मोतेत : चर्चमधील समूहगानाचा प्रकार. तेराव्या शतकात तो उगम पावला. ‘कॉन्डक्टस’ (बाराव्या-तेराव्या शतकांतील, चर्चसंगीतातील एक रचनाप्रकार. या कालखंडात रचना करणे, म्हणजे आधीच उपलब्ध असलेल्या स्वरधुनीला अधिक ‘आवाजां’साठी असलेल्या संगीताची जोड देणे. अशी नवरचित धुन ‘प्लेन साँग’ प्रकारात नसून लौकिक संगीतातील वा नवीन असेल, तर तिला ‘कॉन्डक्टस’ म्हणत). या धर्मसंगीतप्रकारास मागे टाकून, सोळाव्या शतकानंतर त्याच्या दुसऱ्या अवस्थेत तो जास्त प्रभावी ठरला. मूळ फ्रेंच ‘मोत’ (म्हणजे शब्द) या संज्ञेवरून मोतेत ही संज्ञा निर्माण झाली. ही बहुधुनपद्धतीची संगीतरचना असून, त्यात सुरुवातीपासून विभिन्न दिशांनी जाणाऱ्या स्वरावली एकत्र वापरण्यास अधिक मुभा होती. निरनिराळ्या रचनाभागांमधील स्वरांचे कालमूल्यही विविध व अधिक दीर्घ पल्ल्याचे होते. ⇨ जोव्हान्नी पॅलेस्ट्रीना (१५२५–९४) व विल्यम बर्ड (१५४३–१६२३) यांच्या काळी मोतेत हे सांगीतिक अविष्काराचे प्रमुख साधन गणले जात होते. मोतेत म्हणजे आज उपासनेत नसलेल्या लॅटिन भाषिक, चर्चमधील व समूहगानप्रकार-पद्धतीच्या रचना असा वर्तमान अर्थ रूढ आहे. धर्मोपासनेच्या परंपरेनुसार जिथे विशिष्ट संहितेचे गायन करण्याचा आदेश नसतो तिथे मोततचा उपयोग केला जातो, असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
संदर्भ :Mathiassen, Finn, The style of the Early Motet, Copenhagen, 1967.
रानडे, अशोक