोठे नैसर्गिक सरोवर आहे.

खनिजांबाबत हे राज्य समृद्ध आहे. कोळसा हे येथील महत्त्वाचे खनिज राज्याच्या ईशान्य व नैर्ऋत्य भागांत सापडते. खनिज तेल, नैसर्गिक वायू पालॅचिअन पठारी भागात सापडतो. यांशिवाय ग्रॅफाइट, तांबे, निकेल, क्रोमाइट, सँडस्टोन, सोने, चांदी ही खनिजे थोड्याफार प्रमाणात सापडतात.

पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या येथील खंडीय हवामानात अक्षांश, रेखांश व उंचीनुसार बदल होतो. राज्याचे जानेवारी व जुलैमधील सरासरी तपमान अनुक्रमे -६º से. ते ०º से. व १९º से. ते २४º से. असून वार्षिक सरासरी वृष्टी १०.६६ सेंमी. आहे. राज्याचा आग्नेय भाग हा सागरी वाऱ्यांच्या टप्प्यात येत असल्याने येथील हवामान उबदार व समशीतोष्ण असून वार्षिक सरासरी किमान तपमान ११ º से. असते. येथील शेतीयोग्य हवामानाचा काळ हा १७०-२०० दिवसांचा असतो. राज्याच्या नैर्ऋत्य भागात, ओहायओ नदी खोऱ्यात आणि वायव्य भागातील ग्रेट लेक्स मैदानी भागात तपमान सम  असल्याने येथील शेतीयोग्य हवामानाचा काळ अधिक असतो. मात्र उत्तरेकडील भागात जुलैमध्ये तपमान २०º से. असते, तर जानेवारीमध्ये ते -६º से. पर्यंत खाली येते. त्याचप्रमाणे उंचीवरील भागात ७-८ महिने हिमकणांचे आच्छादन असते. त्यामुळे या दोन्ही भागांत शेतीयोग्य हवामानाचा काळही ४-५ महिनेच असतो.

