मोझेल नदी : फ्रान्स व प. जर्मनी या देशांतून सामान्यपणे दक्षिणोत्तर वाहणारी ऱ्हाईन नदीची उपनदी. लांबी सु. ५१५ किमी. ईशान्य फ्रान्समध्ये व्होज पर्वतातील बालों दाल्झास शिखराच्या उतारावर ही नदी उगम पावून सुरुवातीला वायव्य दिशेने वाहत जाते. हा प्रदेश वालुकाश्म व स्फटिकी खडकांचा बनलेला असून, नदीने या भागात खोल दऱ्या तयार केल्या आहेत. पुढे तूल शहराजवळ ही नदी वळण घेऊन ईशान्येस वाहू लागते. या दिशेने सु. १६ किमी. गेल्यावर तिला मर्त नदी मिळते. मर्त मोझेल यांचा संयुक्त प्रवाह प्रथम वायव्येला म्यूज नदीला मिळत असे, परंतु तीव्र उतार व तीव्र खनन यांमुळे मोझेल नदीचा स्वतंत्र प्रवाह बनला व तो उत्तरेस वाहू लागला. मूळचे नदीखोरे ’तूल गॅप’ या नावाने ओळखले जाई. सांप्रत या खोऱ्याचा उपयोग कालव्यासाठी करण्यात आला आहे. मर्त नदीसंगमानंतरचा मोझेल नदीप्रवाह पश्चिमेस चुनखडकाचे पठार असलेल्या गाळाच्या रुंद प्रदेशातून जातो. या भागात नदीकाठावर पाँत-आ-म्यूसों, आगोंदांझ, त्योंव्हील, मेट्स इ. औद्योगिक शहरे आहेत. त्योंव्हीलच्या पुढे सु. ४८ किमी. नदीप्रवाह ईशान्य दिशेने वाहत जाऊन फ्रान्सच्या सरहद्दीवरील शेंगन शहरापासून व्हास्‌राबिलिख शहरापर्यंत सु. ३७ किमी. प. जर्मनी व लक्सेंबर्ग यांच्या सरहद्दीवरून जातो. हा बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे. या भागात लक्सेंबर्गमधील बहुतेक सर्व पूर्ववाहिनी नद्या मोझेल नदीला मिळतात. त्यांत प्रामूख्याने स्यूर नदीचा समावेश होतो. व्हास्‌राबिलिखच्यापुढे ही नदी प. जर्मनीत प्रवेश करते. या देशातून सु. १२८ किमी. वाहताना ट्रीर शहराजवळ आग्नेयीकडून तिला झार नदी मिळते. या संगमानंतर मोझेल नदी ऱ्हाईन उच्चप्रदेशातील आयफेल व हुन्सऱ्यूक पर्वत रांगांतून वाहत जाऊन कोब्लेंट्स शहराजवळ ऱ्हाईन नदीला दक्षिणेकडून मिळते. या खोऱ्यात उत्तर भागात नदीकाठावर पाइन वृक्षांची अरण्ये, तर दक्षिण भागात द्राक्षांचे मळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. मोझेल ’वाइन’ निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले बेर्नकास्टल शहर याच भागात आहे. मोझेल नदील मॅडोन, ऑर्न, स्युर या नद्या डावीकडून तर मर्त, से, झार इ. नद्य उजवीकडून मिळतात.

तीव्र उतार, वळणे, कमी-जास्त खोली, गाळ यांमुळे मोठ्या बोटींच्या वाहतुकीसाठी ही नदी सर्वत्र फारशी उपयुक्त नाही परंतु नदीच्या वरच्या भागात लहान बोटींतून वाहतूक चालते. फ्रान्समधील फ्रूआर शहराजवळ तसेच नदीपासून काढलेल्या कालव्यांमधून ऱ्हाईन, म्यूज, सेन इ.नद्यांपर्यंत जलवाहतूक केली जाते. मेट्स ते त्योंव्हील यांदरम्यान १९३२ पासून नदीपात्रातून ३०० टनी बोटींची वाहतूक सुरू झाली आहे तर १९६४ पासून मेट्‌स अणि नदीमुखाजवळील कोब्लेंट्‌स यांना जोडणाऱ्या कालव्यातून १,५०० टनी बोटी वाहतूक करतात. या कालव्याची देखभाल फ्रान्स, लक्सेंबर्ग व प. जर्मनी यांच्या त्रिपक्षीय प्राधिकरणामार्फत केली जाते.

जंगल उत्पादने, खनिजे वीजनिर्मिती, मद्यनिर्मिती, औद्योगिक शहरे इत्यादींसाठी मोझेल नदीखोरे प्रसिद्ध असून नॅन्सी, मेट्स, त्योंव्हील (फ्रान्स) ट्रीर, कोब्लेंट्स (प.जर्मनी) इ. या नदीकाठावरील शहरे औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहेत.

चौंडे, मा. ल.