मोग्गलिपुत्त तिस्स: (इ. स. पू. तिसरे शतक). प्रख्यात बौद्ध भिक्षू. स्थविरवादी संप्रदायातील पारंपरिक समजुतीप्रमाणे हा अशोकाच्या काली जी तिसरी धर्मसंगीती झाली तिचा अध्यक्ष होता. हा ‘अहो-गंगा’ पर्वतावर सात वर्षे एकान्तवासात राहत असताना अशोकाने निमंत्रण पाठवून त्याला मुद्दाम बोलावून घेतले व त्याच्या मदतीने धार्मिक क्षेत्रात जो गोंधळ माजला होता तो साठ हजार ढोंगी लोकांच्या हकालपट्टीने नष्ट केला. मोग्गलिपुत्त तिस्साबाबतची महावंसात माहिती आली आहे. त्यानुसार तो पाटलिपुत्र येथील ब्राह्मण होता व वयाची केवळ सोळा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्याने तीन वेदांचे व इतर शास्त्रांचे अध्ययन पूर्ण केले होते. थेर सिग्गवाने त्याला बौद्ध धर्मात आणले. अल्पावधीतच तिस्साने अर्हत्त्त्व मिळवले. त्याच्याच प्रभावाने अशोकाने आपला पुत्र वा बंधू महिंद्र व कन्या वा बहीण संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवले आणि हे संपूर्ण बेट बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले. ह्याच्याच उत्तेजनाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता अशोकाने मध्य देशाच्या बाहेर धर्मदूत पाठविले. ह्याच संदर्भात काश्मीर, गांधार, हिमवंत प्रदेश, अपरांतक (कोकण), महाराष्ट्र, महिसमंडळ (म्हैसूर), बनवासी (उत्तर कानडा), ताम्रपर्णी द्वीप (श्रीलंका) आणि सुवर्णभूमी (ब्रह्मदेश व आग्नेय आशियातील देश) वगैरे देशांत व परदेशांत बौद्ध धर्मप्रचारक गेले असा उल्लेख महावंस, समन्तपासादिक इ. ग्रंथांत आला आहे. तिस्साच्या अध्यक्षतेखालील ह्या संगीतीतच धर्मप्रचाराची महत्त्वाकांक्षी योजना आखली जाऊन त्यासाठी एक हजार भिक्षूंना धर्मप्रचाराचे योग्य ते शिक्षणही दिले. ‘त्रिपिटका’ च्या संकलनाचे कामही ह्या नऊ महिने चाललेल्या संगीतीतच पूर्ण झाले. तिस्साचा कथावत्थु पकरण हा प्रमाणभूत ग्रंथ म्हणून ह्या संगीतीने मान्य केला. त्यात पाखंडवादाची मार्मिक चिकित्सा करून तो साधार खोडून काढला आहे.
पहा : बौद्ध धर्म.
बापट, पु. वि.