राज्याचा निम्म्यापेक्षा जास्त प्रदेश वनाच्छादित असून त्यात ओक, मेपल, चेरी, हिकरी, बर्च, बीच, पॉप्लर, श, पाइन, हेमलॉक, एल्म इ. प्रकारचे वृक्ष मौंटन्स लॉरेल, अझेलिया, ऱ्होडोडेंड्रॉन इ. फुलझाडे आढळतात. येथील विविध प्राण्यांमध्ये अस्वल, रानमांजर, डुक्कर, हरिण, स्कंक, वीझल, ऑपोसम, बीव्हर इ. प्राणी व पूर्व अमेरिकेतील बहुतेक सर्व पक्षी आढळतात. नद्या, सरोवरे, ओहोळ यांमधून ट्राउट, पाइक, पर्च, टर्टल, मांजरमासा इ. प्रकारचे मासे सापडतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : अमेरिकेच्या इतिहासात या राज्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंडियन हे येथील मूळ रहिवासी होत. या प्रदेशास भेट देणाऱ्या लोकांत डच, स्वीडिश, ब्रिटिश या लोकांचा अंतर्भाव होता. १६०९ मध्ये हेन्‍री हडसन हा डच प्रवासी प्रथम डेलोवेअर उपसागरात आला. १६१६ मध्ये कॉर्नीलिअस हेंड्रिक्सन व कॉर्नीलिअस याकॉप्सन या दोघांनी डेलावेअर नदीतून प्रवास केला. सतराव्या शतकाच्या पहिल्या दशकात डच आणि स्वीडिश लोकांनी येथे व्यापारासाठी ठाणी उघडली. स्वीडिश लोकांनी १६४३ मध्ये तिनिकम बेटावर पहिली वसाहत केली. १६५५ मध्ये डचांनी त्यांच्या वसाहती जिंकल्या. त्यानंतर १६६४ मध्ये इंग्रजांनी डचांचा पराभव केला. १६८१ मध्ये दुसऱ्या चार्ल्सने विल्यम पेन यास या भागाचे हक्क बहाल केले व पेन याच्या नावावरूनच यास पेनसिल्व्हेनिया हे नाव पडले. स्वातंत्र्यवादी व क्वेकर पंथीय पेनने स्वदेशात आपल्या हक्कांस पारखे झालेल्या आणि विविध धर्मांच्या लोकांना राजकीय व  धार्मिक स्वातंत्र्य आणि समान आर्थिक संधी मिळावी हा आदर्श ठेवून या वसाहतीची स्थापना केली. १६६२-८४ मध्ये पेनने स्वत: अमेरिकेत येऊन वसाहतीची संघटना केली. १७२७-७६ पर्यंत इंग्रज, आयरिश, स्कॉटिश, डच इ. लोकांच्या आगमनामुळे येथील लोकसंख्या वाढली. शेती व इतर अनेक उद्योगांचा येथे विकास होऊन फिलाडेल्फिया हे राजधानीचे शहर मोठी बाजारपेठ बनले. याप्रकारे या वसाहतीचा विस्तार पश्चिमेकडे होऊ लागला. त्यास इंडियन व फ्रेंच यांनी विरोध करून फ्रेंचांनी पिट्सबर्ग शहरी दूकेन हा किल्ला बांधला त्यामुळेच फ्रेंचांचे व इंडियनांचे ब्रिटिशांशी युद्ध झाले. जॉन एडवर्ड ब्रॅडक याच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याचा फ्रेंचांनी पराभव केला. परंतु नंतर ब्रिटिश सरकारने वसाहतकऱ्यांना अधिक प्रमाणात शस्त्रपुरवठा केल्याने फ्रेंचाचा पराभव होऊन त्यांना १७५९ मध्ये हा प्रदेश सोडून जावे लागले. १७६३ मध्ये इंडियनांशी पुन्हा ब्रिटिश वसाहतकऱ्यांचे युद्ध होऊन त्यात इंडियनांचा पराभव झाला. सरहद्दीबाबतही शेजारच्या राज्यांशी संघर्ष झाला. फिलाडेल्फियात १७७४ व १७७५ मध्ये काँटिनेंटल काँग्रेस भरून १७७६ साली स्वातंत्र्याचा जाहीरनामा येथूनच प्रसृत झाला. स्वातंत्र्ययुद्धातील काही महत्त्वाच्या लढाया याच राज्यात झाल्या. १७७६ मध्ये पेनसिल्व्हेनियाने राज्याची घटना बनविली. देशाच्या घटनासमितीने घटना तयार केली व तीवर दुसरी सही या राज्याने केली. फिलाडेल्फिया ही देशाची राजधानी १७९० ते १८०० पर्यंत होती. १७५० पासून लोखंडाच्या उद्योगात राज्याने जी प्रगती केली ती पुढे कायम राखली. औद्योगिकीकरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर, वाहतुकीत सुधारणा इ. दृष्टींनी राज्याची प्रगती उत्तरोत्तर होत राहिली. दोन्ही महायुद्धांत राज्यातील कोळसा, खनिज तेल, लोह खनिज इत्यादींना फारच महत्त्व प्राप्त झाले. युद्धोत्तर काळात राज्याने नव्या उद्योगांचा विकास, शिक्षणाची राज्याच्या गरजांशी सांगड, शहरांची आरोग्यदृष्ट्या फेररचना इ. कार्यक्रम हाती घेतले आहेत.

 

राज्याची घटना १७७६, १७९०, १८३८ व १८८३ अशी चार वेळा बनविण्यात आली व नंतर १९६८ मध्ये तिच्यात दुरुस्ती करण्यात आली. सध्याच्या घटनेनुसार चार वर्षांसाठी निवडलेले गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर, खजिनदार आणि ऑडिटर जनरल तसेच सीनेटच्या संमतीने गव्हर्नरने नेमलेले इतर खातेप्रमुख यांच्यामार्फत राज्याचा कारभार चालतो. जनरल असेंब्लीच्या सीनेट व प्रतिनिधिसभा या विधिमंडळांत अनुक्रमे चार वर्षांसाठी निवडलेले ५० सीनेटर व दोन वर्षांसाठी निवडलेले २०३ प्रतिनिधी असतात. राज्यातून काँग्रेसवर २ सीनेटर व २५ प्रतिनिधी निवडून दिले जातात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे ६७ काउंटींमध्ये विभाजन केले आहे.

