मैकल : भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक पर्वतश्रेणी. ‘मेकल’ या नावानेही ही पर्वतश्रेणी ओळखली जाते. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २१° ११ उ. ते. २२° ४० उ. व ८०° ४६ पू. ते ८१° ४६ पू. यांदरम्यान. साधारण उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली मैकल पर्वतरांग म्हणजे विंध्य व सातपुडा ह्यांना जोडणारा दुवा आहे. त्रिकोणाकृती सातपुडा पर्वतरांगेचा मैकल हा पूर्वेकडील पाया समजला जातो. सर्वसाधारणपणे हिची उंची ६१० मी. पेक्षा अधिक आढळत नाही. मात्र त्यातील लाफा टेकडीची उंची १,०६७ मी. आहे. सातपुडा-मैकल हा भारतातील हिमालयाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा जलविभाजक असून, त्यातील अमरकंटक या तीर्थस्थानाजवळ नर्मदा नदी उगम पावते. ती मैकलकन्या नावाने प्रसिद्ध आहे. तिच्याशिवाय सोन, पांडू, कनहार, रिहांड, बिजुल, गोपाड, बनास इ. नद्या या जलविभाजकात उगम पावतात. या पर्वतश्रेणीमध्येच २,२७९ चौ. किमी. विस्ताराचे व ६०० ते ९०० ममी. उंचीचे वनाच्छादित मैकल पठार आहे. या पठारी भागात जांभा खडकांचे बरेच आच्छादन आहे. पूर्वी मेकल नावाचे एक जनपदही होते. या जनपदात राहणाऱ्या लोकांना मेकल असे म्हटले जाई. या प्रदेशावर जयबल, वत्सराज, नागबल, भरतबल इ. पांडववंशी राजांनी राज्य केल्याचे काही शिलालेखांवरून दिसते. पाचव्या शतकात मेकलांचे राजे वाकाटकांचे मांडलिक बनले होते. चौथ्या व पाचव्या शतकांत या भागात दाट लोकवस्ती होती, अशा स्थानिक आख्यायिका आहे.

साग, साल, गवत व काटेरी वनस्पती या डोंगराळ प्रदेशात आढळत असून, त्यांदरम्यानच्या सुपीक खोऱ्यात शेती केली जाते. गहू, तांदूळ, हरभरा, ज्वा री, सातू, मका, तीळ, मोहरी, कडधान्ये ही येथील प्रमुख कृषिउत्पादने आहेत. सिमेंट, मातीची भांडी, विटा, कौले, काच, दगडी कोरीव वस्तू, लाकडी साहित्य, लाखेच्या वस्तू, पीठ, तेल काढणे इ. उद्योगधंदे या प्रदेशात चालतात. कोळसा, चुनखडक, बॉक्साइट, कुरविंद, डोलोमाइट, संगमरवर, स्लेट, वालुकाश्म इ. खनिजद्रव्ये मैकलच्या परिसरात सापडतात. बालाघाट, मंडला, नैनपूर व डिंडोरी ही मैकल पर्वतप्रदेशातील प्रमुख नगरे आहेत. मंडला (गोंड राजांची राजधानी) येथील किल्ला, रामनगर येथील राजवाडा व कन्हा राष्ट्रीय उद्यान ही या भागातील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. या प्रदेशातील गोंड ह्या मुख्य जमातीशिवाय हल्बा , भराई, बैगा व कोरकू या जमातींचेही लोक आढळतात.

चौधरी, वसंत