 

सर्वोच्च न्यायालय, वरिष्ठ न्यायालय आणि कॉमनवेल्थ न्यायालय या तीन प्रमुख न्यायालयांचे प्रत्येक सात न्यायमूर्ती १० वर्षांच्या मुदतीसाठी निवडलेले असतात. यांशिवाय इतर विविध न्यायालये असून त्यांमार्फत येथील न्यायकारभार चालतो.

 


आर्थिक व सामाजिक स्थिती : राज्याच्या अर्थव्यवस्थेत विविधता आढळते. येथील नैसर्गिक साधनांची विपुलता, सुपीक जमीन, जलमार्गांची सोय, समुद्रकिनारी भागातील या राज्याचे स्थान यांमुळे राज्याच्या आर्थिक विकासास गती मिळाली आहे. निर्मितिउद्योग, शेती, खाणउद्योग, व्यापार यांचा राज्याच्या आर्थिक विकासात फार मोठा वाटा आहे. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इ. खनिजांच्या विपुलतेमुळे देशातील औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्यांपैकी हे एक बनले आहे. येथील सु. १७,००० उत्पादनसंस्थांत ३०० च्यावर विविध वस्तूंची निर्मिती होते. फिलाडेल्फिया आणि पिट्सबर्ग ही दोन महत्त्वाची उद्योगकेंद्रे आहेत. लोखंड-पोलाद उद्योग हा प्रमुख असून देशाच्या १/३ लोखंड-पोलादाचे उत्पादन या राज्यात होते. राज्यातील पोलाद उत्पादनाच्या ३/४ उत्पादन पिट्सबर्ग विभागात होते. तद्वत ॲल्युमिनियम उद्योगही महत्त्वाचा असून तो किंग्स्टन भागात केंद्रित झाला आहे. याशिवाय अन्नप्रक्रिया, सुती कापड, रसायने, विजेची आणि इतर यंत्रसामग्री, प्लॅस्टिक, रबर, जहाजबांधणी, कातडी वस्तू इ. उद्योगांत हे राज्य आघाडीवर आहे. दुग्धपदार्थ उत्पादनास नव्यानेच महत्त्व प्राप्त झाले असून आइसक्रीम आणि तदानुषंगिक उत्पादनांत या राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो. सतराव्या शतकाच्या शेवटी शेती उत्पादनात हे राज्य आघाडीवर होते त्यामुळे त्यास अमेरिकेचे ब्रेडबास्केट म्हणत. १९७५ मध्ये सु. ७२,००० शेते होती. त्यांनी प्रत्येकी सु. ५६ हे. क्षेत्र व्यापले होते. येथे तंबाखू, अळंबे, बार्ली, गहू इ. पिके घेतली जातात. यांशिवाय सफरचंद, पीच, द्राक्षे या फळांच्या उत्पादनात हे राज्य आघाडीवर आहे. गुरे व त्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनाने राज्याच्या विकासास चांगलाच हातभार लावला आहे.

 

दळणवळण साधनांची या राज्यात चांगली प्रगती झाली आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये आधुनिक महामार्गांची उत्तम सोय आहे. राज्यात १९७५ मध्ये १,८४,९८६ किमी. लांबीचे रस्ते, १३,८१३ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. फिलाडेल्फिया आणि पिट्सबर्ग येथील विमानतळ आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून या राज्यात ५०० च्यावर विमानतळ आहेत. डेलावेअर, ओहायओ व सस्क्वेहॅना या नद्यांतून  जलवाहतूक  चालत  असून  फिलाडेल्फिया,  पिट्सबर्ग,  ईअरी  ही  प्रमुख  बंदरे  आहेत.  जगातील  पहिले नभोवाणीकेंद्र १९२० मध्ये पिट्सबर्ग येथे सुरू झाले. राज्यात १९७५ मध्ये ३३ दूरचित्रवाणी केंद्रे, २८१ नभोवाणी केंद्रे, १०८ दैनिके आणि ३४२ साप्ताहिके होती. अमेरिकन वीकली मर्क्युरी, फिलाडेल्फिया इन्क्वायरर, ईव्हनिंग बुलेटिन, पिट्सबर्ग पोस्ट-गॅझेट, बेथलीएम ग्लोब टाइम्स ही राज्यातील जास्त खपाची व प्रसिद्ध दैनिके आहेत. यांशिवाय टुडेज स्पिरिट. सेंटर डेली टाइम्स, बीव्हर काउंटी टाइम्स ही महत्त्वाची वृत्तपत्रे आहेत. राज्यातील एकूण लोकसंख्यापैकी ७१.५ % लोक शहरी भागात राहतात. वसाहत काळापासून धार्मिक स्वातंत्र्य असल्यामुळे पेनसिल्व्हेनियात १०० च्या वर धार्मिक समूह असून त्यांची सदस्यसंख्या सु. ६० लाखांच्यावर, तर चर्चसंख्या १० हजारांवर आहे. रोमन कॅथलिक हा येथील प्रमुख ख्रिस्ती पंथ असून राज्यातील चर्चच्या सदस्यसंख्येच्या ४० % लोक या पंथाचे आहेत. क्वेकर, प्रेसबिटेरियन, मेथडिस्ट, ग्रीक ऑर्थोडॉक्स, ल्यूथरन, एपिस्कोपल, बॅप्टिस्ट इ. पंथांचे तसेच ज्यू लोकही आहेत. ८-१७ वर्षे वयोगटातील मुलांस शिक्षण सक्तीचे आहे. १९७५-७६ साली प्राथमिक शाळांत १४,३५,४८८ विद्यार्थी व माध्यमिक शाळांत १२,३८,५३८ विद्यार्थी होते. राज्यात १२ विद्यापीठे व १२५ च्यावर महाविद्यालये आहेत. १९७६ मध्ये राज्यातील २४७ रूग्णालयांत ५५,१०९ खाटांची सोय होती.

 

राज्यात अनेक ग्रंथालये आहेत. फिलाडेल्फिया ऑर्केस्टापिट्सबर्ग सिंफनी ऑर्केस्ट्रायांचा देशातील प्रमुख वाद्यवृंदांत समावेश होतो. चार्ल्स विल्सन पील व त्याचे रॅएल आणि रेम्ब्रँट हे दोन पुत्र, बेंजामिन वेस्ट, मेरी कसॅट, टॉमस एकिन्झ इ. प्रसिद्ध कलांवत या राज्यातीलच होत. फिलाडेल्फियातील कॉल्डर कुटुंबीय शिल्पकलेत प्रसिद्ध होते फिलाडेल्फियात नववर्षदिनी ममर्स परेड, हॅरिसबर्ग येथे जानेवारीत फार्म शो हे उत्सव साजरे होतात. यांशिवाय राज्यात अनेक सांस्कृतिक आणि रंजनपर कार्यक्रम होतात. मन्‍रो काउंटीतील डेलावेअर वॉटर गॅप, टायओग काउंटीतील पाइन ग्रीक गॉर्ज, पोकानो पर्वताचा परिसर इ. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेली स्थाने फिलाडेल्फियातील स्वातंत्र्यभवन, कार्पेंटर्स हॉल, गेटीझबर्ग नॅशनल मिलिटरी पार्क, फोर्ट नेसेसिटी नॅशनल बॅटलफील्ड, वॉशिंग्टन क्रॉसिंग स्टेट पार्क यांसारखी इतिहासप्रसिद्ध स्थानेलेगेनी नॅशनल फॉरेस्ट व इतर अनेक उद्याने फाउंडर्स हॉल, कॅथीड्रल इ. प्रसिद्ध वास्तू फिलाडेल्फिया, पिट्सबर्ग, हॅरिसबर्ग, जेफर्सन, ईअरी, बेथलीएम इ. औद्योगिक दृष्ट्या प्रसिद्ध शहरे पर्यटकांना आकर्षित करतात.

 

ओक, शा. नि. गाडे, ना. स. फडके, वि. शं.